नवीन लेखन...

उगाच काहीतरी – १८ (जाहिराती)

तसं जाहिरातींबद्दल बोलायची माझी पामराची लायकी नाहीये. जाहिराती म्हणजे 63 की 64वी कला वगैरे काय काय म्हटलं जातं.

ह्या जाहिरातींचा एक प्रकार आहे पोस्टर्स होर्डिंग्स वगैरे वगैरे.

आता यामागे सांगण्यासारखं काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडेल. जी वस्तू विकायची आहे त्याची जाहिरात होर्डिंग किंवा पोस्टर वरून केली. बस संपलं त्यासाठीच जाहिरात असते. तरीपण काही गोष्टी मला विचारात पडतात. आता एवढा रिकामटेकडा विचार करायची गरज नाहीये ही गोष्ट तितकीच खरी पण येतो त्याला आपण काय करणार.

मुंबई आणि आसपासच्या शहराच्या रस्त्यांवर जर तुम्ही फिरला तर शंभरातले नव्वद होर्डिंग्स हे कुठल्यातरी बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्सची जाहिरात करणारे असतात. प्रत्येकाचा मथितार्थ एकच असतो की बस आमच्या कॉम्प्लेक्समध्ये घर घेतलं की तुमच्या जीवनातल्या सगळे प्रश्न सुटत जातात. म्हणजे गार्डन, क्लब, स्विमिंग पूल, मार्केट, मुलांच्या शाळा, वयस्कर लोकांसाठी मंदिर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार असतात. प्रश्न फक्त एकच राहतो की त्या घराचा ई. एम. आय तुम्ही रिटायरमेंट नंतरही किती वर्षे फेडावा लागेल.

त्या कॉम्प्लेक्सची जाहिरात, त्याचं नाव आणि त्यावर दिलेला पत्ता ते अशा पद्धतीने आकर्षक असतं की समोरच्याला वाटतं की वाह!!
पण…. रुको जरा.. सबर करो..

त्या भल्यामोठ्या चित्राखाली बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ‘आर्टिस्ट इंप्रेशन’ त्याचा अर्थ असतो की जे काही चित्र दिसतंय ते तसच असेल असं नाही. ही आमच्या आर्टिस्टची कल्पना आहे.

तोच प्रकार पत्त्यांच्या बाबतीत नॉर्थ ठाणे, अप्पर ठाणे या नावाचे कॉम्प्लेक्स ठाण्यापासून किमान दहा ते वीस किलोमीटर दूर असतात. न्यू कफ परेड नावाचा कॉम्प्लेक्स वडाळ्याला असतं आणि न्यू बीकेसी म्हणून ज्या भागाची जाहिरात केली जाते त्याच्याखाली कंसात बारीक अक्षरात भिवंडी कल्याण कॉरिडोर असं लिहिलेलं असतं. आपली डोंबिवली अशी जाहिरात केलेल्या कॉम्प्लेक्स पर्यंत डोंबिवली स्टेशन वरून निघालात तर प्राण कंठाशी येतील. माझ्याकडे आताच्या घडीला स्क्रीनशॉट सेव्ह केलेल्या एका जाहिरातीत म्हटलंय “” क्लोज टू लंडन, १२० मिनिट्स फ्रॉम चेंबूर ‘ एकूण तो प्रोजेक्ट कर्जत ला आहे.

आपल्याकडे इमारतीची जाहिरात करताना त्यात गोरे लोक घ्यायची काय एवढी हौस असते काय कळत नाही. कोणत्याही बिल्डरचा ब्रोशर उघडा किंवा त्यांचा डेमो व्हिडीओ बघा सगळे गोरेच दिसतील.

सगळ्यात कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी लोकलमध्ये चिकटवलेल्या एका पोस्टर वर दिवा की वसई कुठल्या भागातल्या चाळीच्या जाहिरातीत त्याने अख्खं गोरं कुटुंबच दाखवलं होतं. मी जाम दचकलो. म्हणजे ब्रेक्झिट मुळे इंग्लंडची परिस्थिती इतकी डबघाईला गेली की तिथल्या नागरिकांना दिवा वसई भागात चाळीत येऊन राहावं लागतय?? असो..

दुसरे सगळ्यात जास्त पोस्टर दिसतील ते कपड्यांच्या जाहिरातींचे. त्यात एक मला कळत नाही की स्त्रियांच्या कपड्यांच्या जाहिरातीतल्या ज्या स्त्रिया घेतात त्या एकदम अशा हसतमुख आणि आनंदी दिसतात तेच पुरुषांच्या कपड्याच्या जाहिरातीतले पुरुष बघा अशा त्रासिक चेहऱ्याने उभे असतात चेहऱ्यावर जराही हास्य दिसायला नको असं जणू यांच्याकडून अग्रिमेंट करून घेतलं असावं. आता त्यांना अभिप्रेत असलेल्या मॅस्क्यूलिनटी चा आणि थोबाडावर 12 वाजल्याचे एक्सप्रेशन देण्याचा काय संबंध आहे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण एक गोष्ट आहे शंभरातले नव्वद पोस्टर्स मधल्या पुरुषांना त्या जुन्या जमान्यातले राजेशाही कपडे घातलेले दाखवलं जातं त्यामुळे ते कावून जात असावेत. असे कपडे लग्नाशिवाय कोण घालतं हो रोज. आणि काही स्त्रियांच्या कपड्यांच्या जाहिरातीत त्यांचे कपडे शोधावे लागतात.

एक मात्र आहे की बिल्डिंगचे कॉम्प्लेक्स आणि पुरुषांच्या कपड्यांची नावे जेवढी इंग्रजी तेवढ्या त्यांच्या किमती जास्त. याउलट स्त्रियांच्या कपड्यांच्या दुकानांची नावे जेवढे सांस्कृतिक तेवढे त्यांच्या किमती जास्त.

काही जाहिराती पेपरमध्ये असतात नेहमीच. त्यातली एक म्हणजे निसर्गाच्या कुशीत आपला स्वतःच विकेंड होम घ्या. या निसर्गाच्या कुशीत घर विकणाऱ्या बिल्डर्सनी निसर्गाच्या कुशीची पार वाट लावून टाकली आहे. दिसला सुंदर भाग की कर जाहिरात बांध घरं आणि कर सत्यानाश त्या भागाचा असं चाललंय. आणि जितका वेळ तुमचे सगळे कागदपत्र प्रोसेसिंग व्हायला आणि ती जागा तुमच्या नावावर व्हायला आणि तिथे घर बांधायला जेवढा वेळ लागतो त्या वेळेमध्ये त्या निसर्गाच्या कुशीमध्ये अजून दहा बिल्डरांनी आणखी शेकडो लोकांना जागा विकलेल्या असतात आणि मग तुमचं विकेंड होम म्हणजे इतर वीकेण्ड होम च्या कुशीत तुमचेही एक विकेंड होम असं होऊन गेलेलं असतं आणि निसर्गाची ती कुस ह्या सगळया गेटेड कॉम्प्लेक्स ने उजळून गेलेले असते. निसर्ग काही राहिलेला नसतो.

माझ्या नेहमीच्या रस्त्यावर एक मोठं होर्डिंग होतं ज्यामध्ये अभिनेत्री काजोल अतिशय त्रासिक चेहऱ्याने आणि रागाने अशी आपल्याकडे बघत असे. मला तर होर्डिंग चा अर्थच काही कळत नव्हता. एक दिवस नेमकी तिथेच ट्राफिक जाम झाली आणि नीट बघितलं तर ती एका ज्वेलर्स ची जाहिरात होती आणि काजलच्या कानातले हा एवढाच दागिना त्याच्यामध्ये दिसत होता.

महाराष्ट्रात सगळीकडे सगळ्या चहाच्या आणि नाश्त्याच्या टपऱ्यांवर एक वाक्य नेहमी आढळतं ‘चहा व नाश्त्याची उत्तम सोय’ – काही ठिकाणी तर बऱ्यापैकी उत्तम असते सोय पण बऱ्याच ठिकाणी उत्तम आणि सोय याचा दूरदूरपर्यंत काही संबंध नसतो. तुम्हाला चहा मिळते हे तुमचं नशीब.
त्यात हॉटेलवाल्यांना खोडी असते. ते जाहिरात करतात ‘घरगुती जेवणाचा आस्वाद’. आता मला सांगा घरगुती जेवणाचा आस्वाद मी घरीच घेईन ना हॉटेलात कशाला जाईल मला हॉटेलातला आस्वाद पाहिजे असतो म्हणून मी हॉटेलात जातो. एकवेळ मेस वाल्यांनी हे वाक्य लिहिलं तर चालू शकतं पण हॉटेल?? काही विचारू नका. त्यात अजून जे मोठे हॉटेल्स असतात राहायची सोय असलेले किंवा स्टार हॉटेल्स त्यांच्या जाहिराती अजून निराळ्याच ‘गिविंग यु होमली फिलिंग. ‘ असलं काही वाचलं की धसकाच बसतो होमली फिलिंग म्हणजे हॉटेलमध्ये आपल्या रूम मध्ये क्लीनिंग ला हाउसकीपिंग वाली आली की काहीतरी उखाळ्यापाखाळ्या सांगत बसेल. जेवण घेऊन वेटर आला की तो काहीतरी उद्या फी भरायची आहे जरा पैसे लवकर देऊन टाका असं काहीतरी सांगत बसेल असं वाटतं. त्यामुळे मी कधी त्या होमली फिलिंगवाल्या हॉटेलमध्ये जातच नाही काय उगाच घरांमधून उठून घरातच गेल्यासारखे जायचं. ( परवडत नाही हे सांगण्यापेक्षा हे असं काही सांगितलेलं बरं असतं.)

काही वर्षांपूर्वी म्हणजे ऐश्वर्या राय किंवा सुष्मिता सेन यांचा बोलबाला होता त्या काळात अंधेरी च्या मरोळ भागात एक मसाज करणाऱ्या पैलवानाचे दुकान होतं त्यात त्यांना तेल लावून मसाज करून हाडं जोडणारे देण्याचे. दुकानाच्या समोर बोर्डवर एक पेंटिंग बनवून घेतलं होतं दुकानाच्या नावासकट. त्या जाहिरातीत त्याने सरळ ऐश्वर्या रायलाच हात फ्रॅक्चर होऊन गळ्यात लटकवलेला दाखवलं होतं. आणि विशेष म्हणजे ती चांगली बत्तीशी काढून हसतांना दाखवलेली होती. आणि खाली याच्या दुकानाचे नाव लिहिलेलं होतं. मी त्या रस्त्याने जाताना ती जाहिरात पाहून रोज खदखदून हसायचो.

त्या दिवशी नाशिक मध्ये एक बोर्ड वाचला. “” पुणेरी चवीचा वडापाव मिळेल”” काय???? मतलब कुछ भी?? ( हा शब्द त्या एका ओरडणाऱ्या पत्रकाराच्या आवाजामध्ये इमॅजीन केला तर जास्त मजा येईल)

अरे वडापावचा उगम कुठला? तो खपतो कुठे ?? आणि यांनी सरळ मुंबईलाच फाट्यावर मारलं??

ऍक्च्युली कसे आहे ना की माझ्या निरीक्षणा प्रमाणे नाशिक म्हणजे पुण्याचं पॉकेट एडिशन आहे. कॉलेजमध्ये कसं की पहिला प्रेफरन्स या कॉलेजला आणि त्याला जर नाही मिळाल ऍडमिशन तर मग दुसरा त्या कॉलेजला. तसंच लोक जन्माला येताना समजा त्यांचा प्रेफरन्स पुण्याला असेल पण तिकडच्या जागा फूल झाल्या असतील तर मग नाशिकला टाकून द्या असं काहीतरी ते चित्रगुप्त कडे विनंती करत असावेत. जोक्स अपार्ट पण नाशिक खरच सुंदर आणि शांत शहर आहे आणि . नाशिककर हेल्प फुल असतात.

मी नाशिकला पुण्याचा पॉकेट एडिशन का म्हणालो तर त्यांचे चूल प्रेम. तिथल्या एका प्रसिद्ध मिसळ च्या हॉटेलमध्ये एक बोर्ड बघितला “”चुलीवरचे आईस्क्रीम””. हा बोर्ड म्हणजे भौतिकशास्त्राचे सगळे नियम तोडणारा होता. म्हणजे आईस्क्रीम म्हटल्यानंतर ते थंडगार फ्रिजमध्ये असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती किंबहुना जगमान्य सिद्धांत आहे. आता हे चुलीवरचे आईस्क्रीम काय भानगड आहे हे कळल्याशिवाय ती मिसळ काही घशाखाली उतरला तयार होत नव्हती. शेवटी मॅनेजर ला विचारून घेतलं “”साहेब चुलीवरचे आईस्क्रीम म्हणजे चुलीवर तापवून थंड केलेल्या दुधाचं बनवलेलं आईस्क्रीम. म्हणून ते चुलीवरचे आईस्क्रीम. “” – मॅनेजर उवाच.

हे समजल्यावर मला आईन्स्टाईनच्या थियरी ऑफ रिलेटीव्हीटी समजल्याचा आनंद झाला.

असो..

पण काही म्हणा आत्ताच्या जाहिरातींमध्ये पूर्वीच्या जाहिरातींची डेरिंग नाहीये म्हणजे मी कॉलेजला असताना धुळ्याच्या बस स्टैंड वर अगदी एंट्रन्स लाच अफाट मोठे होर्डिंग होतं ज्यावर एक नवीनच लग्न झालेले शेतकरी कपल दाखवलेलं होतं आणि उजव्या बाजूला मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं “” नव्या नवरीला सांगायला लाजू नको मर्दा, तुझ्या इतकाच प्यारा मला गाय छाप जर्दा”” आणि बरीच वर्ष ते तिथे ठाण मांडून होतं. बच्चू अब लगाके दिखाव ऐसा पोस्टर!!!

बाकी अशा इतर बऱ्याच जाहिराती आहेत जसे चित्रपटाच्या वेब सिरीज च्या आणि हो आजकाल न्यूज चॅनलचे पण होर्डिंग लागलेले असतात. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, वगैरे वगैरे वगैरे. पण एक मात्र निश्चित आहे की जाहिराती शिवाय धंदा होणं शक्य नाही.

— अमोल पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..