नवीन लेखन...

समीक्षक, अभ्यासक आणि विचारवंत

पुलंची मुलाखत घेण्यासाठी एकदा एक स्त्री पत्रकार आली होती. मुलाखत अगदी छान हसत खेळत झाली आणि आता आपल्याविषयी पेपरात काही बरं छापून येईल या कल्पनेने पुलंही पुलकित झाले. काही दिवसांनी त्या बाईंची समिक्षा पेपरात छापून आली, “पुलं स्वतःस पुरोगामी म्हणत असले तरीही त्यांचे पाय मातीचेच आहेत” पुलं बुचकळ्यात पडले, बाईंनी हे असं लिहिण्याचं कारण काय असावं? शेवटी त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, ज्या दिवशी त्या बाई मुलाखत घ्यायला आल्या होत्या तेव्हा सुनीताबाईंनी कुठले कुठले गुडघेदुखी वरचे मातीचे लेप त्यांच्या पायाला अगदी मांडी पर्यंत लावून त्यांना बसविले होते. ते बघूनच बहुतेक त्या बाईंनी थेट पेपरात लिहिलं होतं की पुलंचे पाय मातीचे आहेत.

समीक्षक अभ्यासक आणि विचारवंत, कुठल्या गोष्टीचा काय अर्थ लावतील आणि काय निष्कर्ष काढतील याचा नेम नसतो. म्हणजे छान हापुसच्या आंब्याचा रस काढायचा, तो रस फेकून द्यायचा आणि बाठ चोखत बसायचं आणि आंबा खाणे हा किती घाणेरडा अनुभव आहे हे जगाला ओरडून ओरडून सांगायचं.

असाच रस फेकून देऊन चोथा चघळत बसणाऱ्यांना भारतामध्ये डॉक्टरेट मिळते, मोठं मोठ्या संस्थांमध्ये मनाच्या स्थानी नोकरी मिळते, त्यांना त्या विषयातील औथोरिटी समजले जाते, पण त्या विषयातील रसास्वाद त्यांनी कधी घेतलेलाच नसतो.

महाराष्ट्रात असेच एक ज्ञानेश्वरीचे अभ्यासक मी बघितले आहेत, ज्ञानेश्वर असे नुसते नांव घेतले की ते अहाहा, अहाहा, वावावा, सुंदर सुंदर आहाहा, पाच दहा मिनिटे ते नुसते असेच डोळे बंद करून बरळत राहतात. समोरच्याला काहीच कळत नाही, यांना हा असा झटका कशामुळे आला? पण वास्तविक मला तरी कुठे काय कळलंय हेच त्यांना सांगायचं असतं. ते ज्ञानेश्वरीवर दाबून व्याख्यानं देतात, पुस्तकं लिहितात, पण सुरुवातीला अर्थसाठी वाचलेली एक ओवी सोडली की त्यात बाकी ज्ञानेश्वर कुठेच दिसत नाहीत. डॉक्टरेट आहेत बिचारे.

एक असेच शिक्षण क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही ज्ञानेश्वरीवर बोलायची खूप हौस आहे, ते विशेषतः अमृतानुभव मधील विराण्यांबद्दल बोलतात, पण ज्ञानेश्वरांच्या उपमा जेवढ्या चपखल असतात तितक्याच या गृहस्थांच्या उपमा विषय सोडून असतात. कमळाच्या देठाशी अडकलेल्या त्या भुंग्याला ते त्या तलावामध्ये एक हत्ती घुसवून ठारही मारून टाकतात. ऊसाचा रस काढायचा तो फेकून द्यायचा आणि चोथा चावत बसायचा. यांना डॉक्टरेट मिळते, डि लीट मिळते, पण स्वतः ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्षात येऊन जर ज्ञानेश्वरीवरील पीएचडी साठी अर्ज केला तर त्यांना निश्चितपणे नापास केले जाईल यात शंकाच नाही.

आम्ही बाबा वाक्यम् प्रमाणम् या पद्धतीने शिकतो, आमचे शिक्षणाचे ध्येय रसास्वाद किंवा ज्ञानवृद्धी हे नसून आपल्या वरिष्ठांची खूषमस्करी करून पोट भरणे हेच असते. त्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वर ब्राह्मण दिसतो, शिवाजी मराठा, सावता माळी आणि नामदेव शिंपी दिसतो, त्यांच्या काव्य गुणांशी आणि कार्याशी आमचा संबंध नसतो, आम्ही फक्त खूषमस्करे विद्यार्थी आहोत.

ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना, हे आरती प्रभूंनी लिहिलेले काव्य कृत कृत्यतेतून आणि समाधानातून आल्याचे मला स्पष्टपणे दिसते पण काही समीक्षक खानोलकरांनी व्याकूळ होऊन दुःखातिरेकाने आंघोळ केल्याचे म्हणतात, मला हसावे की रडावे तेच कळत नाही. अनेक अभ्यासकांना साहित्याचे सृजन नक्की कोणत्या मानसिकतेतून झाले असावे हे शोधण्याची फार घाई झालेली असते. त्या साहित्यातील नक्की भाव कोणता? हे आजिबात समजत नाही, मग त्या साहित्यिकाचे चरीत्र ढुंढळतात आणि आपले मनमानी भाव त्या काव्याला चिकटवून टाकतात. दुर्दैवाने डॉक्टरेट वगैरे फक्त अशांनाच मिळते आणि पिढ्यानपिढ्या तीच समिक्षा प्रमाणभूत मानून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवावी लागते.

परीणामी साहित्याकडे वळणारे विद्यार्थी आता आटले असल्याचे दिसून येते. त्यांच्या बुद्धीला जे पटत नाही ते कितीकाळ माणूस डोक्यावर वागवत राहणार? सगळेच विद्यार्थी थोडेच पोटार्थी असतात? पुनर्जन्मावरून हिंदू धर्मावर प्रचंड टीका करणारे एक अभ्यासक मला माहिती आहेत, तेच अभ्यासक गौतमबुद्धांच्या जातककथांमधील पुनर्जन्म हा खराखुरा आहे असे सांगत होते. गौतमबुद्धांना साहित्यिक फ्रीडम घेण्याचा आधिकार होता, हे त्यांना मान्य नाही. किंबहुना जातककथा या बोधकथा आहेत, कॉग्निटिव्ह थिंकिंग साठी प्रवृत्त करणाऱ्या आहेत यावर त्यांचा विश्वासच नव्हता.

ज्ञानेश्वरांनी याचे वर्णन गायीच्या सडाला चिकटून तिच्या सडातल्या मधुर दुधाचा आस्वाद घ्यायचे सोडून देऊन तिच्या सडातलं रक्त पिणारे गोचीड असे केले आहे. हे गोचीड रक्त पिऊन पिऊन गायीचं दूध आटवतात आणि नंतर तिला अशक्त करून भाकड ठरवून कसायाकडे द्यायला भाग पाडतात. हि गोचिडांची घाण शिक्षणक्षेत्रातून जेवढी लवकर हद्दपार होईल तेवढी लवकर मराठी भाषा आणि मराठी साहित्य लवकर लोकाभिमुख होईल.

एका स्वतःस पुरोगामी आणि बुद्धिवादी समजणाऱ्या अभ्यासकांनी पसायदानावर लेख लिहिला होता.

इये ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये।
दृष्टादृष्ट विजये होआवे जी।

यावर त्यांचा आक्षेप होता. कारण ज्याअर्थी ग्रंथोपजीविये म्हटले आहे त्याअर्थी हा श्लोक कुणीतरी ब्राह्मणाने घुसडला आहे, असा भन्नाट निष्कर्ष त्यांनी काढला होता. मी त्यांना ग्रँथोपजीविये हा शब्द इतर वेद वाङ्मया विषयी नसून फक्त ज्ञानेश्वरी बद्दलच आहे, आणि या ग्रंथात सिद्ध केलेल्या नियमांनुसार वागलात तर तुम्ही दृष्य आणि अदृष्य संकटांवर मात करू शकाल, असे आत्मविश्वासाने माऊली सांगत आहेत असे सांगितल्यावर स्वारी गुळणा धरून बसली. मी इतरही काही गोष्टी त्यांना विचारल्या, त्याचीही उत्तरे ते देऊ शकले नाहित.

लाचार अभ्यासक, निर्बुद्ध विचारवंत, राजकीय हेतूंनी विकले गेलेले समीक्षक, जातीयवादाने पोखरलेले सुधारक यांनी मराठी भाषेचे अपरिमित नुकसान केलेले आहे. मराठी टिकविण्यासाठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, मराठी भाषेचे साहित्याचे निरपेक्ष अवलोकन करणारे आणि निर्भीडपणे व्यक्त होणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे.

— विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..