नवीन लेखन...

तुकारामांच्या अभंगांचं गारूड

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये डॉ. नेताजी पाटील  यांनी लिहिलेला हा लेख


ओवी ज्ञानेशाची। अभंगवाणी तुक्याची ।
सुरलोक वामनाचा । आर्या मयुरपंतांची ॥

ही काव्यपंक्ती समर्पक, अन्वर्थक आणि सर्वार्थाने खरी आहे. रचनाकाराने यथार्थ शब्दांत ज्ञानेश्वर, तुकाराम वामन पंडित आणि मोरोपंत यांना त्यांच्या कवित्वाचं श्रेय दिलं आहे. यातील पहिले दोन महान संतशिरोमणी आहेत, तर नंतरचे दोन विचक्षण पंडित आहेत. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना देवदत्त प्रतिभेचं दान लाभलं आहे. तर मोरोपंत आणि वामन यांना प्रज्ञेची देणगी मिळाली आहे. खरं तर, ज्ञानदेव-तुकाराम या संतश्रेष्ठांच्या कवित्वात प्रतिभा आणि प्रज्ञा यांचा सुंदर समन्वय आहे, त्यांच्या तुलनेत पंतकाव्याची पताका खांद्यावर घेऊन मराठी काव्यप्रांताची वाट चालणारे वामन पंडित आणि मोरोपंत यांचे विद्वत्त्व त्यांच्या कवित्वाला मारक ठरतं असं अभ्यासकांचे प्रस्थापित मत आहे.

संतकाव्याने मराठी कवितेचा मजबूत पाया रचला. ज्ञानेश्वरी हा मराठीतील प्रथम काव्यग्रंथ, गीतेचा तो अनुवाद असला तरी कविश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या प्रतिभेचा नवोन्मेष त्यांत प्रत्ययाला येतो. काव्य आणि तत्त्वज्ञान यांचं सामरस्य लाभलेला हा काव्यग्रंथ जगात अजोड आहे. या ठिकाणी मला तुकारामांच्या कवित्वाबद्दल सांगायचं आहे. तरीही ‘ज्ञानियांचा राजा च्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेला प्रणाम करणं मी माझं कर्तव्य समजतो.

ज्ञानेश्वरांचा प्रभाव तेराव्या शतकात होता, तर तुकोबाराय सतराव्या शतकात सर्वतोमुखी झाले. हा देहूगावचा सामान्य वाणी आपल्या असामान्य वाणीने महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचला आजही तुकारामांचे अभंग ‘अ-भंग’च राहिले आहेत. त्यांची गणना अक्षर वाड्मयात झाली आहे. तुकयाच्या अभंगवाणीचं गारुड सर्वसामान्य प्रापंचिकांवर आहेच, पण ब्रह्मविद्येच्या अभ्यासकांवरही याची मोहिनी आहे. काय असेल त्यांच्या लेखणीची जादू? कोठून आली त्यांच्या वाणीत शक्ती? कोणी दिले त्यांना लेखणीचं बळ? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे- तुकोबांचं लोकविलक्षण आयुष्य हाच त्यांच्या वाणी-लेखणीचा स्रोत ‘आयुष्यावर बोलू काही’ हेच त्यांचा प्रत्येक अभंग सांगतो.

तुकारामांच्या प्रत्येक अभंगात त्यांचं आयुष्य दडलेलं आहे. ‘बोलविता धनी वेगळाची’ या त्यांच्याच उक्तीचा संदर्भ घेऊन सांगायचं झाल्यास भगवतभक्तीत लीन झालेलं, पंढरीरायाच्या चरणी समर्पित झालेलं त्यांचं आयुष्यच त्यांच्या ‘कवित्वाचा धनी’ आहे असं म्हणणं अनुचित ठरू नये. हा साधाभोळा देहूचा वाणी आयुष्यभर अग्निपथावरून चालला. दुष्काळी आपत्ती, स्त्रीपुत्रविरह ते वैराग्य म्हणजेच प्रपंच ते परमार्थ ही त्यांची वाटचाल खडतर तर खरीच, पण तुकोबा या संदर्भात काय काय म्हणतो ते त्याचे अभंगच बोलतात. तो जातीचा दाखला देऊन म्हणतो –

बरे देवा कुणबी केले ।
नाही तरी दंभे असतो मेलो ।।

उच्च जातीतील दांभिकांना अशी चपराक त्यांनी दिली आहे. हितशत्रूंनी या गरीब भोळ्या गृहस्थाला खूप व्याप-ताप दिला त्यांचा संदर्भ असलेला हा अभंग वाचून आपले डोळे पाणावतात,

काय खावे, आता कोणाकडे जावे
गावात राहावे कोण्या बळे ||१||
कोपला पाटील गावचे हे लोक
आता घाली भीक कोण मज ||२||
आता येणे चवी सांडिली म्हणती
निवाडा करिती दिवाणात ||३||
भल्या लोकी यास सांगितली मात
केला माझा घात दुर्बळाचा ||४||
तुका म्हणे यांचा संग आहे भला
शोधीत विठ्ठला जाऊ आता ।।५।।

‘वेष असावा बावळा । परी अंतरी नाना कळा’ असं तुकारामाचं व्यक्तिमत्त्व होतं. एका ठिकाणी ते स्वतःच म्हणतात, ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे ।।’ तुकारामाच्या अभंगांच्या इंद्रधनूसारख्या नाना छटा आहेत. कधी ते दंभावर तुटून पडतात आणि शब्दांना समशेरीची धार येते. उदा.

१. लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ।
२. टिळा टोपी गंध माळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।
३. ऐसे संत झाले कली । तोंडी तंबाखुची नळी ।
भांग मुर्की हे साधन । पची पडे मद्यपान।
१. घरी रांडा पोरे मरती उपवासी ।
सांगे लोकापाशी ब्रह्मज्ञान ||

तुकारामाचे अभंग म्हणजे त्यांचे सहजोद्गार आहेत. स्वयंस्फूर्तता हा त्यांच्या कवित्वाचा विशेष आहे. Poetry is the sponteneous overflow of powerful feeling, recollected in tranquility ही हॅजलिटने केलेली व्याख्या तुकारामाच्या कवित्वाला चपखलपणे बसते. अनेकदा हा कवी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करतो आणि सहज लिहून जातो ‘काय गुणदोष वानू आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे’ अर्थात दुसऱ्यांचे गुणदोष मी कशाला वर्णन करू? माझ्यात काय कमी त्रूटी आहेत? तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा’ ही तुकोबांची वृत्तीच होती. स्वतःच्या मनाचं ते अनेकदा परखडपणे ‘ऑडीट’ करतात, यातच त्यांचं माणूसपण लपलेलं होतं.

तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या शब्दांत मोठा आशय दडलेल्या या अभंगपंक्ती विचारांची, भाग्याची मोठा आशय दडलेल्या या अभंगपंक्तीत विचारांची, आशयाची श्रीमंती दडलेली आहे. वानगीच द्यायची असेल तर काही पंक्ती बघा –

१. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण.
२. शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी
३. जळातील मासा झोप घेतो कैसा ।
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ।।
४. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती ।
व्याघ्रही न खाती सर्व तया ।।
५. सत्यासंकल्पाचा दाता भगवान |
सर्व करी पूर्ण मनोरथ ।।
६. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे
येरा गबाळ्याचे काम नोहे ।।
७. पुण्य ते पर उपकार ।
पाप ते परपीडा ।
आणिक नाही जोडा । दुजा यासी ।।

तेजस्वी, स्वयंप्रकाशी अभंगांचा अनमोल ठेवा मराठी मनाला बहाल करणाऱ्या तुकारामापुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं ते याचसाठी. ब्रह्मज्ञानसंपन्न तुकोबारायाला कोटी कोटी प्रणाम.

-डॉ. नेताजी पाटील

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..