नवीन लेखन...

तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची

( एक नवीन रुपककथा .)

— परिस्थिती विचित्र होती .

गर्दीचा महासागर उसळला होता .
लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या .
गर्दी बेभान होती . गर्दी दिशाहीन होत होती . गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती . पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं .
श्वास घेता येत नव्हता . पुढं जाण्याचा ध्यास , मागं येऊ देत नव्हता .
जिथं पाहावं तिथं माणसंच माणसं . मान वर करून जगण्यासाठी श्वास शोधणारी माणसं .
पुढं जाण्याचा रस्ता शोधणारी माणसं .
समोरचं भासमान असणारं क्षितिज हेच आपलं अंतिम मानणारी माणसं .
स्थावर जंगमाचा विचार सोडून दिलेली माणसं .
परावलंबित्वामुळं मनानं अधू अपंग झालेली माणसं .
डोळ्यादेखत पैशाचा कचरा होताना पाहणारी माणसं …

गर्दी वाढत होती.
वातावरण अविश्वसनीय बनत चाललं होतं .
पायाखालची जमीन दिसत नव्हती . बहुधा ती खचत असावी असा भास सर्वाना होत होता .
रावाना , रंकाना , पुरुषांना , स्त्रियांना …
मुलांचा प्रश्नच नव्हता . त्यांचं विश्व निरागस , अबोध होतं . त्यांच्या प्रश्नांचे झरे आटले होते .
मात्र त्यांच्या डोळ्यातलं केविलवाणेपण पाहवत नव्हतं .

ते दोघेही त्या गर्दीत नव्हते पण अशा जागी होते की तिथून सगळं भवताल त्यांना लख्ख दिसत होतं .

” भगवंता , हे किती काळ चालणार अजून ? ”
न राहवून नारदमुनींनी विचारलं .

श्रीकृष्ण नेहमीप्रमाणं हसला .

“हाच प्रश्न ,तू मला महाभारतातील अठरा दिवसांच्या युद्धापूर्वी विचारला होतास , आठवतंय ? ”
” हो , पण तो काळ वेगळा होता , परिस्थिती वेगळी होती , प्रसंग वेगळा होता आणि तेव्हाचे प्रश्नसुद्धा वेगळेच होते . ”

श्रीकृष्ण पुन्हा एकदा हसला .

“तुझ्या या हसण्याचं गूढ मला कधी उकललं नाही . ”
” माझ्या हसण्यात तुला गूढता का वाटते ते मलाही उमगत नाही नारदा . मी हसलो त्याचं कारण वेगळंच आहे . तुला महायुद्धाची , तेव्हाच्या परिस्थितीची , प्रसंगाची आठवण आली . इतक्या वर्षानंतर तू अजूनही ते विसरला नाहीस . याचाच अर्थ , काळ बदलला तरी परिस्थिती , प्रसंग , प्रश्न तसेच असतात , अगदी महायुद्ध सुद्धा तसेच असते हे तुझ्या लक्षात आले , याचे हसू आले . परिस्थिती आणि प्रश्न आत्ता जीवनमरणाचे झाले आहेत . प्रसंगांचे म्हणशील तर ते प्रसंग आणि पुन्हा परिस्थिती माणसांनी स्वतःच ओढवून घेतली आहे . मला हे दिसत नाही असे समजू नकोस . जमीन हा युद्धाचा विषय तेव्हाही होता आणि आत्ताही आहे . जैविक शस्त्रांचा विचार तेव्हाही झाला होता आणि आता तर तो वास्तवातही आला आहे . परिस्थितीचे आकलन त्याकाळात फार थोड्या जणांना झाले होते आणि आत्ताच्या काळात तसेच झाले आहे . प्रसंग किती गंभीर आहे याची जाणीव तेव्हा कौरव आणि त्यांचे साथीदार वगळता , सर्व धुरंधराना होती . परिणाम किती भयानक होणार आहेत , प्रगतीचे ,विकासाचे चक्र कित्येक दशके पाठी लोटले जाणार आहे , जगणे भयावह होणार आहे , पृथ्वीचे सौभाग्य हिरावून घेतले जाणार आहे याचे भान तेव्हाही होते आणि आत्ताही आहे . सगळा आसमंत प्रश्नांच्या ढगांनी व्यापून जाणार आहे आणि भविष्य अंधारमय होणार आहे हे तेव्हाही कळले होते आणि आत्ताही कळले आहे . पण…”

श्रीकृष्ण बोलताना थांबला . नजर सर्वत्र फिरवली .

ते त्याचे अल्पकालीन मौन नारदमुनींना अस्वस्थ करून गेले .

” मी का थांबलो ही पृच्छा तुला करायची असेल , होय ना ? पण मी पाहत होतो या सगळ्या जगाकडे . या जगाच्या वेडेपणाकडे . संपत्तीचा हव्यास धरणारे , जगण्यासाठी जीवावर उदार होणारे , सत्तेसाठी अंध होणारे , धर्माला धुत्कारून लावणारे , व्यसनांपायी , वासनेपायी बरबाद होणारे आणि तरीही स्वतःसाठी जगण्याच्या अमर्याद लोभापायी दुसऱ्याचे जीवन ओरबाडून घेणारे, सगळे सगळे एकाच पातळीवर उतरले . जिथे केवळ जगण्याची भीक आणि मरणातून सुटका हवी असते अशी पातळी .नीचतम पातळी . नारदा , या भरतभूमीवर ही वेळ या लोकांवर कुणी आणली ? प्राणभयाचं संकट ओढवल्यानंतर सगळे दिशाहीन का झाले ? सगळे ध्येयहीन का झाले ? नातेसंबंध तुटले तरी चालतील पण जगण्यासाठी पळाले पाहिजे असं का वाटू लागलं? या सगळ्यांची उत्तरं एकाच शब्दात देता येतील . तो शब्द आहे परावलंबित्व !

सत्ताधीशानं सगळं काही केलं पाहिजे . सत्ताधीशानं सगळं विनामूल्य दिलं पाहिजे , अन्न, पाणी , निवारा , शिक्षण , वस्त्र , संपत्ती . सगळे हक्क हवेत , पण कर्तव्य आम्हाला वर्ज्य . सगळं स्वातंत्र्य हवं , पण नीतिमत्ता नको . नारदा , अरे लोक परावलंबी झाले . याला कारण सत्ताधीशच . सत्ता हवी तर ज्याला जे हवं ते त्याला द्यायचं आणि सत्ता टिकवायची . लोकांना परावलंबी करून ठेवायचं . अज्ञानी ठेवायचं , उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायचं , त्यांना सारासार विचार करूच द्यायचा नाही . मग दुसरं काय होणार ? आत्ता जे काही घडतंय तेच घडणार .”

” पण भगवंता याला काही उपाय ? अरे बुडती हे जन न देखवे डोळा .”

श्रीकृष्ण पुन्हा हसला .
” नारदा , प्रत्येक आपत्तीला उपाय असतोच , त्याचे संकेत मी अनेक वेळेला दिले होते . पण लोकांना संकेतांचे महत्व समजत नाही . परावलंबित्वाच्या बोथट बधीर मानसिकतेने सगळ्यांची मती भ्रष्ट झाली .यातही श्रेय नावाची मोहमाया सगळीकडे हिंडत होतीच . श्रेय म्हणजे ज्याला ते मिळवायचे तिथे अहंकार जन्म घेतो आणि जे देणारे असतात तेथे कृतज्ञता जन्माला येते , हे साधे तत्व सुद्धा लोक विसरून गेले . परावलंबित्व सोडून प्रत्येक जण जर आत्मनिर्भर झाला तर अजूनही सगळे सावरू शकतात . आपला देश , आपली माणसे , आपले नातेसंबंध , आपली संस्कृती हेच डोळ्यासमोर ठेवून आपण आत्मनिर्भर झालो तर दिशाहीन झालेला , सैरभैर झालेला , दुःखी झालेला , भयानं धास्तावलेला हा जनांचा प्रवाह निश्चितपणे मूळ स्थानी येईल , यात शंकाच नाही .आता जबाबदारी तुझी , तू सर्वत्रसंचार करतोस त्यामुळे सर्वाना हे समजावून सांग .यातच कल्याण आहे , तुझे माझे आणि सर्व जनतेचे !”

श्रीकृष्ण पुन्हा हसला .

नारदमुनींनी त्याला नमस्कार केला .
वीणेची तार छेडली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले …

तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची ।
——–
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
———
आवडल्यास नावासह शेअर करा आणि हो दिलखुलासपणे व्यक्त व्हा .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..