नवीन लेखन...

ते रवी, मी साधा तारा

 

साहित्य, कला, संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राला, अनेक थोर चित्रकार लाभले आहेत. एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, एम.आर. आचरेकर, इत्यादींनी सप्तरंगांवर हुकूमत गाजवून कलाजगतात प्रसिद्धी मिळविली. या थोर चित्रकारांच्याच पिढीतील, ज्येष्ठ चित्रकार, रवी परांजपे यांनी काल आपले ‘ब्रश मायलेज’ गाठले.

मला लहानपणापासूनच चित्रकलेचे आकर्षण आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदी पिशवीवर एखादे चांगले चित्र दिसले, तर ती पिशवी पाण्यात बुडवून खळ निघून गेल्यावर तो कागद सुकवून जपून ठेवलेली चित्रं, अजूनही माझ्या संग्रही आहेत. अशाच छंदातून मुळगावकर व दलाल यांची चित्रे, कॅलेंडर्स जमविली. त्याकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या धर्मयुग, इलेस्ट्रेटेड विकली अशा पाक्षिकात रवी परांजपे सरांची रंगीत कथाचित्रे, पाहिल्याची आठवतात.

काही वर्षांनंतर त्यांची चित्रे असलेली ग्रिटींग्ज कार्ड्स पाहिली. काही कॅलेंडर्स, सरांच्या वेगळ्या शैलीमुळे लगेच ओळखू यायची. वर्तमानपत्रातील व रिडर्स डायजेस्ट या इंग्रजी मासिकातील सरांच्या जाहिराती पाहिल्या की, सरांच्या शैलीचं कौतुक वाटायचं. अशा ज्येष्ठ चित्रकाराशी कधी संपर्क येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तरीही, तो आला.

माझ्या मोठ्या भावाने, रमेशने अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक मारुती पाटील सरांच्या शिफारशीवरुन, मुंबईला रवी परांजपे सरांकडे कलाक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठरविले.

सरांचा स्टुडिओ दादर येथील काॅलेज गल्लीतील, मनाली बिल्डींगमध्ये होता. त्यावेळी सर बिल्डर्सना लागणारी माऊंट साईजमधील बिल्डींगची कलरफुल पर्स्पेक्टीव्ह ड्राॅईंग्ज काढून देत असत. सरांकडे रमेश सारखेच चार असिस्टंट काम करीत असत.

त्यावेळी परांजपे सरांना भेटायला कधी अभिनेत्री स्मिता पाटील तर कधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येत असत. मी दोन वेळा रमेशला भेटायला म्हणून, स्टुडिओत गेलो होतो. सर मितभाषी होते. याच दरम्यान सरांकडे काम करणाऱ्या, दिपक गावडे या चित्रकार मित्राशी मैत्री झाली. जी आजही अबाधित आहे.

सहा महिन्यांनंतर रमेशने, सरांकडचा अनुभव घेऊन मुंबई सोडली. १९९० साली, सर पुण्यात आल्यानंतर आम्ही दोघेही सरांना भेटत होतो. सरांची अनेक प्रदर्शने पाहिली. कधी सरांचं प्रदर्शन, मुंबईत जहांगीरला असेल तर तेही जाऊन पाहिलं.

वर्तमानपत्रातून आलेले सरांचे लेख वाचत होतो. मोठमोठ्या सांस्कृतिक समारंभांना, सरांची उपस्थिती हमखास असायची. तिथे भेट होत असे.

आठवड्यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार, अनिल उपळेकर यांचा मेसेज आला. ‘काही दिवसांपूर्वी सर घरात पडले, घोले रस्त्यावरील हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आहे. आयसीयू मध्ये आहेत.’ हे वाचून मला धक्काच बसला.

काल दुपारी परांजपे सरांच्या कलाप्रवासाने पूर्णविराम गाठला. दिग्गज चित्रकारांमधील जो एक शेवटचा दुवा होता, तो ही निखळला. दीनानाथ दलालांना, केतकर सर गुरुस्थानी होते. रघुवीर मुळगावकरांनी, एस.एम. पंडितांना गुरुस्थानी मानलं होतं. एम.आर. आचरेकरांकडे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी चित्रकार झालेले आहेत. रवी परांजपे सरांची चित्रशैली ही इतरांपेक्षा खूप वेगळी होती. अशी ही चालती बोलती विद्यापीठं काळाच्या ओघात नाहीशी झाली. वास्तव चित्रशैली जपणारी पिढी, हळूहळू नामशेष होत आहे. नवीन पिढीचा कल, हा वास्तव पेक्षा अमूर्त कलेकडे अधिक आहे. यातूनही वास्तव कला टिकवायची असेल तर, जुन्या पिढीतल्या पंडित, दलाल, मुळगावकर, परांजपे सरांना कदापिही विसरुन चालणार नाही.

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१२-६-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 342 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..