नवीन लेखन...

ती पण एक सावित्री (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सौ. जया सुधाकर पाटील यांनी लिहिलेली ही कथा.


दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले.

रागिणी आणि हरीश एकाच शाळेत शिकत होते. हरीष २ वर्षे तिच्या पुढे होता. रागिणी आठवीत असताना त्यांची दोघांची पहिल्यांदा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या सरावाच्या निमित्ताने भेट झाली होती. हरीष त्या वर्षी दहावीला होता. पहिल्याच भेटीत त्यांचे प्रेमाचे धागे जुळले. त्यानंतर ते वारंवार एकमेकांना भेटण्यासाठी बहाणे शोधायचे. त्याचाच परिणाम हरीश १० वीला नापास झाला. दोन-तीन वेळा परीक्षा देऊन शेवटी सुटला. पास झाला. रागिणीसोबतच त्याने दहावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्याने शिक्षण सोडूनच दिले. पोस्टाच्या, विम्याच्या एजंटचे काम करू लागला. २ वर्षात त्याचा व्यवसायात चांगला जम बसला. रागिणीने १२ वीची परीक्षा दिली होती. तोपर्यंत तिच्या घरी तिच्या व हरीशच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. घरच्यांनी तिला खूप समजावून पाहिले. ती ऐकायलाच तयार नव्हती. कोवळ्या वयातले ते आंधळे प्रेम. कोणताही सारासार विचार न करता रागिणीने व हरीषने पळून जाऊन मंदिरात व नंतर कोर्टात लग्न केले. दोन्ही घरचा विरोध असल्याने त्यांना राहायचा प्रश्न निर्माण झाला. हरीषचाच मित्र, ज्याने त्या दोघांना मदत केली होती त्याच्या घरी एक-दोन महिने राहिले. त्यानंतर दुसरीकडे भाड्याने घर घेतले. सहा महिन्याने हरीषच्या आईवडिलांचा राग ओसरला. त्यांनी दोघांना घरी राहण्यास बोलावून घेतले. आईवडिलांनी रागिणीच्या माहेरच्यांशी बोलून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. हरीषच्या अशा लग्नामुळे त्याच्या घरात पण कुरबुरी सुरू झाल्या. त्याचे दोन्ही भाऊ व वहिन्या रागिणीला स्वीकारायला तयार नव्हत्या. एकत्र राहात असलेले भाऊ, त्यांच्या पत्नी व मुलांसह, वेगळे राहू लागले. रागिणीला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी बोलावले नाही. गावातच माहेर असूनही तिच्या बाळाला बघायलाही कोणीच आले नाही.

मध्यंतरी रागिणीच्या वडिलांचा अपघात झाला असे तिच्या कानावर आले. तशी ती. छोट्या राजला घेऊन बाबांना भेटायला दवाखान्यात गेली पण आइने व भावांनी तिला बाहेरच अडवले. बाबांना भेटू पण दिले नाही. त्या दिवशी रागिणी घरी आल्यावर खूप खूप रडली. तिच्या सासूने तिची समजूत काढली, राज चालायला व बोलायला लागला होता. त्याच्या बाललीलांनी ती जुन्या गोष्टी हळूहळू विसरू लागली. होती. फावल्या वेळात ती लोकांचे कपडे शिवून, संसाराला हातभार लावीत होती. त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रूळावर येऊ लागली होती.

नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्नाला ४ वर्षे झाली. राज शाळेत जाऊ लागला होता. एके दिवशी हरीष त्याचे कलेक्शनचे काम आटोपून घरीच येत होता. अचानक त्याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो त्याच्या गाडीवरून खाली पडला. डोक्याला जोरात मार लागल्यामुळे तो कोमात गेला. रस्त्यावरच्याच कोणीतरी त्याला दवाखान्यात अॅडमिट केले आणि नंतर घरी कळवले. हरीषच्या आईवडिलांनी बराच पैसा खर्च केला. एक महिन्याने तो शुद्धीत आला पण काहीच हालचाल करू शकत नव्हता. तसेच बोलू पण शकत नव्हता. सुरुवातीला तो कोणालाच ओळखायचा नाही पण हळूहळू त्याच्या नजरेत ओळखीचे भाव उमटू लागले, या व्यतिरिक्त त्याच्या तब्येतीत विशेष सुधारणा झाली नाही.

हरीषच्या अपघातामुळे त्याचे उत्पन्न कमी झाले होते. हरीषचे वडील आयुष्यभर पोस्टामध्ये नोकरी करून निवृत्त झाले होते. नोकरीच्या काळात त्यांनी तिन्ही मुलांना शिकवून दोन्ही मुले चांगल्या पदावर नोकरीला लावले होते. तिन्ही मुलांसाठी स्वत:चे घर बांधले होते. त्यांचे पेन्शन व हरीषचे कमिशन यावरच त्यांचा खर्च भागायचा. त्याच्या वडिलांच्या ओळखीमुळेच त्याला हे एजंटचे काम मिळाले होते. आता खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. नोकरी करण्यासाठी रागिणीकडे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रही नव्हते. लग्नासाठी तिने अंगावरच्या कपड्यांनीच घर सोडले होते. एवढे सगळे घडल्यावरही माहेरचे रागिणीला व हरीषला भेटायला कोणीच आले नव्हते.

परिस्थिती माणसाला घडवते त्याप्रमाणे सुखवस्तू घरातली रागिणीही पूर्णपणे बदलली होती. हरीषच्या कलेक्शनचे काम ती स्वत: करू लागली. शिवणकामही करून घर चालवू लागली. हरीषचे सगळे अंथरुणावरच ती किंवा तिचे सासरे करायचे. राजला तिची सासू सांभाळायची. रागिणीची मानसिक, आर्थिक व शारीरिक ओढाताण व्हायची. खूप थकून जायची.

दुर्दैव काही रागिणीची पाठ सोडायला तयार नव्हते. तशातच हरीषच्या बाबांचे अचानक निधन झाले. रागिणीचा मोठ्ठा आधारस्तंभच गेला. सासूचेही वय झालेले असल्याने, त्यांचीही तब्येतीची थोडीफार कुरकूर असायचीच. बाबांचे पेन्शन कमी झालेली, हरीषच्या औषधपाण्याचा खर्च, राजच्या शिक्षणाचा खर्च हे सर्व भागविताना रागिणीची तारेवरची कसरत व्हायची. तिला एकटे पडल्यासारखे वाटत होते. ज्याच्या सोबतीने तिने संसाराचा डाव मांडला होता त्याचीच केविलवाणी अवस्था झाली होती. मनातले दुःख सांगून मन मोकळे करायला जवळचे असे कुणीच नव्हते. पण या परिस्थितीत हिंमत हारून चालणार नव्हते. डोळ्यातले अश्रू लपवून तिला ही जीवनाची लढाई लढायची होती. रागिणीला चारचौघांसारखे आयुष्य जगता येत नव्हते.मन मारून जगावे लागत होते.

राजची दहावीची परीक्षा सुरू झाली. पहिलाच पेपर होता. परीक्षेला जाताना त्याने देवाला, आज्जीला, आईला नमस्कार केला. नंतर बाबांना म्हणजे हरीशला अंथरुणावरच पाया पडू लागला. हरीशच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. साधा आशिर्वादाचा हातही लेकराच्या डोक्यावर ठेवू शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. बाकीच्या मुलांप्रमाणे राज बाबांच्या अंगाखांद्यावर वाढला नाही, बाबांचे बोट पकडून चालला नाही, बाबांकडे कधीच कशाचा हट्ट केला नाही, लहानपणापासूनच समंजस झाला होता तो.

राजची परीक्षा संपली. पण रागिणीची काळजी वाढली होती. मुलगा हुशार आहे, पासही होईल पण पुढल्या शिक्षणाला जास्त खर्च येणार. ती हरीषला व सासूला घरात ठेवून जास्त वेळ बाहेरही राहू शकत नव्हती. परत उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कोणतीच जबाबदारी ती टाळू शकत नव्हती. स्वत:चे घर होते हीच काय ती जमेची बाजू होती. घरही चांगल्या वस्तीत, रस्त्यावर होते. त्यामुळे तिने पुढच्या खोलीतच छोटेसे किराणा दुकान सुरू केले. सासूबाईंनी स्वत:चे दागिने मोडून तिला भांडवलासाठी मदत केली. तिने कलेक्शनचे काम पूर्ण बंद केले. थोडे दिवस आर्थिक त्रास झाला, पण नंतर दुकान चांगले चालायला लागले. दिवस पालटायला सुरुवात झाली. तरीही बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले.

ती पण एक सावित्री

यंत्रासारखी राबते.

पुसत चाललेल्या कुंकवाला

जपण्यासाठी…

ती पण एक सावित्री

यंत्रासारखी राबते.

वंशाच्या दिव्याला

जोपासण्यासाठी…

ती पण एक सावित्री

यंत्रासारखी राबते.

वृद्ध सासूसासऱ्यांच्या

सेवेसाठी, कर्तव्यपूर्तीसाठी…

ती पण एक सावित्री

यंत्रासारखी राबते.

जगत नाही स्वत:साठी

स्वत:च्या अस्तित्वासाठी…

भावनाशून्य होऊन

फक्त जगतेच एक यंत्र बनून…

– सौ. जया सुधाकर पाटील

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..