नवीन लेखन...

दोज व्हू आर एट सी

एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्सला सुरुवात झाल्यावर दुसऱ्याच दिवशी प्री सी ट्रेनिंग कॉलेजचे रिटायरमेंट जवळ आलेले डेप्युटी डायरेक्टरनी आमच्या बॅच मधील एकशे बारा ग्रॅज्यूएट मेकॅनिकल इंजिनियर्स ना संबोधित करण्यासाठी ऑडिटोरियम मध्ये बोलाविले होते.
आमचे एक वर्षाचे प्री सी ट्रेनिंग झाल्यावर प्रत्यक्ष जहाजावर इंजिन कॅडेट किंवा ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात करून पूढे आणखीन तीन परीक्षांचे टप्पे ओलांडून जहाजावर अनुक्रमे फोर्थ , थर्ड, सेकंड आणि चीफ इंजिनिअर असे बनणार होतो. जहाजावरील एक जबाबदार अधिकारी म्हणून क्लास फोर ची परीक्षा पास झाल्यावर खांद्यावर पहिली सोनेरी पट्टी लागणार होती. थर्ड इंजिनिअरला दोन , सेकंड इंजिनिअरला क्लास टू परीक्षा पास झाल्यावर तीन तर चीफ इंजिनिअरला क्लास वन परीक्षा पास झाल्यावर चौथी सोनेरी पट्टी मिळणार एवढी जुजबी महिती माझ्यासारख्या मर्चंट नेव्ही बद्दल ओ का ठो माहीत नसणाऱ्याला मिळाली होती. कोर्स जॉईन करायच्या पहिले एकदा कोर्स केला की एका पाठोपाठ एक प्रमोशन मिळतात असं वाटायचं. परंतु प्रमोशन साठी परिक्षा द्याव्या लागतात आणि परिक्षा पास झाल्यावर त्या त्या रँक चे लायसन्स मिळते हे कॉलेजला जॉईन झाल्यावर कळलं.
परीक्षा सुद्धा लेखी आणि तोंडी स्वरूपाच्या असतात, लेखी परीक्षा रट्टा मारून रडत रखडत वर्ष दोन वर्षांत का होइना पण पास होता येतील अशी खात्री होती परंतु ओरल एक्झाम्स मध्ये खरा कस लागणार होता, यू पी एस सी लेवलच्या नसतील पण मर्चंट नेव्ही च्या परीक्षा या एम पी एस सी लेवल च्या नक्कीच असतात. ज्युनिअर इंजिनिअर पासून चीफ इंजिनिअर होईस्तोवर तीन परीक्षांचे टप्पे ओलांडावे लागतात. प्रत्येक टप्पा ओलांडण्यापुर्वी त्या त्या रँक मध्ये कमीत कमीत बारा महिने प्रत्यक्ष जहाजावर काम केल्यानंतरच पुढल्या परीक्षेला पात्र होता येते. एम पी एस सी क्रॅक करून एकदा का तहसीलदार, डी वाय एस पी किंवा उप जिल्हाधिकारी झाला की सिनियारीटी प्रमाणे प्रमोशन मिळण्याचा प्रकार मर्चंट नेव्हीत नसतो.
बरं परीक्षा पास झाल्यावर कंपनीत तुमचे वागणे, कामाची पद्धत किंवा थोडक्यात सांगायचे झाले तर त्या रँक मध्ये काम करण्याची सक्षमता किंवा कॉम्पिटेन्सी हा एक महत्वाचा मुद्दा असतो केवळ रट्टा मारून पास व्हायचं आणि लायसन्स मिळवायचे की प्रमोशन मिळालं असा सुद्धा प्रकार मर्चंट नेव्हीत नसतो. जहाजावर एखाद्याला प्रमोशन देण्यापूर्वी कॅप्टन, चीफ इंजिनिअर, ऑफिस मधील सुप्रिडेंट आणि हाताखाली कामं करणारे खलाशी यांच्या सगळ्यांकडून मिळालेल्या रिपोर्ट नुसार कंपनी निर्णय घेते. बारा महिन्यात कोणाचे सहा सहा महिन्यांचे दोन जहाजं होतात तर कोणाला तीन किंवा चार जहाजे करावी लागतात. परीक्षा पास होऊनही जहजावरून कॅप्टन आणि चीफ इंजिनिअर ने पाठवलेले अप्रेजल रिपोर्ट खराब असल्याने दोन दोनच काय पण चार चार वर्ष कोणाला प्रमोशन मिळत नाही.
आमचे प्री सी ट्रेनिंग कॉलेज भारत सरकारचे असल्याने डेप्युटी डायरेक्टर हे सुध्दा परीक्षा देऊनच पंधरा वर्षांपूर्वी कॉलेज वर लेक्चरर म्हणून रुजू झालेले होते. त्यांनी लंडन मधून मिळवलेली एक्स्ट्रा फर्स्ट क्लास चीफ इंजिनिअरची डिग्री म्हणजे त्यांचा अनुभव आणि ज्ञानाचे प्रतीक होते.
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांचे केस नेव्ही कट मारून एकसारखे दिसतील असे कापले होते. नवीन युनिफॉर्म शिवून येईपर्यंत ड्रेस कोड देण्यात आला होता.
डेप्युटी डायरेक्टरनी मेरे नौजवान दोस्तों, डू यू नो, देअर आर थ्री सॉर्ट्स ऑफ पीपल , दोज व्हू आर अलाईव्ह , दोज व्हू आर डेड , अँड दोज व्हू आर एट सी. असं बोलून खेळीमेळीच्या सुरात बोलायला सुरुवात केली.
तुम्ही आज आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहात जिथं मी आजपासून 32 वर्षांपुर्वी होतो. त्यावेळची जहाजांची स्थिती आणि संपर्काची साधने यामध्ये आता कमालीचा फरक पडला आहे. आजचे जग जेवढे वेगवान आणि प्रगत झाले आहे तेवढेच चॅलेंजिंग सुद्धा झाले आहे. जसं मी म्हटलं लोकांचे तीन प्रकार असतात, एक जे जिवंत असतात, दुसरे जे मृत्यू पावलेले असतात आणि तिसरे जे म्हणजे समुद्रात असतात. माझ्या या बोलण्याचा अर्थ तुम्ही जाणून आणि त्याही पेक्षा समजून घ्या.
जिवंत लोकं म्हणजे ते फक्त त्यांचे रूटीन लाईफ जगत असतात त्यांच्या लाईफ मध्ये कोणतेही थ्रील नसते, कोणतेही चलेंजेस नसतात आला दिवस सारखा असतो, शनिवार गेला की सुट्टीचा रविवार आणि पुढल्या दिवशी कामावर जावं लागावे म्हणून येणारा सोमवार यांचे चक्र मर्यादित असते. नाही म्हणायला ते कुटुंबासोबत असतात पण तिथेही तेच कौटुंबिक संसार चक्र. दुसरे जे मृत्यू पावलेले असतात हे तेच जिवंत लोकं असतात ज्यांची आठवण येत असते पण ते नसल्याने किंवा त्यांच्या जाण्याने त्यांचावर अवलंबून असलेले कोणी जगायचे थांबत नाहीत.
आता लोकांचा तिसरा प्रकार म्हणजे जे समुद्रात असतात ते.
या प्रकारातील लोकं एकाचं वेळेला जिवंत आणि मेलेले असल्याचा अनुभव घेत असतात.
एकदा का हे लोकं जहाजावर समुद्रात गेले की यांची चॅलेंजिंग लाईफ सुरु होते, पुढला दिवस किंवा येणारी रात्र कोणते आव्हान घेऊन येईल याचा थांगपत्ता नसतो. आठवड्यातले सगळे दिवस सारखे शनिवार नाही की रविवार नाही. वादळ आले हवामान खराब झाले की दोन दोन दिवस पोटात अन्न राहत नाही की झोप लागत नाही. एखादी मशिनरी नादुरुस्त झाली की ती सुरु करेपर्यंत सगळे बेचैन असतात. जहाज जुने असेल , जहाजावर इंजिन आणि मशिनरी मध्ये प्रॉब्लेम असतील तर दिवसातून सोळा सोळा ते अठरा अठरा तास काम करण्याची तयारी ठेवावी लागते. रोज उठायचं आणि काम करत राहायचे. जहाजावर जॉइन झाल्यावर यांच्या घरीसुद्धा संसार चक्र सुरू असते पण ते मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या सारखे आठवणीत आणि त्यांच्या समुद्रात जाण्याने त्यांचावर अवलंबून असलेले कोणी जगायचे न थांबल्यासारखे.
पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इथे येण्यापूर्वी जहाज किंवा समुद्र सुद्धा बघितला नसेल. त्याहीपेक्षा तुमच्या सोबत जहाजावर काम करणारे सहकारी ज्यांच्याशी तुमची ओळख पालख काहीही नसेल, ते तुमच्या राज्यातीलच काय पण देशातील सुद्धा असतील की नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल. प्रत्येक वेळेला नवीन जहाज आणि नवीन सहकारी, सगळ्यांशी जुळवून घेतलं तरच तुम्हाला चांगले काम करता येईल. चूक झाली तर कबूल करा, ती सुधारता येते परंतु लपवली तर त्याचे परिणाम आणि त्रास तुमच्या मुळे इतरांना सुद्धा भोगावे लागतील याची जाणीव ठेवा. जहाजावर लहानशी चुक सुद्धा जहाज बुडण्यासाठी कारणीभूत ठरते, एक छोटासा स्पार्क एक्सप्लोजन होउन जहाजाला आगीत भस्मसात करण्यासाठी निमित्त बनू शकतो याचे भान ठेवा. पिण्याच्या पाण्याचा साठा संपला तर समुद्राचे खारे पाणी पिता येत नाही त्यामूळे कोणत्याही प्रकारची उपलब्ध साधन सामग्री मग ती खाण्याची असो वा जहाजाला व इंजिनला लागणारे लहानातले लहान स्पेअर पार्टस असो.
तुम्ही लवकरच जिवंतपणी मरण्याचा अनुभव कसा असतो याच्याशी परिचित होणार आहात. परंतु जीवन आणि मरणाच्या पलीकडील समुद्रातले जगणे तुम्हाला खुप काही शिकवून देईल याची खात्री बाळगा.
जय हिंद बोलून डेप्युटी डायरेक्टरनी त्यांचे लेक्चर आटोपते घेतले. बॅच मधील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मर्चंट नेव्ही या निवडलेल्या करिअर बद्दलची उत्सुकता माझ्याप्रमाणेच आणखीन वाढल्यासारखी दिसत होती.
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.( mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..