नवीन लेखन...

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – २

The History of Agriculture in America - Part-2

कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्‍या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे दरवाजे अचानक उघडल्यावर, जुन्या जोखडातून सुटका करून घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी लोक धावले नसते तरच नवल !

युरोपातून नवीन जगात येताना हे लोक आपल्याबरोबर परंपरा, धार्मिक रुढी, रीतिरिवाज, कायदेकानून यांच्याच बरोबर, नवीन जमिनीचा ध्यास देखील घेऊन आले. नवीन जगामध्ये जमीन मिळवणं हा एक जगण्याचा महामंत्रच झाला. जमिनीच्या आधारे लोकांना एक उपजीवीकेचे साधन मिळाले तसेच त्यायोगे त्यांना संपत्तीसाधन करता येऊ लागलं. येवढेच नव्हे तर जमिनीच्या मालकी हक्काद्वारे सामाजिक जीवनाची वरची पायरी गाठता येऊ लागली. युरोपातल्या रीतिरिवाज आणि कायदेकानूनांच्या आधारे, जमिनीच्या मालकी हक्कानुसार, लोकांना अनेक सामाजिक हक्क मिळू लागले. अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कानुसार पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागला.

युरोपातून येऊन वसाहती करून राहिलेल्या रहिवाशांचा शेतीव्यवसायाकडे कल होता. त्यामुळे जमीन वाटपाला महत्व आले होते. त्यावेळी जमीन मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते आणि एकंदरीतच, युरोपपेक्षा या नवीन जगात जमीन मिळवणे सोपे होते. जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण व नोंद करणारी सर्वमान्य पद्धत असणे आवश्यक होते. सुरवातीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाच्या पद्धती फारच ढोबळ होत्या. केवळ नदी, ओढे, झाडांच्या आधारे केलेल्या जमीन सर्वेक्षणात खूप त्रुटी असायच्या आणि जमीन वाटपाचे पर्यवसान भांडणात आणि कोर्टातल्या खटल्यात होणं ही नित्याची बाब होती.

१७७६ सालच्या अमेरिकेन क्रांतीमुळे जमीन वाटपाच्या पद्धतीला आणखी वेगळंच वळण मिळालं. पश्चिमेला प्रचंड मोठी जमीन नव्यानेच उपलब्ध झाली होती. ही जमीन केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे, १७८५ साली एक कायदा करुन, सरकारने जमीन सर्वेक्षणाची नवी पद्धत रूढ केली. चौकडीच्या (grid) स्वरूपात जमिनीची वाटणी करावी आणि प्रत्येक गावाच्या वाटणीला ३६ तुकडे यावेत, अशी साधारण योजना मंजूर झाली. सुरवातीला या कायद्यानुसार कमीत कमी ६४० एकराचा जमिनीचा तुकडा, एकरी १ डॉलर या भावाने लिलावात विकला जावा, अशी तजवीज होती. परंतु कमीत कमी ६४० एकर जमिनीचा तुकडा विकण्याच्या अटीमुळे, ही जमीन बर्‍याच सामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेरची होती. परंतु धनाढय मंडळी मात्र सरकारवर दबाव आणून, एकरी १ डॉलर पेक्षा देखील कमी दराने मोठमोठे जमिनीचे तुकडे मिळवून गिळंकृत करू लागली.

त्यावेळी अमेरिकन राजकारणात, Federalist आणि Anti-Federalist असे दोन पक्ष होते. Federalist पक्षाच्या मते, जमिनीचा भाव अधिक असणे महत्वाचे होते. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाची भर पडण्यास मदत झाली असती. तसेच जमिनीचे छोटे छोटे तुकडे करण्यापेक्षा, थोड्याच पण धनाढ्य लोकांच्या हातात जमिनीचे मालकी हक्क एकवटणे सोईस्कर ठरले असते. या उलट Anti-Federalist पक्षाच्या मतानुसार, अमेरिकन समाज शेती प्रधान राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे थोडयाशाच श्रीमंतांच्या हातात जमिनीचे हक्क एकवटण्यापेक्षा, अनेक छोटया किंवा मध्यम शेतकर्‍यांच्या हातात जमिनीची मालकी असणे महत्वाचे होते. या विचार सरणी प्रमाणे, जमिनीच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा असणे जरूरीचे होते.

पुढे सरकारने जमीन वाटपासंदर्भात बरेच प्रयोग करून पाहिले. जमीन विकत घेण्यासाठी कर्जाची सोय केली, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रफळाची अट, ६४० एकरांवरून ८० एकरांपर्यंत खाली आणली आणि जमिनीचा दर एकरी १ डॉलर वरून २ डॉलरपर्यंत वाढवून बघितला.

१८६१ ते १८६५ च्या अमेरिकन यादवी युद्धामुळे राज्या राज्यांमधले ताण तणाव अधिक उघडपणे दृष्टीस पडू लागले. पश्चिमेकडे होणारा विस्तार, देशाची आर्थिक घडी आणि गुलामगिरी या प्रश्नांवर, उत्तरेकडच्या औद्योगिक आणि दक्षिणेच्या शेतीप्रधान राज्यांमधे युद्धाला तोंड फुटले. दक्षिणेकडची राज्ये फुटून निघाल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठाच बदल झाला. सरकारने पश्चिमेकडच्या विकासासंदर्भात आणि जमिनीच्या वाटपासंदर्भात अधिक उदारमतवादी धोरण स्विकारले. परिणामस्वरूप, १८६२ साली Homestead Act पास झाला. या कायद्यानुसार कोणाही घरचा २१ वर्षांहून अधिक वयाचा पुरुष अथवा स्त्री, १६० एकर जमिनीवर पूर्णपणे विनामूल्य हक्क सांगू लागला. अट एवढीच की त्या जमिनीवर त्या शेतकर्‍याने कमीत कमी ५ वर्षे रहावे आणि तिथे झाडं तोडून जमीन साफ करणे, जमिनीची मशागत करून ती शेतीलायक करणे, घर आणि जनावरांसाठी गोठे बांधणे, अशा सुधारणा कराव्यात. जर जमिनीवर अधिक लवकर हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर ६ महिन्या नंतर एकरी १.२५ डॉलर एवढी रक्कम भरली, की काम झाले !

पुढे देखील, १९ व्या शतकाच्या उरलेल्या दशकांमधे, सरकारने विविध कायदे सुधारणा करून जमिनीचे वाटप चालूच ठेवले. १८७३ च्या Timber Culture Act नुसार, शेतकर्‍यांना ४० एकर जमिनीवर झाडे लावण्याच्या मोबदल्यात १६० एकर जमीन मोफत मिळू लागली. जसजसं पश्चिमेला जावं, तसतशी जमीन अधिकाधिक रुक्ष होत गेली होती. त्यामुळे तिथल्या जमिनीसाठी वेगळे कायदेकानून असणे जरूरी होते. १८७७ सालच्या Desert Lands Act नुसार, शेतकर्‍यांना एकरी १.२५ डॉलरच्या भावाने, ६४० एकर जमीन मिळत होती. अट इतकीच, की त्यांनी तीन वर्षांत तेथे जलसिंचनाची व्यवस्था करावी. Homestead Act मुळे विविध प्रकारचे लोक जमिनी घेण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी जमिनीचा वापर वेगवेळ्या कारणांसाठी केला. परंतु इतर Acts मुळे, शक्यतो मोठया प्रमाणावर जमिनी विकत घेऊन, त्यांचा वापर चराऊ कुरणांसारखा करण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर सुरू झाला.

१९०२ सालच्या Reclamation Act नुसार मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प सुरू करण्यावर भर देण्यात आला. याचं फलस्वरूप म्हणून पश्चिमेकडच्या रुक्ष जमिनीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. या कायद्यानुसार, त्या भागात जमिनीचा ताबा घेतलेल्या लोकांचाच पैसा १० वर्षांपर्यंत वापरून, सरकारने ह्या जलसिंचनाच्या प्रकल्पांना हातभार लागेल, अशी योजना केली होती. या कायद्यामुळे, विसाव्या शतकातल्या सरकारच्या जमीन वाटपाच्या धोरणातील बदलाची नांदी झाली.

या नवीन धोरणानुसार, शेतकर्‍यांना केवळ जमिनीचे वाटप न करता, त्या जमिनीचा त्यांना अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. पुढे १९३४ च्या Taylor Grazing Act नुसार Homesteading ची प्रथा पूर्णपणे बंद झाली. यामुळे देशाच्या जमिनीवर खाजगी लोकांचा मालकी हक्क वाढला आणि त्या जमिनींवर यशस्वी होण्यासाठी लोकांना अधिकाधिक संधी मिळतील याची काळजी घेण्यासाठी सरकार अधिकाधिक कटीबद्ध झाले.

अमेरिकन वेस्ट म्हटलं की सर्वसाधारण वेस्टर्न चित्रपटांनी दाखवल्याप्रमाणे, घोडदौड करून तुफान गोळीबार करणार्‍या काऊबॉइजचं चित्र आपल्या डोळ्यां समोर तरळून जातं. परंतु खरा इतिहास काही इतका रंजक किंवा आकर्षक नाही. चित्रपटांनी रंगवलेल्या भव्यदिव्य काल्पनिकतेपेक्षा वास्तव अगदीच साधेसुधे व रूक्ष होते. अफाट आणि अविकसित अशा “वेस्ट़”ला काबुत आणण्याचे काम खरं तर तीन साध्या सुधारणांनी केलं – नांगराचा लोखंडी फाळ, काटेरी तार आणि इकडून तिकडे सहज नेण्यासारखी पवनचक्की.

प्रेअरीवरचे गवत म्हणजे उंच सळसळणारे. पण या गवताची मुळे खूप लांबवर पसरून जमिनीला घट्ट पकडून राहणारी. त्यामुळे प्रेअरीवरची जमीन खोदायची म्हटली की या मुळांनी जखडून ठेवलेल्या घट्ट जमिनीशी झटापट करावी लागायची. १९ व्या शतकाच्या सुरवातीचे नांगरांचे लाकडी फाळ, ही टणक जमीन आणि त्यातला गवताच्या मुळांचा गुंता, यांच्याशी टक्कर घेता घेता मोडून पडायचे. किंवा अगदीच नांगर मोडला नाही तर ही जमीन नांगराण्यासाठी चक्क आठ दहा बैल लावावे लागायचे. १८३७ साली जॉन डीर या माणसाने लोखंडाचा मोठा सुबक असा फाळ बनवला आणि प्रेअरीवरची जमीन अमेरिकन शेतकर्‍यांच्या कह्यात आली.

चहूदिशांना अफाट पसरलेल्या या जमिनीवर गाई, गुरं काबूत ठेवायची, म्हणजे एक दिव्यच असायचं. पूर्वेकडच्या किनारपट्टीसारखी इथे प्रेअरीवर जंगले नव्हती, किंबहुना एकंदरीत झाडांचीच कमतरता, त्यामुळे लाकडाची कुंपणं घालणं शक्य नव्हतं. मग १८७४ साली, जोसेफ ग्लीडन नावाच्या माणसाने लोखंडाच्या तारेला, तारेचेच छोटे छोटे टोकदार तुकडे जोडून काटेरी तार तयार केली. त्या काळी या काटेरी तारेचे वर्णन मोठं समर्पकपणे “हवेपेक्षा वजनाला हलकी, व्हिस्कीपेक्षा ताकदवान आणि मातीपेक्षा स्वस्त” असं करण्यात आलं होतं. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी या तारेने जनावरांच्या चराऊ कुरणांना कुंपण घालण्याचं काम चोख बजावून मोठीच मोलाची कामगिरी बजावली.

तिसरी महत्वाची सुधारणा म्हणजे हलक्या पवनचक्क्या. या साध्या पवनचक्क्या, लाकडी खांबांनी केलेल्या ३०-४० फूट उंचीच्या चौकटीवर उभ्या रहायच्या. प्रेअरीच्या मोकळ्या आकाशाखालचा भणाणता वारा या पवनचक्क्या गरगरा फिरवत रहायचा. त्यांच्या सहाय्याने, जमिनीत जागो जागी खणलेल्या बोअर वेल्स (विहिरी) मधून काढलेल्या पाण्यावर शेकडो, हजारो एकरांवर शेती भाती पिकू लागली. सुमारे १९३० पर्यंत या पवनचक्क्या म्हणजे प्रेअरीवरच्या प्रत्येक फार्मचं जणू अविभाज्य भागच झाला होता. पुढे मग विजेवर चालणार्‍या मोटारींनी या पवनचक्क्यांची जागा घेतली. परंतु अजूनही बर्‍याच ठिकाणी या जुन्या छोटया पवनचक्क्या फार्मवर शोभेसाठी किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जपून ठेवलेल्या आढळतात.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..