नवीन लेखन...

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ७

Thanksgiving Sale in America - Part 7

एकतर इथली सगळी स्टोअर्स प्रचंड मोठाली. त्यात नवखा माणूस हरवला तर शोधायला मुश्कील अशी परिस्थिती. आतातर सेलफोनशिवाय एकाच दुकानात एकमेकांना शोधणं अवघड वाटतं. आठ नऊ वर्षांपूर्वी, सेलफोन्सशिवाय, आम्ही सात आठ जण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांतून फिरून, एवढया धुमश्चक्रीमधे आमचा एकही मेंबर कसा हरवला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात दळणवळणाची साधनं नसतानाही, आपल्या सेनेच्या सार्‍या तुकड्यांना नियंत्रणात ठेवण्यात, अनुपमाने एखाद्या कसलेल्या सेनापतीसारखे नैपुण्य दाखवले, हे मान्य करायलाच हवे.

सोबत भली मोठी शॉपिंग लिस्ट घेऊन जायची आणि केवळ काही तासांमधे अगदी यादी बरहुकूम खरेदी करून सार्‍या वस्तू आणायच्या, हे काही येर्‍यागबाळ्याचे काम नाही. एकतर यादीतल्या सार्‍या वस्तू मिळवण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग, चपळाई आणि स्मार्टनेस असावा लागतो. दुसरं म्हणजे, आजूबाजूला पसरलेल्या या सेलच्या अफाट समुद्रातल्या, इतर असंख्य आकर्षक गोष्टींकडॆ काणाडोळा करायचा कठोर मनोनिश्चय देखील लागतो. हे म्हणजे, अलीबाबाच्या गुहेत जाऊन, मोजून चार माणकं, पंधरा पाचू, एकवीस मोती आणि एक नीलमणी हुडकून काढायचा आणि बाकीच्या खजिन्याकडे निर्धाराने न बघता गुहेच्या बाहेर यायचं असा प्रकार झाला. आमच्याकडे आणि देशमुख कुटुंबाकडे ना हव्या असलेल्या वस्तू मिळवायची चतुराई होती, ना नको असलेल्या वस्तूंच्या मोहात न पडण्याएवढा मनोनिग्रह! त्यामुळे हव्या असलेल्या वस्तूंपेक्षा ऐनवेळी दुसर्‍याच वस्तू आवडणं, ऐन समरप्रसंगी, घेण्याच्या आणि न घेण्याच्या वस्तूंमधे चित्त भरकटून दोलायमान होणं, नको त्या वस्तू धुंडाळण्यात वेळ घालवल्यामुळे, नेमक्या हव्या त्या वस्तूंपर्यंत पोहोचण्यास उशीर होणे, वगैरे छोटे मोठे प्रमाद आमच्या हातून घडलेच.

शेवटी एकदाचं शॉपिंग आटोपलं. सकाळचे जेमतेम साडे दहा वाजले होते. पुन्हा एकदा सारे गुर्जरांच्या घरी येऊन पोहोचलो. श्रीयुत गुर्जर व आमचा मुलगा सिद्धार्थ आरामात उठून ब्रेकफास्ट करून प्रसन्न चित्ताने टी.व्ही. बघत बसले होते. पुढचे दोन तीन तास, खरेदी केलेल्या वस्तूंची, शिवाजी महाराजांनी लुटलेल्या सुरतेच्या खजिन्याच्या थाटात छाननी झाली. काही कपडे दुकानातून घरी आणताना अचानक आकुंचित झाले होते, तर काही प्रसरण पावल्यासारखे वाटत होते. काही वस्तू दुकानात जेवढया आकर्षक वाटल्या तेवढया आता वाटत नव्हत्या. माधवरावांनी थोडी अधिक चपळाई, धूर्तपणा आणि थोडं कमी स्त्रीदाक्षिण्य दाखवलं असतं, तर हाता तोंडाशी आलेल्या दोन तीन वस्तू गमवाव्या लागल्या नसत्या असं नलिनीबाईंनी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलं. परंतु एकंदर मोहीम फत्ते झाली, असे सर्वांचेच मत पडले.

त्यानंतर आठ नऊ थॅंक्सगिव्हींग आले आणि गेले. आता त्या थॅंक्सगिव्हींग च्या सेलचं काही मोठंसं अप्रूप देखील राहिलं नाही. किंबहुना त्या २००२ सालच्या थॅंक्सगिव्हींग सेलनंतर, पुन्हा कधी आम्ही त्या सेलला जाण्याचं धाडस देखील केलं नाही. त्यावेळी तर आम्ही खरेदी केलेल्या वस्तू नंतर कशा का वाटेना, त्या आपल्या गळ्यात पडल्यासारख्या वापरत राहिलो. अशा खरेदी करून आणलेल्या किंवा कुणाकडून भेट म्हणून मिळालेल्या परंतु पसंत न पडलेल्या वस्तू, न वापरता त्याच दुकानात पावतीसकट परत करता येतात, याचा देखील आम्हाला पत्ता नव्हता. बर्‍याच वर्षांनी समजलं की थॅंक्सगिव्हींगच्या सेलच्या दुसर्‍या दिवशी त्याच स्टोअर्समधे दोन दोन तास रांगांमधे उभे राहून लोक न पसंत पडलेल्या वस्तू परत करत असतात.

अजूनही थॅंक्सगिव्हींगचा सेल येतो. ऑफिसमधले, आसपासचे, ओळखीचे कोणी कोणी सेलमधे काय काय घ्यायचं याच्या याद्या आणि strategy planning करत असतात. आम्ही आपले बर्‍याच वर्षांपूर्वी, श्रीयुत गुर्जरांनी दाखवलेल्या व्यवहारीपणाला दाद देत, स्वत:ला उबदार पांघरूणात गुरफटून घेऊन झोपी जाणं पसंत करतो.

– डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..