‘ परीक्षकांचा निर्णय अंतिम असतो आणि तो सर्वाना बंधनकारक असतो ! ‘
या एका वाक्याने तिला टोलवलं गेलं. आणि तिच्या अंगातली शक्तीच निघून गेली. मनाला नैराश्यानं ग्रासलं आणि ती पूर्णपणे कोलमडून पडली.
स्पर्धा नुकतीच संपली होती आणि निकालही जाहीर झाला होता. या स्पर्धेसाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली होती. दिवसरात्र अथक मेहनत हेच तिचं गेल्या काही वर्षातील जीवनव्रत बनलं होतं.
काय केलं नव्हतं तिनं ?
पाठांतर , उत्स्फूर्तता , स्वतःचे विचार , नवीन अनुरूप शैली , निरीक्षणाच्या माध्यमातून समृद्ध अनुभवाची मांडणी , देहबोलीचा कमालीचा संपन्न आविष्कार , स्पष्ट, शुद्ध उच्चार , विलक्षण आत्मविश्वास , संपूर्ण व्यासपीठाला सजग राहण्यासाठी दिलेलं अघोषित आव्हान आणि समोरच्या प्रेक्षागृहात क्षणाक्षणाला मिळणारी उत्स्फूर्त दाद …!
निकाल लागल्यागत वाटत होतं. परीक्षक वगळता सर्वांनीच अगदी प्रेक्षकांनीसुद्धा मनोमन निकाल गृहीत धरला होता…
तीच येणार सर्वप्रथम . नक्कीच !
निकाल उलट्या क्रमाने जाहीर होऊ लागला ,उत्तेजनार्थ , तृतीय , द्वितीय आणि आणि प्रथम….
निकाल सांगून झाला, पण तिचं नाव कुठेही नव्हतं, सर्वच प्रेक्षक अवाक…
टाळ्यासुद्धा वाजत नव्हत्या.
एकप्रकारचा सन्नाटा पसरला होता .
आणि ती कोलमडून गेली होती…
ज्यांचे क्रमांक आले होते तेही स्वतःकडे अविश्वासाने पाहत होते…
स्पर्धा संपली होती…
स्वप्नांच्या सौदागरानी आणखी एक भ्रूणहत्या घडवली होती !
-आजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…
स्पर्धक प्रचंड तयारीने स्पर्धेत उतरतायत , नवी उमेद , विलक्षण प्रतिभाशक्ती , नाविन्याचा ध्यास आणि असं बरंच काही…
उत्साहानं करिअरसाठी आणि जीवनात वेगळं काहीतरी घडविण्याची इच्छाशक्ती बाळगणाऱ्या युवाशक्तीसाठी स्पर्धा म्हणजे सर्वस्व असतं. त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असतं .
पालकांसाठी , आजूबाजूच्या वातावरणासाठी ते अप्रूप असतं.
मात्र स्पर्धेपूर्वीच भ्रूणहत्येची पूर्ण तयारी झालेली असते.
हे अनेकांना माहित नसतं, कुणाला पुढं आणायचं, कुणाला पाठी चेपायचं , कुणाला आयुष्यातून उठवायचं आणि अनपेक्षितपणे कुणाकुणाला धक्का द्यायचा, हे सर्व काही नियोजित असतं, आपल्याला ते माहित नसतं इतकंच.
बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणून आपण एकमेकांचे सांत्वन करत असतो आणि नियती हसत असते आपल्याला …
गुणवत्ता डावलणे आणि त्यातून नवोदित प्रतिभावंतांच्या स्वप्नांची भ्रूणहत्या घडवणे हाच आजच्या काळातील परवलीचा शब्द झाला आहे जणू !
एकमेकांचे सांत्वन न करता आपण हे थांबवू शकतो ?
गुणवत्तेला पुन्हा एकदा मानाचे स्थान देऊ शकतो ?
आपल्या भावी पिढीला निकोप स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मदत करू शकतो ?
ढोंगी , आपमतलबी तत्वज्ञानातून आपल्या पुढच्या पिढीवर अन्याय करणाऱ्या संधीसाधुना वठणीवर आणू शकतो ?
निकालातील सत्य सर्व प्रकारच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी चळवळ उभारू शकतो ?
की , सतत होणाऱ्या भ्रूणहत्यांकडे निर्जीव , गलितगात्र , हतबल होऊन निकालाकडे पाहणे इतकेच करू शकतो ?
विविध प्रकारच्या असंख्य स्पर्धाक्षेत्रातील हे जळजळीत वास्तव , आपण केव्हातरी डोळे उघडून पाहणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे !
आणि यावरच भावी पिढ्यांचे आणि अनुषंगाने हिंदुस्थानचे भवितव्य अवलंबून आहे !
तुम्हाला काय वाटते ?
—डॉ .श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी
८९५१९०६७०१


Leave a Reply