प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो .
निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या .
ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात .
‘ रस्त्यावरून जात असताना मैलाचे दगड दिसतात , म्हणून त्यांना कुणी बरोबर घेऊन जातं का ? त्या दगडाचं स्थान , त्या ठिकाणाहून जाणाराला आपण किती चाललो , हे कळण्यापुरतं असतं ! ‘
अशी एक मध्यवर्ती कल्पना केव्हातरी मला सुचली होती .
दैनंदिन व्यवहार चालू असताना अशा अनेक कल्पना मला नेहमी सुचत असतात . मग खिशातल्या छोट्या वहीत मी त्या लिहून ठेवत असतो . आणि स्वस्थचित्त असताना मग त्यातल्या एखादया कल्पनेवर मनातल्या मनात एखादा आकृतिबंध आकाराला येत असतो .
त्यादिवशी असंच झालं .
संपादकांचं पत्र आलं आणि मी विचार करू लागलो . वही चाळता चाळता मैलाच्या दगडाच्या मध्यवर्ती कल्पनेविषयी मन घुटमळू लागलं .
अशावेळी एक अस्वस्थता असते . काहीतरी सुचू पाहत असतं आणि मनातल्या आकृतिबंधाला योग्य शब्द मिळत नसतात .
मग नुसतं फिरणं , नको असलेल्या कामात गुंतून राहणं असं काहीतरी माझं होत राहतं .
तर अशाच एका अवचित क्षणी मला टेबलाचा ड्रॉवर साफ करण्याचा मूड आला . आणि मी ड्रॉवर उघडला .
त्यातल्या वस्तूंची गर्दी बघून मलाच चमत्कारिक वाटू लागलं .
परस्परविरोधी अनेक वस्तू मी त्यात कोंबून कशाही ठेवल्या होत्या . पेनं , पेन्सिल , खोडरबर , नेलकटर , सुटे पैसे , किल्या , कागदाचे तुकडे , कुठली कुठली बिलं …कशाचा कशाला पत्ता लागू नये इतकी गर्दी ..
आणि लक्षात आलं की हे अगदी आपल्या मनासारखं आहे .
नको असणाऱ्या अनेक गोष्टींनी मन खच्चून भरून गेलेलं असतं आणि जेव्हा केव्हा काही आठवायला हवं असतं तेव्हा काहीच आठवत नाही .
आठवणींचा चिखल झालेला असतो डोक्यात …
असं काहीतरी लक्षात आलं आणि त्याक्षणी मी तो उघडा ड्रॉवर तसाच ठेवून पॅड आणि पेन हाती घेतलं. आणि कागदावर लिहायला सुरुवात केली …
‘आळसावलेल्या कुत्र्यानं उठावं , अंग झडझडावं आणि उडी मारण्याची तयारी करावी , तसा दिवस उगवला …’
कथेला सुरुवात तर चांगली झाली .
मग त्यात रवी आला . प्रेम विवाह करूनसुद्धा नको इतक्या चिकित्सक वृत्तीनं राहिल्यानं होणारी भांडणं आली.
त्यामुळे वैतागून माहेरी गेलेली त्याची बायको किरण त्यात आली .
रवीची भावनाप्रधानता , किरणची जमिनीवर राहून विचार करण्याची वृत्ती , त्यातून बिघडलेले नाते संबंध हे सगळं आलं .
कथा पुढे पुढे सरकत असताना लक्षात आलं की हे सगळ्यांच्या कथेत असतं . मग आपल्या ड्रॉवर कथेमध्ये वेगळं काय ?
मग मैलाच्या दगडाचं स्थान , ड्रॉवर मधील वस्तू असं काही काही आठवत गेलं, सुचत गेलं . त्याअनुरोधानं प्रसंग येत गेले . माझीच कथा असूनही मी त्या पात्रांच्या विश्वात गुंतत गेलो . आणि शेवट करण्याआधी पुन्हा विचारात पडलो . दोघं एकत्र का येत नाहीत असा मलाच प्रश्न पडला आणि केव्हातरी ड्रॉवर साफ करताना जुनी टाचणी बोटाला टोचली होती ती आठवण आली आणि कथेचा शेवट सुचला .
माणसाच्या जुन्या सवयी , जुन्या आठवणी कधी कधी अनपेक्षितपणे सुखद धक्का देतात आणि आयुष्य बदलून जाते .
मैलाच्या दगडाला उचलून घेऊन जायचे नसते , ही जाणीव किंवा ड्रॉवर मधल्या सगळ्याच वस्तू टाकाऊ नसतात ही जाणीव होणे महत्त्वाचे असते .
कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते .
— आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते .
आणि खूप समाधान वाटते .
– डॉ .श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
८९५१९०६७०१


Leave a Reply