नवीन लेखन...

सुवर्णयुगाचा वारसाः लेणी

सध्या गड-कोट – किल्ले ह्यासंबंधी खूपच कुतूहल वाढलेले आहे. ह्याठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे आणि हे उत्तमच आहे. अगदी त्याचप्रमाणे पर्यटकांची लेण्यांकडेही रीघ लागू दे, अर्थात अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आदी लेण्यांकडे रीघ आहेच. पण छोट्या छोट्या उपेक्षित लेण्यांकडेही रीघ लागू दे… आपण भारतीय आहोत, परंतु महाराष्ट्र हा भारताचा खङ्गहस्त आहे तसेच महाराष्ट्राची काही खास वैशिष्ट्ये आहेत नि त्यांचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. उदा. महाराष्ट्राच्या श्रीगणेशोत्सवाला जगात तोड नाही. मोगल आदी आक्रमकांपासून एक प्रकारे साऱ्या भारतवर्षाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. खरोखर महाराष्ट्राला तोड नाही. दुर्गसंपत्ती म्हणजे किल्ल्यांच्या बाबतीतही महाराष्ट्राला तुलना नाही आणि लेण्यांच्या विषयी काय लिहू? जगातील सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात आहेत ह्याचा आपल्याला किती आनंद होत आहे म्हणून सांगू! महाराष्ट्रात सुमारे ४०० गड नि सुमारे १०० लेणी आहेत. प्रत्येक खोली व विहार वा चैत्यगृह हे स्वतंत्र लेणे धरले तर हा आकडा ९०० लेणी इतका होऊ शकतो. ही लेणी बहुजनांच्या साहाय्याने खोदलेली आहेत हे त्यांचे एक वैशिष्ट्य नि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक सहिष्णुता! इथली बहुसंख्य प्रजा नि इथले राजे धर्माने बौद्ध नि जैन नसूनही त्यांनी जैन-बौद्ध लेण्यांच्या उभारणीला भरभरून साहाय्य केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तर ही लेणी पहावी, ती समजावी म्हणून प्रा. प्र. के. घाणेकर, पांडुरंगराव पाटणकर, आनंदराव पाळंदे, प्रमोदराव मांडे, डॉ. मंजिरीताई भालेराव, प्रा. डॉ. शुभांगीताई, प्रा. कल्पनाताई, रायरीकर, डॉ. गोखले, डॉ. दाऊद आदींनी आम्हा पर्यटकांवर, अध्यापकांवर, वाचकांवर मोठेच उपकार केलेले आहेत. त्यांना वाचून गेलो की लेणी उत्तमपैकी समजतात.

लेणी म्हणजे काय? तर लेणी म्हणजे डोंगरावरील खडक खोदून निर्माण केलेली गुहागृहे. प्राचीन काळी बौद्ध भिक्षू पावसाळी निवासासाठी म्हणजे वर्षावासासाठी अशा गुहागुहातून राहात. पावसाळ्यात, सदैव संचारी असलेल्या भिक्षूंचा संचार थोड्या काळापुरता बंद असे. पाऊसकाळात ते अशा गुहातून राहात असत. प्रारंभी अनलंकृत असलेली ही लेणी अत्यंत सुशोभित करण्यात आली. अशा प्रकारे आधी ओक्याबोक्या करणाऱ्या ह्या गुहांवर ही चित्रांची नि शिल्पांची लेणी चढवली गेली. बौद्धजन ह्या गुहागृहांचा ‘लेण’ ह्या शब्दाने संबोधतात. ही लेणी ज्यांनी खोदविली त्यांचा क्रमनिर्देश असतो. नाशिकजवळच्या पांडव लेण्यात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ( इ. स. पू. १ले शतक). लेण शब्द संस्कृत लयन = गृह ह्या शब्दावरून आलेला आहे. लेणी आणि लेण्यांमधील लेख ह्यावरून त्या प्रदेशाचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला कळतो; हे ‘लेण्यां’चे मोठे ‘देणे’ आहे. लेण्यांमुळे भारतातल्या स्थापत्यकलेची प्रगती कळते. त्याकाळची वस्त्रप्रावरणे कळतात. मूर्तीवरून आणि चित्रांवरून त्याकाळच्या अलंकारांच्या पद्धती कळतात. सह्याद्रीकार स. अ. जोगळेकर म्हणतात, लेणी ही केवळ शिल्पसौंदर्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर अनेक दृष्टींनी भारताची लेणी (अलंकरणे) ठरलेली आहेत.

लेण्यांची वैशिष्ट्ये, महत्त्व अगदी थोडक्यात पाहिले, आता काही महत्त्वाच्या लेण्यांचा वैशिष्ट्यपूर्ण परिचय करून घेऊ. अजिंठा हे जगप्रसिद्ध लेणे संभाजीनगरच्या म्हणजे औरंगाबादच्या उत्तरेला सुमारे १०० किमी अंतरावर आहे, पण आश्चर्य म्हणजे ही लेणी आम्हाला माहीतच नव्हती, ती इंग्रजांनी बरोबर २०१ वर्षांपूर्वी म्हणजे १८१९ मध्ये शोधून काढली. एक ब्रिटिश सेनाधिकारी जॉन स्मिथ ह्याने ही लेणी शोधून काढली नि १८२४ मधे दुसरा एक सेनाधिकारी सर जेम्स अलेक्झांडर ह्याने ह्या लेण्यांचा अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग येथे फारच सुंदर रीतीने रेखाटलेले आहेत. अनेक पाश्चात्य कलाभ्यासकांनी येथील विशेषतः १६ व्या लेण्यातील चित्रांची मुक्तकंठाने स्तुती केलेली आहे. शोक, कारुण्य नि सुस्पष्ट प्रसंगचित्रे ह्या बाबतीत ह्या चित्राला मागे टाकणारी कलाकृती कलेच्या इतिहासात सापडणार नाही, असे ग्रिफिथ म्हणतो. फ्लॉरेन्सचे चित्रकार, व्हेनिसचे कलाकार ह्यांनासुद्धा अजंठा चित्रातल्या भावना जास्त उत्तम रीतीने व्यक्त करता आल्या नसत्या.

हा लेख म्हणजे एक ट्रेलर आहे; आपण प्रत्यक्ष लेण्यांचा चित्रपट पाहावा ही विनंती. वेरुळ लेणी अशीच अतिशय सुंदर ! वेरुळ लेणी औरंगाबादपासून केवळ २७ किमी अंतरावर आहे. वेरुळचे कैलास लेणे म्हणजे जगविख्यात, ज्याला तोड नाही. गिरिशिल्पातील हे अद्वितीय लेणे आहे. हे प्रचंड लेणे एकाच डोंगरापासून वेगळे केलेले आहे. प्रांगणात प्रवेश करताच समोर श्रीगजलक्ष्मीची सुंदर मूर्ती दिसते. मध्यभागी श्री नटराज शिवाची सुरेख मूर्ती आहे. या रूपात शिवाने नृत्य – नाट्यकला प्रवर्तित केली, अशी परंपरा आहे. शिवाच्या नृत्यमूर्ती आणि अर्धनारीनटेश्वर मूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. श्रद्धा, सौंदर्य, भव्यता, दिव्यता, अप्रतिमत्व आदींचे मनोहर मीलन आहे, आदींचे अद्वितीय प्रतीक आहे. २०० फूट लांब, १५० फूट रूंद नि १०० फूट उंच अशा खडकातून कोरून काढलेलं हे मंदिर आहे. जगातल्या आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी हे आहे. १९८३मध्ये युनेस्कोने हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले आहे. सहस्त्र वर्षांपूर्वीचं हे लेणं पण त्याचा निर्माता माहीत नाही. प्रसिद्धीपराङ्मुखता हेच त्याचं कारण असणार. कैलास मंदिराची विशालता आणि परिपूर्णता बघता ते कसं बांधलं असेल त्याची कल्पना करणंही अत्यंत अशक्य आहे.

घारापुरी लेणी म्हणजे एक महान वैशिष्ट्यच आहे. पोर्तुगिजांनी ह्यांचे नाव एलिफंटा असे ठेवले, लेण्यांची नासधूस केली, पण आपण अट्टाहासाने ‘घारापुरी’ असेच म्हणावे, हे आवाहन. मुंबईपासून १०-११ किमीवर समुद्रातील घारापुरी गावात हे अप्रतिम लेणे आहे. अनेक सुंदर सुंदर भव्य मूर्ती आहेत. एका भव्य दालनात ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, तिन्ही मुखे अतिशय सुंदर आहेत. अर्धनारीनटेश्वराची सुंदर मूर्ती अत्यंत दर्शनीय आहे. शिव हा शक्तीने युक्त होतो तेव्हाच तो कार्यक्षम होतो. शिवशक्तीची नित्य समरसता म्हणजे अद्वैत. विवाहमंगल म्हणजे शिवपार्वती विवाह हे घारापुरीच्या चित्रांतील सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.

थोडक्यात घारापुरी हे महाराष्ट्राच्या प्राचीन, मध्ययुगीन सामर्थ्याचे, समृध्दीचे, संस्कृतीचे एक अभिमानास्पद प्रतीक आहे. प्रसिद्ध संशोधक डी. कौटी म्हणतात, ‘मेण्यावर किंवा सोन्यावर करता येणार नाही इतके नाजूक काम येथे दगडावर केलेले आहे.’

आता जरा महाराष्ट्राबाहेर जाऊ.
उदयागिरी गुंफा – मध्य प्रदेश, भेलसा (विदिशा) नगरीपासून ८ किमी, भोपाळपासून सुमारे ५८ किमी. येथे २० गुंफा आहेत. ५ व्या क्रमांकाच्या गुहेत वराहावतार चित्रित केलेला आहे. वराहाची प्रतिमा हे गुप्तकालीन कलेचे अप्रतिम उदाहरण होय. ह्या वराहाची मूर्ती १२ फूट उंच आहे, धड मानवाचे नि मुख वराहाचे! त्याच्या दंताग्रावर स्त्रीरूपधारिणी पृथ्वी आहे. हे शिल्प मूर्तिकाराच्या अप्रतिम सौंदर्यनिर्मितीची साक्ष देते. वराहाचे शरीरही इतके दृढ आणि ओजस्वी आहे की, त्याच्या अंगप्रत्यंगातून शक्ती अतिचैतन्य ओसंडत आहे, असे वाटते.

आता कर्नाटकातील बादामी (मराठी बदामी) लेणीची महिती अगदी थोडक्यात घेऊ. बादामी विजयपूर (विजापूर) हून १२० किमी नि बंगळूरहून ४४८ किमी अंतरावर आहे. वेरुळप्रमाणेच येथे वैष्णव, जैन नि बौद्ध लेणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. नटराजाचे सुंदर शिल्प पाहावेच त्याला १८ हात आहेत. तमिळनाडूमधला नटराज कर्नाटकातील एका गुंफेत आहे नि अनेक मराठी नाटकांच्या प्रारंभी नटराजाचे पूजन होते. ही एकात्मता नव्हे काय?अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा अप्रतिम सुंदर आहे. अन्यत्र फारशी पाहावयास न मिळणारी हरिहराची प्रतिमा भिंतीवर पहावयास मिळेल. त्रिविक्रम, वामन व बळी ह्यांचे शिल्पकाम अतिशय भव्य नि सुंदर आहे. लेण्यांच्या दर्शनी भागात सुंदर आणि अलंकृत खांब आहेत. बौद्ध लेण्यांमध्ये श्री पद्यपाणी बोधिसत्त्वांची सुंदर मूर्ती आहे तर जैन लेण्यात श्री आदिनाथ तीर्थंकर, भव्य आहे. श्री भगवान महावीरासाठी व इतर तीर्थंकर यांच्या मूर्ती आहेत… अस्तु आपण लवकरच यथाशक्य लेणी पर्यटनाला निघावे, हे आवाहन !

प्रा. सु. ह. जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..