नवीन लेखन...

सुई-दोरा

पन्नास वर्षांपूर्वी मुलाला मुलगी पहाताना, तिला अनेक परीक्षा द्याव्या लागत होत्या.. म्हणजे तिच्या पायात काही दोष नाहीना हे पहाण्यासाठी तिला चालून दाखवावे लागे.. तिच्या शब्दोच्चारामध्ये काही दोष असेल तर तो कळावा म्हणून गाऊन दाखवायला सांगितलं जात असे..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यात दोष नाहीना हे पहाण्यासाठी तिला सुईमध्ये दोरा ओवून दाखवावा लागे..

एवढ्या अग्निदिव्यातून गेल्यावर तिचे इतर गुण, रूप, कुळ पाहून पसंत केले जात असे.. त्याकाळी गृहिणीला शिवण, टिपण इत्यादी कला अवगत असणे गरजेचे होते. त्यासाठी सुई-दोऱ्याचा डबा उपयोगी पडे.

कालांतराने शिवणक्लास सुरु झाले. घरातील स्त्री घरकाम सांभाळून शिवणक्लासला जाई. ते शिकल्यावर शिलाई मशीनवर किमान स्वतःचे ब्लाऊज शिवत असे.‌ पुढे चार घरची अशा प्रकारची कामे करुन ती संसाराला हातभारही लावत असे..

पूर्वीच्या मराठी हिंदी चित्रपटातील हिरोला आॅफिसला निघताना कळून येईल की, शर्टाचं वरचं बटन तर तुटलेलं आहे. अशावेळी त्याची पत्नी लगेचच सुई-दोरा घेऊन त्याचे बटन लावून देई व शेवटी बटणाचा दोरा आपल्या कुंदकळ्यांसारख्या दातांनी अलगद तोडत असे.. हा उत्कट रोमॅंटिक प्रसंग अनेक दिग्दर्शकांनी चित्रपटात हमखास घेतलेला आहे.. प्रेक्षक देखील अशा प्रसंगी हिरोच्या ठिकाणी स्वतःला समजत असे..

त्या काळात प्रत्येक गृहिणी सुई-दोऱ्याचा डबा घरात ठेवत असे. त्यामध्ये विविध बटणं, लहान मोठ्या सुया, दाभण, रंगीत दोऱ्यांची रिळं, ब्लेड ठेवलेलं असे..

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘स्टीच इन टाईम, सेव्हज् नाईन’ म्हणजेच वेळीच जर फाटलेल्या ठिकाणी, टाका घातला तर पुढचे नऊ टाके वाचू शकतात.. अनर्थ टळू शकतो..

याचाच आपल्या जीवनाबद्दल असाही अर्थ काढता येईल की, कोणतीही चुकीची गोष्ट घडल्यानंतर लगेचच त्याची दुरुस्ती केली तर पुढे घडणारं, रामायण टळू शकतं.. उदा. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दलचं चुकीचं ऐकून गैरसमज करुन घेतला आणि त्याच्याशी शहानिशा न करता संबंध तोडला तर भविष्यात त्याचं नुकसान होऊ शकतं..

तेव्हाच या समजूतदारपणाच्या सुईत, मैत्रीचा धागा ओवून टाका घालणं शहाणपणाचं ठरतं.. सुईमध्ये तोच धागा जाऊ शकतो, ज्याला गाठ नाही.. मन स्वच्छ, स्वभाव पारदर्शक असेल तर तो धागा कोणत्याही सुईतून सहजपणे ओवला जाऊ शकतो…

खेड्यामध्ये अजूनही दुपारच्या वेळी चार बायका एकत्र येऊन वापरुन झालेले कपडे, साड्या जोडून वाकळा, गोधड्या तयार करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपड्यांपासून तयार झालेले ते एक प्रकारचे नात्यांचे ‘फ्युजन’च असते.. ज्याला घडविणारा असतो तो.. सुई-दोरा!

आता काळ बदलला आहे.. आता शिवणक्लासही नाहीत.. शिलाई मशीनही घरात नाही तर फक्त टेलरकडेच दिसते.. तुटलेलं बटण लावण्याचे रोमॅंटिक प्रसंगही होत नाहीत.. तसं घडलंच तर नवीन कपडे आॅनलाईन मागवले जातात.. सगळं भावनाशून्य डिजिटल झालंय.. अगदी प्रत्येकाचं ‘मन’ही….

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

९-१०-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 158 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..