नवीन लेखन...

पाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करा

पुलवामानंतर भारताने सीमेवर केलेल्या आक्रमक सैन्य तैनातीमुळे पाकिस्तानला तशीच तैनाती करणं अत्यावश्यक आहे. यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था कोट्यावधी रुपये रोज जाळत आहे. भारतीय हल्ल्यांनी पाकिस्तानची प्रवासी आणि व्यापारी विमान वाहतूक बरेच दिवस पूर्णपणे बंद होती. चीनसह अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाकिस्तानवरील विश्वास पूर्ण उडत चालला आहे.

अशीच सैन्य तैनाती दीर्घकाळ चालू ठेवावी लागली तर पाकिस्तानात महागाई कळस गाठेल आणि अंतर्गत अशांतता वाढत जाईल. एक वेळ अशी येईल कि सैन्यसुद्धा सामाजिक उद्रेक थांबवू शकणार नाही.

सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.

पाकिस्तानी सैन्य  अफगाणिस्तान आणि इराण सीमेवरून भारतीय सीमेवर

भारताची सैन्य तैनाती सुरु झाल्या झाल्या पाकिस्तानने बलुचिस्तान आणि पश्तुन भागातून घाईघाईने सैन्याची हलवाहलव सुरु केली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्य  अफगाणिस्तान आणि इराण सीमेवरून भारतीय सीमेवर नेलं जात आहे. यामुळे बलुच गटांचे पाकिस्तानी सैन्यावर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय सैन्याने रिकाम्या केलेल्या २०० च्या आसपास पाकिस्तानी चौक्या आणि ठाणी बलुच योद्ध्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. गेल्या एक महिन्यात बालुच हल्ल्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

भारताची आक्रमक सैन्य तैनाती दीर्घकाळ पाकिस्तानी सीमेवर राहिल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला जाईल आणि बलुच , सिंधी, मुहाजिर स्वातंत्र्य आंदोलनाला यातून मोठं बाळ मिळेल.हे “वॉर ऑफ ऍट्रीशन” स्वतंत्र बलुचिस्तान, सिंधुदेश आणि मुहाजिर राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून देईल.

पाकिस्तानात महागाईने कळस गाठला

दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानचे भारताने सीमा शुल्क २०० टक्क्यांनी वाढवून, ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा काढून चांगलाच दणका दिला. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानात महागाईने कळस गाठला आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीयस्तरावर एकाकी पडला आणि याचाच दुष्प्रभाव त्या देशाच्या जर्जर अर्थव्यवस्थेवरही होताना दिसून येतो. वर्तमानातली परिस्थिती अशी अशी आहे की, पाकिस्तानात महागाईने गगनाला गवसणी घातली असून नव्या आकडेवारीनुसार चलनवाढीचा(Inflation rate) दर सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये या दराने गेल्या पाच वर्षांतल्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला.

फेब्रुवारी २०१९ मध्ये महागाईचा वेग ५६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच ८.२१ टक्क्यांवर पोहोचला. इतक्या मोठ्या प्रमाणावर महागाईने उसळी घेतल्याने जवळपास प्रत्येकच आघाडीवरील वाढत्या किंमती आयुष्य जगण्यासाठीच्या खर्चात मोठी वाढ होण्याचेच संकेत देतात. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाने १ मार्च रोजी सांगितले की, ग्राहक मूल्य निर्देशांकाद्वारे (सीपीआय-Consumer price index) मापन केलेल्या चलनवाढीमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये वाढ होऊन ती ८.२१ टक्के झाली, जी की गेल्या वर्षी ३.८ टक्क्यांच्या पातळीवर होती.गेल्या काही काळापासून पाकिस्तानी रुपयाचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या एका वर्षात पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी खाली घसरला. रुपयाच्या निचांकी पातळीचा दुष्प्रभाव पाकिस्तानच्या परकीय चलनसाठ्यावरही पडला आणि त्यातही घट झाली. परिणामी, पाकिस्तान खर्चाच्या संतुलनाच्या(Balance of payment) मोठ्या संकटाकडे अग्रेसर जात आहेत.

रोजच्या जेवणातील टोमॅटो, आले, बीफ, साखर, चहा, मटण, गूळ, तूप, मासे, मूगाची डाळ, अंडी, खाद्यतेल, तांदूळ, हरभरा डाळ, ताजे दूध आणि गव्हाच्या किंमतीत ३.२१ टक्क्यांवरून १७९.४ टक्के इतकी वाढ झाली. चलनवाढीचा दर सरासरी ६.४६ टक्के राहिला, फेब्रुवारी २०१९ मध्ये हा दर जवळपास सहा वर्षांच्या उच्चस्तरावर म्हणजेच ८.८ टक्क्यांवर पोहोचला. चलनवाढीचा प्रभाव सरकारच्या धोरणांवरही होताना दिसतो. चलनवाढीच्या या वाढत्या दरामुळे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे की,पाकिस्तान सरकार सर्वच सरकारी कर्मचार्यांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ करण्याच्या सिनेटच्या प्रस्तावाला फेटाळेल. कारण, पाकच्या राजकोषाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे.

भविष्यकालीन शक्यता

आशियाई विकास बँकेच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या जीडीपी वाढीचा दर सध्या ४.८ टक्के आहे, जो की नेपाळपेक्षाही (५.५ टक्के) कमी आहे. पाकिस्तानच्या नव्या जीडीपीविषयक आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ५.४ टक्के आणि २०१८मध्ये तो ५.८ टक्क्यांवर घसरल्याचे दिसते. ‘स्टँडर्ड अॅण्ड पुअर्स’नेदेखील पाकिस्ताच्या दीर्घकालीन कर्जविषयक मानांकनाला ‘बी-निगेटीव्ह’पर्यंत खाली आणले. सोबतच असा इशाराही दिला की, २०१९मध्ये पाकिस्तानचा जीडीपी दर चार टक्क्यांच्याही खाली जाऊ शकतो, जो की, आगामी दोन वर्षांत साडेतीन टक्के आणि २०२२ पर्यंत ३.३ टक्क्यांच्या पातळीवर जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानातील चलनवाढ भारत, बांगलादेश आणि नेपाळसह भारतीय उपखंडात सर्वाधिक आहे. परकीय चलनसाठ्यात कथितरित्या सात बिलियन डॉलर्सपर्यंत घट झाली आहे, ज्यामुळे पाकिस्तान केवळ एक महिन्यापर्यंतच आयात करू शकतो.

जून २०१९ ला समाप्त होणार्‍या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत मंदीही निर्माण होऊ शकते. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था दोन प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे. एक म्हणजे सरकारी खर्च तिजोरीतील पैशापेक्षा खूपच अधिक आहे, ज्यामुळे दरवर्षी दोन खर्व रुपयांचा तोटा होत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानची आयात निर्यातीहून दुप्पट आहे. वाढत्या चलनवाढीला जोडून असलेले नुकसान उच्च वास्तविक आर्थिक विकासाच्या मार्गावर पाकिस्तानला निकटच्या भविष्यात मोठ्या संकटात टाकू शकतो.

पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध सुरु करा

भारताने पाकिस्तानविरुद्ध आर्थिक युद्ध सुरू करायला हवे आहे. शस्त्रस्पर्धेत त्यांना गुंतवून, अमेरिकेने ज्याप्रमाणे रशियाला परास्त केले त्याचप्रमाणे, आपण पाकिस्तानला आर्थिक विनाशाप्रत नेले पाहिजे. होर्मुझच्या आणि एडनच्या आखातांत, भारतीय नौदलाची कायमस्वरूपी उपस्थिती असायला हवी, ज्यामुळे पाकिस्तानी नौदलाला अतिरिक्त शस्त्रास्त्रे तैनात करावी लागतील. आणि त्यामुळे आधीच अशक्त असलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था प्रभावित होईल. आपण आपले आर्थिक सामर्थ्य पणाला लावून पाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकायला हवी. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या १५ पट मोठी आहे. जर आपण पाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकलो नाही तर, ह्या सामर्थ्याचा उपयोग काय? आपण खालील गोष्टी करू शकू काय?

१.   ५००/१.००० रुपयांच्या खोट्या पाकिस्तानी नोटा पाकिस्तानात शिरवू शकू काय? पाकिस्तान आपल्या देशात करतो मग आपण का नाही?

२.   भारतीय स्वस्त वस्तुंनी पाकिस्तानी बाजार भरून टाकू शकू काय आणि त्यायोगे त्यांच्या उद्योगास अवनत करू शकू काय? ह्याकरता अगदी स्वस्त चीनी वस्तूही तस्करीने किंवा पाकिस्तानात निर्यात करून हे साधले जाऊ शकते.पाकिस्तान/ अफगाणिस्तानच्या अफू शेती वर गंडातर कसे आणता येईल ते बघावे..

३.   आपण एफ.आय.आय. (Foreign Institutional Investors)/ एन.आर.आय./ इतर उपायांनी कराचीचा भांडवली बाजार (Karachi Stock Exchange) कोसळवू शकतो काय?

४. पाकिस्तानात वाहणार्या नद्यांचा उगम भारतात आहे. गाजावाजा न करता पाण्याचे नियोजन असे करा की, उन्हाळ्यात कमी आणि पावसाळ्यात जास्त पाणी सोडा. चीन जसे ब्रम्हपुत्रेचे पाणी पळवत आहे तसे आपण पाकिस्तानात वाहणार्या नद्यांचे पळवावे.

अजुन काय करावे

भारताने सध्याच्या स्थितीत मोठा सैनिक संघर्ष स्वतःहून सुरु नं करता, आणि सध्याची आक्रमक सैनिकी तैनाती जराही कमी नं करता पाकिस्तानवर जीवघेणा सैनिकी दबाव कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानी अर्थव्यवस्था धाराशायी होईल आणि बलुच, पश्तुन, सिंधी, मुहाजिर ही राष्ट्रवादी आंदोलने जोमाने मन वर काढू शकतील.

अफगाणिस्तानातील रक्तरंजित तालिबान, दहशतवाद आणि कश्मीर मधील रक्तपात याची मुळे पाकिस्तानात खोलवर रुजलेली आहेत त्यामुळे पाकीस्तान पूर्णपणे खंडीत केल्याशिवाय दहशतवाद थांबणार नाही.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..