नवीन लेखन...

सोरड

पिकांनी माना टाकल्या होत्या. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत होता. नद्या आटलेल्या , कोरडयाठाक पडलेल्या होत्या. अंगाभेवती चिलटं घोंगावेत. पुन्हा हातानं हानावेत. तशी माणसं कावल्यागत झाल्ती . पावसाचा शिपका जूनमधी पडून गेल्ता. त्यानंतर गोमतार शिंपडल्यावाणी तरी यायचं त्यांनी. चार- दोन ढगं आभाळात यायचे . थोडफार वारं सुटायचं आणि पुन्हा सगळं नितळ. तश्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आट्या पडायच्या . कणगी रिकाम्या झालेल्या . खिशात खडकू नाही. अशात भिमराव घोडके घराबाहेर पडले. गावात सामसूम होती. कुणी कुणासंग चकार शब्द बोलत नव्हतं. गावातल्या हाटेलात कपबशी हिसाळल्याचा आवाज होत नव्हता. दुपारी भणभण आवाज करणारी पिठाची गिरण बंद असल्यागत होती. अजगरावाणी पडून होती. शाळेच्या पडवीत कशाचातरी कलमा होत आहे. तिकडं माणसं नेमकं काय करताहेत ॽ हे बघायची उत्सुकता भिमरावला लागून ऱ्हायिली . तात्याच्या दुकानापुढं तेलाच्या टाक्या मोकळ्याच पडल्या होत्या . आणसाबयाचं माळवदाच घर , भिंती पडल्याले दगड तसेच खिळपाट रचून ठेवलेले होते.

भिमरावाचे पाय शाळाकडं आपसूकच ओढले. पडका वाडा वलांडून झाला. पलिकडं देवळाच्या कडीला भलामोठा घोळका दिसत होता. जुनं – पडकं सभागृह थुकून- मुतून घाण झाल्याल होत. तिथंच एक माणूस पोतं टाकून बसलेला होता. घाम पुसत होता. त्याच्या भोवताली तरूण पोरांचा घोळका उभाच होता. पाठीमागं हात मुडपत तर कुणी गुडघ्यावर वाकत, हात टेकवत समोर पाहत होत. कायीतरी तिथं घडतय असं वाटत होत. काय बरं असल ॽ अशी उत्सुकता ताणली होती. आत पाहिल्याशिवाय राहावत नव्हते. ‘च्यामारी रानात यान्ला काम न्हायीत म्हणून काहीतरी उद्योग करत असतील’ म्हणत भिमरावानं घोळका गाठला त् हे बेणं सोरड खेळत होते.

‘ ए, दिवा ss एक रूपया ’ – एकजण

‘ सूर्य लाव SS दीड रूपया ’ – दुसरा

भोवरा पाच रूपये ’ – तिसरा

‘एक लावा , आठ घ्या Ss एक लावा, आठ घ्या. एकला आठ , एकला आठ’ – पोत्यावर बसणारा पोऱ्या ओरडत होता. त्याची जीप चलत होती. रांजणेगाव ते उंडणगाव … हप्ते- फिप्ते जाम होते. जिथं – तिथं. त्याच्यात सोरडबी लावायचा. अजुन काही धंदेही होते. तोंडात बोकना भरून वरडत होता. दोन- तीन जण शेजारी पाळले होते. ते त्यांच्याच बाजूचे होते. ते त्याच्याकडून पैसे घ्यायचे. पतंगावर दिव्यावर लटकेच लावायचे . शाळा जवळच होती. शाळातले ठोकळ पोऱ्हबी नादाला लावले होते. नवं गिऱ्हाईक फसायच. जवळचे धा – पाच देऊन मोकळे व्हायचे. खिसा मोकळा झाला की तिथंच बसायच तोंडाचं पाणी गिळीत. सोरडवाल्याकडं बरच गबाळ साचलं होत. सगळे व्हळीले होते. भीलवाडा, झेापडपट्टी, वडारवस्ती, खालची सुतारनेट, वरची आळी, सडकाचे, मसुबाकडले, सगळे पोऱ्ह धुवून हाणले होते. त्यांच्या डोक्यात काय अक्कल येत नव्हती. जाम नशा चढली होती. प्रत्येकाच्या घरी कुरबुरी होत होत्या. बायकापोऱ्ह वैतागली होती. कामधंदा बुडत होता. इकडं सोरड भोवताली भणाभणा हिंडत होती.

भिमरावाला चक्कर आल्यागत झालं. कालची एकादस निरंकार धरली होती. पाणीच काय तेवढं घेतल होत. गावातल्या सगळ्यांनी निरंकार एकादस केली होती. कोणत्यातरी गडावरच्या महाराजांनी सांगितले होते. ‘ पाऊस पडत न्हायी . दुष्काळ सारखा पडतोय. एकादशीला भलं लई मोठं खात जाऊ नका.’ असं म्हणाला होता. म्हणून भिमरावान निरंकार उपवास धरला होता. पाऊस पडेल. दुष्काळ हटेल. अस उगीचच वाटल होतं. डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या तरी भिमरावान बुड टेकवत पाराच्या कडीला बुड टेकवल. सावध पवित्रा घेतला. डोळे थोडेसे उघडले. घशाला कोरड पडली. काय करावे ते सुचेना. तसाच उभा राहीला . पायातलं बळ कमी झाल्यासारखं वाटलं. उंबराची दोडी पिकून गळती व्हावी तसं.

भिमराव तसाच उठला. घराकडं निघाला. हापशावरच्या बायका नुसत्या हापशा दणाक् दणाक् वाजवत होत्या. उगं करंगळीएवढी धार चलत होती. आठ दहा घागरी भरल्या की मधीच हापशा अंगात आणायचा. एक सांगळा उपसला की दुसरा चार- पाच तासानी उपसावा लागायचा. तव्हार त् घरातलं सगळं पाणी उडून जायच. तिकडं देवढयाच्या रानात एक बांधल्याली जुनी एक यहीर होती. तिथनं पाणी आणावं लागायचं. पण तिच्यातबी चिचाचा पाला पडून. पाणी लालसर झाल्त. कोऱ्या चहागत्. त्येबी प्यायला घेतलं त् बीएस्सी पावडरगत भपका मारायच. खिळपाटामाग एक आड होता. त्याच्यात गप्पी मासे सोडले होते म्हणं. त्याच पाणी आटलं अन् मासे डासाला खाण्याऐवजी तेच मरू लागलं.

भिमराव इचाराइचारातच कव्हा घरी पोहचला. कायीच समजल नाही . दारात चपला सोडीतेत नाही सोडीतेत तोच घरातला आवाज दणकण कानावर आदळला. कानफाडात मारल्यागत. कानात नुसतच शिट्टी फुकल्यागत झाल.

‘ मी काय म्हणते ॽ’, – एवढं एकच वाक्य भिमरावाला भानावर आणायला पुरेस होत.

‘ गिरणीतले दळण आणलं का ॽ’ – भिमरावची बायको.

‘ नाही ना …’

‘ कामून ॽ’

‘ गिरणीचं जातं उपटीलय् ’

‘ व्हय का ॽ’ – त्यालाबी आताच सवड सापडलीय का ॽ’

भिमरावान हवेतच फवारा हाणला व्हता. एक प्रकरण निस्तारूस्तर दुसरं हजर होत. दुसऱ्यांदा तोच प्रश्न.

‘ मी काय म्हणते ॽ’, – भिमरावानं हे काय मनावर घेतलं नाही.

‘ मी काय म्हणते ॽ’, – जोराचा आवाज.

‘कायॽ बोलना ss’

‘ त्ये लोकं विमाफिमा भरत्येत बघा की जाऊन जरा. धा-पाच येत्येत खर्चायला.’

‘त्यातुन काय व्हतयॽ’

‘ तुम्हाला त् काहीबी म्हण्ल त् हिंग्लीडिंग्लीवरच नेता.’

‘हिंग्लीडिंग्लीवर !’

‘ मंग काय त् !’

‘बरं बरं जातो.भरतो विमा. त्यो आता ऑनलाईन झालाय म्हण.’

‘म्हण्जी काय ?’

‘विमा भरायला रांगाच्या रांगा असतात. चेंगराचेंगरीबी होतीय. दांडके हाण्ले म्हणं. ह्या नडघ्या काळ्यानिळ्या झाल्यात. त्या गहिनीनाथअप्पाचं धोतर फिटल होत का पिवळं झाल्त म्हणं’

‘ झालं असलण्‍ अग लई मारामारी झालीय.’

‘हूँ ss’

‘परत लाईनबी नसतीय.’

‘लाईट त् मस्स जळतीय मरणाची.’

‘अगं लाईन नाही.लाईट असतीय पण त्ये ऑनलाईन भरत्येत कॉम्प्यूटरला . तिथं अंगठयाचे, बोटाचे ठसेबी द्यावा लागत्येत.’

‘बरं’ – भिमरावचे घरचे माणसं समजून घेत होते.

‘परत ज्यो- त्यो माणूस लागतोय’

‘म्हंजी ?’

‘दोन-तीन वर्षात काय झालं. माहितीय का?’

‘काय झालं?’

‘ कुणी आठ अ बदल्येव. क्षेत्र वाढून लावेव .एका एकराचे धा-धा एकर वाढून लाव. कुणी बँकेचे साहेब साहेब हाताशी धरून बोगस इमे भरले. ह्या बँकीत भरला की दुसऱ्या बँकीत भर. सगळ्या बँकीत एकाच वावराचा. एक्याच पिकाचा. सारखाच इमा. जे चालबाज होते त्यांना दोन- दोन लाखांपर्यंत मिळाले. जे इमानदार होते. ते गर्दीतच चेंगारले.’

‘ व्हय का?’

‘ म्हणून आता हे ऑनलाईन आणलय.’

‘बरं झाल मग’

‘बरं न्हायी . ह्यो पिकविमा म्हंजी. याच्यापेक्षा सोरड लावल्याल बरंय असं झालय. चारपाच पिकाचा पीकपेरा द्यायचा. त्यातून एकाच पिकाला निघतूय विमाबी.’

‘व्हय का?’

‘ तसच असतय. कापूस, तूर, मूग,उडीद , सोयाबीन हे सगळे पीकं लावले तरी एकालाच लागतो. सोरडमधी नाही का दिवा, ससा, कप, भोवरा यापैकी एकालाच मिळत्येत तस.’

‘ म्हंजी काय?’

‘ तुला नाही कळायचं त्ये.’

‘बरं जाऊ द्या. तुम्हाला त् काहीबी सुचतं..’

‘काहीबी कस, खरं त्येच सांगतोय.’

‘सरकारकडं कितीतरी वरलोड पैसा जमा व्हत असल’

‘चार जणाचा घ्यायचा आणि उका जणाला द्यायचा.’

‘व्हय आता कसं बोल्ली .आपलाच पैसा आपल्याला द्यायचा . उलट त्यातूनच ठेवायचा. असं असतय. आपले लोक बिनडोक. त्यान्ला काय.. ती कंपनी असतीय म्हणं.’

‘जाऊ द्या आपलं. सगळे भरत्येत त् आपलाबी या भरून.’

‘ गेल्तो ना परवा. त्यांचे तोंडच दिसानात. परत एका एका फारूम मागं पाश्शे हजार जादाचे घ्येत्येत.. ज्याला जसं साधलं त्यां तसा लुटतोय.’

‘व्हय का?’

‘हूँ, एवढे कुठून आणायचे पैसे. परवाच पोरांना भरल्येत कपड्याचे . फीसचे , मास्तर माघत्येत. शाळा रंगवायला. त्यान्ला तर नाहीत म्हणून सांगितल्येत. इथं हातातच नाहीत अन् तिथं बाजारत जाऊन काय उप्येग’

‘ बघा त् खरी, कुणाकुण तरी उस्नेपास्ने करावात.’

‘ उसने तरी कोण देतय अस्ल्या काळात. याजान म्हण्लत् हजार तयार व्हत्येल. बरं बघू’

संध्याकाळ झाली. लेकरंबाळं झोपली. उद्याची चिंता सतावत होती. पिकविमा भरायचा होता. पैशाची तजबीज करायची होती. कुणापुढे तरी हात पसरावे लागणार होते. बीडात ऱ्हाणारा बाजीराव आठवला पटकन् ‘ नोकरदाराकडं असत्येत धा- पाच कव्हाबी.’ असं मनाशीच पुटपुटला आणि सकाळ कधी झाली हे कळलेच नाही. पोरांची शाळेची गरबड उडाली.

सकाळीच बाजीरावाच घर गाठलं. त्यालाबी शाळेत जायची गरबड होती. त्याच्याकडं हात पसरले. त्यानं सुरूवातीला जरा अंगातच आणलं. पण नंतर दिले दोनेक हजार. भिमरावानं तलाठी कार्यालय गाठलं. तिथं सेतू केंद्रातून उतारा, आठ अ, सातबारा अन् पीकपेरा घेतला. तलाठयाच्या हाताखाली गावातलाच एक माणुस होता. त्याला काही दिलं अन सेतू केंद्रावाल्याला काही दिले. तसाच बिगरभाकरीचा पिकविमा भरत्येत त्या केंद्रावर गेला. तिथं मरणाची गर्दी . एकेका केंद्रावर लांबलचक रांगा लागलेल्या . पोलिस बंदोबस्त. बँकावाल्याची, विमावल्याची, झेरॉक्सवाल्याची पळापळ. सगळा कलमाच. पिकविमा काढायला माणसं रातभर त्या केंद्रावरच होती. आधारकार्ड असल्याशिवाय विमा निघत नव्हता. ज्याच्या नावावर वावार असल त्याच्या बोटाचे ठसे लागायचे . कुणाकुणाचे ठसेच उमठत नव्हते. विमा काढणाराच तोंड दिसत नव्हत. शेवटची तारीख जवळ आल्ती. पंढरपूरच्या विठ्ठलाला दर्शनासाठी बारी लागावी तशा रांगा लागल्या होत्या. बायामाणसं सुध्दा रात्रीच मुक्कमाला येत असत.

भिमरावानं एक पोऱ्या गावातलाच गटवला. त्याला विनवणी केली. तो बघतो म्हणत होता.

‘ बघ ना कुठं लवकर इमा भरत्येत का त्ये.’

‘ नाय ना.. इथं लई हुरसुळं माजलय’

‘ तुमचं हायी ना त्ये इमा भरायचं.’

‘हायी ना मस्स. पण इथं लाईनच चलाना. लोडवर आलीय.’

‘लाईट त् हायी.तिकाय बल्प लागल्याला दिसतूय.’

‘ती लाईन न्हायी. त्ये ऑनलाईन असतय. लिंक बंद पडलीय.’

‘बरं.बरं. हे पैसे अन कागदपत्र. हे ऱ्हाऊ द्या.

‘ इथं अगोदरचेच दोन-तीनशे फॉर्म पडल्येत.’

‘ धा- पाच जास्तीचे घ्या.’

धा-पाच म्हटल्याबरोबर तो टवकारला. मग बोलायला लागला.

‘‘ तुमचे विम्याचे कितयेत. सतराशे अन् वर पाचशे द्या म्हंजी भागलं. मी बोलतो त्याला. अन् रेंज आली की कळवता.’’

भिमराव विना अन्नपाण्याचा दिवसभर वाट बघत बसला. आता नंबर येईल अन् विमा भ्रला जाईल. असं त्याला सारख वाटायचं. लोकांची धावपळ वाढली होती. गर्दीतून वाट काढणं मुश्कील झालं होत. आपण कुणाचेतरी मिंधे आहोत. अस वाटायचं. रोजच शेतातल काम बुडत होत. हेलपाटे वाढत होते. कुणीतरी मोर्चाची भाषा करत होते. कालच पालिसांनी ते बदडले होते. आयाबाया रातभर सेतूकेंद्रातच झोपल्या होत्या. पहाटे रेंज येती म्हणायचे. आशेपोटी, स्वप्नापोटी,दोन रूपये गाठीला मिळतील. सुखाचे चार दिवस येतील. अशी अपेक्षा वाढली होती. सूर्य कलला होता. लोकं वैतागून गावाकड निघाली. दिवसभर उपाशीच होती. काकुळतीला आली होती. अंधार पडत होता. सेतू केंद्रावाला ‘ थांबाच येईन लाईन’ म्हणत होता. रात्रीचे बारा वाजले. रेंज आली. धडाधड शटर वाजू लागले. ऑनलाईन विमा सुरू झाला. लाकं तटातटा उठून बसले. भिमराव सावध झाला. सेंटरच्या दारात तुंबल्याली नाली होती. रेटारेटी वाढली. अंधारात नाली काही दिसली नाही. सपाट जागा असल्यासारख वाटल. पाय घसरला. कमरेपर्यंत रेंदाच रेंदा. कपडे भरले. पायात फन्कन् मुंग्या निघाल्या. वेदना सुरू झाल्या. दवाखाना गाठला. पायाचं हाड मोडल होत. डॉक्टरान प्लॉस्टर केलं. दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागल. एका पायानं अधू. विमा भरता आला नाही. ना पिकाचा. ना पायाचा !

— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
मो. 9421442995

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..