नवीन लेखन...

सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार

आधुनिक तंत्रज्ञान, धार्मिक कट्टरता यांचे घातक मिश्रण

आयएसची आगेकूच रोखण्यात अमेरिकेला अपयश
सौदी अरेबिया व अमेरिकेने मिळून कूर्द सिरियाच्या सीमेवर असलेल्या आयएसच्या ठिकाणांवर अनेकदा हवाई हल्ले केले; पण आयएसची आगेकूच ते रोखू शकले नाहीत. शेवटी युद्ध हे जमिनीहून लढणार्‍या योद्ध्यांच्या पराक्रमावरच जिंकायचं असतं. बगदाद शहराच्या पश्चिमेकडे १८५ किमीवर असलेल्या अनवर प्रांतात आयएस सेनेशी लढताना संयुक्त सेनेची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. जर अमेरिकन हेलिकॉप्टर्सनी आयएस सेनेवर बॉम्बवर्षाव करून त्यांना रोखले नसते, तर केव्हाच बगदाद एअरपोर्टवर आयएसचा कब्जा झाला असता. सध्याचे अमेरिकन हवाई हल्लेदेखील तोकडे आहेत.

आयएसने नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले विचार ट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून जगभर पसरविण्यात यश मिळविले आहे. आज पाश्चिमात्य देशातील ३००० तरुण आयएससाठी लढत आहेत. नव्या पिढीतील मुस्लीम तरुणांना आयएसचे आकर्षण वाटते ते त्यांच्या जगावर अधिराज्य मिळविण्याच्या आकांक्षेमुळेच. अन्यथा, आयएसची कार्यपद्धती व विचार हे मध्ययुगीन धर्माभिमुख समाजव्यवस्थेला चिकटून आहेत. आयएसच्या राजवटीतील क्रूरतेचे व स्त्रियांना गुलामासारखी वागणूक देण्याच्या वृत्तीचे नवीन पिढीच्या मुस्लीम तरुणांनी डोळे झाकून समर्थन करावे व त्यांच्यासाठी लढण्यात धन्यता मानावी, हे एक आश्चर्यच आहे. आपल्या धर्माचा सर्वत्र विजय झालेला पाहताना आपण मध्ययुगीन संकल्पनांना व बंधनांना कवटाळून बसलो आहे, याची त्यांना खंत वाटत नाही.

नव माध्यमे आणि दहशतवादाचा प्रचार
सोशल मीडिया हे दुधारी अस्र आहे. त्याचा वापर चांगला आणि वाईट अशा दोन्ही कारणांसाठी होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. आपल्याला इंटरनेटमधल्या जिहादी अतिरेक्यांविरुद्ध लढाई करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, याचा सखोल विचार करण्याची गरज आहे. सध्या इंटरनेटचा-नवतंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन प्रसार-प्रचार करण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. ट्विटरद्वारे मेहदीचा सर्व प्रचार सुरू होता. याशिवाय ईमेल्स, एसएमएस, ब्लॉगस्पॉट आणि व्हॉट्स अ‍ॅप्स आणि अशा कितीतरी नवीन माध्यमांचा सध्या सुळसुळाट झालेला आहे. त्यांच्यातील स्पर्धा तीव्र होत आहे. त्यातूनच अत्याधुनिक सुविधा देऊन नवनवीन साधने तयार होत आहेत. यूटूयुबसारख्या साईटचा वापर करून घेऊन अतिरेकी आपले भडकाऊ विचार व्हिडीओद्वारे प्रसारित करत असतात. जिहादी, अतिरेक्यांबरोबरच माओवादीही सोशल मीडियाचा वापर अतिशय हुशारीने करत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून आपल्या देशाविषयी विषारी-विघातक विचार आणि देशद्रोहीपणा पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आज भारतामध्ये जवळजवळ ८० कोटींहून जास्त मोबाईलधारक आहेत. इंटरनेटचा वापर करणार्यांची संख्या २० कोटींच्या आसपास आहे. ही संख्या पुढील पाच वर्षांमध्ये ६० कोटींवर घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.या माध्यमांचा जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा देशाला सायबर वॉरचा मोठा धोका निर्माण होतो.

भारतीय संस्था का ठरल्या अपयशी?
सोशल मिडियाचा वापर करून अशी विचारसरणी पसरवणार्‍या गुन्हेगारांवर किंवा अतिरेक्यांवर लक्ष ठेवण्याचे काम भारतात प्रामुख्याने दोन संस्था करत असतात. एक एनटीआरओ.{National Technical Research Organization (NTRO)} आणि दुसरी सीइआरटी {Cyber Emergency Response Team(CERT)}. या दोन्ही संस्था आणि आपल्या गुप्तहेर संस्था व पोलीस यांच्यातील सायबर सेल यांच्यावर अशा व्यक्ती वा संस्थांवर आणि त्यांच्याद्वारे इंटरनेटच्या वा सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या संभाषणांवर, प्रचारावर, कारवायांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. असे असताना मेंहदीबाबतची माहिती आपल्याला भारतीय संस्थेकडून मिळाली नाही; तर चॅनल फोर नावाच्या ब्रिटिश चॅनेलने दिली.

समाजाने जागे व्हायची गरज
चॅनेल फोरचे म्हणणे जर खरे असेल तर अवघ्या २४ वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मेहदीच्या डोक्यात इतकी विकृती कुठून शिरली हा प्रश्न उभा राहतो. विज्ञानाने मानव जीवन सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार केले. त्याच तंत्रज्ञानामुळे जर मेहदीसारखे तरुण धर्मांधतेत बुडून इतर तरुणांना विकृतीकडे नेत असतील तर केवळ सुरक्षा यंत्रणांनी यावर विचार करून या गोष्टीची उकल होणे शक्य नाही.

अशा या तरुणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. उच्च आणि आधुनिक शिक्षणाने माणूस मध्ययुगीन अंधारापासून दूर जाईल, अशी अपेक्षा असताना उलटच घडताना दिसत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आजवर दारिद्रय़, अडाणीपणा हे दहशतवादाचे घर होते. आज शिक्षित तरुणाईच त्या जाळ्यात सापडत आहे.

एकट्याने प्रवास करणार्‍या युवकांना व्हिसा नाही
इराक हा इस्लामी भाविकासाठी महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. आज इराकमध्ये प्रचंड हिंसाचार चालू असूनही बगदाद, बसरा, नजफ, समरा यांच्यासहित सहा-सात शहरांकडे जगभरातील मुस्लिम भाविकांचा ओघ चालू असतो. भक्तांच्या नेमक्या याच प्रवाहाचा ओघ लक्षात घेऊन मुंबईजवळच्या कल्याणचे चार तरुण आधी २६ भक्तांच्या चमूमध्ये सहभागी झाले. नंतर इराकमध्ये पोहोचल्यानंतर मात्र जत्था सोडून पळाले आणि ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवादी गटांमध्ये सामील झाले. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आता भारतात इराकी व्हिसा देणाऱ्या इराक सरकारच्या प्रतिनिधी संस्थेने तिशीच्या आतल्या आणि एकट्याने प्रवास करू इच्छिणार्‍या मुस्लिम युवकांना इराकचा व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
आज देशभरात आखातात प्रवेश मिळवून जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ इच्छिणारे काही तरुण असतीलही. या नव्या निर्बंधांमुळे त्यांची वाट अधिक कठीण करण्याची शक्यता आहे. इराकमध्ये दरवर्षी सरासरी २५ ते ३० हजार भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी जातात. एकदा इस्लामिक स्टेटच्या ताब्यात गेल्यानंतर पश्चात्ताप होऊन उपयोग नाही. एकाकी तरुणांना इराकमध्ये जाऊ न देण्याचे पाऊल स्वागत करावे असेच आहे.

काय करायला हवे?
आपल्या संस्थांना त्याच्या या कारवायांचा पत्ता का लागला नाही? याचे प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडियाचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारतात सध्या कार्यरत असलेल्या सरकारी संस्थांची व्याप्ती दसपटींनी वाढवावी लागेल. तरच आपण या इंटरनेट आणि सोशल मिडियावर लक्ष ठेवता येईल. ज्या व्यक्ती अशा प्रकारे सोशल मीडियामार्फत देशविघातक प्रचार वा कारवाया करताना आढळतील त्यांना तात्काळ शिक्षा केली गेली पाहिजे. खोट्या बातम्या पसरवून, इतरांची माथी भडकावण्याचे काम करून देशामध्ये हिंसाचार, कट्टरतावाद किंवा दंग्यांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करणारी सर्व अकौंटस् सोशल मिडियामधून काढून टाकली गेली पाहिजेत.

तसेच सोशल मीडियावरील अशा गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी कृतिशील,आक्रमक आणि परिणामकारक दल वा गट तयार करण्याची गरज आहे. तरच आपण सोशल मीडिया विरुद्धची लढाई लढण्यास सक्षम होऊ शकतो.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..