नवीन लेखन...

काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

काही दिवसापूर्वी कश्मीर खोऱ्यात तीन दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश मिळाले. मात्र सैन्याची कार्यवाही सुरू झाली आणी सोशल मीडिया च्या मदतीने आजूबाजूच्या भागातल्या तरुणांना या भागात येउन सैन्यावर हल्ले आणि तुफान दगडफेक करण्यात सांगितले गेले. स्वतःचे रक्षण करण्याकरता पहिले पोलिसांनी अश्रुधूर वापर केला, त्यानंतर पॅलेटचा वापर करण्यात आला. तरीही जमावाची आक्रमकता थांबली नाही म्हणून दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे सैन्याला जमावावर गोळीबार करावा लागला. ज्यामध्ये सात युवक मारले गेले. हा सोशल मीडिया चा केवढा गैरवापर केला जाऊ शकतो याचे एक मोठे उदाहरण आहे.

बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्‍यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे.

सोशल मिडीया हिंसाचार भड्कविण्याचे साधन 

जी घटना सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे काश्मिर खोर्यातील दहशतवादाचे बदलते स्वरूप. काश्मिर खोर्यात सरकारने शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला आहे. बहुतांश काश्मिरी विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाल्याने काश्मिर खोरे मध्यमवर्गीय, सुशिक्षित झाले आहे. शिक्षणाचा उद्देश असा की ते देशाचे चांगले नागरिक होतील. मात्र ही अपेक्षा फोल ठरत हे सर्व शिक्षित युवक फेसबुक किंवा सोशल मिडीया दहशतवादी बनले आहेत. त्यांनी सोशल मिडीयामध्ये दहशतवादाचा/उग्रवादाचा प्रचार करायला सुरूवात केली आहे. आपल्या देशात अनेक सोशल मिडीयाचे प्रकार आहेत. त्यात व्हॉटस अॅप, फेसबुक, ट्वीटर, स्नॅपचॅट अशी वीस वेगवेगळी माध्यमे आहेत. याचा चांगला वापरही करता येतो तसा गैरवापरही करता येतो. याचा काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात गैरवापरच होतो आहे. भारतीय सैन्य शोधमोहिम किंवा धरपकड करायला कोणत्याही गावात प्रवेश करते तेव्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून निरोप पाठवला जातो की सैन्य आले आहे आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना सैन्यावर दगडफेक करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे सैन्याची शोधमोहिम सुरू होते तेव्हा शेकडोंनी युवक गोळा होतात आणि सैन्यावर दगडफेक करायला सुरूवात करतात. एका बाजूला दहशतवाद्यांना तोंड द्यायचे आणि मागच्या बाजूने दगडफेकीलाही तोंड द्यायचे.

सोशल मिडीयावर फेक न्यूज

एवढेच नव्हे तर अनेक फेक न्यूज किंवा चुकीच्या बातम्या, फोटो पाठवले जातात.  सोशल मिडीयावर एक बातमी आली होती ती म्हणजे सैन्याने एका भागात असलेल्या सर्व हातगाड्या जाळून टाकल्या त्या बातमीने हाहाकार माजला होता. मात्र नंतर ही चुकीचा बातमी असल्याचे स्पष्ट झाले. आज काश्मिर खोर्याची 70 टक्के लोकसंख्या ही तरूणवर्गातील आणि 35 वर्ष वयोगटातील आहेत. ते मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर करतात. सोशल मिडीयाचा गैरवापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की सरकारने त्यांच्यावर वेगवेगळे निर्बंध लावायला सुरूवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॉटस अॅप ग्रुप च्या अॅडमिनिस्ट्रेटर्सना डीसी ऑफिस मध्ये स्वतःला नोंदणीकृत करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर अफवा किंवा चुकीची बातमी पसरवली तर त्याला दोन वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते. काश्मिरमध्ये सरकारी कर्मचार्यांची संख्या पाच लाखाहून जास्त आहे. त्यांनाही सोशल मिडीयाचा गैरवापर करण्यापासून थांबवले जात आहे. या विरोधात तिथल्या युवक आणि कर्मचार्यांनी एक चळवळ सुरु केली आहे. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वात मोठे आव्हान आहे ते प्रंचड व्याप्ती असणार्या सोशल मिडीयावर नियंत्रण कसे ठेवायचे.

दुर्देवाने अनेक वेळा व्हॉटस अॅप वर येणारे मेसेज अनेक वेळा भारतातून न येता ते पाकिस्तान किंवा इतर देशांतून येतात. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करणार्या व्यक्तीची ओळख पटली पाहिजे. यासाठी मोबाईल क्रमांक घेताना जसे सर्व माहिती मोबाईल कंपनीला देतो तशीच ही माहिती सोशल मिडीयाच्या वापरासाठी देणेही सक्तीचे केले पाहिजे.

अनेक काश्मिरी युवक कुठलीही हिंसाचाराची घटना घडली की त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू करतात आणि त्या घटनेला मोबाईलवरून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दहशतवादी संघटनेत नव्या तरूणांची भरती करण्यासाठी व्हॉटसअॅप सारख्या माध्यमांचा वापर केला जातो. व्हॉटसअॅप चा वापर युवकांना कट्टरतावादी बनवण्यासाठी केला जातो. आज काश्मिर खोर्यातील तरूण तिन प्रकारे विचार करणारे आहेत. एक म्हणजे काश्मिर खोरे स्वतंत्र हवे आहे, दुसरे ज्यांना पाकिस्तानात सामील व्हायचे आहे आणि तिसर्यांना कट्टरवादी इस्लामिक राष्ट्र होण्याची इच्छा आहे.

सोशल मीडियांतून लष्कराविरुद्ध अपप्रचार

ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडियांतून संरक्षण मंत्रालय तसेच लष्कर मुख्यालयाच्या काही शाखांची लेटरहेड वापरून लष्कराविरुद्ध अपप्रचार सुरू आहे. भारताच्या सीमेपलीकडील देशांतून हा गैरवापर सुरू असावा, असा संशय खुद्द लष्करानेच व्यक्त केला आहे. या अपप्रचाराला बळी पडून लष्करासंबंधी माहितीचा गैरवापर थांबवावा, असा इशारा लष्कराच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरून दिला आहे.सोशल मीडियावरील संदेशांमध्ये अॅटॅचमेण्ट म्हणून अशाप्रकारे लेटरहेडवर छापलेले संदेश वितरित झाल्याचे लक्षात आले आहे. सेवानिवृत्त सैन्याधिकारी तसेच सध्या कार्यरत असलेल्या सैन्याधिकाऱ्यांचे ब्लॉग्स किंवा त्यांच्या नावाने पेरले गेलेल्या व्हॉट्सअॅप संदेशांमधून खोट्या माहितीचे दस्तऐवज किंवा छायाचित्रांचा गैरवापर केला जात असल्याचे आढळले आहे. असे लेखन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही माहितीवर किंवा सामग्रीवर आधारित काही लिखाण करताना ती माहिती किंवा साहित्य यांची खातरजमा लष्कर मुख्यालयाकडून करून घ्यावी. त्याद्वारे आपल्या सैन्य दलांना अडचणीत आणण्याचे प्रयोजन आहे का, याची खातरजमा करावी.अपप्रचाराचे प्रकार सोशल मीडिया निरीक्षण करणाऱ्या पथकांच्या नजरेस आल्यानंतर ही खबरदारी घेतली जात आहे.

सोशल मिडीयावर  लक्ष ठेवणे गरजेचे 

सोशल मिडीयावर  लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे. सरकारने त्यावर अनेक निर्बंध टाकले आहेत परंतू इतर देशांपासून काही धडा घेऊ शकतो का याचा विचारही केला पाहिजे. शेजारील राष्ट्र चीनने देशात सोशल मिडीयावर पूर्णपणे निर्बंध लावले आहेत. कोणताही सोशल मिडीया चीनमध्ये कार्यरत असेल तर सर्व्हर चीनमध्ये ठेवावे लागतात. तसेच पाऊल भारताने उचलले पाहिजे .कोणतीही चुकीची बातमी किंवा अफवा पसरवण्यात येत असतील तर ते त्वरीत ब्लॉक केले पाहिजे. पोलिस खात्यामध्ये सोशल मिडीयावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळा विभागच कार्यरत केला पाहिजे ज्यामध्ये प्रशिक्षित तंत्रशिक्षित पोलिसांचा वापर करून अश्या सोशल मिडीयावर घडणार्या गुन्हेगारी गोष्टींना थांबवणे, त्या मागच्या कर्त्यांना पकडणे किंवा त्यांना ब्लॉक करणे या प्रकारची कामे सुरू करणे हे गरजेचे आहे.

मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी

काश्मिर खोर्यातील बंदुकधारी दहशतवाद जरी कमी होत असला तरी आता कीपॅड जिहादी किंवा फेसबुक, व्हॉटस अॅप दहशतवादी हा नवा वर्ग सुरू होत आहे. जो चुकीच्या बातम्या पसरवून कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून तिथे दुष्कृत्य करणार्यांना पकडणे गरजेचे आहे. त्यामुळे खोर्यामध्ये पसरलेल्या कट्टरतावादाला रोखण्यास मदत मिळेल.

सोशल मीडिया आणि इंटरनेटचा गैरवापर करण्याचे प्रमाण काश्मिर खोर्यांमधे फार वाढले आहे, प्रक्षोभक स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने नवा ठोस कायदा तयार करण्यावर भर द्यायला हवा. सोशल मीडियाचा चांगला वापर करा, नाहीतर चीनसारख्या देशांकडे बघा, तिथं इंटरनेटच्या वापरासाठी कडक नियम आहेत.सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या  बनावट व्हिडिओमुळे दंगल भडकल्याचे उदाहरणे आहेत.  हे रोखायचे असेल तर सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याचे मार्ग शोधण्याची आवशकता आहे.या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. मात्र, अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला जात आहे असे दिसते.

— ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..