ही कहाणी आहे बातमीसाठी जीवघेणी स्पर्धा चालते अशा , Necessary evil ची .
अर्थात या कादंबरीविषयी मी पूर्वी लिहिले आहे , ते वेगळ्या अंगाने .
पण स्मरणगाथा जसजशी उलगडू लागली तसे नवे आयाम दिसू लागले .
मी विचार करायला लागलो , या व्यक्तिरेखा त्यांच्या खास व्यक्तिमत्वासह मला कुठे भेटल्या असाव्यात .
हा मलाच पडलेला प्रश्न वेडगळ वाटेल , पण तो प्रश्न अजूनही पडतो .
विचार करता करता लक्षात येते की हे तर आपल्या आजूबाजूला घडत आहे .
मराठी न्यूज चॅनल्स लावली की कित्ती तरी व्यक्तिरेखा आपण होऊन समोर उभ्या ठाकतात .
सांगतात , मला पण घ्या कथानकात .
सगळ्यात जास्त दया येते ती वार्ताहरांची .
ते बिचारे उन्हातान्हात , पावसात , पुराच्या पाण्यात उतरून ग्राउंड लेव्हलला जाऊन रिपोर्टिंग करत असतात .
अक्षरशः त्यांना वेठबिगार समजून , त्यांची मानसिक , शारीरिक स्थिती समजून न घेता त्यांना बातमीच्या पाठी पळवलं जात असतं . कठपुतळी सारखं नाचवलं जात असतं . भयंकर असतं त्याचं हे आयुष्य . पण चेहऱ्यावर नाराजी न दाखवता त्यांना खरं खोटं मिश्रण करून सांगायला , गोंधळ उडवायला सांगितलं जात असतं.
त्यामुळं अर्थातच ही कहाणी अशा ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची सुद्धा होऊन गेली आहे . जिथे त्यांना ताठ कण्यानं वागणं अशक्य केलं जातं .
ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .
ही कहाणी आहे बारबालांची , मसाज सेंटर्सची आणि लेदर करन्सीचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्या तथाकथित मान्यवरांची .
कहाणी अर्थातच राजकारण्यांची .
त्यांना वापरून घेणाऱ्या उद्योगजगताची .
ही कहाणी घामाला मातीमोल देणाऱ्यांची .
अगदी क्षुल्लक पैशात श्रम विकणाऱ्यांची .
अपवाद म्हणून जिवंत असलेल्या विवेकवादी विचारवंतांची .
‘ इस देशमे कुछ नही होनेवाला ‘ आणि ‘ सब चलता है ‘
हे म्हणणाऱ्यांची कहाणी म्हणजे ब्रेकिंग न्यूज
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो …
बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे .
तरन्नुमची अटक हा हाय पॉईंट कॅच करून लाईव्ह करायला बसलेल्यांची पंचाईत होतेय , कारण तिला लपवून नेलं जातंय आणि एका चॅनलच्या कॅमेरामनने हे टिपलंय , त्याचं प्रसारण सुरू झालंय .
आता इथून पुढं खेळ सुरू होतोय .
चेकमेट चं राजकारण , ब्लॅकमेलिंगचं राजकारण आणि जनतेच्या हिताचं नाव पुढं करून स्वतःच्या पोळीवर तूप ओढायचं राजकारण .
यात कळत नकळत ओढला जातोय , भरडला जातोय तो इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा स्टाफ .
पण अजूनही चांगली माणसं आहेत , त्यांना हाताशी धरून त्या मीडियातील सहासातजण काहीतरी बदल घडवण्यासाठी प्लॅन करत आहेत .
पण त्यांना यश येण्याआधीच ज्या तरन्नुमवरून प्रकरण सुरू होतंय ती बेपत्ता करून सगळे तथाकथित सहीसलामत सुटतायत .आणि ते सहासातजण भरडले जातायत .
टीव्ही न्यूज मध्ये चटपटीत ,चमचमीत , झणझणीत , मसालेदार डिशची सवय सवय लागलेल्या जनतेला बेवकुफ बनवण्याचे , जीवनमरणाच्या प्रश्नावरून लोकांचे लक्ष उडवून लावण्याचे आणि दिलेल्या बातमीचे पुढे काय झाले याची माहिती न देता फक्त टीआरपी वर लक्ष केंद्रित करण्याचे कारस्थान करणाऱ्या आजच्या न्यूजविश्वाची ही कहाणी आहे .
ब्रेकिंग न्यूज
—-
ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती .
पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते .
सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो .
आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले .
मेनका दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .
पण त्याचा आनंद मानायचा , की हे भयंकर विश्व अजूनही त्याच पद्धतीने चालत आहे , याचे वैषम्य वाटून घ्यायचे , या संभ्रमात मी आहे .
— डॉ. श्रीकृष्ण जोशी


Leave a Reply