निवेदकाने नाव उच्चारताच होणारा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट .
कॅमेरे सरसावून पुढं येणारे फोटोग्राफर्स .
नामवंत दिग्गजांच्या हस्ते होणारा सत्कार . पुरस्काराचे वितरण .
आणि मनोगतासाठी हाती दिलेला माईक .
पुरस्कार वितरण समारंभातील हे दृश्य अनोखे , सुखावणारे , प्रसिद्धी देणारे आणि नव्या लेखनासाठी कार्यप्रवण बनवणारे .
माझ्या साहित्यिक वाटचालीत असे पुरस्कार समारंभ सातत्याने येत गेले .
वेगवेगळ्या नावांचे पुरस्कार .
माझ्या वेगवेगळ्या साहित्यकृतींची आणि साहित्यिक वाटचालीची घेतलेली दखल .
वेगवेगळ्या संस्था .
वेगवेगळी गावे , शहरे .
विविध नामवंत दिग्गज .
विविध प्रकारची स्मृतिचिन्हे , भेटीदाखल मिळणाऱ्या वस्तू , त्यातही दुर्मिळ असणारी पुस्तके .
सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते .
अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ .
पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .
मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .
सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .
आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .
कधी कधी तर पुरस्कार देणारे त्या कार्यक्रमात ओळखीचे होऊन जातात . कारण त्यांची प्रत्यक्ष ओळख नसते . ती त्यावेळी होते .
कधी कधी ज्या व्यक्तींच्या नावे पुरस्कार लाभतो , त्यांच्याशी नवे नाते जोडल्यासारखे वाटते . त्या मान्यवरांनी निर्माण केलेल्या कर्तृत्वाच्या सागरात आपण आपल्या अक्षरांचा एक थेंब अर्पण केल्याची भावना मनाला समाधान देऊन जाते .
कै . अण्णासाहेब किर्लोस्कर .
स्वरराज छोटा गंधर्व .
कुसुमाग्रज .
साहित्यभूषण .
कै . अ . ना . भालेराव .
कै . पु . भा . भावे .
कै . र .वा . दिघे .
कुसुमताई अभ्यंकर .
या महनीय दीपस्तंभांबरोबर आपले नाव जोडले गेले ही माझ्या आयुष्यातील अनोखी जमापुंजी म्हणायला हवी .
स्मरणगाथा सादर करताना त्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे !
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
—————
स्मरणगाथा आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही


Leave a Reply