नवीन लेखन...

अकल्पित 

साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता. कोणीतरी तरण तलावात उडी मारून उडालेल्या पाण्याचा विशिष्ट आवाज येत होता. उन्हाचा थोडा चटका बसायला लागला होता. पोहून झाल्यावर महेश, जरा सावली पाहून, एका लांबट खुर्चीवर पडून तो विश्रांती घेत होता.

महेशची एक चांगली सवय अशी होती की रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी मस्त तासभर मनसोक्त पोहायचे. लहानपणी गावी नदीवर पोहायची चांगलीच सवय होती. आता नोकरीसाठी शहरात आल्यावर ती आवड जराही कमी झाली नव्हती. जरा परवडायला लागल्यावर, त्याने चक्क या एका प्रतिष्ठित स्विमिंग पूलची मेंबरशिप घेतली होती. कॅन्टीनमधील मुलाने आणून दिलेला फळांच्या रसाचा पेला जवळ हाताशी ठेवला होता. पडल्या पडल्या तो मधूनमधून त्यातून घुटके घेत होता. पोहून दमल्यानंतर, अशातऱ्हेने डोळे मिटून पडून रहाणे हा त्याच्या साप्ताहिक आत्मिक आनंदाचा भाग होता. आत्तासुद्धा,  त्याच्या मनात आपल्या अत्यंत समाधानी आयुष्याचे विचार चालू होते. तो स्वतः वर एकदम खूश होता.

मध्येच जरा डोळे किलकिले करून बघतांना त्याचे लक्ष गेले ते एका ३-४ वर्षाच्या मळकट कपडे घातलेल्या मुलीकडे. त्याचे कुतूहल जागे झाले. त्या मुलीचे त्या रूपात तिथे असणे तेथील वातावरणात फारच असंबद्ध दिसत होते. केस विस्कटलेले होते. बऱ्याच दिवसांत केसांना तेल किंवा कंगवा लागला नसावा. अंगाने काळीसावळी आणि कृश दिसत होती. ती मुलगी तलावाच्या काठावर बसून काहीतरी शोधत असल्यासारखी इकडेतिकडे बघत होती. असेल कदाचित तिथल्या एखाद्या कामगाराची मुलगी आणि तिची काळजी घेणारा कोणीतरी नक्कीच जवळपास असेल असा विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटले. कदाचित त्याचा डोळा लागला असावा कारण थोड्या वेळाने त्याला अचानक जाग आली ती त्याच्या मांडीवर काहीतरी जड असल्याच्या संवेदनेने. पहातो तो काय, तीच छोटी मुलगी चक्क त्याच्या मांडीवर डोके ठेऊन झोपली होती. क्षणभर त्याला काय करावे हे सुचेना. तो काही वेळ त्या निरागस शांत चेहेऱ्याकडे बघत राहिला.

पण असे अवघडत किती वेळ बसणार? अखेरीस, त्याने त्या मुलीचे डोके हळूवारपणे बाजूस सरकविले आणि स्वतःला मोकळे केले. जरा सावरल्यावर, साहजिकपणे त्याने त्या मुलीचे पालक कुठे आसपास दिसतात का ते पाहायला सुरुवात केली. तलावावरील सर्व लोक आपापल्या पोहोण्यात, विचारात किंवा कामात मग्न दिसत होते. आसपास कोणीही काहीतरी शोधत असल्याचे दिसत नव्हते.

तेवढ्यात ती मुलगी जागी झाली आणि त्याला बघून रडू लागली. महेशची परिस्थिति अजूनच अवघडल्यासारखी झाली. एकदा वाटले की गपचूप कुणाचे लक्ष नाही असे पाहून उठावे आणि आपले लॉकर मधील सामान घेऊन, कपडे बदलून काढता पाय घ्यावा. पण का कुणास ठाऊक, त्या निरागस मुलीला तसेच सोडून जाणे त्याच्या स्वभावाला योग्य वाटेना.

“बाळ, रडू नको, तुला भूक लागली आहे का? थांब इथेच. मी तुझ्यासाठी काहीतरी खाऊ आणतो” अशी समजूत घालून, महेश उठला. टॉवेल खांद्यावर टाकून, झटपट तेथील कॅन्टीन मधून त्याने तिच्यासाठी दोन क्रीम रोल आणले.

हातात क्रीम रोल मिळाल्यावर ती मुलगी जरा शांत झाली. तिला खरंच भूक लागली असावी. ती तो रोल खाऊ लागल्यावर, तिने त्याच्याकडे वर बघितले. त्या भाबड्या नजरेने त्याच्या काळीज हलले.

त्याने विचारले, “मुली, तुझे नाव काय आहे?

“माली”

“तुझे आई बाबा कुठे आहेत?”  काहीच उत्तर नाही.

“तू इथे कशी आलीस?”

“चालत चालत”

“कुठे राहतेस?”  काहीच उत्तर नाही.

आता मात्र त्याची पंचाईत झाली. त्या तरण तलावावर परवानगीशिवाय आत  येण्यास कोणालाच परवानगी नव्हती. बहुधा तीची लहान मूर्ती बाहेरून आत येतांना तिच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नसावे. तिला तिथेच बसायला सांगून, तो तेथील अंगरक्षकांच्या शोधात निघाला. एव्हाना स्विमिंग पूलवरील वर्दळ बरीच कमी झाली होती. शेवटी एका कोपऱ्यात डुलक्या खातांना तो अंगरक्षक सापडला. त्याला बरोबर घेऊन तो परत त्या मुलीकडे आला. अंगरक्षकाला परिस्थिती समजावून सांगितली.

“हे बघ, ही मुलगी चुकली आहे, असे वाटते. तिचे आई वडील इथेच कुठेतरी आसपास असतील. कृपया त्यांना शोधून तिला त्यांच्या ताब्यात द्या. लागलेच तर तुमच्या मॅनेजरची मदत घ्या.”

त्यालाही परिस्थिती फार गंभीर वाटली नाही.

“कशी आत आली कुणास ठाऊक? साहेब, काही काळजी करू नका. मी बघतो काय करायचे ते.”

तिला त्याच्या ताब्यात देऊन आणि त्याचे आभार मानून, ‘चला सुटलो’ या भावनेने तो घरी परतला.

दिवसभर मधूनमधून त्या मुलीचे विचार त्याच्या मनात येत राहिले. का कुणास ठाऊक, तिचा निरागस चेहेरा आणि डोळ्यातील आर्जवी भाव तो विसरू शकत नव्हता. ती रात्र अशीच गेली. दुसरे दिवशी सकाळी कामावर जायला थोडा उशीर होईल याची जाणीव असून सुद्धा, जरी तो फक्त दर रविवारी पोहायला जात असे, तरी न रहावून, केवळ कुतूहलापोटी तो पुन्हा तरणतलावावर पोहोचला.

त्याला बघताच, तिथला मॅनेजर धावतच त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “साहेब, त्या कालच्या मुलीबद्दल, आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. काल दिवसभर आम्ही त्या मुलीला कोणी न्यायला येईल अशी वाट पाहिली. येथील सर्व कर्मचाऱ्यांना विचारले. आसपास बराच शोध घेतला. जवळपासच्या दुकानात चौकशी पण केली.”

महेशला कळेना की हे सगळे हा मला का सांगतोय? त्याच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून मॅनेजर पुढे म्हणाला, “साहेब, आमच्या सुरक्षा कॅमेऱ्यात ही मुलगी तुमच्या मांडीवर झोपलेली दिसत आहे. तुम्ही तिच्याशी बोलत होतात तसेच तुम्ही तिला काहीतरी खायला आणून दिल्याचे पण दिसत आहे. रात्री तिला दादापुताकरून कशीतरी आमच्या या अंगरक्षकाने सांभाळली. सकाळी नाईलाजाने पोलिसांत कळवले आहे. एक पोलिस पण चौकशीसाठी आला आहे. आमचा अंगरक्षक तुमचेच नाव सांगत आहे. चला, आपण त्यांना सर्वांना भेटूया.”

मॅनेजरच्या बरोबर आत जाताजाता महेशने आपली बाजू सांगायचा प्रयत्न केला, “अहो, माझी या मुलीशी कसलीही ओळख नाही. ती भूकेली वाटली म्हणून केवळ सहनुभूतीपोटी मी तिला आपल्या कॅन्टीनमधून क्रीमरोल आणून खायला दिले. मी केवळ कुतुहलापोटी आज परत आलो. मला एवढेच पहायचे होते की त्या मुलीचे पालक सापडले की नाही. मला कामावर जायला उशीर होत आहे. मला आता जाउद्या.”

एव्हाना ते आत ऑफिसात पोहोचले. पोलिस त्याचीच वाट पाहत असावा. महेशला पाहताच ती मुलगी धावत येऊन त्याच्या पायांना बिलगली. आता मात्र सर्व जण जरा संशयाने त्याच्याकडे पाहू लागले. ‘हाच तर या मुलीला येथे सोडून गेला नसेल?’ असा संशय येणे स्वाभाविक होते. त्याने स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती, आपला घरचा आणि नोकरीवरील पत्ता सांगितल्यावर आणि आदले सकाळच्या सर्व घटनांचे पुनः एकदा विस्तृत कथन केल्यावर त्यांचा संशय दूर झाला असावा. कारण त्यानंतर, आता पुढे काय करायचे याची चर्चा सुरु झाली.

ती मुलगी मात्र सतत वर त्याच्याकडे त्याच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या नजरेने बघत होती.

“तिला पालक मिळेपर्यंत योग्य अशा सरकारी संस्थेत सोडूया.” पोलिस.

महेशला ती कल्पनाच असह्य झाली. त्या मुलीच्या निरागस नजरेने त्याच्या मनावर काय गारूड केले होते कोण जाणे. महेशने सुचविले, “त्यापेक्षा, तुम्हा सर्वांची सहमती असली तर तिचे पालक मिळेपर्यंत मी तिची काळजी घेऊ का? माझी सर्व माहिती तुमच्याकडे आहेच.”

त्याला सर्वांच्याच नजरेत, एक सुटकेचा भाव दिसला.

पोलीस म्हणाला, “साहेब, तुम्ही म्हणत आहात तर तात्पुरती तुम्ही तिची काळजी घ्या. पण लक्षात ठेवा की तुमची सर्व माहिती आमच्यापाशी आहे. दोन दिवस मी पण बघतो आसपास चौकशी करून. धन्यवाद.”

अशातऱ्हेने कामावर जायचा विचार सोडून, महेश आणि माली त्याच्याच गाडीत बसून परत घरी आले आणि महेशच्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरु झाला. तो एकटाच सडाफटिंग त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर राहत असे. त्यामुळे जागेची कमतरता नव्हती. दोन दिवस रजा घेतलीन. मालीला लागतील अशा सर्व वस्तूंची खरेदी केली. त्याच्या घराची आणि खाण्यापिण्याची काळजी घेणाऱ्या वासंती काकूंना जास्तीच्या पगाराची खात्री देऊन, मालीची सर्व काळजी घेण्याची विनंती केली आणि नशिबाने त्यांनी पण ती जबाबदारी स्वीकारली.

स्वच्छ अंघोळ  आणि नवीन कपड्यात आल्यामुळे, दोन दिवसात मालीचे बाह्य रूप चांगलेच बदलले. सर्वच गोष्टी नवीन असल्याने माली दिवसभर घरभर फिरून प्रत्येक वस्तू आपल्या डोळ्यात भरून घेत होती आणि हात लाऊन पहात होती. शिवाय तिचा बुजरेपणा कमी होऊन तिच्या नजरेत आनंद दिसू लागला.

दोनाचे चार दिवस झाले. त्याला गम्मत वाटली की मालीला तो सोडून सर्वजण लगेच विसरून गेले होते. पोलीस, मॅनेजर आणि अंगरक्षक यापैकी कोणीही त्याच्याकडे तिच्याबद्दल एकदाही चौकशी केली नाही. कदाचित कोणी तिच्या पालकांचा पण शोध घेतला नसावा. माली आता त्याला दादा अशी हाक मारू लागली होती.

त्याला पूर्ण कल्पना होती की त्याला मालीबद्दल कितीही प्रेम वाटले तरी कायद्याप्रमाणे तो मालीला घरी ठेऊन घेऊ शकत नव्हता ना तिला दत्तक घेऊ शकत होता. या बाबत, सरकारी नियम फारच कठोर आहेत याची महेशला कल्पना होती. नाईलाजाने त्याने सरकारी दत्तक देणाऱ्या कारा [CARA] या संस्थेशी संपर्क साधला आणि मालीला त्यांच्या सुपूर्द करण्याची प्रक्रिया पोलिसांच्या मदतीने सुरु केली.

मालीला हे घर सोडून जायला लागणार आहे याची कल्पना नव्हती आणि का ते तिला समजले पण नसते. महेशच्या मनात मात्र प्रचंड घालमेल चालू होती. मन सुन्न झाले होते. सर्व प्रकारचे सोपस्कार आणि कागदपत्रे यांची पूर्णता झाल्यावर एके दिवशी तो मालीला तिच्या इच्छेविरुद्ध श्रीवत्स ह्या संस्थेच्या हवाली करण्यासाठी घेऊन गेला. आपल्याला दादा इथेच सोडून जाणार हे कळल्यावर, माली तर त्याच्या पायांना घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडत होती. माली त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात इतकी शिरली होती की तिला निरोप देतांना त्याच्या काळजाला किती घरे पडली ती त्यालाच माहीत.

“माली, हे बघ, मला कामानिमित्त बरेच दिवस बाहेरगावी जावे लागणार आहे. तू एकटी रात्री घरात राहू शकणार नाहीस. इथल्या मावशी तुझी नीट काळजी घेतील. मी पण जमेल तसा तुला भेटायला येईन. शहाणी माझी बाळ ती. आता थोडी हास पाहू.” महेशने असे काही कारण सांगत तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. माली मात्र रडतच राहीली.

घरी परततांना महेशला आपल्या काळजाचा तुकडा हरविल्यासारखे वाटत होते. काही दिवस झोप पण नीट लागली नाही.

त्याला वाटले होते की आपण हळूहळू मालीला विसरून जाऊ. पण तिची नजर आणि निरागस चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येत राहिला. मग दर रविवारी पोहून झाल्यावर मालीला भेटण्यासाठी जाण्याचा कार्यक्रम पक्का झाला. ती पण संस्थेत रुळायला लागल्यासारखे वाटत होते. मालीची ‘दादा’ अशी हाक ऐकल्यावर त्याला अगदी भरून येत असे. मालीशी गोष्टी करणे हा महेशच्या आयुष्यातील एक मोठा विरंगुळा होऊन गेला होता. हळूहळू तिची समज पण वाढत होती. स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी तो त्या संस्थेला जमेल तेवढे दान देऊ लागला.

नियमाप्रमाणे मालीच्या आणि त्याच्या वयामधील कमी फरकामुळे महेश मालीला दत्तक घेऊ शकत नव्हता. दत्तक घेऊ इच्छीणाऱ्या लोकांची भली मोठी यादी होती. त्यामुळे तो सतत लक्ष ठेऊन होता की माली कुणाकडे दत्तक जाते. जवळ जवळ तीन वर्षांनी त्याला समजले की श्रीधरन नावाच्या नवरा बायकोने मालीला दत्तक घ्यायचे ठरविले आहे.

“नमस्कार, माझे नाव महेश पाटील. मी तुमचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे. तुम्ही उभयतांनी माली या मुलीला दत्तक घेण्याचे ठरविले आहे असे श्रीवत्स या संस्थेतून समजले. तुमची हरकत नसेल तर या व्यवहाराशी माझा संबंध काय हे सांगू इच्छितो.”

साहजिकच श्रीनिवासन यांनी कुतूहलापोटी संमती दर्शविली आणि महेशने आत्तापर्यंतचा इतिहास सांगितला. हे अनोखे प्रेम पाहून श्रीनिवासन यांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले.

लवकरच माली, ‘माली श्रीनिवासन’ झाली. श्रीनिवासन कुटुंबाने महेशला मालीला केंव्हाही भेटायला पूर्ण मुभा दिली. तिला एका  चांगल्या शाळेत घातले. मालीला तिच्या शाळेच्या यूनिफोर्ममध्ये उड्या मारत जाताना पाहिले की महेशचा ऊर भरून येई.

“महेश दादा, माझे नवीन आई बाबा तुझ्यासारखेच फार चांगले आहेत. माझे खूप लाड करतात. तू पण आमच्या घरी राहायला का येत नाहीस?” मालीचा निरागस प्रश्न.

“अग वेडे, मला पण तुझ्या बरोबर राहायला आवडेल पण तुझे नवीन घर मी जिथे काम करतो तेथून खूप दूर आहे. मला जमले की येतोच की नाही तुला भेटायला? आता खूप चांगला अभ्यास कर. चांगली शीक आणि मोठी हो.”

अशातऱ्हेने महेशला एक विचित्र योगायोगामुळे एक राखी बहीण मिळाली. अभ्यासात हुशार होती. राखी पोर्णिमा आणि भाऊबीज हे तर खास दिवस होते दोघांच्याही आयुष्यातील. महेश मालीला घेऊन दर महिन्यात एकदातरी संस्थेत घेऊन जायचा. श्रीनिवासन दाम्पत्याला या अनोख्या भाऊ बहिणीबद्दल  वाटणारे कौतुक वाढतच गेले.

माली प्रकृतीने जात्याच चांगली असल्याने शाळेतील खेळामध्ये छान प्रवीण झाली. गॅदरिंगमध्ये पण तिचा खूप सहभाग असे. महेशने मालीला त्याच्या स्विमिंग पूलवर नेऊन पोहायला शिकविले. तिथल्या कर्मचाऱ्यांना आधीचा इतिहास माहीत असल्याने दोघांनाही खास वागणूक मिळत असे. महेश भेटला की मालीला शाळेमधल्या गमतीजमती किती सांगू आणि काय सांगू असे होऊन जाई.

लवकरच महेशचे लग्न ठरले. महेशच्या बायकोला या भावाबहीणीच्या अनोख्या नात्याचे फार अप्रूप वाटले. बघता बघता माली कॉलेजात गेली आणि उत्तम रित्या पास झाली. बहूगुणी मालीने कॉलेजच्या दिवसात सर्वांगीण प्रगती दाखविली. पास झाल्यावर उत्तम नोकरीही पटकावलीन. माली महेशशी कुठलाही आडपडदा न ठेवता गप्पा मारीत असे. हल्ली ती नेहमीपेक्षा जास्त उत्साही आणि आनंदी दिसू लागली होती. तिचे पहिले प्रेमप्रकरण सर्वांच्या आधी महेशला समजले.

“दादा, तुला एक गंमत सांगायची आहे. माझा  एक खास मित्र आहे. राजेश गुंजाळ. एमबीए झालाय. मला दोन वर्षे सीनियर होता कॉलेजात. आमची मैत्री मात्र आत्ता झाली.” माली लाजत म्हणाली.

महेश अनिमिश नेत्रानी एक कळीचे फूल झालेले बघत होता.

“मला पण भेटव न राजेशला एकदा. मला बघायचय कोण आहे हा नशीबवान मुलगा”

“ते करीनच रे. त्यालाही माझ्या महेश दादाला भेटायचे आहे. पण तू हे आई बाबांना सांगशील का? राजेश दाक्षिणात्य नाही त्यामुळे मला त्यांना सांगायची भीती वाटते.”

सुदैवाने श्रीनिवास दाम्पत्याला हे ऐकल्यावर आनंदच झाला. त्यांनी राजेश बद्दलची खात्री करून घेण्याचे काम माझ्यावर सोपविले. राजेश आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटून मी तिच्या भूतकाळाबद्दल पूर्ण कल्पना दिली. मला पण मालीची निवड उत्तम असल्याचे पटले.

“महेश दादा, मालीने मला तुमच्या दोघांमधील अनोख्या  प्रेमाची पूर्ण कल्पना दिली आहे. धन्य आहे तुमची. माझ्यावरही असेच प्रेम करा.” राजेश.

कोण कुठली मुलगी, तिचे लागेबांधे काय? सारेच अकल्पित. आज मालीला लग्न समारंभ संपल्यावर तिच्या घरी जाण्यासाठी नवरीच्या रूपात बघतांना महेशचे डोळे ओले झाले होते आणि त्या अश्रूंच्या तरंगात एक लहानशी निरागस मुलगी त्याच्या पायाला मिठी मारून वर बघत होती.

– विश्वास दाते

*******

Avatar
About विश्वास दात्ये 3 Articles
vishwasdatye@gmail.com | +९१ ९८५००३५३६२,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..