नवीन लेखन...

हिप्पार्कसचं आकाश

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला. तसंच आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची स्थानं तपशीलवार सर्वप्रथम नोंदण्याचं श्रेय हिप्पार्कसकडे जातं. परंतु ‘कॉमेंटरी’ या भाष्याच्या स्वरूपातील ग्रंथाचा अपवाद वगळता, हिप्पार्कसनं केलेलं लिखाण मूळ स्वरूपात आज उपलब्ध नाही. हिप्पार्कसच्या संशोधनाची माहिती ही नंतरच्या काळात होऊन गेलेल्या ग्रीक खगोलज्ञांच्या लिखाणातून मिळाली आहे. मात्र हिप्पार्कसनं केलेल्या ताऱ्यांच्या स्थानांच्या काही नोंदींचा शोध अलीकडेच अनपेक्षितपणे लागला. ही माहिती शोधली गेली ती, दुसऱ्याच एका लिखाणाखाली दडलेल्या स्थितीत. फ्रान्समधील सीएनआरएस या राष्ट्रीय संशोधन संस्थेतील विज्ञान-इतिहासकार विक्टर गायसेंबर्घ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी, हा ऐतिहासिक महत्त्वाचा ठेवा शोधून काढला आहे. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्यानं केलेलं हे मोलाचं संशोधन ‘जर्नल फॉर दी हिस्टरी ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये ‘म्यूझिअम ऑफ दी बायबल’ या नावांचं, बायबलशी संबंधित पुरातन लिखाणांचं एक संग्रहालय उभारलं गेलं आहे. पुरातन वस्तूंच्या संग्रहात रस असणाऱ्या डेव्हिड ग्रीन या उद्योगपतीनं उभारलेल्या या संग्रहालयात, चाळीस हजारांहून अधिक पुरातन लिखाणांचं जतन केलं गेलं आहे. या लिखाणांत ‘कोडेक्स क्लायमसी रीस्क्रिप्ट्स’ या, दहाव्या-अकराव्या शतकांतील दस्तऐवजाचाही समावेश आहे. एकूण १४६ पृष्ठांचं हे चर्मपत्रांवरचं लिखाण इजिप्तमधील सायनाय येथील ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथाच्या, सेंट कॅथेरिन मठात सापडलं. हे लिखाण ज्या चर्मपत्रांवर केलं गेलं आहे, ती चर्मपत्रं पूर्वी इतर लिखाणासाठी वापरली गेलेली चर्मपत्रं आहेत. नवं लिखाण करण्यापूर्वी जे जुनं लिखाण पुसलं आहे, ते लिखाणही या चर्मपत्रांवर अस्पष्टपणे दिसतं. हे अस्पष्ट लिखाणही क्रिश्चन धर्माशी संबंधित लिखाण असण्याची शक्यता प्रथम दिसून येत होती. सन २०१२ साली, इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील बायबल-तज्ज्ञ पीटर विल्यम्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, या दडलेल्या लिखाणावरच्या एका अभ्यास-प्रकल्पावर काम करायला सांगितलं. या लिखाणाचा अभ्यास करताना, जेमी क्लेअर या विद्यार्थ्याला मुख्य लिखाणामागे अस्पष्ट दिसत असलेल्या लिखाणात, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या इरॅटोस्थेनिस या सुप्रसिद्ध खगोलज्ञाशी संबंधित ग्रीक मजकूर दिसून आला.

इरॅटोस्थेनिसशी संबंध जोडला गेल्यानं, या चर्मपत्रांना आता वेगळंच महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे हे लिखाण पुढील संशोधनासाठी, अमेरिकेतील ‘अर्ली मॅन्युस्क्रिप्ट्स इलेक्ट्रॉनिक लायब्ररी’ या संस्थेकडे पाठवण्यात आलं. सुरुवातीच्या अनेक चाचण्यांनंतर, २०१७ सालच्या जुलै महिन्यात या चर्मपत्रांच्या, वर्णपटावर आधारलेल्या आधुनिक तंत्राच्या साहाय्यानं प्रतिमा घेतल्या गेल्या. शाई जरी पुसली तरी, त्या शाईचा थोडासा अंश हा त्या चर्मपत्रावर राहिलेला असतोच. संशोधकांनी, या दस्तऐवजांवरील, पुसलेल्या लिखाणातल्या शाईच्या, मागे राहिलेल्या अंशाचाच वर्णपटशास्त्राद्वारे माग काढला.

शाईत वापरलेल्या रंगद्रव्यांनुसार, वेगवेगळ्या लहरलांबीच्या प्रकाशकिरणांचा त्या शाईवर होणारा दृश्यपरिमाण वेगवेगळा असतो. रंगद्रव्यातील रेणूंच्या रासायनिक रचनेनुसार, त्यावर पडणाऱ्या प्रकाशकिरणांपैकी काही तरंगलांबीचे प्रकाशकिरण शोषले जातात, तर काही प्रकाशकिरण परावर्तित होतात. शोषल्या गेलेल्या प्रकाशापैकी काही प्रकाश हा वेगळ्या तरंगलांबीच्या स्वरूपात पुनः उत्सर्जित केला जातो. वेगवेगळ्या तरंगलांबीच्या प्रकाशात चर्मपत्राच्या प्रतिमा घेतल्यास किंवा वेगवेगळ्या तरंगलांबीच्या प्रकाशात चर्मपत्राचं निरीक्षण केल्यास, त्यावरून चर्मपत्रावरील पुसट लिखाण वाचणं, काही प्रमाणात शक्य होतं.

अर्ली मॅन्युस्क्रिप्ट्स इलेक्ट्रॉनिक लायब्ररीतील तज्ज्ञांनी, संशोधल्या जात असलेल्या या दस्तऐवजातील प्रत्येक पृष्ठाच्या, अतिनील, दृश्य, अवरक्त, अशा वेगवेगळ्या प्रकारातील तरंगलांबीच्या प्रकाशात ४२ प्रतिमा घेतल्या. प्रत्येक पृष्ठाच्या या ४२ प्रतिमांमध्ये, काही प्रतिमा या चर्मपत्रावरून परावर्तित झालेल्या प्रकाशातल्या होत्या, काही प्रतिमा या चर्मपत्रातून पार झालेल्या प्रकाशातल्या होत्या, तर काही प्रतिमा या चर्मपत्रानं उत्सर्जित केलेल्या प्रकाशातल्या होत्या. या प्रतिमांत, चर्मपत्रातल्या पुसलेल्या शाईचा ठळकपणा हा काहीसा वाढला होता. या सर्व प्रतिमा त्यानंतर संगणकीय प्रक्रियेद्वारे एकत्र केल्या गेल्या. त्यानंतर चर्मपत्रांवरचा जुना मजकूर वाचणं, हे आता काही प्रमाणात शक्य झालं होतं.

जेव्हा पीटर विल्यम्स यांनी या प्रतिमांतील मजकूराची फोड करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना या चर्मपत्रांपैकी नऊ चर्मपत्रांवर खगोलशास्त्रविषयक लिखाण असल्याचं आढळलं. यांत इरॅटोस्थेनिसशी संबंधित लिखाण तर होतंच, परंतु त्यावर इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील अराटस या ग्रीक कवीनं लिहिलेली ‘फेनोमेनॉ’ ही, आकाशातील तारकासमूहांवरची कविता होती. याबरोबरच पीटर विल्यम्स यांना या लिखाणातील एका पानावर तारकासमूहासंबंधी, आकड्यांनिशी काही माहिती दिली असल्याचं आढळलं. आकड्यांचा समावेश असलेल्या या लिखाणाचं खगोलशास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन, त्यांनी या संदर्भांत फ्रान्समधील सीएनआरएस या संस्थेतील विक्टर गायसेंबर्घ यांच्याशी संपर्क साधला. विक्टर गायसेंबर्घ यांनी या प्रतिमांतील लिखाणाची तपशीलवार फोड करायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे या लिखाणांत वापरलेल्या संज्ञा वा संदर्भपद्धत, ही चर्मपत्रं लिहिली गेली त्या काळात वापरात असलेल्या संज्ञा वा संदर्भपद्धतीसारख्या नव्हत्या. किंबहुना अशा संज्ञा आणि संदर्भपद्धत, इ.स.पूर्व दुसऱ्या काळात होऊन गेलेल्या हिप्पार्कसच्या कॉमेंटरी या ग्रंथात वापरल्या गेल्या होत्या. इतकंच नव्हे तर, यांतल्या काही नोंदी या कॉमेंटरी ग्रंथातील नोंदींशी जुळतही होत्या. यावरून हे लिखाण हिप्पार्कसचं असल्याची शक्यता दिसून येत होती. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी विक्टर गायसेंबर्घ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पुढील संशोधनात या लिखाणातील माहितीचाच आधार घेतला.

या लिखाणांत उत्तरेकडच्या आकाशात दिसणाऱ्या ‘उत्तर मुकुट’ या तारकासमूहाच्या लांबी-रुंदीचं अंशांच्या स्वरूपात वर्णन केलं आहे. तसंच, या तारकासमूहाच्या पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण अशा चारही बाजूंच्या सीमेवर असलेल्या ताऱ्यांची स्थानं दर्शवण्यासाठी, त्या ताऱ्यांची (उत्तर) ध्रुवबिंदूपासूनची अंशात्मक अंतरं दिली आहेत. या लिखाणाचा काळ ठरवण्यासाठी संशोधकांनी याच अंतरांचा उपयोग केला. हिप्पार्कसनंच लावलेल्या शोधानुसार पृथ्वीचा अक्ष हा ७२ वर्षांत एक अंश, अशा धीम्या गतीनं अंतराळात भोवऱ्यासारखा फिरतो आहे. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसल्यानं, त्याची दिशा सतत बदलत असते. त्यामुळे हा अक्ष आकाशात जिथे रोखला आहे, त्या बिंदूचं – म्हणजे ध्रुवबिंदूचं – स्थानही सतत बदलत असतं. परिणामी, ताऱ्यांच्या ध्रुवबिंदूपासूनच्या अशांत्मक अंतरांतही कालानुरूप बदल होत असतो. विक्टर गायसेंबर्घ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताऱ्यांच्या ध्रुवबिंदूपासूनची, या लिखाणात उल्लेख केलेली अंतरं लक्षात घेतली. त्यानंतर त्यांनी या अंतरांची, याच ताऱ्यांच्या ध्रुवबिंदूपासूनच्या आजच्या अंतरांशी तुलना केली. या अंतरांत पडलेल्या फरकावरून, लिखाणातील निरीक्षणं इ.स.पूर्व १२९ साली केली गेल्याचं त्यांना दिसून आलं. हा काळ हिप्पार्कसच्या आयुष्यातला काळ होता! या गणितामुळे, चर्मपत्रातला मजकूर हा हिप्पार्कसच्या मूळ लिखाणाची प्रत असल्याच्या शक्यतेला थेट दुजोरा मिळाला.

हिप्पार्कसनं केलेल्या तपशीलवार नोंदींचा हा अगदी छोटासाच भाग असला तरी, खगोलइतिहासकारांच्या दृष्टीनं हा एक मोठा शोध ठरला आहे. कारण हिप्पार्कसच्या ज्या लिखाणाचा अनेक प्राचीन खगोलज्ञांकडून उल्लेख केला गेला आहे, परंतु ज्या लिखाणाची मूळ स्वरूपातली प्रत आतापर्यंत सापडलेली नाही, त्या लिखाणाचाच हा भाग आहे. कदाचित नजिकच्या भविष्यात हिप्पार्कसच्या आणखी काही नोंदीही सापडण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. कारण, हिप्पार्कसचं हे लिखाण ज्या कोडेक्स क्लायमसी रीस्क्रिप्ट्स या दस्तऐवजावर सापडलं, त्या दस्तऐवजातील काही पानांवरील मजकूराची अजून फोड करता आलेली नाही. कालांतरानं ही फोड केलीही जाईल. आणि कदाचित त्यातून हिप्पार्कसनं केलेल्या आणखी नोंदीही सापडू शकतील!

 हिप्पार्कसच्या नोंदी सापडल्या तो मठ (सायनाय, इजिप्त)

(छायाचित्र सौजन्य : Marc Ryckaert/Wikimedia)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..