नवीन लेखन...

गायिका, अभिनेत्री सुंदराबाई जाधव

गायिका, अभिनेत्री सुंदराबाई जाधव यांचा जन्म १८८५ साली सातारा येथे झाला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात लावणी, ठुमरी, गझलचा बाज रुजवणाऱ्यात, भावगीतांच्या प्रवर्तक असलेल्या, बहुरंगी गायनशैली असणाऱ्या गायिका म्हणून सुंदराबाई जाधव यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. मूळच्या साताऱ्यादकडच्या असणाऱ्याव सुंदराबाईंची गायन कारकीर्द पुण्यात सुरू झाली. दाभाडे गोंधळींकडून त्या लावणी शिकल्या, शंकरभैया घोरपडकरांकडून ख्याल शिकल्या. मुंबईत गिरगावातील राममंदिरातील कनौजी ठाकूरदासबुवांकडून त्या उत्तरेतील ठुमरी, भजने शिकल्या. इंदूरच्या वास्तव्यात गम्मन खाँ, गुलाम रसूल खाँ यांच्याकडून त्या ठुमरी व गझलचा उर्दू-हिंदी ढंग शिकल्या. त्या काळात सुंदराबाईंनी गायकीत हे सर्व गानप्रकार व त्या योगे येणारे अलंकरण, लगाव, भावदर्शन, उच्चारण, ढंग आत्मसात केले. काहीसे स्थूल शरीर, रूप बेताचेच, सावळा वर्ण; पण उपजत विचक्षण बुद्धी व प्रखर धारणाशक्तीमुळे सुंदराबाईंनी आपले स्थान निर्माण केले. टिपेचा, परंतु अत्यंत भरदार, जव्हारीदार आवाज, अतीव सुरेलता, स्वरांचे सूक्ष्म दर्जे आणि रेखीव हरकती-मुरक्या यांमुळे सुंदराबाईंचे गाणे श्रुतिमनोहर वाटे. त्यांच्याकडे नाना रागतालांचा भरणा नव्हता; पण जे होते ते अस्सल, चोख आणि पूर्ण पक्के होते. सुंदराबाईंच्या स्वरशब्दांच्या उच्चारणात लयांगाच्या सूक्ष्म अवधानाची जाणीव होते. गाताना योग्य तेथे थांबून जो भावपरिणाम होतो, त्याची बरोबरी हजार बिकट तानांनी होणार नाही या तत्त्वाची सूक्ष्म, तारतम्ययुक्त जाण त्यांना होती, त्यामुळे त्यांच्या गायनातील विरामही बोलके असत. सर्वच गानप्रकार त्या सहजतेने पेश करत. बनारस, हैद्राबाद, कलकत्ता असे चोहीकडून त्यांना जलशाचे निमंत्रण यायचे. गायनाचार्य भास्करबुवा बखले, बालगंधर्व, विष्णूपंत पागनीस हेही त्यांच्या गायकीवर लुब्ध होते.

एच.एम.व्ही., ओडियन, रीगल, कोलंबिया, यंग इंडिया या ध्वनिमुद्रण कंपन्यांसाठी सुंदराबाई जाधव यांनी ख्याल, ठुमरी, दादरा, होरी, लावणी, गझल, कव्वाली, भावगीते या प्रकारांची ध्वनिमुद्रणे केली. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या ध्वनिमुद्रिकांतील गायनाच्या शेवटी त्यांची ‘सुंदराबाई ऑफ पूना’ अशी उद्घोषणा असे. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांची संख्या सुमारे ७५ (१५० गीते) आहे. या ध्वनिमुद्रिकांच्या विलक्षण खप व लोकप्रियतेमुळे एच.एम.व्ही.ने त्यांना विशेष सुवर्णपदक देऊन गौरविले होते. ‘एरी माँ मोरा मन हर लीनो’ (भीमपलास), ‘अत मन भाये’ (कामोद), ‘तू सांई सब का दाता’ (दुर्गा), ‘कुंजबन में सखी’ (यमन) या ख्यालांच्या ध्वनिमुद्रिका; ‘तुम्ही माझे सावकार’, ‘कठीण बडोद्याची चाकरी’, ‘खूण बाळपणात’, ‘सखे नयन कुरंग’, ‘ऐकुनी दर्द आले डोळ्याला पाणी’, ‘कुठवर पाहू वाट’ अशा खास लावण्या त्यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी गायल्या. ‘भोळे ते नेत्र खुळे’, ‘देवा मी बाळ तुझे’, ‘तुझ्याविण गोपगोपींना’ अशी भावगीते त्या स्वत: चाली लावून गायल्या. ‘कौन तर्हाप से तुम खेलत’, ‘कान्हा मुखसे न बोले’, ‘पिया गये परदेस’, ‘बारी उमर लरकैया’, ‘नाही परे मैंको चैन’, ‘ना कभी सुख मन पायो’, ‘मतवारे तोरे नैना’ या ठुमरी, दादरा, होरींमधील भावविभोरता; ‘कत्ल मुझे कर डाला’, ‘मानूंगी न हरगिज’ या गझलांतील नर्म शृंगार, आर्तता; ‘ये गं ये गं गाई’ या शिशु गीतातील मुग्धता, ‘राधेकृष्ण बोल मुख से’, ‘मथुरा न सही’, ‘भुवन पधारे प्रभू’, ‘वनवासी राम माझा’ अशा भजनांतील समर्पणभाव त्यांच्या गायनातून प्रतीत होतो.

सुंदराबाईंच्या मधुर गायकीचा परिणाम १९१७-१८ साली बालगंधर्वांवर झाला होता असे म्हणतात. बालगंधर्वांनी आपल्या या मानलेल्या बहिणीस १९२० साली ‘एकच प्याला’ नाटकाकरिता चाली देण्यासाठी पाचारण केले व सुंदराबाईंनी आपल्या संग्रहातून उत्तम चाली काढून दिल्या. त्यांतील ‘कशी या त्यजू पदाला’ (दिल बेकरार तूने), ‘सत्य वदे वचनाला’ (कत्ल मुझे कर डाला), ‘दयाछाया घे’ (पिया मनसे बिसार ना), ‘प्रभु अजि गमला’ ही पदे फारच लोकप्रिय झाली. त्या काळात बाई सुंदराबाई ‘पुणेकरीण’ या नावानेही ओळखल्या जात. शोधक आणि सूक्ष्म अभ्यास करण्याची कुशाग्र बुद्धी लाभलेल्या सुंदराबाईंनी प्रभात फिल्म कंपनीच्या ‘माणूस’(१९३९, हिंदीत ‘आदमी’) चित्रपटात प्रेमळ आईची भूमिका वठवून रसिकांची वाहवा मिळवली होती. तसेच ‘माणुस’ या चित्रपटातील मास्तर कृष्णरावांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली ‘तोड मोहजाल’ आणि ‘मन पापी भूला’ ही गाणी अविस्मरणीय आहेत. त्यांनी ‘संगम’(१९४१) याही चित्रपटात भूमिका करून दादा चांदेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीते गायली होती.मुंबईतील बोरीबंदरसमोरच्या एका मोठय़ा हवेलीचा एक पूर्ण मजला त्यांनी विकत घेतला होता. पदरी दोन मोटारी असणाऱ्या या कलावतीने त्या काळातील समाजात आपल्या कलेच्या आधारे मिळवलेली प्रतिष्ठा हा चर्चेचा विषय होता. पण त्याहीपलीकडे त्यात एका नव्या पर्वाचे बीज होते. बदलाच्या वाऱ्याची दिशा होती.

आकाशवाणीवर सन्माननीय गायक कलाकार म्हणून काम करताना बाई सुंदराबाईंनी तंत्राच्या या नव्या अंगाचा फार कलात्मकतेने उपयोग करून घेतला. त्यापूर्वी ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून त्यांनी अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांना दिल्या. पुढे ‘नवभारत रेकॉर्ड कंपनी’ या ग्रामोफोन कंपनीच्या कारभारात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला, सारे वैभव लयास गेले व त्यांच्यावर एका छोट्या खोलीत राहण्याची वेळ आली. त्यांच्या एकुलत्या एका मुलीच्या अकाली निधनाने त्या खचल्या. या अखेरच्या काळात मुंबई आकाशवाणीवर केंद्रप्रमुख झेड.एच. बुखारी यांनी सुंदराबाईंना मानद सल्लागाराचे पद देऊन मदत केली. कुमुदिनी पेडणेकरांसारख्या मोजक्या गायिकांनी त्यांच्याकडून गाण्याचे शिक्षणही घेतले.

सुंदराबाई जाधव यांचे निधन ३ जून १९५२ रोजी झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..