प्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.
टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.
जलते है जिसके लिए तेरी आँखो के दिये
धुंड लाया हु वही गीत मै तेरे लिये.
गीत नाजूक है मेरा शीशे से तुटे ना कही..
प्रियकर आणि प्रेयसी मधला दर्द सांगत असताना व डोळ्यातून अश्रू येत असताना इतक्या संयत पध्दतीने हे गाणं केवळ भावनाच व्यक्त करत नाही तर दुःखाची व दुःख व्यक्त करण्याची अत्युच्च पातळी गाठतें. गितकाराने जरी गाणं दुःखाचं लिहिलं असलं तरीही अभिनय आणि गायकीने त्याला उंची प्राप्त होते.
मेरी याद में तुम ना आॉसू बहाना
ना जी को जलाना मुझे भूल जाना
म्हणतांना तलतच हवा.
दुसऱ्यांचं जास्तीचं दुःख आपण जेंव्हा ऐकतो तेव्हा आपल्या कमी दुःखाला झोपवणारं ते अंगाई गीत असतं. प्रत्येकाला सुखाबरोबर एकावर एक फ्री प्रमाणे दुःख मिळतंच. सिने मे जलन हे तलत जेव्हा म्हणतो तेव्हां ते हृदयाला भिडतं. गाणं म्हणणं वेगळं आणि गाणं भिडणं वेगळं. दुःखाने भरलेलं आर्जव हृदय पिळवून टाकतं.तलत मेहमूद यांच्या गाण्यांमधील “दर्द” म्हणजे केवळ शारीरिक वेदना नव्हे, तर एक भावनिक, आत्म्याला भिडणारा वेधक अनुभव आहे. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट नरमपणा, कारुण्य आणि कोमलता आहे, जी श्रोत्याच्या अंतःकरणाला स्पर्श करतें. तलत यांचा आवाज मखमली, सौम्य आणि खोल भावनांनी भरलेला आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये एक प्रकारची शांतता असते, जणू मनाच्या खोल कप्प्यातील वेदना हळुवारपणे शब्दांमध्ये उतरते. दुःख व्यक्त केल्यानेच माणसे मोकळी होतात. दुःखं हा असा दागिना आहे जो मिरवता येत नाही.
दुःखी चेहऱ्यावर अनेक हसरें व फसवें मुखवटे असतात. तीच माणसाच्या जगण्याची पुंजी असते.
तलतनी अनेकदा गझलांच्या माध्यमातून प्रेमभंग, विरह, आणि हळुवार भावना व्यक्त केल्या. “आए भी तो क्या हमारे ग़म में इज़ाफ़ा कर गए…” सारखी शायरी त्यांच्या गाण्यांतून आणखी दर्दनाक वाटते.
तलत कधीच भावनांमध्ये अतिरेकी होऊन गात नाहीत. त्यांच्या गाण्यातील वेदना संयमित आणि अंतर्मुख आहे, जी ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात खोलवर पोहोचते.
त्यांच्या गाण्यांत संगीत अत्यंत साधं आणि सौम्य असायचं – जेणेकरून शब्द आणि भावना ठळक व्हाव्यात.
“शामे ग़म की क़सम, आज ग़मगीन हैं हम…”
“मेरा करार ले जा, मुझे बेकरार कर जा…”
तलत मेहमूद यांची खासियत म्हणजे त्यांनी गाण्यातून “दर्द”ला एक अभिजात सौंदर्य दिलं — असं सौंदर्य जे वेदनादेखील श्रवणीय आणि मनाला भिडणारं करतं. तलत मेहमूद हे त्यांच्या मखमली आवाजामुळे आणि दर्दभऱ्या गायकीमुळे श्रोत्यांच्या मनात कायमचं घर करून राहिले आहेत. त्यांच्या काही गाणी आजही “आठवणीतली गाणी” म्हणून ओळखली जातात. मै दिल हु आरमां भरा– विरहाची हळवी भावना तलतने इतकी नाजूकपणे मांडली आहे की, ऐकणारा त्या काळात हरवून जातो.
– मनातील हताशा आणि असहायता तलतच्या आवाजातून फारच संयतपणे प्रकट होते.
– मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा हे गाणं तलतच्या रोमँटिक पण वेदनामय शैलीचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. इतना ना मुझसे तू प्यार बडा– प्रेमाच्या कोमल भावनांमधून जन्मलेली अस्वस्थता तलतच्या गाण्यातून सुंदरपणे व्यक्त होते. ही गाणी तलत मेहमूदच्या आवाजाचं सौंदर्य, त्याच्या दर्दभऱ्या भावनांची खोली आणि त्याचा काळजाला भिडणारा स्पर्श सतत आठवणीत ठेवतात. काहीजण स्मृती मधून जातच नाहीत कारण त्यांचे स्मृतिचित्रे जिवंत असतात. दुःख गिळून जीवन जगायचं असतं हे तलत ने गायलेल्या सुरातूनच कळतं.
डॉ.अनिल कुलकर्णी
९४०३८०५१५३
Leave a Reply