नवीन लेखन...

या मातीला जाग केव्हा येणार ?

सकाळपासून या एका प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय .

प्रश्न केवळ वर्तमानकाळातला नाही .
तो भूतकाळातील पण आहे आणि दुर्दैवाने भविष्यातही तो राहणार आहे .
संदर्भ बदलतात . काळ बदलतो . माणसेही काळानुसार वेगवेगळी असतात .
पण भूभाग तोच असतो .
त्यावरच्या वृत्ती-प्रवृत्ती त्याच , तशाच असतात .
माती तीच असते. त्यावर पडणारे पाणी तेच असते . तेच हवामान , तेच पर्यावरण , तोच सूर्यप्रकाश …सर्व काही तेच ते असते .

पण त्या मातीत रुजलेल्या काही वृक्षवल्ली कुजलेल्या मनोवृत्तीच्या का निपजतात ?

अशावेळी वाटून जातं ,
या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

बिपीन रावत यांचं अकाली जाणं , हा नियतीनं लिहिलेला ललाटरेख नक्कीच नसावा .

त्यांची कारकीर्द , शत्रूराष्ट्रांसाठी कर्दनकाळ स्वरूपाची होती .

त्यांची कारकीर्द , सर्व सैन्यदलांसाठी प्रेरक , कार्यप्रवण करणारी , खंबीर , आश्वासक , दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय देणारी , त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा शोध आणि वेध घेणारी , त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांचं बळ पुरवण्याचा आग्रह धरणारी अशीच होती .

त्यांच्या कारकिर्दीला , प्रखर राष्ट्रभक्ती असणाऱ्या राष्ट्रप्रमुखांचे कोंदण लाभले होते .

त्यांच्या कारकिर्दीला , सीमेवरील स्फोटक परिस्थितीच्या ज्वालामुखीचे आव्हान होते .
आणि तसे आव्हान पेलताना त्यांनी शत्रू राष्ट्रांना ठणकावून सांगितले होते ;
” पहिली गोळी आम्ही झाडणार नाही पण नंतर आम्ही झाडलेल्या गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही ! ”
अशी शत्रूला थरकापवणारी आणि स्वदेशाला आश्वासक करणारी सार्थ गर्वोक्ती त्यांच्याजवळ होती .

एका कुटुंबप्रमुखाची सर्वसमावेशक भूमिका असावी तशी त्यांची कारकीर्द होती .
सैन्याचं मनोबल कधीच कमी होत नाही , हा त्यांच्या कारकिर्दीचा पाया होता .
भारतीय सैन्य कधीच खोटं बोलत नाही आणि अंगावर पडलेली जबाबदारी कधीच झटकत नाहीत , उलट प्राणपणानं सैन्य झगडत असतं , संघर्ष करीत असतं , मदतकार्य करीत असतं , मग ती जागा सीमावर्ती असो वा देशांतर्गत असो , हा त्यांचा सैन्याबद्दलचा प्रगाढ विश्वास होता .

देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

आतंकवाद्यांच्या बाबतीत देशद्रोही असणारे तथाकथित मानवाधिकारवादी जितके जागरूक असतात आणि देशाचा विचार न करता केवळ दहशतवाद्यांचा , त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करतात , तितका भारतीय सैन्याचा विचार ते का करत नाहीत ? आपलं सैन्य हे तथाकथित मानवाधिकारवाद्यांच्या दृष्टीने माणसं नाहीत ? आपल्या सैन्याच्या कुटुंबीयांचा ते विचार का करीत नाहीत ?

राष्ट्ररक्षणासाठी भारतीय सैन्याने शत्रूवर केलेल्या कारवाईवर अविश्वास दाखवणं हे कुठल्या देशभक्तीत येतं ? आपलं राष्ट्र समर्थ्यसंपन्न बनावं म्हणून आयात केलेल्या वा करण्यात येणाऱ्या शस्त्र सामग्रीत , तंत्रज्ञानात दलाली खाणारे या मातीत कमी नाहीत , त्यांची दलाली बुडाली म्हणून आता राजकारण करणारे या मातीचे कधी झालेच नाहीत . घरभेदी हा या मातीला मिळालेला शापच आहे , पण अशा घरभेदीना , आपली माती का ओळखत नाही ? देशावर होणाऱ्या आघातानंतर आनंदी होणारे , समाज माध्यमावर तो आनंद व्यक्त करणारे या मातीत पिकणारे धान्य खाऊन माजले आहेत , अशावेळी वाटतं

या मातीला जाग तरी केव्हा येणार ?

या मातीच्या आधारानं जगणाऱ्यांना सीमेवरच्या तणावाचं भान कसं नाही ?

शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण स्वावलंबी होत आहोत हे कळत कसं नाही ?

गल्लीबोळात वाढणाऱ्या विषवल्ली उपटून फेकायला हव्यात , किमान त्यांना ओळखता यायला हवं , हे भान सुबुद्ध नागरिकांना का येत नाही ?

एकीचं सामर्थ्य जाणण्यात आम्ही कुठे कमी पडतो ?

अखंड सावधानता हा मंत्र आम्ही आचरणात का आणत नाही ?

आपल्या अकाली जाण्यानं बिपीनजी , असे असंख्य प्रश्न उभे राहत आहेत .

या मातीची परंपरा ओजस्वी होती . समर्थ्यसंपन्न , संस्कृतीसंपन्न भूतकाळ हा सुवर्णकाळ होता .
पराक्रमाचे तेज शत्रूला नामोहरम करणारे होते . पण तो भूतकाळ होता. त्या भूतकाळाला सुद्धा घरभेदीनी ग्रासले होते . पण आपल्यासारख्या शूर योध्यानी तेव्हाही भारतभूमीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती . तोच वारसा आपण चालवत होता .

पण…
माती तीच आहे ना ?
घरभेदी बदलले तरी वृत्ती तीच आहे ना ?

स्वर्गीय जनरल बिपीनजी रावत

आपल्याला आदरांजली वाहताना माझ्या मनातल्या प्रश्नाचं रौद्ररूप समोर येतंय .

– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..