नवीन लेखन...

कोकणात कृषी पर्यटनाला चालना !

पर्यटन या विषयाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. काँक्रिटच्या जंगलाला कंटाळून प्रत्येकाला सुटीच्या दिवशी निसर्गरम्य शांत परिसरात जाण्याची ओढ लागली आहे. सुखवस्तूंच्या सोबतच आता मध्यमवर्गीय माणूसही मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडू लागला आहे. पर्यटनासाठी चार पैसे खर्च करण्याची सर्वसामान्यांचीही मानसिक तयारी झाली आहे. यामुळेच पर्यटन हा आता जगभरात व्यवसाय बनला आहे.

——————————————————————————-

पर्यटन या विषयाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. काँक्रिटच्या जंगलाला कंटाळून प्रत्येकाला सुटीच्या दिवशी निसर्गरम्य शांत परिसरात जाण्याची ओढ लागली आहे. सुखवस्तूंच्या सोबतच आता मध्यमवर्गीय माणूसही मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडू लागला आहे. पर्यटनासाठी चार पैसे खर्च करण्याची सर्वसामान्यांचीही मानसिक तयारी झाली आहे. यामुळेच पर्यटन हा आता जगभरात व्यवसाय बनला आहे. स्वित्झर्लंड, मॉरिशस, मलेशिया अशा अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. भारतातही हिमाचल प्रदेश, केरळ, गोवा ही राज्ये पर्यटन व्यवसायात अग्रणी राज्ये बनली आहेत. या राज्यांमध्ये देशातून-परदेशांतून लाखो पर्यटक येतात आणि स्थानिक स्तरावर मोठ-मोठे रोजगार निर्माण होतात. कोकणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास निसर्गाने कोकणावर मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली असून कोकणचा कायापालट करण्याचे सामर्थ्य पर्यटन उद्योगात सामावलेले आहे. वाहतुकीच्या वाढत्या सुविधा आणि कोकण रेल्वेमुळे कोकण आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या डेक्कन ओडिसीमुळे कोकण पर्यटनाच्या नकाशावर झळकले आहे. या संधीचा फायदा कोकणात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी निश्चितपणे होईल.

पर्यटन व्यवसायासाठी कोकणात निसर्गाची समृद्धता आणि भरपूर अनुकूलता असूनही कोकण अद्यापपर्यंत पर्यटनाच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे विकसित झालेला नाही. कोकणच्या दोन्ही टोकांना मुंबई आणि गोवा अशी पर्यटनाची दोन शक्तिस्थळे असून बाराही महिने येथे देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. मुंबईहून गोव्याकडे जाणारा पर्यटक मुंबई-गोवा राष्ट्रीय रस्ते महामार्ग आणि कोकण रेल्वेतून संपूर्ण कोकण ओलांडून गोव्याकडे वळतो. गोव्याकडे जाणाऱ्या या पर्यटकांना आता कोकणचा निसर्ग आणि विस्तीर्ण सागर किनारा भुरळ पाडू लागल्याने कोकणाकडेही या पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. त्यामुळे हळूहळू का होईना कोकणात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. आता गरज आहे ती पर्यटनाला व्यवसाय-उद्योग म्हणून शास्त्रशुद्ध जोड देऊन स्थानिकांनी यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ उठविण्याची आणि कोकण ओलांडून गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना कोकणात थांबविण्याची. कोकणच्या निसर्गरम्य प्रदेशांत अनेक धार्मिक, प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळे तर आहेतच, परंतु या जोडीला कोकणाला विशेष सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

कोकणातील नमन खेळे, दशावतार, जाखडी यासारख्या पारंपरिक सांस्कृतिक लोककला, होळी, शिमगा, गौरीगणपती या सारखे सण-उत्सव आणि विशेष म्हणजे कोकणातील खास पदार्थ मालवणी खाजा, सोलकढी, कोळंबी, वडे-सागोती, उकडीचे मोदक, फणसाची भाजी, इथली आंबा-फणसासारखी रसाळ फळे, काजू-करवंदे, जांभळे, आंबावडी, फणसपोळी, आमरस, कोकम तसेच मासळी यासारखा कोकणी मेवा आणि त्याच्या जोडीला समृद्ध सागर किनारा आणि निसर्ग सौंदर्य यामध्ये पर्यटकांना भरभरून आनंद देण्याची क्षमता आणि ठेवा निश्चितपणे आहे. एवढी सर्व अनुकूलता असतानाही आजपर्यंत कोकणात पर्यटनातून फार मोठा रोजगार निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत नाही. हे चित्र बदलण्यासाठी कोकणातील तरुणांना कृषी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची फार मोठी संधी उपलब्ध आहे. मात्र त्याचा आपली मानसिकता बदलून परिश्रम आणि कल्पकतेने लाभ करून घेण्याची गरज आहे.

पर्यटन व्यवसायात हॉटेल्स, ट्रान्सपोर्टस, टुरिस्ट गाईड, सेवा उद्योग, स्थानिक साधन संपत्तीचा उपयोग करून घेवून पर्यटकांना त्यातून सेवा-सुविधा, कोकणी मेवा, साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यातून आर्थिक उत्पन्नाची साधने निर्माण करणे सहज शक्य आहे. त्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आता ‘कृषी पर्यटनाची संकल्पना’ स्वीकारून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी शोधाव्या. ‘कृषी पर्यटन’ म्हणजे नेमके काय हे मात्र आधी समजून घेण्याची गरज आहे. पर्यटन व्यवसायासाठी भरपूर भांडवली गुंतवणूक करून हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स बांधण्यापेक्षा आपल्या गावातील पर्यटन क्षेत्रानजीक असलेले शेतघर, बंगले, घरे, घरातील काही खोल्या, वाडे की जे वर्षभर रापरले जात नाहीत किंवा बंद ठेवले जातात अशांचा उपयोग पर्यटकांना निवास व्यवस्थेसाठी करून देणे सहज शक्य आहे. आपल्या घरी आलेल्या नातेवाईकांप्रमाणे पर्यटकांची आत्मीयतेने उठ-बस करून पाहुणचार देणे, त्यांना कोकणी मेव्याचा आस्वाद घेण्याची संधी देणे उदा. नाष्ट्यामध्ये पेज, घावणे, तांदळाच्या भाकऱ्या, नाचणीच्या भाकरी, जेवणामध्ये ताज्या माशांचे कालवण, खुश चिकन, कोळंबी, कोंबडी वडे इत्यादी देऊन निवासाबरोबरच न्याहारी व भोजनाची सोय झाली तर पर्यटक होतात. त्यामुळे एकदा येऊन गेलेला पर्यटक पुन्हा येताना आणखी दोन-चार पर्यटक तेथे घेऊन येतो. कोकणात आज येथील चाकरमानी रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरात जावून तेथे स्थायिक झाल्याने कोकणात असंख्य घरे बंद अवस्थेत आहेत. त्यांचा उपयोग पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी करता येणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास-न्याहारी योजनेचा फायदा घेऊन अथवा थेट पर्यटकांशी संपर्क ठेवून यातून चांगला रोजगार निर्माण करण्याची संधी आहे.

केवळ निवास-न्याहारी एवढ्याच सुविधा देवून न थांबता पर्यटकांना गावाची सांस्कृतिक ओळख करून देणे, नमन, जाखडी, दशावतार, फुगड्या यासारख्या पारंपरिक सांस्कृतिक कलांचे दर्शन घडविणे, नदीवर मासेमारी अथवा पोहण्यासाठी नेणे, शेती-बागायती – नारळी-पोफळीच्या बनात फेरफटका यामुळे पर्यटक बेहद्द खुश होतात. या कृषी पर्यटनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पर्यटक घरी जाताना येथील सांस्कृतिक ठेवा मनात जपून तर जातोच शिवाय बागेतील नारळ, आंबे, काजू, भाजी, कडधान्य, कोकम, आंबा-करवंदाचे लोणचे, आंबापोळी, फणसपोळी, आमरस यासारखा कोकणी मेवा न विसरता घेऊन जातो. यातूनच शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो आणि अनपेक्षितपणे रोजगार निर्मिती होते.

संपूर्ण कुटुंब या रोजगारात सामावले जाते. या पद्धतीने कोकणातील शेतकरी आणि तरुणांना एकत्र येऊन सहकारी पद्धतीने गावागावांतून कृषी पर्यटनाचे प्रकल्प उभारता येतील आणि रोजगारही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. आज कोकणात महाराष्ट्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानातील रोजगार हमी योजनेअंतर्गत फळझाड लागवड कार्यक्रमामुळे मोठ्या क्षेत्रावर फळझाडांची लागवड होऊन प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ यासारख्या फळपिकांच्या उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. या उत्पादनाला कोकण रेल्वेमुळेही चांगली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यापुढील टप्पा म्हणून शासन फळ प्रक्रिया युनिट्स उभारून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला नव्या बाजारपेठेत नेण्यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज आहे. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर आणि राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी असी कोकणी मेव्याची विक्री केंद्रे उभारून पर्यटकांना कोकणी मेवा घेण्यासाठी आकृष्ट करण्याचे प्रयत्न झाले तर या फळप्रक्रिया उद्योगातूनही येथील तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होण्याची क्षमता आहे.

कोकणात असंख्य नद्या आणि खाड्या असून पर्यटकांची जलपर्यटनाची हौस भागविण्यासाठी नौकानयनाच्या सुविधांची गरज भासते. कोकणातील तरुण मच्छिमारांनी छोट्या छोट्या सुशोभित होड्या अथवा यांत्रिक नौका पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या तर पर्यटकांना जलविहाराचा आनंद तर उपभोगता येईल शिवाय अशा जलक्रीडा केंद्राच्या माध्यमातून चांगला रोजगारही कमावता येईल. कोकणात असंख्य धार्मिक स्थळे, प्राचीन मंदिरे, किल्ले, बारमाही वाहणारे धबधबे, लेणी, गरम पाण्याची कुंडे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटकांना याची माहिती देण्यासाठी कोकणात टुरिस्ट गाईड्सची कमतरता जाणवते. असे दुरिस्ट गाईड कोकणातील सुशिक्षित तरुणांतूनच निर्माण होण्याची गरज आहे. शिवाय या पर्यटकांना तेथे जाण्यासाठी वाहनांची अथवा नौकांची सुविधा, तेथे निवास, भोजन, तंबू निवास, सहली अशा उपक्रमांद्वारे पर्यटकांच्या गरजांची पूर्तता करणे आपल्याला सहज शक्य आहे. त्यातूनही आर्थिक उत्पन्न मिळविणे कठीण नाही.

जलद आणि सुखद वाहतूक आणि प्रवासाची वाढलेली साधने, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, कोकण रेल्वे यामुळे पर्यटक कोकणात मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत. दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीत आता पर्यटकांची तेथे वाढती गर्दी दिसू लागली आहे. त्यांना जर येथे निवास, भोजनादी चांगल्या सुविधा मिळाल्या तर त्यांची गर्दी वाढतच जाणार आहे. या संधीचा फायदा घेऊन कोकणात पर्यटन स्थळी तसेच राष्ट्रीय महामार्गावर मोठ मोठी पंचतारांकित, त्रितारांकित हॉटेल्स, रिसॉर्टस उभी राहू लागली आहेत. त्यामुळे या व्यवसायासाठीही प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासू लागली आहे. कोकणातील तरुणांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करून ही गरज स्थानिकरीत्या पूर्ण केली तर त्यांना भविष्यातही रोजगाराच्या मोठ्या संधी या व्यवसायातून उपलब्ध होणार आहेत.

कोकणात गणपतीपुळे, आंबोली, माथेरान यासारखी अनेक पर्यटन स्थळे आज असंख्य हॉटेल्स आणि रिसॉर्टसनी गजबजलेली दिसून येतात. यातून स्थानिकरीत्या रोजगार निर्मिती होवून त्या त्या भागाच्या आर्थिक विकासाला फार मोठी चालना मिळाल्याचे चांगले दृश्य दिसून येते. कोकणात पर्यटन विकासामुळे झालेला हा बदल आहे. निसर्गरम्य श्रीक्षेत्र गणपतीपुळे आज संपूर्ण देशाला परिचित झाले आहे. येथील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि परिसर यामुळे विदेशी पर्यटकांचीही येथे संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गणपतीपुळे पर्यटन केंद्रात दरवर्षी दीड ते दोन लाख पर्यटकांची वास्तव्यासाठी हजेरी लागते आणि त्यामुळेच हे राज्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे केंद्र म्हणून राज्य पर्यटन विकास महामंडळात नोंदले गेले आहे. शिवाय या परिसरातील असंख्य स्थानिकांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनही फार मोठा रोजगार उपलब्ध झाल्याचे दिसून येते. कृषी पर्यटनाची संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्ष साकार झालेली आहे. हाच बदल संपूर्ण कोकणात होऊन ठिकठिकाणी कृषी पर्यटनाची संकल्पना साकार होणे कठीण नाही. कोकण पॅकेजमधून कोकणातील अशा अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या विकासाला चालना देऊन पर्यटकांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू झाले आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळही पर्यटन विकासाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम हाती घेत आहे. डेक्कन ओडिसीमुळेसुद्धा येथील सुमारे पाचशे लोकांना विविध स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे.

कोकणात कृषी पर्यटनाची संकल्पना हळूहळू साकार होत असून – त्याची फळे काही कालावधीतच पाहावयास मिळणार नाहीत. तथापि ही फळे चाखण्यासाठी आता कोकणातील दृश्य-उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी पर्यटनाच्या प्रत्येक स्तरावर कृतिशील सहभाग घेण्याची गरज आहे. यातूनच कोकणात पर्यटनाला उद्योग व्यवसायाचे सामर्थ्य प्राप्त होईल आणि येथील तरुणांना रोजगाराच्या वाढत्या संधी उपलब्ध होतील. कोकणचा कृषी पर्यटनातून आर्थिक विकास साधला जाईल.

संकलन : शेखर आगासकर 

प्रभाकर कासेकर
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..