श्री स्वामी समर्थ पंथाचे श्रेष्ठत्व !

सृष्टीच्या आरंभापासून ते सृष्टीच्या अंतापर्यंत कायम तिचे पालकत्व घेणाऱ्या आणि अखिल ब्रह्मांडावर आपली परिपुर्ण सत्ता चालवणाऱ्या ब्रह्मांडनायक स्वामींना कोटी कोटी वंदन करुन, आजचे पंचम पुष्प सुरू करू या.

अनादि कालापासून चालत आलेल्या सृष्टिचा गाडा सुरळित चालविण्यासाठी परमेश्वराने नानाविध अवतार धारण करुन जगताला सन्मार्गाला लावण्याचे कार्य केले. धर्माला आलेली ग्लानी दुर करून, सज्जनांचा सांभाळ केला. प्रंसगानूरुप घेतलेल्या अशा अनेक अवतारावरून त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली. या उपासनेचा क्रम असाच पुढे वाढत जाऊन, त्यातून मग अनंत पंथ, असंख्य संप्रदाय निर्माण झाले. या असंख्य संप्रदायाचे पुढे अगणित पंथ प्रमुख, धर्मगुरू निर्माण झाले. पुढे याच प्रमुखांचे, धर्मगुरूंचे वारस आणि अनुयायी वाढत गेले. ही साखळी पुढे अशीच वाढत गेल्यामुळे, धर्माच्या, पंथाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. यातूनच मग एकमेकांविषयी द्वेष, मत्सर वाढीस लागला. मुळ धर्मतत्वे, मुळ विचार, मुळ संस्कृती बाजूलाच पडली. यातून सुरु झाली ती जीवघेणी स्पर्धा आणि माझाच पंथ सर्वश्रेष्ठ, ही संकुचिंत भावना. या फुटीमुळेच मुळ वैदिक धर्माची अनेक शकले निर्माण होऊन, धर्म खिळखिळा झाला. याचाच फायदा घेऊन पुढे शेकडो वर्ष देशावर परकियांची सत्ता आली. परंतु एवढे सगळे काही होऊन सुध्दा अजूनही या धर्म पंडिताना आणि पंथ प्रमुखांना जाग आली. किंवा त्यांच्यातील हेवेदावे, मत्सर कमी झाला नाही. आजपर्यंत कोणीही मुळ धर्म शिकवण, मुळ धर्म तत्वे जशीच्या तशी शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. बदलत्या काळासोबंत तत्कालीन समाजात रुजलेले धर्म नियम बदलण्याचा व त्यातील फोलपणा जगासमोर आणण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही.

जवळपास हिच परिस्थिती सगळीकडे असताना व सर्वंच पंथ, संप्रदाय हे धर्मकार्य करण्यास सक्षम नसताना मग ही मोडलेली धर्माची घडी पुन्हा व्यवस्थित बसविण्यासाठी आणि धर्मातील फोलपणा बाजूला काढून सत्य आणि शुध्द स्वरूपाचा धर्म सर्वासमोर मांडण्यासाठी कोणाला तरी या भूतलावर अवतीर्ण व्हावे लागणार, अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा मग सर्व देव देवतांशी विचार विनियम करून आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती ध्यानात घेऊन सर्वांनुमते निर्णय झाला. या झालेल्या निर्णयानुसारच मग ईतर कोणालाही अवतार घेण्यासाठी न पाठवता स्वत: परब्रह्मच या भूतलावर येण्यासाठी प्रथमच सज्ज झाला आणि चैत्र शुध्द द्वितीया शके 1071 मध्ये हस्तीनापूर नजीक छेली ग्रामी प्रकट झाला. येथून मग दृश्यादृश्य स्वरूपात परब्रह्माने संपूर्ण जगभर पायी प्रवास करून, पदभ्रमंती करून धर्माला उजाळा देण्याचे काम केले. तीर्थक्षेत्राला भेटी देऊन त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले. धर्माची मोडलेली घडी पुर्ववत करायला सुरूवात केली. पुढे मग अक्कलकोटी दृश्यरुपात 22-23 वर्ष लीला करत लोकांच्या मनातील भिती, दडपण, अंधश्रध्दा दूर करण्याचे काम केले. सर्व भेदाभेद नष्ट करण्याचे काम केले. सोहळ्याचे अवंडबंर माजवणाऱ्यांना ताळ्यावर आणले. जटील कर्मकांड आणि कठोर नियम पाळणाऱ्यांना यातील फोलपणा दाखवून दिला. परमेश्वर हा उपाशी राहिल्याने नाही तर उघड्या मनाने प्राप्त होतो. याची शिकवण दिली. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ ही वृत्ती अंगी बाणवायला शिकविले. निर्जीव मुर्तीची सेवा करुन भान हरपण्यापेक्षा आपल्यातील व ईतरांतील परमेश्वर ओळखण्याची बुध्दी दिली. मुक्या प्राण्यांचे बळी देणारांची कठोर शब्दात निर्भत्सना करून त्यांना यापासून परावृत्तीत केले. झाडे तोडणांराना कठोर शब्दांत तंबी दिली. दगड धोंड्याना शेंदूर फासलेल्या देवतांची फजिती करून, यापासून लोकांना परावर्तीत करण्याचे कार्य केले. ग्रह ताऱ्यांचे भूत लोकांचे मनातून काढून टाकले.

अशी अनेक प्रकारची कामे परब्रह्माने आपल्या वास्वव्यस्थानी केली. आज ही आपण अत्यंत बारकाईने स्वामींचे चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, स्वामी महाराजांनी केलेली प्रत्येक लीला ही एक फार मोठी शिकवण होती. त्यात खुप मोठा अर्थ दडलेला होता. पंथा-पंथातील, धर्मा-धर्मातील वाद-विवाद नष्ट करण्याचे व मुळ धर्म आणि मुळ संस्कृती सर्वांपुढे मांडण्याचे महान कार्य म्हणजेच स्वामींचे जीवनकार्य होय. धर्मात रुजलेल्या चुकिच्या गोष्टी, अनिष्ट प्रथा, अनीती दुर घालवण्याचे काम स्वामींनी आपल्या अधिकाराने केलेले आहे. प्रसंगी अतिशय कठोर शब्दांत निर्भत्सना करून या बाबींना आळा घातला.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, स्वामींचे प्रकटीकरण आणि स्वामींचे अवतार कार्य हाच खरा विश्वधर्म आहे. प्रत्येकांनी जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर जगात कधीही आणि कुठेही धर्मा-धर्मात आणि पंथा-पंथात संघर्ष होणार किंवा मतभेद होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकानेच आपले व आपल्या कुटूंबासह आपल्या राष्ट्रांचे कल्याण साधण्याकरीता या ‘श्री स्वामी समर्थ’ पंथाचे अनुकरण करावे. हा पंथ स्विकारावा. श्री स्वामी समर्थ पंथ हा किती श्रेष्ठ व किती महत्वपुर्ण याची शिकवण आपण आज स्वामीसुत महाराजांच्या पुढिल अभंगातून पाहणार आहोत.

‘श्रीस्वामीसमर्थपंथ’ हाचि बरा। असेचि हा खरा जगामाजीं ॥1॥
स्वामीदीक्षा हीच घेऊनियां बरी। आनंदाची लहरी साधा वेगीं ॥2॥
‘स्वामी’-महामंत्र, जगी हा तारक । तत्वमसि सुरेख सर्व ज्यांत ॥3॥
स्वामींचे पूजन चालवूनी घरीं ।  साधा मुक्ति चारीं, सृष्टिजन ॥4॥
मायबाप हाचि सकळांचा स्वामी ।  छंद ठेवा नामीं त्याचें सदा ॥5॥
उपासना हीच, घरोघरीं पूजा । भगवंत-राजा-मोक्षदाता ॥6॥
पाहुनियां तुम्ही दीक्षानियमपर्व । ब्राह्मणादि सर्व स्वामीपूजा ॥7॥
सर्वसृष्टिजनें पूजन करावें । स्वामीचें बरवे घरोघरी ॥8॥
जातिधर्मनेमें पूजनाचे मर्म ।  पाहूनी स्वकर्म तुम्हीं करा ॥9॥
स्वामीसुत म्हणे ‘श्रीस्वामीसमर्थ’ । पंथ हा हितार्थ तुम्हीं धरा ॥10॥

सज्जनहो, आजच्या आपल्या अभंगात स्वामीसुत महाराज स्वामींच्या पंथाची आवश्यकता व सर्वश्रेष्ठता प्रतिपादन करताना दिसतात. स्वामीसुत सांगतात, जाती धर्माच्या आणि श्रेष्ठ कनिष्ठतेच्या निरर्थक चौकटीत अडकून पडलेल्या अज्ञानी लोकांनो, हे सर्व संकूचित विचार दुर करा. सर्व सृष्टि ही एकाच परमेश्वराने निर्माण केलेली असल्यामुळे आपण सर्वच त्याची लेकरे आहोत, तेव्हा भेदाभेद उरतो कुठे ? जेव्हा कसलाच भेदाभेद उरत नाही, तेव्हा मन शुध्द झालेले असते. म्हणून लोकहो, या जगात सर्व भेदाभेद रहित आणि सर्वश्रेष्ठ असा एकच पंथ आहे, तो माझ्या परब्रह्म बापाचा ‘श्री स्वामी समर्थ पंथ’ हा आहे. या पंथाचा निर्माता हा प्रत्यक्ष या सृष्टिचा निर्माता आहे. त्यामुळे यात कसलाही भेदाभेद नाही. जर आपले इहलोक आणि परलोक साधायचे असेल तर या पंथात या. स्वामी नामाची दिक्षा घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करा. स्वामी नाम हे आनंद लहरीचे उगमस्थान आहे, ब्रह्मानंदाचे भांडार आहे. तेव्हा या आणि या ब्रह्मानंदाचा आस्वाद घ्या.

या अखिल जगात फक्त एकच मंत्र आपला उध्दार करणारा आहे, हा महामंत्र म्हणजेच ‘स्वामी नाम’ होय, तेव्हा या मंत्राची दिक्षा घ्या आणि आपले जीवन सार्थक करुन घ्या. या महामंत्राच्या दिक्षेने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होऊन सर्वात उत्तम अशी ‘तत्त्वमसि’ अवस्था प्राप्त होईल. ( तत्त्वमसि- हे सामवेदातील महावाक्य आहे. याची फोड तीन पदांनी होते, तत्-त्वम्-असि म्हणजेच ‘तें तूं आहेस’. ‘तत्’ अर्थात ‘तें’ म्हणजेच सर्वांतयामी असलेले व्यापक निर्गुण-निराकार-अद्वितीय असे परात्पर परब्रह्म तत्त्व, ‘त्वम्‍’ अर्थात ‘तूं’ म्हणजे जीवआत्मस्वरुप आणि ‘असि’ अर्थात ‘आहेस’ म्हणजे निर्गुण-निराकार-परब्रह्म तत्त्व आणि तूं स्वत: हे दोन्ही वेगळे नसून एकच आहेत. हा भाव जागृत होणे होय.) हीच अवस्था प्राप्त होण्यासाठी तपस्वी जन हिमालयात हजारो वर्ष जप-तप करतात. योगी जन शेकडो वर्ष योग-प्राणायाम करतात. ज्ञानी जन 04 वेद, 06 शास्त्रे, 18 पुराणे, उपनिषदे यांचे अनेक तपे अध्ययन करतात. परंतु एवढे परिश्रम घेऊन ही त्यांना यश मिळतेच असे नाही. उलट वेळ आणि श्रम व्यर्थ जातात. पण माझ्या स्वामींना शरण गेल्याने आणि स्वामी मंत्राचा ध्यास घेतल्याने मात्र अगदी सहजतेने ही ‘तत्त्वमसि’ अवस्था प्राप्त होते. एवढे स्वामी नाम गोड आणि दीनजनउध्दारक आहे.

स्वामींचे पूजन आपल्या घरी नित्यनेमाने केले, तर केवळ या अल्प सेवेने आपल्याला चार ही प्रकारच्या मुक्ती साध्य होतील. एवढा दयाळू मायबाप स्वामी आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वामी नामाचा छंद ठेवावा. घरोघरी स्वामींची उपासना, पूजा करावी. स्वामी हे सर्वांचे भाग्य विधाते भगवान आहेत, सर्व देवी देवतांचे राजे आणि मोक्षदाते परब्रह्म आहेत. स्वामी महाराज दीनानाथ, भक्तवत्सल, करुणासागर आहेत. त्यांची करुणा प्राप्त करण्यासाठी आपण त्वेरेने स्वामी नामाची दिक्षा घ्यावी. स्वामींच्या दारात वर्णभेदाला थारा नसल्यामुळे ब्राह्मणापासून ते क्षुद्रापर्यंत सर्वांना एकच मंत्र व एकच दिक्षा नियमपर्व आहे. ते म्हणजे श्रध्दापुर्वक, शुध्द अंत:करणाने स्वामी नामाचे चिंतन करणे आणि आपल्यातील ‘स्वा-मी’ ला ओळखणे हे होय. तेव्हा व्यर्थ वेळ न दवडिता सर्व सृष्टिजनांनी तात्काळ स्वामी पूजेला, स्वामी सेवेला सुरूवात करावी. प्रत्येक घरोघरी स्वामी नामाचे चिंतन व्हावे. हीच तळमळ स्वामीसुतांनी येथे व्यक्त केली आहे.

पुढे आपल्या जातीधर्मानुसार कर्म करून स्वामी सेवेचे मर्म जाणून घ्यावे, असा संदेश स्वामीसुत देताना दिसतात.  यातील जातीधर्मानुसार कर्म म्हणजे जन्माने मिळालेला जातीधर्म अपेक्षित नसून, आपण आपला प्रपंच चालविण्यासाठी जो व्यवसाय, जो उद्योग, जे कर्म करतो, तो आपला जातीधर्म होय. हा धर्म करत करत आपण हे स्वामी नामाचे स्वकर्म करायचे आहे. म्हणजेच आपला संसार गाढा ओढत ओढत प्रपंचातून परमार्थ साधायचा आहे. असा उपदेश स्वामीसुत देताना दिसतात. आपल्या कर्मापासून दुर न होता, आपले कर्तव्य करत करत स्वामी नाम घ्यावे, स्वामींचे चिंतन करावे, स्वामी नामाचे भजन करावे, म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला आपलेसे करतील.  कारण ‘आळसी माणसांचे तोंड ही पाहू नये’ असे स्वामी महाराज नेहमी म्हणत आणि अशा माणसांना आपल्या जवळ कधीही थारा देत नसत. असो.

स्वामीसुत म्हणतात की, जनहो, आपले सर्वस्वी कल्याण साधण्यासाठी, आपला इहलोक आणि परलोक सुधारण्यासाठी आपण हा ‘श्री स्वामी समर्थ पंथ’ अंगिकारावा. हे आपल्याच हितासाठी आपण करायचे आहे. या पंथाचा स्विकार केल्याने आपले प्रापंचिक आणि पारमार्थिक कल्याण देखील होणार आहे. स्वामी महाराजांनी आपला पुर्ण योगक्षेमं चालविण्याची हमी घेतलेली आहे. तेव्हा आपण आपला संपूर्ण भार स्वामी महाराजांवर सोपवून आपले कर्म करत करत स्वामी नामाचे चिंतन करावे, याने तुम्हाला सहजतेने मुक्ती मिळेल. असा अंतिम उपदेश स्वामीसुत महाराज आपल्याला देतात.

सज्जनहो, स्वामींची सेवा किंवा स्वामींचा पंथ हा विश्वातील सर्वश्रेष्ठ आणि मुळ धर्माची, मुळ संस्कृतीची शिक्षा देणारा आहे. स्वामी महाराजांचे जीवन चरित्र हे एखाद्या धर्मग्रंथाप्रमाणे आहे. आपल्या सर्व प्रश्नांचे, सर्व शंकाचे आणि सर्व अडी अडचणींचे अचूक उत्तर स्वामींच्या चरित्रात दडलेले आहे. फक्त आपण स्वामी महाराजांचे जीवन चरित्र हे अत्यंत बारकाईने अभ्यासावे. म्हणजे आपल्याला योग्य मार्ग नक्कीच मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा आपण स्वामी महाराजांचे जीवन चरित्र अभ्यासावे आणि या ‘श्रीस्वामीसमर्थ पंथाचा’ स्विकार करावा, हीच आपूलकीची विनंती करून आजचे पंचम पुष्प स्वामी चरणी अर्पण करून येथेच थांबू या ! जाता जाता शेवटी स्वामीसुत महाराजांनी दिलेला पंचदशाक्षरी स्वामी मंत्राचा ध्यान पुर्वक उच्चार करू या…….

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।

अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !

अक्कलकोट स्वामी महाराज की जय !

— सुनिल कनले

सुनिल कनले
About सुनिल कनले 14 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…