मतांची पोतडी सत्तेची गोधडी : खांदणी

आमचं नांव खंडेराव मते.

आम्ही पक्षातले

‘चुनावी-महत्व’ असलेले नेते.      १

 

इलेक्शनचं ओझं

आमच्या खांद्यावर होतं.

त्यासाठी खूऽप खूऽप खपलो.

विरोधकांचा खडक फोडायचा,

मतांच्या खुरटल्या रोपट्याला

पाच वर्षं खतपाणी घालायचं,

मतं खांदायची,

आपल्या पक्षाच्या बांधावर

मांडायची, सांधायची,

मनं जोपासायची,

तण खुरपायचं,

मतदारांना खिलवायचं-पिलवायचं,

तन-मनानं,

पण मुख्य म्हणजे धनानं

मळा शिंपायचा,

फळ येईल याची खात्री करायची,

आपला पक्ष गड जिंकेल

अशी खबरदारी घ्यायची,

हें आमचं काम.

 

आगामी मतांच्या जमाखर्चाचा

‘कच्चा-खर्डा’ मांडायचा,

‘खतावणी’त एंट्रया  करायच्या,

अन् अपेक्षित-मतांचा सगळा हिशेब

वेळोवेळी

पक्षाच्या शिखरापर्यंत पोंचवायचा,

हेंही आमचं काम.

 

कुणी पक्षविरोधक

खोडी काढायला गेला,

तर खराटा बनून

अनेकानेक खुसपटं काढून,

त्याला चांऽगलं ‘झाडायचं’,

चांऽगले रट्टे द्यायचे ;

खवळून जाऊन,

खाष्टाहून खाष्ट बनून,

अगदी खदिरांगार बनून,

( तसं नाटक करून ),

त्याला ‘बुकलायचं’,

अन् खोटंनाटं पसरवून,

त्याला चांऽगलं खंगाळायचं,

त्याची झूल उतरवायची,

त्याच्या राजकीय कारकीर्दीचा

अगदी खटारा करायचा,

पूर्ण खात्मा करायचा ,

त्याला अगदी खल्लास करायचं,

तिसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून

त्याच्या लोकप्रियतेचा ‘खून’ करायचा,

मग त्याचं  ‘जिवंत-मढं’

लांऽब कुठेतरी खबदाडात

खदेडून द्यायचं  !

हेंही आमचंच काम.

असे आम्ही खट.

म्हणून तर आमची वट !             २

 

आमचं काम,

हे सोपं काम नव्हे,

तें कुणा फत्रूड माणसाचं

काम नव्हेच ;

तिथें खत्रूडऽच हवा.

तिथें खोगीरभरती चालत नाहीं,

तेथें पाहिजे जातीचे !

तें खास महत्वाचं काम आहे.

त्या कामासाठी, कुठूनतरी

आमचे खिसे भरले जातात,

आम्हाला ‘खांदणी’ मिळते,

किंवा खंडणी म्हणा हवं तर.

(याला कुणीही ‘पैसे खाणं’ वगैरे

म्हणत नाहींत बरं का ;

हा तर आमचा ‘खुराक’ आहे. )

अन् या खांदणीपोटी

कुणी आम्हाला ‘खडूस’ म्हटलं,

किंवा खादाड ऊर्फ ‘खाऊ’ म्हटलं

तरी कांहीं फिकीर नाहीं.

अशा फालतू कमेंट्स् मुळे

आमच्या अंगावर ओरखडाही उठत नाहीं.          ३

 

पक्षाच्या ‘इलेक्शन-मास्टर-प्लॅन’ साठी खपणं,

यामुळेच आम्हाला पक्षात मान आहे.

अन्, हें महत्वपूर्ण काम म्हणजे

आमच्यासाठी पैशाची खाण आहे,

याची आम्हाला पूऽर्ण जाण आहे.            ४

 

संपली एकदाची इलेक्शनची खटखट.

अन् आमची खुडबुडही .

पण निकाल जाहीर होईतो,

दिवसभर,

बेचैनीत खालवर-वरखाली करायचं ;

अन्, रात्रीं झोप कुठली !

नुसतं खाटेवर अंग टाकून पडायचं,

कुठं ‘खुट्ट’ वाजलं तरी जाग यायची,

रात्र अगदी खायला उठायची !              ५

 

आतां निकाल !

आतां येईल  सुकाळ !

जर आमच्या पक्षाचं

घोडे खदडवणं

सफल झालं,

सर्वात मोठी पार्टी

म्हणून यश मिळालं,

सत्ताश्री खुणवायला लागली,

तर, आपण,

खाणीतून हिरे मिळाल्याच्या

आनंदात खुलून जाऊन,

खुळावून जाऊन,

खिदळायचं, हंसायचं ;

खळखळून हंसायचं,

खदखदा हंसायचं,

दिल खोलून हंसायचं,

(पण मनातल्या मनात,

खाजगीत, बरं का,

खुल्लेआम नव्हे ! ),

भले एक्कावन टक्के जागांची

‘फिनिशिंग लाइन’

पार नाहीं करतां आली, तरी.

 

मग अगदी खुल्लमखुल्ला,

कुणाच्या तरी खांद्याचा

आधार घेऊन, पक्षानं

‘तीन पायांची शर्यत’ जिंकायची,

सरकार बनवायचं,

सत्तेचा खांदेपालट घडवायचा,

खंद्या वीरासारखा.

अन् मग आमची खाशी स्वारी

बड्याबड्यांबरोबरीनं

मंत्र्यांच्या जंत्रीत जागा मिळवणार !           ६

 

पऽण,

जर सगळा खटाटोपच व्यर्थ गेला,

सरकार बनवायचं खटलंऽच जर

कुठेतरी अडकलं,

‘खरेदीविक्री’च्या तागडीत ‘वजन’ कमी पडलं,

‘देवाणघेवाणी’चं चक्रच खचलं,

सत्तेचा खजूर

हातात गावलाच नाहीं,

तर ?

तर मग धर्मसंकटच !

सगळं बोलणंच खुंटलं !

सगळं मुसळ केराच्या खड्ड्यात !

आपला तर

अगदी ‘निक्काऽल’च लागला म्हणायचा !

मग खरकटं काढत बसायचं, दुसरं काय !

आपली मेहनत

पक्षासाठी कमी पडली,

यासाठी मन खात रहाणार, म्हणून,

भाग्याच्या खट्याळपणाला

बोल लावायचा

नशिबानं आपल्याला खेळणं बनवलं

असं बोलून बोटं मोडायची.

( पण,

‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’,

असं मात्र म्हणूं नका. )

मग कुणां जवळच्याच्या खांद्यावर

मान टेकून,

हळूंच खारं पाणी पुसायचं,

मनात खदखदत असलेली खंत,

मनाला खाऊन टाकणारा गहिरा खेद,

हें सगळं खोलवर दाबायचं,

अन् ,

केविलवाणं कां होईना,

खोटंखोटं हंसू दावायचं,

( अशा हंसण्याला ‘खोटेपणा’ म्हणत नाहींत हं ).

अपयशाचं खापर

आमच्या डोक्यावर फोडायची कुजबूज

कानाआड करायची.

कारण, खुलासा ऐकणार कोण ?

दिलासा देणार कोण ?

म्हणून,

खांदे पाडून,

खालच्या मानेनं,

चुपचाप,

(पण मनातल्या मनात

दातओठ खात) ,

एखाद्या अंधार्‍या खोलीत,

दाराआड दडून बसायचं,

आणि कांहीं काळानं,

खुरटत, रखडत,

पुढल्या खडबडीत वाटेवर

चालायला लागायचं !

मन खातेर्‍यातून कधी बाहेर येणार,

खोऽल जखमेवर

खपली कधी धरणार ,

कोण जाणे !             ७

 

अन्,

त्याहूनही पुढली पायरी म्हणजे,

देव न करो,

खुदा न करो,

पऽण,

जर सगळी खबरदारी घेऊनही,

सगळी खाडाखोड करूनही,

खोटे मतदार आणूनही,

खुद्द आपलं स्वत:चं

डिपॉझिटऽच

जप्त होण्याची

खबर आली, तर ??

खर्‍याखोट्याची

खातरजमा करूनही, शेवटी,

ती बातमी खरीच ठरली, तर ?

खातेवहीतल्या

सगळ्या नोंदी

निष्फळ ठरल्या, तर ?

तळागाळापर्यंत खरडून-खरवडून

तयार केलेली माणसं आणि मतं

कमी पडली, तर ?

केलेला खर्च निष्फळ ठरला, तर ?

मतांची पर्ची खोटी ठरली, तर ?

वीज खालती पडून

सुपीक शेत

जळून खाक झालं, तर ?

त्याची खाड्कन खारजमीन बनली,

‘खराबा’ बनला, तर ?

तर मग

सगळं खराबच खराब !

सगळं खल्लास !

आमचं संस्थानच खालसा !!

पुरताच ‘खवडा’ की !

सगळं खपणं,

भविष्य जपणं

सगळी स्वप्नं,

फुकऽटच की !

 

हें म्हणजे

‘खाजवून खरूज काढण्या’सारखं झालं,

हात दाखवून अवलक्षण

करून घेण्यासारखं झालं,

जोडे खाल्ल्यासारखं झालं,

कोडे खाल्ल्यासारखं झालं.

अगदीऽ मातेरं झालं.

पुरतं पोतेरं झालं,

दैवानं अब्रू वेशीवर टांगली,

जवळची-जवळची म्हणवणारी,

( म्हणजे, खरं तर, फक्त तसं दाखवणारी,

पण खरोखर तसं न  वागणारी,

खाल्ल्या-मिठाला न जागणारी ),

सगळी मंडळी पांगली.           ८

 

अशा कातरवेळी

खूऽप खूऽप,

मनस्ताप होतो,

एकटेपण खायला उठतं,

हृदयात खोलवर

खंजीर खुपसला जातो,

असह्य ताण येतो,

नकोसा प्राण होतो,

आणि मग,

जगातलं आपलं खातंच

बंद करायची पाळी येते,

चौघांच्या खांद्यावरून

प्रस्थान करायची वेळ येते.

(नशिबानं आमच्यावर अजून तरी

तशी वेळ आली नाहीं खरी,

पण ती येणारच नाहीं, याची खात्री काय ? )            ९

 

खरोखर,

इलेक्शन आणि निकाली-सिलेक्शन

या डावात,

कल्पनातीत विकल्प आहेत, नाहीं !

कोण कुणाला खेळवतं,

कोण दैवाचं खेळणं बनतं,

कांऽही सांगतां येत नाहीं !

 

भाऊसाहेब,

हा  लई खुळावणारा खेळ आहे,

पण लईऽऽ खतरनाक आहे !!           १०

 

— सुभाष नाईक 

– – –

 

खांदणें : खणणें

खंगाळणें : (धुतांना) घुसळणें

खटखट : कटकट

दावणें  :  दाखवणें

खराबा : अनुत्पादक, निरुपयोगी शेतजमीन

खवडा होणें : फजिती होणें

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 279 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…