नवीन लेखन...

शक्ती संस्कारांची, आदर्शाची !

सकाळी उठताना दोन्ही हातांचे तळवे समोर ठेवून आई म्हणायला सांगायची, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूलेतु गोविंद, प्रभाते करदर्शनम् । जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करायचा. त्यानंतर वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।’ असं म्हणून उठायचं. सुरुवातीला हे सारं आई सांगते म्हणून व्हायचं. आता विचार करताना वाटतं, दिवसांची सुरुवात केवढ्या चांगल्या विचारांनी व्हायची ! ‘हात’ हे कर्तृत्वाचं प्रतिक. समाजामध्ये स्थान मिळवायचं तर लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि सरस्वती म्हणजे विद्या दोन्ही हवं. पण हे दोन्ही मिळवणं माणसाच्या हातात आहे. आपल्या हाताचं सामर्थ्य जो जाणतो आणि हातानं काम करण्याची ज्याची तयारी असते, त्याला संपत्ती आणि विद्या मिळवणं कठीण नाही. एवढंच कशाला, प्रयत्न करणाऱ्याला प्रत्यक्ष परमेश्वराचीसुद्धा प्राप्ती होईल असं सांगणारा हा श्लोक, देवाच्याही आधी उठल्याबरोबर पहिलं दर्शन स्वतःच्या हाताचं घेऊन आपलाच आत्मविश्वास असा जागृत करायचा.

भारतीय संस्कृतीनं लोकांना आळशी बनवलं, दैवावर विश्वास ठेवून स्वस्थ बसायला शिकवलं, हा तिच्यावरचा नेहमीचा आक्षेप. पण या श्लोकानं तो पार धुवून टाकलाय. खरं तर या संस्कृतीनं काम करणं तुझ्या हातात आहे, फायद्याचा विचार मनात न आणता तू काम करीत राहा, हेच तर शिकवलं; पण आमच्याच संस्कृतीचा अर्थ आम्हाला परकीयांनी चुकीचा सांगितला आणि तो खरा मानून आम्हीही आमच्याच चांगल्या गोष्टी पाहायच्या विसरलो. एका फार मोठ्या सत्पुरुषांना विचारलं, ‘समाजाची आजची वाईट अवस्था नष्ट करण्यासाठी परमेश्वर अवतार घेईल का? ‘ तेव्हा ते म्हणाले, ‘पुरुषसूक्तामध्ये परमेश्वराचं वर्णन आहे सहस्र हातांचा, सहस्र पायांचा… असा ! हे सहस्र हात म्हणजे जनता जनार्दनाचे हात. प्रत्येकानं स्वतःच्या दोन हातांनी समजातलं वाईट ते नष्ट करायला आणि विधायक कार्य सुरू करायला सुरुवात केली, की सहस्र हातांचा तो परमेश्वर तुमच्याच रूपात प्रगट होणार नाही का? ‘ आपण पुणेकरांनी जनता जनार्दनाच्या हातांची शक्ती नुकतीच पाहिली त्वष्टा कासार समाजानं गणेशोत्सवासाठी उभारलेला मंडप आगीनं कोसळला, तेव्हा हातांवर, माणसांचा असलेला दुर्दम्य विश्वास किती भव्य काम करू शकतो, ते आपण पाहिलं. मग आपलं छोटंसं आयुष्य आपले हात समर्थपणे पेलू शकणार नाहीत का? पण आत्मविश्वास आणि गर्व यांच्यामधल्या सीमारेषा कधी कधी खूप पुसट होतात. आपण स्वतः मिळवलेल्या यशामध्येही खूप वेळा इतरांच्या कष्टाचा बाटा असतो हे आपण विसरून जातो. मुकेपणानं दुसऱ्यांसाठी कष्ट सोसणारी आपली ‘भूमाता’ ही आपल्याजवळच्या, आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या व्यक्तींचीच प्रतीक वाटते मला. म्हणून सकाळी उठून तिला केलेला नमस्कार हा मनातली कृतज्ञता जागृत करतो. ही कृतज्ञता आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या सगळ्या व्यक्तींसाठी असावी.

मी केलेल्या कामाची कुणी दखल घेत नाही’ ही भावना सामान्य माणसाला दुःखी बनवते. आईला वाटतं, मी मुलासाठी काढलेल्या खस्तांची त्यानं जाणीव ठेवावी; पत्नीला वाटतं मी घरासाठी इतकी राबते त्याची दखल घेतली जावी एवढंच कशाला ज्या कामाबद्दल आपण पैसे घेतो, त्या कामाचीसुद्धा मालकानं दखल घ्यावी असं कामगारांना वाटत असतं. परस्परांबद्दल कृतज्ञ राहणं म्हणजे परस्परांच्या कामाची दखल घेणंच ! ही कृतज्ञता बुद्धी जाते तेव्हा हक्काची भाषा सुरू होते आणि हक्क मागणं म्हणजे भांडण आलंच! एकूणच समाजातून आता कृतज्ञताबुद्धी नाहीशी होते आहे. याचं मूळही कृतज्ञतेचे संस्कार होतच नाहीत यात असेल का? पूर्वीच्या काही संस्कारांबरोबर जे भावविश्व फुलत होते, ते आता या भरधाव रुटीनमध्ये कोमेजत तर चाललं नाही? तशा बऱ्याच गोष्टी आपण हरवत चाललो आहोत. देव-देवतांच्या गोष्टी म्हणजे पुराणकथा ! असं मानून नकळत त्यांना आपण तुच्छ मानत चाललो आहोत.

खरं तर सद्गुणांचा वस्तुपाठ म्हणून मुलांपुढे त्यांची चरित्रं ठेवायला काय हरकत आहे? नुसतं ‘गोल’ या शब्दांवरून जो अर्थ कळणार नाही, तो ‘चेंडूसारखा गोल’ म्हटलं की कळतो. तसं कुणासारखा चांगला वागू? या प्रश्नाला रामासारखा, कृष्णासारखा हे उत्तर मिळालं तर जास्त चांगलं नाही का? राम, कृष्ण खरे असोत वा खोटे, याच राम, कृष्णांचा आदर्श समोर ठेवून घडलेले शिवाजीमहाराज तर खरे होते!
म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर डोळ्यासमोर ‘आदर्श’ ठेवायचा. त्यासाठी कृष्णाला नमस्कार. हा कृष्ण आठवायचा तो नंद- यशोदेचा गोकुळातला नव्हे; तर वसुदेव-देवकीला बंधमुक्त करणारा, दुष्ट वृत्तींचा नाश करणारा, पराक्रमी आणि विचारवंत असा कृष्ण !
हे छोटंसं प्रातः स्मरण मनावर नकळत संस्कार करून जायचं. आता मात्र सकाळ उगवते तीच मुळी मिनिटामिनिटाचा विचार करीत घाईगडबडीत! अशा वेळी हे इतकं काही मनात येणं अवघडच ! अशाच घाईगडबडीत उमेदीचं आयुष्य संपूनही जाईल तेव्हा मात्र वाटेल, आपल्याच संस्कृतीत अशा किती गोष्टी आहेत, ज्याचा आपण विचारच केला नाही. आता उरल्यासुरल्या तुटपुंज्या आयुष्यात काय काय वाचायचं? घाईच होणार सगळी !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..