नवीन लेखन...

शहाणं बाळ

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेली श्री नितीन राणे यांनी लिहिलेली कथा)

शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली.

अचानक आलेल्या पावसाने सुनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधातिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते. त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवले.

इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला. सुनेचा कॉल होता. सुकवण आत घेतले काय विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला.

संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यांनी गॅसवर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरुवातीला चहा करतानासुद्धा त्यांच्या खूप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लूडबूड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफिसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब.

त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यु ट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काही ना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफिसला गेले की सोपानराव, मुलगा आणि सुनेला कसं खूश करता येईल हे बघायचे.

आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच कायतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते, तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता. तो ही वैतागत. त्याची आठवण आज त्यांना झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहिले. ते नुकतेच रिटायर्ड झाले होते. रिटायर्डमेंट नंतर बायकोसाठी त्यांनी खूप काही करायचे ठरविले होते. ती माऊली पण खूप खूश होती. पण ते सुख नियतीला पाहावले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमीन सरकली. ती आता काही दिवसांची सोबती होती. सोपानरावांनी रंगवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. सोपानराव तिची खूप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसलातरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरुवात केली.

सोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकलीये पण किती काळजी करतेय. तिचं पूर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेले. आपण तर कधीच तिचं म्हणणं ऐकले नव्हते. आपले ते खरं करत आलो होतो. आज ती गोष्ट करण्याची वेळ आलीये. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावांनी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले. पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती.

त्या दिवसापासून सोपानराव हळूहळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. दोन महिन्याने सुनेने वृद्धश्रमाविषयी बोलायचा प्रयत्न केला. पण तो शेवटचा होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुला- सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्कीवरून दळण आणण्यापासून, घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग , मुड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती, एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही. त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तीही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आवडू लागले. तोही त्यांच्याशी मनमोकळेपणाने वागू, बोलू लागला. एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुलासुनेने साजरा केला. हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचे शहाणं बाळ घरात चांगलचं रांगू लागले होते.

इतक्यात दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले.

तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सून आणि नातू चिंब भिजून उभे होते.

‘अरे,तुम्ही तर पूर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलंत? मी त्याला आणायला जाणारच होतो.’ असे बोलून सोपानरावांनी बाथरूममधला गिझर चालू केला.

‘बाबा, पाऊस खूप पडत होता म्हणून त्याला आणला, परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता.’ चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला.

बाहेर अजून पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सून सान्वी गरमगरम भजीने भरलेल्या प्लेटस घेऊन हॉलमध्ये येताना दिसली.

‘बाबा खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती.’ भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली.   ‘अगं सान्वी, बाबा ना मनकवडे झालेत.’ बाबांच्या प्लेट मधली एक भजी उचलत सागर म्हणाला.

हे ऐकल्यावर सोपानरावांनी गालातल्या गालत हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहिले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला. अगदी शहाण्या बाळासारखा…

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व  दिवाळी २०२२ ह्या विशेषांकात प्रकाशित झालेली श्री नितीन राणे यांनी लिहिलेली कथा)

-नितीन राणे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..