नवीन लेखन...

प्रसार माध्यमं आणि साहित्य

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात डॉ. अनंत देशमुख  यांनी  लिहिलेला लेख.

‘प्रसार माध्यमं आणि साहित्य’ याचा विचार करताना प्रसारमाध्यमं म्हणजे नेमके काय अर्थ समजावून घेतला पाहिजे. आपल्या विचारांचा, भावनांचा, लेखनाचा वा अन्य कलाप्रकारांमधून व्यक्त होणा-या कृतींना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहक अथवा साधक म्हणून कार्य करणारी यंत्रणा म्हणजे माध्यमं होत: त्यात लेखन आणि चित्रकलेसाठी वृत्तपत्रं, नियतकालिकं. केवळ लिखित विचार, संहिता श्रवण माध्यमातून पोहोचवते ते आकाशवाणी माध्यम आणि जे दृश्यश्राव्य स्वरूपात पोहोचवते ते दूरदर्शन हे माध्यम: तयार डॉक्युमेंटरीज, फिल्म आणि तत्सम इतर गोष्टींचा विचार करता येईल. शीर्षकात दुसरा शब्द साहित्य हा आहे. साहित्य हे निबंध, प्रबंधात्म, प्रवासवर्णन, विज्ञान – अध्यात्मपर, कथा, कादंबरी, कविता, नाटक या ललितप्रकारांतील असू शकते.

माहिती, ज्ञान, मनोरंजन असे तिन्ही प्रकारचे काम ते करू शकते. १९६० मध्ये दिल्लीमध्ये आणि १९७२ मध्ये मुंबईमध्ये ‘दूरदर्शन’ सुरू झाले. त्यानंतर ‘दूरदर्शन’ने दुसरी वाहिनी सुरू केली. १९८५ साली दिल्लीमध्ये एशियाड झाले, तेव्हा कृष्णधवल असलेले ‘दूरदर्शन’ रंगीत झाले. पुढे त्यावर जाहिराती दाखवण्यात येऊ लागल्या. हळूहळू वाहिन्यांची संख्या वाढली. भिन्न भिन्न प्रकारचे कार्यक्रम देण्याची त्यांच्यात चढाओढ निर्माण झाली.

त्या आधीही संस्कृत, मराठी नाटकांवर आधारित कार्यक्रम चित्रित करण्याची परंपरा ‘फिल्म डिव्हिजन’मध्ये चालू होती. ‘दूरदर्शन’ ने ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘बुनियाद’,…. सारख्या मालिका तयार केल्या त्याच मुळात प्रसिद्ध साहित्यकृतींवर आधारित ‘अमृतकुंभ’ सारख्या मालिकेतून संस्कृत साहित्याचा परिचय करून देण्यात येत असे.

मराठी साहित्यातील कित्येक साहित्यकृतींचे नाट्यीकरण चित्रित करून सादर केले गेले आहे. एकेका कथाकाराची वैशिष्ट्यपूर्ण कथा घेऊन ती चित्रित करून दाखवणारा कार्यक्रम दीर्घकाळ चालवला गेला होता. मराठीतल्या प्रसिद्ध कादंब-यांचीही नाट्यीकरणे याच पद्धतीने दाखवली गेली.

जुन्या काळात दर रविवारी सादर करण्यात येई तो ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा कार्यक्रम, ‘गजरा’, ‘शरदाचे चांदणे’ हे कार्यक्रम प्रायः साहित्याशी थेट निगडित असत. मंगेश पाडगावकर, सुरेश भट, विंदा करंदीकर, आरती प्रभू यांच्या निवडक कवितांना चाली लावून ‘नक्षत्रांचं देणं’ हा कार्यक्रमही साहित्याशी निगडित असायचा. अलीकडच्या काळात पुल, गदिमा आणि बाबूजी यांच्या साहित्यावर आणि व्यक्तित्वावर आधारित ‘आनंदयात्री’ कार्यक्रमही त्या त्या लेखकाच्या साहित्याला केंद्रस्थानी ठेऊन सादर केले जात. यात मुद्दा हा की या सा-याच्या केंद्रस्थानी साहित्य हे आहे.

सर्वच माध्यमांमध्ये जे विविध घटक असतात, म्हणजे निर्माते, छपाई कामगार, ध्वनिलेखक, चित्रिकरण-तज्ज्ञ, त्यामागे कार्यरत असलेले दिग्दर्शक – संपादक, मार्केटिंग युनिट, जाहिरातदार यांच्याबरोबरीने, किंबहुना काकणभर जास्त लेखक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अशा वेळी लेखकाचे जीवनविषयक आकलन, जनजागृतीविषयक वा लोकप्रबोधनासंबंधीचं त्याचं भान, तो जे माध्यम हाताळत असतो त्याच्या सामर्थ्य वा मर्यादांचे त्याचे आकलन, त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि त्यांचा त्याच्या प्रयत्नांवर पडणारा प्रभाव, तो ज्यांच्यासाठी ही कृती तयार करीत असतो त्यांच्या अभिरूचीचा त्याला असलेला अंदाज, ती घडवण्यासाठी तो करीत असलेले प्रयत्न यातून ती कृती तयार होत असते.

प्रसारमाध्यमांकडे वळणारा करमणुकीकरिता वळत असतो. त्यातून माहिती, ज्ञान आणि आनंद मिळण्यास त्याला हवा असतो. इथे कार्यक्रम कोणत्याही स्वरूपाचा असो त्याची मुळातली ‘संहिता’ लिहिणारा लेखकच त्या रसिकाच्या अभिरूचीला आकार देणारा असतो. अशा वेळी कोणत्याही माध्यमांतून सादर केलेली संहिता ही नेहमीच उच्चभ्रू अभिरूची असणे शक्य नसते. कारण प्रसारमाध्यमांना जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचायचे असते. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे मालक, संचालक अधिकाधिक व्यक्तींना टारगेट करीत असतात. स्वाभाविक सामान्य माणसाला सहज आवडेल, रुचेल, पटेल अशा संहितांना ते प्राधान्य देतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यातून आपला टीआरपी वाढता राहील यासाठी योग्य ठरतील अशाच संहितांच्या शोधात ते असतात. संहितेच्या गुणवत्तेपेक्षा जास्तीत जास्त लोकांना आपल्या कार्यक्रमाकडे ओढून घेण्याची क्षमता जिच्यात असेल तिलाच ते स्वीकारतात. या करिता मग ते समाजातील श्रद्धा, अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती इकडे ते लक्ष देतातच असे नाही. नुसत्या चित्रमालिका घेतल्या तरी कुणाला कौटुंबिक, कुणाला ऐतिहासिक, कुणाला रहस्यप्रधानअशा वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असतो. सा-यांना एकाच वेळी सारेच आवडेल असे नसते. म्हणून इपिसोडलेखकांना अनेकदा निर्माता-दिग्दर्शकाच्या सल्ल्यानुसार कथानकाच्या प्रवाहात बदल करावे लागतात. मग आपले काम टिकावे आणि पुढेही ते मिळत राहावे यासाठी ते अनेक तडजोडी करतात. त्यातही संवादलेखन वा इपिसोडलेखन ही कला साऱ्यांनाच जमतेच असे नाही. मराठीतले नामवंत समजले जाणारे लेखकांना अशा तडजोडी करणे आवडतही नाही. त्यामुळे गुणवान लेखक या प्रकाराकडे वळतात असे नाही.

प्रसारमाध्यमं आणि साहित्य यांचा संबंध परस्परावलंबी असतो, पण अनेकदा श्रेष्ठप्रकारचा कलानंद त्यात मिळतोच असे नाही.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात लेख. 

डॉ. अनंत देशमुख
ज्येष्ठ साहित्यिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..