नवीन लेखन...

संत तुकारामांचा भक्तीभाव व समाजप्रबोधन

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. पद्मावती जावळे  यांनी लिहिलेला हा लेख


वारकरी पंथात संत तुकारामांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची महती तशी सर्वांनाच माहित आहेच. म्हणूनच त्यांच्याबद्दल विद्वतजनांनी याप्रमाणे म्हटले आहे,

ज्ञानदेवे रचिला पाया । रचिले देवालया । नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत ।। भजन करू सावकाश तुका झालासे कळस ।।

असे म्हणत. कारण थोडक्यात असे म्हणता येईल की सर्वसामान्यांना गृहस्थाश्रमी लोकांना, ईश्वरप्राप्तीचा मार्ग सर्वांना सहज समजेल असा सोपा करून सांगितला आहे. त्यांच्या काही अभंगांतून त्यांचा भक्तिभावख त्यांचा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग सहज स्पष्ट दिसतो.

त्यावरील त्यांचे हे अभंग पहा,
१) एक भावचि कारण देवा ।
कासया पाषाण पूजिती पितळ ।।
अष्ट धातु खळ भावेविण ।
भावचि कारण, मोक्षाचे साधन बोलियेले।।

२) युक्ताहार नलगे आणिक साधने,
अल्प नारायणे दाखविले ।
कलियुगामाजी करावे किर्तन,
जतेणे नारायण देईल भेटी ।

३) नाम घेता उठाउठी ।
होय संसारती तुरी,
नाम संकिर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापे जन्मांतरीची ।।

४) नलगे सायास जावे वनांतरा ।
सखे येतो घरा नारायण ।
ठायीच बैसोनी करा एकाचित्त ।
आवडी अनंत आळवावा ||

५) रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ ।
पाहुनि आणिक नाही पै साधन ।
वाहतसे आण विठोबाची ।।

अशा शकडो वचनात ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग त्यांनी दाखविला आहे. त्यातून त्यांचा भक्तिभावही दिसून येतो.

भक्तिभावाबरोबरच संसारात राहूनही वैराग्य अंगी आणता येते असे स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी लोकांना पटवले आहे.

सर्वसामान्यांना ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे संत तुकाराम जीवनाचा आदर्श मार्गही दाखवतात. त्यांचे अभंग जीवनात कसे वागावे, कसे वागू नये याचे
मार्गदर्शन जसे त्याकाळी लोकांना होत असे त्याचप्रमाणे आजच्या या विज्ञान युगातही ते जीवनात मार्गदर्शन करीत आहेत. चारशे वर्षांपासून हे कार्य त्यांचे अभंग करीत आहेत. त्याचे कारण त्यांचे साध्या सोप्या भाषेतील हे अभंग ते सर्वसामान्य माणसाला सहज समजतात. तयातील उदाहरणे ही अगदी व्यावहारिक जीवनातली आहेत.

तसे तुकाराम फारसे शिकलेले नव्हते पण वाचनाच्या छंदाने त्यांना ज्ञानी बनवले होते. वारकरी पंथाचा साध्या सोप्या भाषेत अगदी वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान ही या अभंगातून लिहिले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रसार करण्याचे काम संत तुकारामांच्या अभंगातून झाले आहे.

अगदी साध्या सोप्या भाषेतून उपदेश करणाऱ्या तुकारामांचा जन्म देहू सारख्या लहान गावात झाला. याच गावात ते लहानाचे मोठे झाले. सर्वसामान्यांसारखा संसारही केला. तरी त्यांचे जीवन लोकोत्तर होते. कनक आणि कामिनी यांचा त्यांना कधी मोह पडला नाही. शिवाजी महाराजांनी भक्तीभावाने मोठा नजराणा त्यांना पाठविला होता. त्याला न शिवताच तो नजराणा संत तुकारामांनी परत पाठवला होता व म्हणाले,

मुंगी आणि राव आम्हा सारखाचि जीव,
गेला मोह आणि आशा ।
कळीकाळाचा हा फांसा,
सोने आणि माती
आम्हा समान रे चित्ती ।
तुका म्हणे आले घरी वैकुंठ सगळे ।।

संत नामदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी चिपळ्यांची साथ घेत अभंग विणेच्या झंकाराबरोबर म्हणायला सुरुवात केली होती. ते म्हणतात,

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंग येऊनिया ।
सांगितले काम, करावे कवित्व ।
वाऊगे निमित्य बोलो नये ।।
माप टाकी सवे धरिली विठ्ठले ।
थापटोनी केले सावधान |
प्रमाणांची संख्या सांगे शेतकटी ।
उरले ते शेवटी लावी तुका ।।

तुकाराम असे अभंग गात भजन करीत संसारात राहूनही विरक्त होते. तुकारामाचा आवाजही गोड होता. त्यांची लोकप्रियताही वाढली होती.

तुकोबांची रसाळ वाणी, शास्त्रातली क्लिष्ट तत्त्वे ती सोप्या शब्दात ते उलगडून सांगायचे. सोपे सोपे व्यवहारातले दृष्टान्त द्यायचे. आवाजही मधुर होता. नवनवीन अभंगांतून ते सोपे केलेले तत्त्वज्ञान ते किर्तनातून सांगू लागले. त्यांची लोकप्रियता वाढू लागली. ती मंबाजीबुवांना खटकू लागली. रामेश्वरशास्त्र्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले व तुकारामांना गाढवावर बसवून त्यांची धींड काढली. तुकारामांना गावाबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तर तुकारामांच्या गाथा त्यांनी इंद्रायणीत टाकल्या. तुकारामांना खूप दुःख झाले परंतु संत तुकारामांच्या भक्तिचा महिमा असा की त्यांचे सर्व अभंग परत मिळाले. त्यामुळे रामेश्वर शास्त्रीही चकित झाले व संत तुकारामांचे शिष्य झाले. त्याआधीही त्यांचे आणखी काही शिष्य झाले होते.

संत तुकारामांचे अध्यात्म लिखाण व त्यांचे शुद्ध चारित्र्य लोकोत्तर भागवत भक्ति हे पाहून प्रसिद्ध कवी वामन पंडितांनी तुकारामांबद्दल ते म्हणतात,
‘जपावी वद पुर्ण वेदान्तवाणी,
कसे हो म्हणावे तयालागी वाणी ।’
संत तुकारामाचे अभंग दोन प्रकारचे आहेत. काही भावपर व काही विचारपर.
भावपर अभंगात त्यांनी देवाविषयीच्या भावना इतक्या उत्कटपणे गायल्या आहेत की त्यांना तोडच नाही. कधी ते कोपाने, कृतकोपाने तर कधी लोभाने, प्रेमाने तर कधी अगतिकतेने देवाशी बोलतात तर कधी आपली भक्तिभावना आपल्या अभंगातून व्यक्त करतात, कधी म्हणतात,

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

अभंग जेव्हा इंद्रायणीतून मिळाले तेव्हा लोकांनी त्यांच्या भक्तीची वाखाणणी केली. तेव्हा ते म्हणतात,

साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी ।
शिकविता धनी वेगळाची ।
फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
मी तो हमाल भारवाही ।।
तर कधी देवाला म्हणतात,
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
चालविशी हाती धरूनिया ।।

लोभानंतर म्हणतात,
फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर ।
नामाचा गजर सोडू नये ।।

त्यांचे विचारपर अभंग स्तोत्रासारखे आहेत. प्रत्येक अभंगात एखादा प्रमुख विचार ते मांडतात आणि लौकिकातले, व्यवहारातले दाखले देतात. सामान्य व्यवहारापासून तर अत्युच्च तत्त्वज्ञानापर्यंत त्यात ज्ञान भरलेले आहे. असे अभंग उपदेशपर व सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करणारेही आहेत.

याचे हे उदाहरण पहा,
असाध्य ते साध्य करीता सायास ।
कारण आभ्यास तुका म्हणे ।।

अगदी विद्यार्थ्यांना हा अभंग किती मार्गदर्शक आहे. जिद्द व प्रयत्न चिकाटीने काय साध्य होणार नाही.

तर एका अभंगात ते म्हणतात,
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।

चंचल मनावर बंधने हवीतच हे सांगताना ते म्हणतात,

तका म्हणे मना पाहिजे अंकुश ।
नित्य नवा दिस जागृतीचा ।।

यात उपदेश आहेच. त्यांचे विचारपर स्तोत्रासारखे असतात, त्याचेही उदाहरण पाहू या!
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ।।
अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ ।
त्याचे गळा माळ, असो नसो ।।
तसेच

निंबाचिया झाडा साकरेचे आळे ।
आपली ती फळे संडिच ।
तैसे अधमाचे अमंगळ चित्त ।
वमन ते हित करून सांडी ।।

तुकारामांच्या अभंगातून कधीतरी त्यांची
विनोदबुद्धीही दिसून येते. उदाहरणार्थ,

म्हातारपणी थेटे पडसे खोकला ।
जातो वाराणसी निरखी गाई घोडे हौशी ।।
बोलाचिच कढी, बोलाचाच भात ।
कोणी वंदा कोणी निंदा । आमचा स्वहिताचा धंदा।।
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।
अशा काही अभंगांतून उपरोधही झळकतो.
आजच्या काळात हा उपयुक्त अभंग तर लोकप्रिय आहेच,

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ।
पक्षीही सुस्वरे गान गाती ।।
येणे सुखे रूचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ।।

शब्दांवरील कवित्वावरील प्रेमाला व्यक्त करताना ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
शब्दांचीच वस्त्रे यात्न करू ।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्दचि गौरव पुजा करू ।।

शब्दांवर त्यांचे प्रेम होते. शब्दांचे सामर्थ्य त्यांना माहित होते म्हणून त्यांनी किर्तन प्रवचनद्वारा भगवतभक्तीचा प्रसार केला. शेवटी वैकुंठात जाण्याची तळमळ लागलेल्या तुकोबांना सगळीकडे परमेश्वरीवास जाणवू लागला. आनंदी आनंद जाणवू लागला आणि
ते म्हणू लागले,

आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ।।

शेवटी तर या आनंदनंदातच ते दिसेनासे झाले
तेही सदेह वैकुंठात गेले असे म्हटले जाते.

तुकोबांनी आमच्या महाराष्ट्रासाठी फार मोठे कार्य केले आहे. वारकरी पंथाचा प्रसार करताना लक्षावधी लोकांना एकत्र करून त्यांना हा भक्तीचा मार्ग दाखवला. वारकऱ्यांनी तो महाराष्ट्रभर पसरवला आहे. आजही तुकोबांचे अभंग हे काम करीत आहेत. संसाराचा त्याग न करता परहित साधून परमेश्वरप्राप्तीचा त्यांनी सांगितलेला मार्ग सर्वसामान्य लोकांना भावला म्हणूनच तुकोबांचे अभंग लोकप्रिय आहेत.

संत तुकारामांच्या जन्माआधी त्यांच्या आईला, कनकाईला विठ्ठलाचे भजन, कीर्तन करण्याचे डोहाळे लागले होते. त्यांना सारखे साधू-संतांचे दर्शन घ्यावेसे वाटत असे. त्या भक्तीचे तिला फळही तसेच मिळाले. एका निरभ्र दिवशी संत तुकारामांचा तिच्या पोटी जन्म झाला.

नवविधा भक्ती केली सायास ।
तेंचि पूर्ण झाले नव मास ।।
कनकाईचे भाग्य विशेष ।
विष्णु भक्त उदरासी आला कीं ।।

प्रपंचाची कथा तुकाराम महाराजांच्या शब्दात

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।
उदास विचारें वेच करीं ।।
उत्तमचि गति तो एक पावेला ।
उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणें परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माता ।।
भूतदया गायी पशूंचे पालन ।
तान्हेल्या जीवन वनामाजी ।।

तुकारामांनी परमेश्वराचे भामनाथ डोंगरावर चिंतन केले. त्याचे वर्णन त्यांच्या शब्दांत-
वृक्षवल्ली आम्हां सोयरें वनचरें ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
येणे सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथिवी आसन ।
रमे तेथे मन क्रीडा करी ।।३।।
कथा कमंडलु देह उपचारा ।
जाणवितो वारा अवसरू ।।४।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रूची ।।५।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुलाचि वारू आपणांसी ।।६।।

तुकाराम महाराज समाजात साधू संतांचे भरपूर
पीक आलेले पाहून त्याविषयी ते म्हणतात,
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू।।
दया धर्म नाही चित्ती । ते जाणावे भोंदू ।।
कलियुगी घरोघरी । संत झाले फार ।।
वीतिभरी पोटासाठी । हिंडती दारोदार ।।

तुकाराम महाराजांना समाधीत असताना परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना सर्वत्र विठ्ठलाचे अस्तित्व जाणवू लागले. गायी, म्हशी, म्हाताऱ्या-कोताऱ्यांत तसेच रंजल्या-गांजलेल्यात त्यांना देव दिसू लागला. त्यांची तुकाराम महाराज सेवा करू लागले. सगळ्यांना समान वागणूक द्या, असे ते लोकांना उपदेश करू लागले. कारण विठ्ठल सगळ्यात आहे.

जे का रंजले गांजले ।
त्यांसि म्हणें जो आपुले ।।
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ।
ज्याची अपंगिता नाही ।।
त्यासी धरी जो हृदयी।
दया करणें जे पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ।।
तुका म्हणे सांगू किती ।
तोचि भगवंताची मूर्ती ।।

-– सौ. पद्मावती जावळे, 

डोंबिवली (प.)

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..