नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – ऑफीसातील शिष्टाचार

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका “माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


ऑफीसमधील शिष्टाचारांमध्ये योग्य पेहरावापासून स्वत:चे टेबल, कागदपत्रे नीट ठेवण्यापासून सहकार्‍यांशी बोलणे, वागणे, फोनवरील संभाषण, इ-मेलचा वापर, इतकेच काय दुसर्‍यांच्या तोंडावर न खोकणे-शिंकणे, व स्वच्छतागृहाचा वापर यांचाही समावेश होतो. आपल्या वागण्या-बोलण्या-राहण्यात टापटीप असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यापासून दुसर्‍याची काही गैरसोय होऊ नये, मग उपद्रव तर दूरच.

ऑफीसमधील पेहेरावाचे शिष्टाचार ठरवलेले असतात. टाय लावून येणे, जीन्स न घालणे व त्याचे सर्वांनी पालन करणे. रोज व्यवस्थित दाढी करणे हा कार्यशैलीचा भाग आहे. ऑफीसमधे पान खाऊन येणे, चुइंगम खात खात बोलणे, विशेषत: दुसर्‍याशी बोलताना मधेच चुइंगमचा फुगा निर्माण करणे, या अत्यंत अभिरुचीहीन गोष्टी आहेत. नुकत्याच शिक्षण संपवून कामावर रुजू झालेल्या तरुणांना याबद्दल स्पष्ट कल्पना द्यावी. प्रत्येकाने व्यक्तिगत स्वच्छता पाळणे हे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

हे शिष्टाचार (उदा: दुसर्‍यासमोर शिंक / खोकला आल्यावर मान वळवून रुमाल तोंडावर धरणे, एक्सक्युज मी म्हणणे) सगळ्यांच्या अंगवळणी पडलेले असतातच असे नाही. तेव्हा इ-मेल मधून अथवा कागदावर छापून दिल्यास व्यवस्थापनाचे काम सोपे होईल.

ऑफीस ही काही संपत्ती आणि अंगप्रदर्शनाची जागा नाही. भडक मेकअप करणे व तो टिकवण्यासाठी वारंवार स्वच्छतागृहात जाणे अशा गोष्टींना सुरवातीसच आळा घालणे आवश्यक आहे. युरोपातील कित्येक देशात स्त्रिया ऑफीसला जाताना लिपस्टिकही लावत नाहीत. मग दागिने घालणे तर दूरच. त्याच बायका संध्याकाळी समारंभ असेल असेल तेव्हा इतक्या नटून थटून येतात की सकाळी ऑफीसमधे भेटलेली हीच का ती बाई असा प्रश्न पडावा ! पाश्चात्यांच्या अशा प्रथा आपण उचलणे चांगले.

भारतीय लोकांना मित्रत्वाचे संवंध नसतानाही जराशी ओळख झाली की खाजगी प्रश्न विचारायची सवय असते. या उलट अशी जवळीक न साधताही पाश्चात्य मित्रत्वाचे संबंध ठेवतात. भारतातील अमेरिकन कंपनीचे व्यवस्थापक एकदा सांगत होते की त्यांच्या अमेरिकन मुख्यालयाने तयार केलेल्या नियमांप्रमाणे मुलाखतीला येणार्‍या उमेदवाराला त्याच्या वैवाहिक स्थितीबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. आपल्याकडे मात्र स्त्रियांच्या वैवाहिक स्थितीबद्दल फाजील कुतुहल दाखवले जाते. काही वर्षांपूर्वी नवरा काय करतो? असा थेट प्रश्न विचारीत. आता तसा प्रश्न विचारणे कमी झाले असले तरी जराशी ओळख झाली की घरी कोण कोण असतं? हा प्रश्न हटकून ठरलेलाच!

प्रत्येक कामानुसार शिष्टाचाराचे काही संकेत ठरलेले असतात. स्वागतिका किंवा दुकानातल्या विक्रेत्याने ग्राहकांशी बोलताना कधीच कपाळाला आठ्या घालून बोलणे अपेक्षित नसते. त्याचप्रमाणे चौकशी (माहिती) कक्षात बसणार्‍या कर्मचार्‍याने कोणत्याही प्रकारची माहिती विचारणार्‍यांना न पिडता उत्तर दिले पाहिजे.

प्रत्येकाने दुसर्‍याच्या खाजगीपणाचा आदर करावा. कामाच्या जागेत / खोलीत जाताना त्याला पूर्वसूचना द्यावी. दरवाज्यावर / काचेवर टकटक करून मगच खोलीत / क्युबिकलमध्ये प्रवेश करावा. मिटींगला वेळेवर हजर रहावे. उशीरा पोचण्यासारखा दुसरा वाईट शिष्टाचार नाही. मिटींगमध्ये दुसरा बोलत असताना मध्येच बोलू नये. आपल्याशी दुसर्‍याने कसे वागावेसे वाटते तसे आपण त्याच्याशी वागत राहिल्यास चांगले शिष्टाचार आपोआपच पाळले जातील.

दुसर्‍याबद्दल बेफिकीर असल्यामुळेच नागरी जीवनातही शिस्त व सौजन्य यांना तिलांजली दिली जाते. म्हणूनच इस्पितळांमध्येही डॉक्टरांच्या खोलीत जाण्यापूर्वी मोबाईल बंद करावा अशा पाट्या लावाव्या लागतात. चित्रपट व नाट्यगृहांमध्येही याहून वेगळी स्थिती नाही. एका विद्यापीठातील कोर्टात तर कोर्ट चालू असताना कोणाचा मोबाईल वाजल्यास त्याला रु. ५०० चा दंड आकारला जातो.

दागदागिन्यांच्या दुकानातील कर्मचार्‍यांचे वागणे बोलणे

एका सुप्रसिद्ध जवाहर्‍यांच्या दुकानातील कर्मचार्‍यांचे ग्राहकाशी हसतमुखाने व आदबीने वागणं बघून मी फारच प्रभावित झाले. न राहवून मी तेथील मालकीणबाईला विचारलेच की त्या आपल्या नोकरांना प्रशिक्षण कसे देतात? त्या म्हणाल्या आमच्या दुकानातील मुले कमीत कमी दहावी / बारावीपर्यंत शिकलेली आहेत. पण ती अशा वर्गातून येतात की त्यांनी मोती, इतर रत्ने कधी पाहिलेली नसतात. तेव्हा त्यांना आम्ही मोती कसा तयार होतो, त्याची प्रतवारी कशी ठरवतात इ. मूलभूत शिक्षण देतो. तसेच इतर रत्नांविषयी माहिती, त्यांना पैलू कसे पाडतात, त्यांची किंमत कशी ठरते इ. बद्दल माहिती देतो. शिवाय ग्राहकांशी नम्रपणे हसतमुखाने बोलायचे, कधी त्रासून उत्तर द्यायचे नाही याबद्दल आम्ही फार दक्ष असतो. कधी गिर्‍हाईक नसेल तर नुसतेच हाताची घडी घालून चुळबुळत उभे राहयचे नाही तर आपल्यापेक्षा अनुभवी असलेल्या सहकार्‍यांकडून कामाविषयक काही ना काही शिकून घ्यायचे असा आमचा आग्रह असतो. कोणी यात काही चुकला तर त्याची मी सर्वांसमोर कानउघाडणी न करता माझ्या खोलीत बोलावून त्याला समजावते.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..