नवीन लेखन...

ऋणानुबंध (कथा)

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेली ही कथा 


आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम.

“बंधूभगिनींनो, माझ्याही दृष्टिने हा झालेला कार्यक्रम म्हणजे यशाचेच शिखर गाठणे होय. कोणत्याही परिस्थितीत राजू-राणीचे चांगलेच व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा असल्याने तसे तसे घडत गेले. आज तो यशस्वितेचा कळस म्हणता येईल,” असे म्हणून डॉ. शरदनी बाळ संदेशच्या गळ्यात साखळी घालून राजू-राणीचा उत्तमरित्या सन्मान केला. त्या दोघांनीही डॉक्टरांच्या पाया पडून जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. “डॉक्टरांच्या मायेनेच आम्ही आज हे चांगले दिवस पाहू शकलो आणि मग डॉक्टरांच्या रूपात साक्षात परमेश्वराचे दर्शन झाले.”डॉक्टरांनी हात सोडताना प्रत्येकाला स्वतःतर्फे उत्तम मिठाईचे पाकीट आग्रहाने दिले. पार्टी हॉलमध्ये खाण्यापिण्याचा सर्वांनी आस्वाद घेऊन आनंदाने त्यांचा निरोप घेतला.

“राणीऽऽ खरंच सांगतो केवळ तुझ्या सेवाभावी वृत्तीनेच मला हे दिवस दिसले आहेत. आजारपणात तू माझी रात्रंदिवस केलेली सेवा, शुश्रूषा मी कधीच विसरणार नाही. तुझी शिस्त, कठोरपणा, कर्तव्यदक्षता मला खूप शिकवून गेली आहे बघ. संदेशचे आपल्या जीवनात आगमन म्हणजे नक्कीच ईश्वरी प्रसाद म्हणायला हवा कारण अपघाताने माझ्या शरीराची झालेली दैना तुला ज्ञात आहेच.” म्हणून दोघांनी प्रेमाने एकमेकांना पेढा भरविला. राणीच्या घरापैकी कोणीही नसले तरी राणीला त्याची खंत थोडीच होती? लहानपणापासून ती दु:ख पचवितच आली होती. मोठ्या हुषारीने एकटीच एकेक करून जीवनाच्या पायऱ्या ती चढत इथपर्यंत आलेली होती.

त्या रात्री अगदी पहाटेपर्यंत ते जागेच होते. ते दोघे एकमेकांच्या मिठीत घुसून जुन्या आठवणींना उजाळा देत होते. संदेश शांत झोपला होता. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. पहाटे कधीतरी उशिराने श्रमामुळे त्यांचा डोळा लागला.

राजू दुसऱ्या दिवशी कामाला जाणार असल्याने राणीची धावपळ चालू होती. ती मात्र अजून काही काळ संदेशसाठी रजेवर होती. डॉ. शरदनी तिला विशेष रजा मंजूर केली होती. राजूच्या सुधारणेत राणीचाही मोलाचा वाटा होता याची पूर्ण जाणीव डॉक्टरांना होती.

पालिका कार्यालयातील स्थापत्य विभागात राजू नोकरीला होता. इंजिनीयरची पदवी घेतल्यानंतर तो नगरपालिकेत रुजू झाला. त्याची ती पहिलीच नोकरी होती. ल्या दोन वर्षात घरातील सर्वच मंडळी कायमची राजूला एकट्याला सोडून गेली. राजूच्या वडिलांनी शरदला डॉक्टर होण्यासाठी घसघशीत मदत केल्यानेच तो आज प्रथितयश डॉक्टर बनू शकला. राजूला यातील काहीच माहिती नव्हती. कृतज्ञतेची भावना शरद्रच्या मनी कायम होतीच. राजू एकटाच घरात असल्याने घरची सारी कामे स्वतःच करून कामाला येई. रात्री फावल्या वेळात न चुकता बासरी वाजवीत असे. त्याच्या बासरी वादनात विशेष जादू होती. मंद रागदारीने शेजारच्या आजोबाना म्हातारपणात चांगलाच दिलासा मिळत होता. त्यांचे दुखणे तेवढे तरी दूर पळून जात असे. त्याची पावती देत आजी बेसनाचा लाडू पुढे करीत. “तुझी बासरी ऐकायला तुझे आईबाबा हवे होते रे! पण ईश्वर इच्छेपुढे कोणाचे काय चालणार? काशीयात्रेला जातात काय आणि परतताना त्यांच्याच ए.सी. कोचला आग लागते काय? आणि त्यांचा काळेठिक्कर कोळसा झाले त्यांचे मृतदेह आपल्यापुढे येतात काय? सारेच अघटित रे! तुझ्या आईची सूनमुख पाहायची खूप इच्छा होती. तरी ती मला नेहमी बोलून दाखवायची. पण तुझे शिक्षण, नोकरी स्थिर व्हायला हवे होते ना! निवृत्तीनंतर बाबांनी तरी जेमतेम दोन वर्षच काढली. आता मात्र मनावर घे रे लग्न करायचे! माझ्या हाताखाली तिला चांगले सर्व बाबतीत तयार करते की नाही पहाच!” राजूने आपले घर उत्तम टापटिपीत राखले होते.

“राजू, तुझे सध्याचे दिवस खराब आहेत. सांभाळून राहा. कुलदेवतेंचे स्मरण रोज न चुकता कर. कारण या आपत्प्रसंगातून तीच तुला सावरणार आहे रे!” असे भाऊ ज्योतिषी सहजपणे बोलून गेले. भाऊंचा ज्योतिषाचा अभ्यास दांडगा होता. कधीतरी यायचे आणि त्याला सावध करून जायचे. राजू त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायचा नाही. रण ज्योतिषावर त्याचा विश्वास नव्हता. कर्तृत्त्वावर त्याचा गाढा विश्वास होता. तो ते प्रामाणिकपणे करीत असे. मात्र देव्हाऱ्यात सकाळ, संध्याकाळ दिवा लावून प्रार्थना करीत असे इतकेच.

‘भक्ती’ कॉम्प्लेक्समध्ये स्नेहसंमेलनात राजूच्या बासरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार राजू तेथे वेळेवर पोहोचलादेखील. अचानकपणे मंडळाचे अध्यक्ष पुढे आले. त्याच्या तबलजी साथीदार तापाने फणफणत असल्याने साथीला येणार नसल्याचे कळविले असून पर्यायी व्यवस्थेसाठी अध्यक्ष चिंताग्रस्त स्थितीत येऊन उभे राहिले. “माझ्या माहितीतील एक तरुणी आहे. मच्या गॅदरिंगला दोन वर्षांपूर्वी तिने उत्तम तबला वाजविला होता. तिला विचारू का?” “साहेब, चानकपणे साथीदार आणून कसे चालेल हो? नुसती बासरीच (सोलो) वाजवीन. चालेल तर पहा!” “ती तरुणी कार्यक्रमास आलेली आहे. तबल्याचे मी पाहतो. पहा कसे जमते ते! ती उत्तम कलाकार आहे.” केवळ दहा मिनिटातच रजनी पवारला तबल्यासह घेऊन आले. “हे पहा रजनी! प्रसंग बाका आहे. सांभाळून घ्या एकमेकाला. श्रोतृवर्ग जमायला लागला आहे. अखेर इज्जतीचा प्रश्न आहे. त्या सर्वांना मी अगोदर कल्पना देईनच म्हणजे झाले.”

रजनी व राजूने तालसुरांची जुळवाजुळव केली आणि चटकन् पडदा उघडला गेला. मालकंस, भूप, देस आदी राग व चिजा वाजविल्या गेल्या. रजनीने तबल्याची उत्तम साथ दिली. प्रत्यक्षात कार्यक्रम खुलल्याने ते दोघेही खूश होते. अखेर ‘तोच चंद्रमा नभात’ या गाण्याने कार्यक्रम संपला. “रजनी, तबल्याची इतकी उत्तम साथ कराल याची मी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती. बेस्ट ऑफ लक…” असे म्हणून सांस्कृतिक मंडळाचे सन्मान स्विकारून दोघेही आपल्या घरी पांगले. उत्तरादाखल रजनीने केलेले स्मित साऱ्यांच्या नजरेतून सुटले नव्हते. रजनीदेखील राजूच्या बासरीवर खूश होतीच पण ती बोलणार कशी?

रात्री बराच वेळ ती अंथरुणात एकटीच तळमळत होती. मी सल्ला कुणाचा घेणार? राजूचा ठावठिकाणा देखील मला माहिती नाही. कसे मी माझे मन मोकळे करणार? दोन महिन्यांपूर्वी आईदेखील अचानकपणे गेली. पूर्वाश्रमात तिने पवार नावाच्या हुशार, कर्तबगार मुलाशी प्रेमविवाह केला हाच काय तो तिचा गुन्हा. म्हणून सर्वांनीच आमच्या घरचा संबंध कायमचा तोडला. आई पूर्वाश्रमतीची पोंक्षे. पोंक्षे-पवार हा आंतरजातीय विवाह कसा पटावा? बाबा कसरतपटू होते म्हणून चांगली नोकरी लागली पण तेही अकाली गेले. केवळ माझी सुरक्षा म्हणून कराटे शिकले व त्यात यशस्वी देखील झाले. अखेर नर्सिंगचा कोर्स करून नोकरी सुरू झाली. पण हा अवघड निर्णय मलाच घ्यायला हवा कारण केवळ मी स्थळे नाकारणार व स्विकारणार देखील. मनाच्या कोपऱ्यात ‘राजू’चा चेहरा लॉक करून दवाखान्यात परिचारिका म्हणून सेवा करीत आहे. डॉ. शरद म्हणजे देवमाणूस. नेहमी मी त्यांच्याकडे वडिलांप्रमाणेच पाहिले आहे. त्यांना विचारावं का? या विचारातच तिचा डोळा लागला आणि दूधवाल्याने घराची घंटा वाजवली.

“राजू, साहेब, लगेचच पोटेसाहेबांनी तुम्हाला पेपर्ससह आत बोलावले आहे.” “ठीक आहे, येतो मी म्हणून सांगा.” शिपायाने वर्दी दिली.

“हे पहा काळे, मी तू तपासलेली ड्राईंग्ज पसंत केली आहेत. त्यावर मी शिफारसपत्र देखील जोडले आहे. हेड ऑफिसला पिंटो साहेबांशी मी बोललो आहे. तू ते पेपर्स असलेली फाईल त्यांना स्वत: नेऊन दे व काही माहिती लागल्यास तू स्वत: त्यांना देऊ शकशील. सोबत लॅपटॉप देखील घेऊन जा आणि मला पुढील गोष्टी कळवित रहा,” असे बोलून पोटेसाहेबांनी फाईल राजूच्या हाती सुपूर्द केली. बेस्ट ऑफ लक म्हणत त्याच्यासोबत कॉफीदेखील पिऊ लागले. “जातो मी साहेब,” असे म्हणून राजू कॅबिनच्या बाहेर पडलादेखील.

“पोटे, अहो पोटे, श्री. काळे मला भेटण्यासाठी निघालेत ना? शक्य असेल तर त्यांना मागे परतायला सांगा कारण आत्ताच मला गंभीर बातमी समजली आहे व ती खरी देखील आहे. आमच्या वाटेवरच अचानकपणे जातीय दंगल उसळली आहे. सामान्यांचे जीव हकनाकपणे जात आहेत. छोट्या गल्लीबोळांतून चाकू, सुऱ्या, तलवारीचे सपासप वार होत आहेत. पोलीस तेथे आले आहेत पण त्यांना देखील ही दंगल शमविणे अशक्यप्राय झाले आहे. राज्य राखीव पोलीस फोर्स त्वरित दाखल होतोच आहे. श्री. काळे माघारी येतील असे पाहा. त्यांना अडवा” असे म्हणून गंभीरतेने डॉ. पिंटो (सिनीअर अभियंता) यांनी फोन बंद केला.

वॉर्ड ऑफिसरना त्वरीत बातमीची कल्पना देऊन अन्य कर्मचारीवर्ग सोडून दिला गेला. काळेंचा फोन लागत नव्हता. पोटेंची अस्वस्थता वाढत चालली. सोबत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला काहीच सुचत नव्हते.

“आईऽऽ गऽऽ मेलो गं मी मेलो. कुणी आहे का तिकडेऽऽ वाचवाऽऽ!” तीव्र वेदनेने कण्हणाऱ्या राजूला चटकन पोलिसांनी व्हॅनमध्ये घालून ‘समर्थ हॉस्पिटल’ या खाजगी इस्पितळात आणले. पोलिसांकडे राजूच्या हातातील फाईल, मोबाईल मिळाला होता. “डॉक्टर त्वरित पेशंटना उपचार चालू करा. बाकीच्या नंतरच्या गोष्टी सांभाळून घेऊ. जीव हा महत्त्वाचा नाही का?” म्हणत पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पूर्ण रक्तबंबाळ झालेल्या व ग्लानीत गेलेल्या पेशंटला उपाचारासाठी आत नेत स्ट्रेचरवरून आणताना सर्वत्र रक्त सांडले होते. केस खरोखरीच गंभीर होती. त्वरित डॉ. शरद यांनी सहाय्यक डॉक्टरना व भूल तज्ज्ञांना बोलावून घेतले. “हे पहा, पेशंटला त्वरित रक्त चढवायचे आहे. तुमच्यापैकी कोणी त्वरित देऊ शकेल त्यांनी त्वरित देण्यासाठी हजर व्हा. क्षणाचा विचार न करता रजनी पुढे येऊन तिने रक्त दिले. तेच रक्त पेशंटला चढविले. एकीकडे अनेक शस्त्रक्रिया होतच होत्या. अनेक फोटोग्राफर्स फोटो काढीत होते. “डॉ. गोरे, जखमा बऱ्याच खोलवर असून रक्त फार गेले आहे. रक्तदाब उतरत चालला आहे. त्यातल्या त्यात एकच चांगली गोष्ट अशी की मूळ इंद्रिये, हाडे इत्यादींना धक्का पोहोचलेला नाही. जांघेमधील जननेंद्रिय चांगलेच कापले गेले आहे. पाहू या काय होते ते पण पेशंट वाचायला हवा. खूप काळजी घ्यायला हवी. डॉ. शरद इतरांना सांगत होते. सर्व उपचार होईपर्यंत मध्यरात्र झाली व पेशंटला अतिदक्षता विभागात स्वतंत्रपणे ठेवले गेले. शरीरावर सर्व प्रकारच्या नळ्या लावलेल्या होत्या. टाके घालून रक्तप्रवाह थांबवला होता. पेशंट शुद्धीवर येणे तेवढेच गरजेचे होते.

“सकाळी १० वाजता पोलीस इन्स्पेक्टर शिंदे स्टाफसह हजर झाल्याची वर्दी डॉ. शरदना दिली गेली. “नमस्कार, डॉक्टर पेशंटकडे मिळालेल्या मोबाईल, कागदपत्रांवरून बऱ्याच गोष्टी समजल्या पण काही माहिती त्यांचे जबानीतून येणे आवश्यक आहे. पेशंट शुद्धीवर आल्यावर लगेच आम्हाला कळवा. श्री. राजेंद्र काळे इंजिनीयर असून पालिकेच्या कार्यालयात ड्रॉइंग विभागात आहेत. ते फाईलसह हेड ऑफिसला चालले होते, आम्ही पालिकेच्या विभागात रीतसर चौकशी केली आहे. आमचा हवालदार बाहेर कायम बसून असेल.” कॉफी घेत असताना शिंदे बोलत होते. डॉ. शरदना साऱ्या घटनेचा अंदाज आला. ते म्हणाले, “शिंदेसाहेब, पेशंट थोडक्यात वाचला. थोडासा जरी उशीर होता तर सारेच संपले होते. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो स्थिरावतोय. काही तासाने बहुधा शुद्धीवर येईल. मी माझा डॉक्टरी संपूर्ण तपशिल तुम्हाला सुपूर्द करीन म्हणून क्लेमच्या दृष्टीने उपयोगी ठरावे. पेशंटची स्थिती पहाता तो इथेच रहाणे त्यांचे दृष्टिने चांगले आहे. जखमा ओल्या असल्याने कुणालाही भेटू देणे शक्य नाही. काचेतून पेशंट बघू शकता.” असे म्हणून रजनीला आत बोलावले. “है पहा, अजून चार दिवसांनी ही सिनीअर नर्स पेशंटची पूर्ण काळजी घेईल. मला पेशंटला पूर्ण पूर्वस्थितीत आणायचा आहे.”

“राणी, मुद्दाम मी तुला राजूवर लक्ष ठेवायला सांगितले आहे. तो इथे अॅडमिट झाल्यापासून नर्स म्हणून संबंधित आहेस. परवा त्याला आपल्या अति स्पेशल वॉर्डमध्ये ५ (शेवटचा मजला) शिफ्ट करणार आहे. त्याच्या शस्त्रक्रियेत्तर सारे सोपस्कार तोपर्यंत पुरे होतील. साऱ्या नळ्या काढल्या जातील. जखमा भरायला वेळ लागेल. तुझ्याशिवाय कुणीही नसेल. मी फक्त रात्री कधीतरी व्हिजिटला येऊन जाईन. आजच तो वॉर्ड निर्जंतुक करून ठेवला आहे. राजूला भयंकर अशक्तपणा आल्यामुळे त्याची सारी काळजी तुला करावी लागेल. तो आहे तोपर्यंत “तुझी तीच ड्यूटी असेल. तू देखील इथेच राहायचे आहे. स्वतः घरी केलेले गरम, शुद्ध खाणे, पथ्यपाणी वगैरे देत जा. त्यासाठी सारी व्यवस्था केलेली आहे. तू देखील या वॉर्डातच राहायचे आहे. कोणतीही गरज लागल्यास फोनवर कळव त्वरित ती तुला पुरविली जाईल. राजूचे माझे जुने संबंध आहेत पण त्याला ते माहिती नाहीत. राजूचे वडील माझे शिक्षक. मी त्यांचा आवडता विद्यार्थी. त्यांनी मला त्यावेळी भरघोस आर्थिक मदत केल्यानेच मी आज या स्थानी आहे. ती कृतज्ञता मला पाळावयाची आहे. राजू साधा, सरळ, प्रामाणिक आहे. या प्रसंगाने  मला तो आता भेंटला आहे. राजू आणि तू मला दोघेही सारखेच. वॉर्डात लॅपटॉप ठेवलेला आहे. तुमच्या आवडीचे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. थोडक्यात कोणत्याही औषधांव्यतिरिक्त केवळ माया, ममता, प्रेम, त्याग इत्यादी भावनेतून त्याला तू जप. रोज दोनदा तरी दुखऱ्या भागावर मॉलिश करून सकाळी त्याला कोवळ्या उन्हात बसव. बेस्ट ऑफ लक राणीऽऽ” म्हणून पोलिसांना पेशंट शुद्धीवर आल्याचे कळविले.

तासाभराने पोलिसांसह पालिका अधिकारी देखील हजर झाले. “नमस्कार, मी श्री. पोटे! राजू काळे माझा ज्युनिअर आहे. मुलगा प्रामाणिक, होतकरू व हुशार देखील आहे. दुर्दैवाने तो अपघातात सापडलाय. तुम्ही देवकार्य समजून प्रयत्न करीतच आहात. देव लवकरच त्याला पूर्ववत आणो. कारण तो आम्हाला सर्वांना हवा आहे.” असे म्हणून डॉक्टरी रिपोर्टचे कागद पालिकेसाठी पोटेंकडे डॉक्टरांनी दिले. लांबूनच राजूची जबानी रेकॉर्ड करून शिंदे देखील केबिन बाहेर पडले.

“राजू! मी एक व्यावसायिक परिचारिका आहे. रुग्णास बरे वाटावे म्हणून आम्ही झटत असतो. त्यासाठी संकोच, घृणा, किळस आदी गोष्टी सतत लांबच ठेवायच्या असतात. तुझ्याकडे मी एक रुग्ण म्हणून पाहते. साहेब रूग्णसेवा म्हणून माझे नेमून दिलेले काम आहे. ते मी करणारच. तुला संकोच का वाटावा? गेले दहा दिवस मी तुझा वस्त्रहीन जखमी देह पाहत आहे.” म्हणून जखमांवर मालीश करून शेकत होती. “राजू, लिंगापेक्षा बाकीची इंद्रिये चांगल्या स्थितीत आहेत. लिंग वाचविण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. टाका घालून ते शिवले तरी त्या नसा कार्यरत होण्यासाठी तेलाने मला ते बऱ्याचदा भरपूर चोळावेच लागणार. अखेर लिंग असेल तरच पौरूषत्व राहील ना? अन्यथा लग्न करून पत्नीला फसविल्यासारखे नाही का?”

“राणीऽऽ माझ्यासाठी तू खूपच करते आहेस गं. मलाच ते कसंतरी वाटतंय. एखाद्या आईप्रमाणे तू माझे करते आहेस. रोजच्या रोज नवनवीन डिशेसनी तर मी पूर्ण समाधानी आहे. आईचीच आठवण येते गं. ती आता नाही. आता तू लवकरच पत्नी म्हणून येशील का? तसे आपण समदुःखीच गं. कारण कोणताही पाश आपल्यामागे नाही. शेजारच्या आजींचे कृपाछत्र माझ्यावर आहे गं. सकाळी सूर्यकिरणात आपण बसतो. ब्रेकफास्टची तुझी नवनवीन डिश व सोबत बासरी व तबल्याची जुगलबंदी वेगळेच वातावरण बनते बघ. मला वाटते तुला माझ्यावर कामगिरी देताना विशिष्ट हेतू असणार डॉक्टरांचा. पण मला वाटते नोकरीवर रुजू होण्यासाठी किमान महिनाभर तरी जाईलच. जखमा भरून शरीर सुदृढ होईपर्यंत तितका वेळ जाणारच. तू मालीश करताना मलादेखील संवेदना होत असतात. त्या मला प्रेरीत करीत असतात त्यामुळे इंद्रिय पूर्ववत होणार असं मला विश्वास आहे. आता तर मी स्वतंत्रपणे चालायला देखील लागलो आहे.”

“राजू, अरे हे बासरीचे सूर कुठून आले? लॅपटॉप तर बंद आहे.” कपात चहा भरताना राणी म्हणाली. “राणी, समोर बासरी नसली तरी काय झाले. बघ! शिळेद्वारे (व्हिसल) मी राग पेश करीत आहे. त्यामुळे माझ्या रियाजात खंड पडणार नाही. अखेर बासरी ती बासरीच हे खरे आहे. तुला तबल्याचे बोल ऐकायचे आहेत काय? प्रत्यक्ष तबल्याशिवाय?” राणी पाहतच राहिली. “सारे अजब रे बाबा तुझे!”

“माझी पत्रिका आईने ज्योतिबाला दाखविली होती. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बाबतीत संघर्ष, कटकटी आहेत. लग्न, संततीत विलंब आहे. त्याचे काय असेल ते असो. पण कोणताही निर्णय मलाच घ्यायचा असल्याने अत्यंत सावध मला राहावे लागते. मध्यंतरी दोघेजण मला सांगून गेले होते. पण पण होय म्हणण्याअगोदर त्यांचे पौरूषत्वाचे रिपोर्ट मला हवे होते. मी माझे त्यांना सादर करूनही त्यांनी ते मला दिले नाहीत. स्पष्टपणेच मी त्यांना नकार कळविला. कारण नंतर निराशा येण्यापेक्षा वेळीच विषयाचे मूळ छाटणे चांगले ही माझी भूमिका. दुसरे असे की विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की ग्रहांच्या पत्रिका, रिपोर्टसपेक्षा भलतेच सांगतात.

“राजू, चला दोन दिवसांनी मी तुला डिस्चार्ज देणार आहे. पालिका तुझी सर्व रजा भरपगारी करणार असून वर दोन लाखांची रक्कम देणार आहे, असे श्री. पोटे यांनी सांगितले. सरकारतर्फे तीन लाखांचा चेक येऊ लागलाय. आता तू बऱ्यापैकी नॉर्मल झाला आहेस. चार दिवसांनी कामाला रुजू हो. तसे फीट सर्टिफिकेट मी तुला देईन. तुझ्या सुयशामध्ये आमच्या उपचारांसोबत गेली अडीच महिने मनापासून सेवा, शुश्रूषा करणाऱ्या राणीचे योगदान फार मोठे आहे. केवळ माझ्या सांगण्यावरून कोणतीही बाब पुढे न करता खऱ्या अर्थाने रुग्णसेवा करून तुझे मनोधैर्य वाढवून लैंगिक दुर्बलता पळवून लावली आहे. परवाच मला तुझा सिमेन्सचा रिपोर्ट मिळाला. त्यानुसार शुक्रांची गुणसंख्या आणि त्यांची गती समाधानकारक आहे. वास्तविक मला त्याचीच धास्ती होती. हिमोग्लोबिन १४ आहे. तू घरी गेलास तरी राणी नेहमीप्रमाणे दररोज सकाळी व संध्याकाळी जेवण व डबा देत राहील. त्याबद्दल तिला मी वेळेची सवलत नक्की देईन. नाही म्हणू नकोस. अशी मुलगी लाभणे म्हणजे गेल्या जन्मीचे नक्कीच ऋणानुबंधच म्हणायला हवेत. त्याशिवाय हे होऊच शकत नाही.”

“डॉक्टर, तुमचे आभार मानू तितके थोडकेच आहेत. ते मी कधीच विसरणार नाही. केवळ राणीमुळेच उपचारानंतर माझी शारीरिक आणि मानसिक प्रगती होऊ शकली.”

“डॉक्टर, मला उपचारांच्या बिलाची कल्पना द्या. म्हणजे मला पैसे देता येतील. मला मिळालेले दोन्ही चेक्स मी खात्यात टाकीन. त्यानंतर तुम्हाला चेक देईन.”

“हे पहा राजू, बिलाचे आपण नंतर पाहू कारण तुझ्या वडिलांचे माझ्यावर फार उपकार आहेत. तुला माहिती नसेल. तू अभ्यासासाठी बाहेरगावी असताना त्यांना मिळालेल्या निवृत्तीनंतर मिळालेली जवळजवळ अर्धी रक्कम मला डॉक्टरी व्यवसायासाठी दिली, तेही कोणतीही अट न घालता कारण मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो. त्यामुळे मी त्यांच्या पुण्याईने प्रथितयश डॉक्टर बनू शकलो आहे. ती गुरुदक्षिणा रूपाने तरी मला देण्याची संधी मिळू दे. नाही म्हणू नकोस.” डॉक्टर बाहेर पडणार इतक्यात मिल्कशेक राणी घेऊन आली. सोबत सुकामेवाही होताच.

‘आणि हो राणी, एखाद्या सतीसावित्री प्रमाणे तू आपल्या भावी पतीचे प्राण लग्नाआधीच परत मिळविले आहेस. तुम्ही दोघे सुखाने संसार करा. नोंदणी पद्धतीने लवकर विवाहित व्हा. नंतर एक स्नेहसंमेलन ठेवले म्हणजे झाले. माझे आशीर्वाद व सहकार्य तुम्हाला सदैव आहेच.” असे म्हणून डॉक्टर समाधानाने वॉर्डबाहेर पडले.

“राजू, आज संध्याकाळी कॉफी हाऊसमध्ये येशील का? तसे मला कळव म्हणजे ड्यूटी संपल्यावर तडक येऊ शकेन.” राजूच्या सकारार्थी आशेने राणी आनंदित झाली. तिच्या डोळ्यात उत्तम कलाकार, साधा, सरळ, होतकरू, समंजस, उमदा तरुण, चांगलाच भरला होता. सेवाशुश्रूषेचा महत्त्वाचा भाग म्हणून तिने त्याला प्रेमाने हाताळले होते. त्याचेच सारे गुण असलेले बाळ तिला मिळाले व आई म्हणून त्या बाळाचे संगोपन करावे ही तिची मनीची इच्छा लवकरच फळणार होती. डॉक्टरांनी देखील समाधानाने लग्न प्रस्ताव संमत केलेला होताच. सारे काही छान जुळून आले होते म्हणून ती सतत याच गोड स्वप्नात रमत असे. बरे राजूने देखील लग्नप्रस्ताव संमत केला होताच. तिने तरीही राजूची शेवटची परीक्षा घेण्याचे ठरविले कारण ती वैद्यकीय क्षेत्राशी बरीच निगडित होती.

“ये राजू ये! म्हणून राणीने राजूस घरात घेतले. आज तिने सुग्रास पक्वानाचे जेवण केले होते. त्यांच्या पानापुढे उत्तम रांगोळी घातली होती. आग्रहावर आग्रह झाले. राजू खूप खूष झाला. राजूने तोंडात पान चघळायला सुरुवात करून तो जायला निघाला.

‘अरे, चाललास काय? फार काही अजून रात्र झालेली नाही. आवरून मी आलेच.” राजूस पायजमा बदलायला दिला. राणीकडे तो पहातच राहिला. इतकी गुणाची राणी दैवाने माझ्या पदरात टाकली खरोखरच भाग्यच म्हणायचे. कधी नव्हे तो त्याने देवाला चक्क नमस्कार केला.

मंद दिव्याच्या प्रकाशाने त्या खोलीत मोगऱ्याचा सुगंध पसरला होता. अचानक सैलसर गाऊन घालून राणीने चक्क राजूला प्रदीर्घ आलिंगन दिले. दोघांनाही कसलेच भान राहिले नाही. मिलनाच्या धुंदीत ते दोघे बराच वेळ रममाण झाले. तो स्वर्गसुखाचा आनंद परत परत अनुभवू लागले. “राजू, तू माझ्या परीक्षेत उत्तमरित्या पास झालास. माझी सेवा ईश्वराने मान्य केली. वेल, उद्याला नोंदणी कार्यालयात जाऊन पुढची कारवाई करू या! एकमेकांच्या सहकार्याने मस्त यशस्वी, सुंदर आयुष्य उपभोगू या! ‘जगी ज्यास कुणी नाही त्यास देव आहे,’ हेच खरे!

– रामकृष्ण विनायक अभ्यंकर


२/४९, भक्तीयोग सोसायटी, परांजपे नगर,

वझिरा नाका, बोरीवली (प.), मुंबई – ४०००९१
मो. ९८१९८४४७१०

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..