“अनेक रोगांना पळविणारे केवळ तंत्र नव्हे मंत्र” रिव्हर्सल मंत्र
ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल.
प्रवाहा विरुद्ध पोहणाऱ्या या डॉक्टरांचे उपाय ही असेच आहेत, त्यांचा कोणताही उपचार शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे आणि त्यामुळे रुग्णांना मधुमेहापासून मुक्ती मिळत आहे. अनेक डॉक्टर्स मध्येही आज अनेक बाबतीमध्ये एक मत नाही. आरोग्य विषयक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी त्याच्यावर एखादा सेंसार बोर्ड असावा अशी परिस्थिती आज झाली आहे. अनेक संबोध स्पष्ट नसणं यापेक्षाही अनेक संभ्रम असणं हे धोकादायक आहे. डॉ. चंद्रकांत कणसे म्हणजे दृष्टिकोन देणारे व बदलणारे डॉक्टर असं म्हणायला हवं,त्यांच्याऔषधामुळे अनेकांच्या गोळ्या कमी झाल्या, बंद झाल्या व इन्सुलिन कमी झाले, बंद झाले. योग्य आहार, व्यायाम,उपवास जीवनशैली बदलल्यावर सर्व कसे रिव्हर्स होतात हे या पुस्तकात उत्तम रित्या समजावून सांगितले आहे. एक आजार दुसऱ्यांना जन्म देतो,ते आजार दुरुस्त झाले तर पुढचे आजार आपोआपच रिव्हर्सल कडे वाटचाल करतात. जीवनशैली बदलली की आपल्याकडे केवळ आरोग्य येत नाही तर आत्मविश्वास, आनंद आणि जगण्याची उमेद येते.
अनेक डॉक्टर, गृहिणी, रुग्ण यांच्यासाठी शरीर, मन आणि आयुष्य परत मिळण्याची ही एक ज्ञानेश्वरी आहे.
जीवन शैली हेच एक प्रभावी औषध आहे पुस्तकातून समजते,जाणवते. अनेक औषधे बाजारात येत आहेत, पण लोक बरे होत नाहीत. आज आजारावर नको तर आयुष्यावर उपचार हवेत. हे पुस्तक तुमच्याशी संवाद साधतं, तुमच्या प्रश्नांना उत्तर देते व मंत्राप्रमाणे तुमच्यावर उपचार करते, कारण हे मंत्र तंत्र म्हणून आपल्यासमोर येतात.
मंत्र जर आपल्याला कळाले तर पूजेचा आध्यात्मिक आनंद आपल्याला मिळतो. तंत्र कळाले तर जीवनशैली बदलण्यास आपण प्रवृत्त होतो औषध, रिपोर्ट, तपासण्या यात रुग्ण कंटाळून जातो, आणि रोगाचे उच्चाटन ही होत नाही. जेव्हा अशास्त्रीय माहितीचा शास्त्रीय म्हणून प्रचार व प्रसार होतो तेव्हा अनेक जण त्याला बळी पडतात. जादूटोणा कायदा प्रभावीपणे अमलात आला तरच आरोग्यविषयक अंधश्रद्धा कमी होतील. मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, हृदय विकार रिव्हर्सल करण्यासाठी डॉ. चंद्रकांतअनंत कणसे यांनी रिव्हर्सल मंत्र या पुस्तकाद्वारे या सर्व रोगावर मात करण्यासाठी कशी जीवनशैली अवलंबावी लागेल याचे सुंदर विवेचन केले आहे. प्रवाह विरुद्ध पोहणारे पण संशोधन निष्कर्ष च्याआधारे प्रत्येक गोष्ट सिद्ध करणारे म्हणून डॉ. चंद्रकांत कणसे यांची ओळख आहे. अनेक जाहिराती आज अंधश्रद्धा पसरवीत आहेत आणि विक्री करणारे ग्राहकांना फसवीत आहेत अशा परिस्थितीमध्ये नेमका आहार कसा असावा याचे उत्तर डॉ.चंद्रकांत कणसे यांच्याकडे आहे. आजारी पडणे हा जीवनाचा भाग आहे. आजारी पडणं, आरोग्य बिघडणं एखादा रोग होणे हे आपल्या नशिबाचा भाग आहे अशा नैराशेच्या गर्दीत अडकलेल्या लोकांना अनेक जाहिराती आज फसवत आहेत. युट्युब वरून अनेक डॉक्टर्स वेगवेगळे उपाय सांगत आहेत त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. जिथे सकस आहार व श्रम प्रतिष्ठा लयाला जाते तिथे आरोग्य नांदत नाही. आज प्रचंड प्रमाणात वैज्ञानिक प्रगती झाली, यांत्रिक युग आले, लोकांची जगण्याची जीवनशैली बदलली. करिअरच्या नादात आहार दुय्यम ठरू लागला त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या.
सुखलोलुपता आली शारीरिक कष्ट कसे कमीत कमी करता येतील याच्यासाठी अनेक उपकरणे हात जोडून प्रत्येकासमोर उभी आहेत व प्रत्येक जण ती मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या शारीरिक व्यायामाकडे लक्ष देत नाही त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आज निमंत्रण मिळत आहे. काय खावे, कसे खावे किती खावे याबाबत परस्पर मते समाज माध्यमातुन व्यक्त होत असताना एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे गृहिणींना सुद्धा पूर्ण वेळ कुटुंबाकडे लक्ष देणे होत नाही त्यामुळे सकस आहार हा आजचा प्रत्येक कुटुंबातील प्रश्न आहे. वेळेवर अनेकांना आज आहार मिळत नाही मिळाला तरी तो सकस असत नाही काहीतरी खाऊन लोक रोगाला निमंत्रण देत आहेत.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत कुटुंबाचे प्रबोधन पहिल्यांदा व्हायला हवे. आग्रह करण्याची परंपरा बदलायला हवी.
भूक लागेल तेव्हा जेवायला हवं पण आज पारंपारिक कुटुंब पद्धतीतून अनेक वेळा रात्री भूक नसली तरी थोडं तरी खाणे हा आपला रूढी परंपरेचा भाग बनला आहे. अनेक परंपरा व आहार बदलायला लोक तयारच नाहीत. पूर्वी आरोग्याचे तंत्र माहित नसले तरी मंत्र माहित होता. उदा.एकादशी दुप्पट खाशी म्हणत उपवासाचे महत्त्व अधोरेखित होत असे. शालेय अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन व कॅलरीज याच्याबद्दल मुलांना जागरूक केल्या जात नाही. टीव्हीवरच्या अनआरोग्याच्या जाहिराती मुलांना व पालकांना हातबल करत आहेत. मॅगी, बर्गर, पिझ्झा, बिस्किटे, चॉकलेट्स यात मुले न्हावून निघत आहेत. विज्ञानात मुलं व्याख्या पाठ करून पैकीच्या पैकी मार्क मिळवतील पण आपल्या आहारात कशामध्ये कार्बोहायड्रेट आहे कशामध्ये प्रोटीन आहे कशामध्ये जीवनसत्वे आहेत हे नजरेआड करून हवं ते खातात,मोठेही त्यात आले.आणि अनेक जण जीवनशैल बदलतच नाहीत. अनेक डॉक्टरांचेही प्रबोधन करणं आज आवश्यक आहे वेगवेगळ्या डॉक्टर्स कडून वेगवेगळे सुचवलं जातं आणि सामान्य माणसे मानसिक रित्या गोंधळून जातात. कोणी म्हणतो दोनदा, कोणी म्हणतो दोन दोन तासाने जेवा.एखाद्या डॉक्टर म्हणतो बारा वाजेपर्यंत भरपूर फळे खा अनुशापोटी गोड फळे खा काही होत नाही. कशाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे केवळ एवढच माहित असून चालत नाही तर ग्लायसेमिक लोड त्याचा किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. काय खायला पाहिजे याचा विचार करताना या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. प्रोसेस फूड का खाऊ नये, मैदा किंवा त्याचे पदार्थ का खाऊ नयेत,
अशा अनेक संभ्रमांना योग्य उत्तर डॉ.चंद्रकांत कणसे यांच्याकडे मिळेल,त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये महागडी औषधे नसून फक्त जीवनशैली बदला असा त्यांचा आग्रह असतो आणि अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. पोथ्या पुराणाच्या ग्रंथांबरोबरच आरोग्याचे ग्रंथ संग्रही असणे ही काळाची गरज आहे. संतोष धोंगडे यांचे मुखपृष्ठ विषयानुरूप आहे.
रिवर्सल मंत्र डॉ.चंद्रकांत कणसे
संवेदना प्रकाशन पृष्ठे : 512
मूल्य : 1260/_
डॉ.अनिल कुलकर्णी


Leave a Reply