नवीन लेखन...

‘रंजोगम’ – खय्याम साहेब !

खय्याम साहेब तसे एस-जे, एस.डी, एल-पी किंवा आर.डी. यांच्यासारखे खूप फॕन फाॕलोईंग असणारे संगीतकार नव्हते. तसे त्यांचे नावही फक्त दर्दी कान-सेनांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चटका लागलाच पण त्याचवेळी त्यांच्याविषयी त्यांच्या संगीताविषयी एवढं भरभरुन दाखवले गेले व लिहीले गेले हे पाहून मनाला खरंच समाधान वाटलं त्यांच्या निधनानंतर मी जे काही थोडे कार्यक्रम पाहिले व लेख वाचले त्यात खय्याम साहेबांची बरीच गाणी उल्लेखली गेली. त्यात प्रामुख्याने ‘कभी कभी’ व ‘उमराव जान’ यातील त्यांच्या गाण्यांचाच जास्त उल्लेख येत होता. हे दोन चित्रपट खय्याम साहेबांच्या कारकिर्दीतील, व एकूणच भारतीय फिल्म संगीतात देखील, मैलाचे दगड आहेतच, यात शंका नाही. पण केवळ दोन चार चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांनी खय्याम साहेबांचे कार्य अधोरेखित करणे चुकीचे राहिल.

पण रजिया सुल्तान, बाजार, नुरी, त्रिशूल, थोडी सी बेवफाई, दर्द, खानदान या सारख्या सिनेमांना खय्याम साहेबांनी सत्तर , ऐंशी च्या दशकात दिलेले ‘हटके’ संगीत कोण विसरु शकेल?माझ्या स्वतःच्या टाॕपटेन मधे त्यांची तीन गाणी येतात. मी आता त्यांच्याविषयीच लिहीणार आहे.

१. पहिलं गाणं म्हणजे रफीसाहेब आणि सुमनताईंच ‘महोब्बत इसीको कहते है’ मधील गाजलेले द्वंद्व गीत ‘ठहरीये होश मे आं लू.. तो चले जाईयेगा..’ अहाहा..नुसतं शब्द ऐकूनच मन फ्रेश होतं की नाही? अगदी नव्या नव्हाळीतला शशी कपूर व जन्मभर ‘बेबी’ भासावी अशी गोड नंदा यांच्यावर चित्रीत हे गीत म्हणजे गालावरुन अलगद फिरणारे मोरपीसच!!

यातील रफी साहेबांच्या ‘..चले जाईयेगा..’ नंतर सुमन ताईंचे ‘हूं हूं’ असा प्रेमळ हूंकार हा खास खय्याम टच या गाण्याला व श्रोत्यांना एका वेगळ्याच दुनियेत घेउन जातो..पुन्हा प्रेमात पडायला लावतो. या गाण्यात शशी व नंदा खरोखर एकमेकांच्या प्रेमात बुडाल्याचा भास होतो, ते फिल्मी वाटत नाही. माझ्या मते हे खरं तर खय्याम साहेबांच्या सच्च्या सुरावटींचे यश म्हणावे लागेल.
One of the best duets ever.

२. माझं खय्यामसाहेबांचं दुसरं अतिशय आवडतं गीतही खासच आहे. शगून चित्रपटातलं ‘तुम अपना रंजोगम..अपनी परेशानी मुझे दे दो’ हे खय्याम साहेबांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गायलेलं गीत.

एक वहिदा रेहमान सोडलं तर या चित्रपटातले व गाण्यातले कलाकार ओळखीचे नाहीत व त्यांचा यातला अभिनयही यथातथाच होता, त्यामुळे त्याविषयी फार न बोललेले बरे.

या गाण्याचे खरे स्टार हे गीतकार साहीर व संगीतकार खय्यामच आहेत. पुढे अनेक यशस्वी गाणी देणा-या या जोडगोळीचा ही अगदी सुरवातीच्या काळातली कलाकृती. या गाण्याला एका वेगळी संवेदनशील पार्श्वभूमी देखील आहे. साहीरजी व अमृता प्रितमजी यांची मैत्री (की प्रेम?) ही भारतीय साहित्यातील आख्यायिका आहे. त्यावर आधारित ‘तुम्हारी अमृता’ हा साहीरजी व अमृताजींनी एकमेकांना लिहीलेल्या पत्रांवर आधारीत कार्यक्रम फारुख शेख व शबाना आझमी सादर करायचे हे काही दर्दी लोकांना आठवत असेल. तर ही पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश हाच की, असे म्हणतात की साहीरजींनी ही नज्म अमृताजींना उद्देशून लिहीली असावी. सिनेमात हे गाणे एका स्त्रीपात्र पियानोवर म्हणतेय असं दाखवलय. पियानो साँग असूनही पियानोला खय्यामजींनी इतक्या मुलायमपणे वापरलं आहे की त्यामुळे जगजीत कौर यांचा ‘नेझल’ आवाज व गाण्याचे शब्द जास्तच भिडतात. गाण्यात संगीत एकजीव कसे होउ शकतं याच उत्तम उदाहरण म्हणजे खय्यामजींनी या गाण्याला दिलेली चाल व संगीत. गीतातल्या या पुढच्या दोन कडव्यांमधे साहीरजी व खय्यामजी या गजलला एका वेगळ्या उंचीवर नेतात..

मैं देखूँ तो सही, दुनिया तुम्हें कैसे सताती है
कोई दिन के लिये, अपनी निगहबानी मुझे दे दो
वो दिल जो मैने मांगा था मगर गैरों ने पाया
बड़ी इनायत है अगर, उसकी पशेमानी मुझे दे दो
हिंदी सिनेमातल्या सर्वोत्तम पियानो गितांमधे या गाण्याचा नक्की समावेश करता येइल.

३. आता शेवटचं माझे अतिप्रिय खय्याम गीत. हो..मी त्यांच्या गीतांना खय्याम गीतच म्हणेन, कारण त्यांच्या प्रत्येक गाण्याला एक खास खय्याम टच असतोच.. (आठवून पहा..नुरीमधले ‘आजा रे, ‘दिखाई दिए यूँ’-फिल्म ‘बाजार’ व ‘ये मुलाकात भी इक बहाना है’-फिल्म ‘खानदान’).

हे जे गीत मी बोलतोय ते एका ब-यापैकी अनोळखी चित्रपटातील आहे. एक हिंट देतो. फिल्मचे नाव आहे ‘आखरी खत’.
गाणं आठवलं का?
अजून नाही…? चला सांगूनच टाकतो.
लता दिदींनी गायलेलं
‘बहारों..मेरा जीवन भी संवारो..
कोई आये कहींसे.. यूं.. पुकारो..
बहारों..’
साठच्या दशकातलं गाणं आहे..(राजेश खन्नाचा पहिला सिनेमा असावा). चेतन आनंद यांचा हा अतिशय वेगळ्या विषयावरेचा चित्रपट. चित्रपटाचा ८०% भाग एका दिड वर्षाच्या तान्ह्या मुलावर चित्रीत झालाय. कैफी आझमींचे सुंदर शब्द, खय्यामजींचे अतिशय तरल व मधुर संगीत व दिदींचा आर्त स्वर. हे गाणं लागलं की का कोण जाणे..अंग असं मोहरुन जातं..!! कुठल्यातरी अनामीक ओढीने मन अस्वस्थ होतं. या जगात प्रत्येकाला एक साथीदार देवाने दिला आहे. पण जर कोणी जीवनाच्या काळोखात एकटे चाचपडत असेल त्यांच्यासाठी हे गीत म्हणजे आशावादाचं चांदणं आहे.

(या चित्रपटावरही मी वेगळ्याने खूप मागे लिहीलय. तुम्हाला आपल्या गृपवर सापडेल माझ्या नावाने).
असे हे अतिशय अविट गोडीचे गाणे.

तर अशी ही तीन गाणी..माझ्या मनातली.
खय्यामजी, आम्ही तुम्हाला लिहीलेले हे ‘आखरी खत’ निश्चीतच नाही. शेकडो सुंदर तरल गाणी आमच्या ओंजळीत टाकून तुम्ही निघून गेलात…अनंताच्या वाटेवर…
मागे आमच्यासाठी हा ‘रंजोगम’ ठेउन..!!
ता.क. _ हा खरोखर एक दुर्धर योगायोग आहे की खय्यामजींच्या पत्नी जगजीत कौर यांनी देखील ऑगस्ट महिन्यातच या दुनियेला अलविदा म्हंटलं. अलिकडेच, म्हणजे पंधरा ऑगस्टलाच, त्यांचे निधन झाले. आपल्या पतीस प्रत्येक सुख दुखाःत शेवटपर्यंत खंबीर साथ देणा-या जगजीतजी फार काळ आपल्या पतीपासून दूर राहू शकल्या नाहीत. ‘मै देखू तो ये दुनिया तुम्हे कैसे सताती है..’ हाच विचार त्यामागे असणार याची मला खात्री आहे.

सुनिल गोबुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..