नवीन लेखन...

रंग माझा वेगळा

मी रंगांधळा आहे . थोडे दचकलात ना ? जास्वंदीचं लाल फूल पानात थोडं दडलेलं असेल तर मला ते आकारावरून कळतं….. त्याच्या लाल रंगावरून नव्हे !! हे वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल कारण चित्रकारांचे रंग विकणं हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे एकाचवेळी मी रंगांधळा आहे आणि कॅम्लिन सारख्या कंपन्यांचा , आर्ट मटेरिअलचा डायरेक्ट डीलर सुद्धा आहे !!

मुळात अशी काही उणीव असते याचा अनेकांना पुरेसा अंदाज नसतो . तुम्ही जर गुगलवर कलर ब्लाइंड टेस्ट असं टाईप करून सर्च केलंत तर गोल आकारात रंगांचे अनेक ठिपके काढलेले दिसतील . त्या रंगीत ठिपक्यांमध्ये कोणतातरी एक इंग्रजी आकडा लपलेला असतो . हे ठिपके जास्तकरून लाल आणि हिरव्या रंगाच्या कमीजास्त रंगछटांमध्ये रंगवलेले असतात . तो लपलेला आकडा मला कधीच ओळखता येत नाही .

हा शोध मला फारच उशीरा लागला . मी बीकॉम झाल्यावर वाहन परवाना काढायला गेलो तेव्हा तिथल्या वैद्यकीय चाचणीमध्ये मला हा आकडा ओळखण्याचा प्रश्न विचारला होता आणि त्यात मी सपशेल क्लीन बोल्ड झालो होतो . त्यानंतर कुणीतरी या टेस्ट बद्दल मला सांगितलं . त्याच दरम्यान माझे दोन मामा घरी आले होते . तेव्हा गुगल नव्हतं पण माझ्याकडे या टेस्टच्या काही प्रिंट होत्या . त्यांनाही ते कोडं घातल्यावर तेही फसले . तेव्हा सहापैकी माझे किमान दोन मामाही रंगांधळे असल्याचा अजून एक शोध लागला . या दोन्ही मामांचं हस्ताक्षर उत्तम , त्यांना चित्रकलेची जाणही चांगली पण तरीही रंगांच्या बाबतीत तेही माझ्यासारखेच .. .. खरंतर मी त्यांच्यासारखा !!

यावर वाचन करताना , माझ्या डॉक्टर मित्रांशी बोलताना हे कळलं की स्त्रियांमध्ये ही कमतरता असण्याचं प्रमाण “२०० पैकी १ म्हणजे जेमतेम अर्धा टक्का आहे तर पुरुषांच्या बाबतीत ८ पैकी १ म्हणजे जवळपास १२% आहे !! गुणसूत्रांच्या XYआणि XX या जोड्यांच्या क्लिष्ट जीवशास्त्रात मी शिरत नाहीये . पण थोडक्यात सांगायचं तर मामाकडून भाच्याला ही देणगी मिळण्याचं प्रमाण खूपच जास्त !! गंमतीचा भाग म्हणजे मला सख्ख्या चार भाच्या आणि एकच भाचा आहे. पण त्यालाही माझ्या कडून ही देणगी मिळाली आहे .

ही जी जन्मजात विशेष भेट मला ( आणि माझ्यासारख्या काही मंडळींना) मिळाली आहे त्यांचे काही विशेष गमतीशीर प्रॉब्लेम्स असतात . निदान माझ्याबाबतीत तरी ते आहेत . म्हणजे बघा की हिरवा आणि लाल रंग शेजारी शेजारी असतील तर त्यात फरक करणं मला अशक्य असतं . रबरी लाल चेंडू गवतात गेला तर तो मला चटकन दिसत नाही . म्हणजे रंगामुळे मी तो शोधू शकत नाही तर त्याच्या आकारामुळे तो मला ओळखता येतो . पायलट कंपनीचं पांढरी बॉडी असलेलं काळं किंवा निळं पेन आपल्यापैकी अनेकांनी वापरलं असेल . बॉलपेन सारखं निब आणि शाईपेनसारखा फ्लो असलेलं हे पेन वापरणं ही आम्ही शाळेत असताना जरा स्पेशल ( भाव खायची ) गोष्ट होती . तर त्या पेनात हिरवं आणि लाल शाईचं पेनही मिळतं . त्या पेनाच्या टोपणात छोटी गोल खाच असते त्यात हा आतल्या शाईचा रंग समजतो . यातही मला हिरवं आणि लाल पेन चटकन काढून द्यायला कधीच जमत नाही .

दुकानात रंगांच्या खणात आम्ही रंगांच्या सुट्या बाटल्या (चटकन रंग दिसावे म्हणून) उलट्या करून ठेवतो .काचेच्या बाटलीचा तळ पारदर्शक असल्याने त्यातला रंग दिसतो . त्यातही मी हमखास गोंधळतो. कुणी सॅप ग्रीन द्या म्हटलं तर मी चटकन तिथेच असलेला बर्न्ट सायना काढून देण्याची शक्यता नाकारता येत नाही . आता असं असूनही मी काउंटरला उभं राहून रंगांचा व्यवसाय कसा करत असेन हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे ….तर तिथे माझी स्मरणशक्ती काम करते . कारण कॅम्लिन असो की फेविक्रील , त्यांच्या प्रत्येक शेडला विशिष्ट क्रमांक असतो . व्हर्मिलियन ( 394) , क्रिमझन (062) , बर्न्ट सायना (031) , सॅप ग्रीन ( 281) , ऑलिव्ह ग्रीन (391) अशा प्रकारचे हे क्रमांक असतात . यापैकी बरेचसे नंबर मला पाठ आहेत . त्यामुळे मी तो नंबर बघतो आणि चटकन तो रंग काढून देतो . अर्थात शेडकार्ड वर बोट दाखवून रंग विकणं सोपं असतं . खरी आफत केव्हा येते ? ….. तर कुणीतरी हातात एखादं चित्रं किंवा चित्राचा फोटो घेऊन येतं . मला असंच चित्र काढायचंय , तर यात कोणते कोणते रंग वापरावे लागतील ते काढून द्या !! आता आली का पंचाईत …..!! मी अशा ग्राहकाचा चार्ज सरळ अक्षय किंवा दुकानातल्या इतर कुणा मुलाकडे सोपवतो आणि मोकळा होतो . माझ्या नशिबाने स्टाफमध्ये सर्वजण नॉर्मल आहेत , त्यातला कुणीच रंगांधळा नाही ही फार मोठी जमेची बाजू आहे.

मी दुकानात यायला लागलो तेंव्हा आम्ही मदुरा कोट्स चे शिलाईचे धागे ठेवायचो . दुकानाच्या आसपास शिलाईकाम करणारे बरेच लोक होते. ते कापडांचे अगदी छोटे तुकडे ( खरंतर चिंधीच) घेऊन दुकानात यायचे . त्यावेळी काका दुकानात येत असत . ते चटकन त्या चिंधीचा रंग बघून त्याला मिळतंजुळतं धाग्याचं रीळ काढून द्यायचे . मी मात्र हमखास चुकीचं रीळ काढायचो . माझं रंगांचं अगाध “(अ)ज्ञान” बघून आमची शिंपीकाम करणारी मंडळी मात्र हैराण व्हायची . २००८ ला दुकानाचं नूतनीकरण केलं त्याच दरम्यान काका गेले आणि मी रिळांची विक्रीही कायमची थांबवली .

आज पर्यावरणपूरक आकाशकंदिल , गुढ्या ही उत्पादनं ही आमची वैशिष्ट्य आहेत . गणेशोत्सव आणि नवरात्रीसाठी आम्ही कितीतरी वेगवेगळ्या कलावस्तू विक्रीसाठी बनवतो . यातलं आरेखन बरेचदा मी आणि स्मिता मिळून करतो . दुकानातले माझे सहकारी त्यात काही बदल हवे असतील तर सूचना करतात . त्याप्रमाणे आवश्यक ते बदल मी न कंटाळता करतो . पण रंगसंगती या विषयात मात्र माझा सहभाग म्हणजे….. “लगभग नहीं के बराबर !!”

रंगांचं आपल्याला होणारं ज्ञान ही निसर्गाची विलक्षण किमया आहे . तो मुख्यतः प्रकाशाचा खेळ आहे . एखाद्या वस्तूचा रंग आपल्याला कसा ओळखता येतो ?? थोडं सोपं करून सांगायचं झालं तर प्रकाशाच्या किरणात सात रंग असतात . त्यात एकमेकांना पूरक रंगांच्या जोड्या असतात . निळा – पिवळा , हिरवा- लाल अशा त्या जोड्या आहेत . सोप्या शब्दांत सांगायचं तर झाडाच्या पानांवर प्रकाश पडतो . त्यातल्या लाल रंगाच्या लहरी पानात शोषल्या जातात आणि बाकीच्या रंगलहरी परावर्तित होतात तेव्हा पान हिरवं असल्याचं रंगज्ञान आपल्याला होतं . काजूचं बोंड आपल्याला पिवळंधमक दिसतं. प्रत्यक्षात त्यावर पडलेल्या प्रकाशकिरणातून निळा रंग शोषला जातो म्हणून ते आपल्याला पिवळं दिसतं . प्रकाश नसेल तर हा खेळ खेळता येत नाही , म्हणून अंधारात थोडासा कुठे उजेड असेल तर आपल्याला वस्तूंचा आकार कळतो पण रंग समजत नाही .

रंगविज्ञान ही रसायनशास्त्रातली अत्यंत महत्त्वाची शाखा आहे . रंगांचा संबंध जसा भौतिक गोष्टींशी आहे तसाच तो मानसशास्त्राशी सुद्धा आहे . आपल्या मनाच्या भावावस्थांशी रंगांचा खूपच निकटचा संबंध आहे . आपले सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती पाहिल्या तरी त्यातली रंगांची उधळण स्तिमित करणारी आहे . आज शहरी भागातलं पेस्टल किंवा तथाकथित इंग्लिश रंगांचं आकर्षण सोडून द्या . पण थोडं खेड्यांकडे सरकलं की भारतीय संस्कृती आणि रंगांचं नातं समजून येतं . एवढं कशाला ……अगदी आपला लग्नसमारंभ बघा . लग्नविधींसाठी पिवळं वधूवस्त्र , लग्नाच्या वेळी हिरवा शालू आणि स्वागत-समारंभाला भरजरी लाल किंवा छान निळी जांभळी पैठणी ही आपली परंपरा ….. आता त्यातही बदल होत चालले आहेत आणि तिथेही पेस्टल रंगसंगती वापरण्याचा ट्रेंड आलाय हे कसलं द्योतक आहे ?
चित्रकारांच्या भाषेत सांगायचं तर भारतीय चित्रकारांच्या पॅलेट वर वापरले जाणारे रंग आणि युरोपियन चित्रकारांच्या पॅलेट वरचे रंग खूपच भिन्न असतात . पावसाळ्यातले अति-पावसाचे दिवस सोडले तर वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आपल्या सोबत असतो . त्यामुळे आपल्याला दिसतं ते उत्फुल्ल रंग-संगतीने भरलेलं आणि भारलेलं जीवन आपल्या पॅलेटवर उतरतं . तेच रंगविचार युरोपच्या बाबतीत पूर्णतः भिन्न ठरतात . सप्टेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे जवळपास मार्चपर्यंत रेंगाळतो . दिनमान कमी . दुपारी चार वाजताच आभाळ अंधारून येतं .त्या काहीशा उदास , अंधाऱ्या वातावरणाचा प्रभाव अर्थातच तिथल्या पॅलेटवर दिसतो . रंगांचा विक्रेता म्हणून मी हा फरक खात्रीनं सांगू शकतो कारण आपल्या चित्रकारांकडून भारतीय वातावरणाला साजेशा रंगांना सर्वाधिक मागणी असते . आणि त्याच रेषेत पुढचं विधान करायचं तर तशाच चित्रांना आपल्याकडे जास्त मागणी असते . जगात पांढरे वाघ नाहीत असं नाही पण …. वाघ म्हटलं की प्रत्यक्ष वाघ पाहिला असो किंवा नसो , आपल्या डोळ्यासमोर पिवळ्याधमक अशा रंगाचं अत्यंत रुबाबदार जनावर उभं रहातं ….. आपलं रंगज्ञान , मेंदूत कोरल्या गेलेल्या स्मृती आणि आपला भवताल असा एकमेकांत गुंफला गेलेला असतो .

जाता जाता एक महत्त्वाचा उल्लेख …. कुठलीही खरेदी करताना रंगांच्या बाबतीत स्त्रिया जास्त चोखंदळ असतात. कारण पुरुषांचं रंगांशी असलेलं नातं हे म्हटलं तर जेवढयास तेवढं … पण स्त्रियांचं रंगांशी असलेलं नातं अधिक गहिरं असतं …. रंगविज्ञान आणि मानसशास्त्र हातात हात घालून चालतात… आजच्या जेन-झी च्या भाषेत सांगू का ?? …..तर कोणत्या रंगांचे कपडे घातल्यावर आपल्याला जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि कोणत्या ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये आपला लुक जास्त ट्रेण्डी दिसतो , हे (रंग आणि आपलं अस्तित्व यांचं ) नातं स्त्रियांच्या स्मृतिकोशात अधिक घट्टपणे विणलेलं असतं ….. आणि म्हणून रंग हे स्त्रियांसाठी केवळ रंग नसतात तर त्या रंगांना आठवणींचे गंध असतात .

अनेक प्रथितयश , मान्यवर चित्रकारांशी माझी मैत्री आहे …. इतर सामान्य माणसाच्या तुलनेत त्यांची संवेदनशीलता खूपच जास्त असल्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे …. कदाचित याच टोकदार संवेदना त्यांच्या रंगांना अधिक उठाव देत असाव्यात !! रंगांचं हे विश्व खूपच विस्मयकारक आणि गहिरं आहे यात शंकाच नाही . त्यातले दोन रंग माझ्या वाट्याला थोडे कमी आले इतकंच. पण म्हणून फार काही बिघडलं नाही. हे दोन रंग सोडले तरी इतर रंगांनी आयुष्य समृद्ध केलं. त्यातलं चैतन्य अनुभवता अनुभवता असीम आनंद मिळाला.

या लेखाची समाप्ती करायला…..
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा
या भट साहेबांच्या ओळी पुरेशा आहेत एवढं मात्र नक्की !!

मयूरेश गद्रे
गद्रे बंधू , डोंबिवली
२५ फेब्रुवारी २०२६
९९३०९७७७४६

(विशेष तळटीप : या लेखातील शास्त्रीय माहितीसाठी रंगविज्ञान तज्ज्ञ डॉ. सौ. अमृता जोगळेकर आठवले (Phd) यांची बहुमोल मदत झाली.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..