गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’

'Pyasa' by Gurudatta - Is it a Copy of 'Chor Bajar' by Ga Di Ma ?

पंचवटीच्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते. फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या. त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले, ‘या गुरुदत्तजी!’.

हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता ‘गुरुदत्त’ आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते, ‘माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखेंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरी हो तो बताईयेगा’ गदिमा ‘जरुर गुरुदत्तजी’ इतकंच म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली.

‘एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी किंमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्या पायर्या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो….

‘गदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्यावर संतुष्टीचे भाव स्पष्ट दिसत होते…’वा माडगूलकरजी बहोत खूब’,असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वतःचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, ‘माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही है,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म के लीए लिखिये’.

मराठी चित्रपटातून गदिमांची दिगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता!.
गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही “मसालेदार” बदल सुचवले.आपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एकदा सीता-स्वयंवर चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क ‘माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया’ म्हणताच,गदिमांनी त्याचे थोबाड ज्या पद्धतीने रंगवीले असेल याची कल्पना न केलेलीच बरी!, तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगितले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही!

आपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेल ती तडजोड त्यांनी कधीच केली नाही.

एका कवितेत ते म्हणतात

‘गीत हवे का गीत?,
एका मोले विकतो
घ्यारे विरह आणखी प्रित!……
‘याच कवितेत शेवटी म्हणतात’
मी हसण्याने तुमच्या हसलो
बोलू नये ते गूज बोललो,
तुमच्या दारी रोजच बसणे
माल मला खपवित..
गीत हवे का गीत?’

पुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट ‘प्यासा’ अशी पोस्टर्स झळकली,’प्यासा’ ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधीच दिले नाही, गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते ‘प्यासा’ आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा ‘जोगीया’ हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची ‘चोर बाजार’ नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती ‘प्यासा’ ची कथा आहे, इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्या एका कवितेत मिळेल!

मराठी चित्रपटसृष्टीचे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या ‘अमिताभ बच्चन’ व ‘राणी मुखर्जी’ यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.गदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ,पण ‘प्यासा’ च्या गुरुदत्तना सुद्धा ‘चोर बाजार’ करावासा वाटला हे दुदैव!’

1 Comment on गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’

  1. नमस्कार.
    ग. दि. मां. नी प्यासा ची कथा दिली होती, ही माहिती नवीन आहे, व नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे.
    – मात्र, वेळोवेळी सांगतलें जातें , व लिहिलेंही गेलेलें आहे की, गुरुदत्तचा प्यासचा नायक हा मुळात चित्रकार दाखवला जाणार होता. पण गुरुदत्तनें साहिर लुधियानवींच्या तल्ख़ियाँ या संग्रहातील कांही काव्य ऐकलें व त्याला तें आपल्या सिनेमात सामील करावेसें वाटलें. म्हणून त्यानें आपल्या नायकाला चित्रकाराऐवजी शायर बनवलें. प्यासाची गीतें साहिरनेंच लिहिलेली आहेत.
    – या दोन्ही माहित्यांची सांगड कशी घालायची , तें कळत नाही.
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..