नवीन लेखन...

प्रारब्ध – भाग 3

आजोबांनी करसनकडे फक्त एकदाच पण रोखून पाहिले. काही बोलले नाहीत. पण त्या एका नजरेनेच करसनला जणू कोणी कानफटात मारल्यासारखे वाटले असावे. तो लगेच तिथून पसार झाला.

मिस्त्रीशेटही पहात राहिले, म्हणाले, “अरे आजोबा, मला माफ करा. हे आमचा डिकरा हाये ने करसन, लय खराब हाये. माझ्या मरणाची वाट पहाते साला.

माझा लोखंडनो मोठा धंदा हाये. लय इस्टेट हाय. ते समदे तर याचेच हाय. पन पैसा उडवायचे अने पोरी लोक फिरवायचे ये परीस साला दुसरा काय कामधंदा नाय करीत. नाय तर नाय पन माला, मालाबी काय वाट्टेल ते बोलते. ते पन ठीक हाय पन साला तुमाला बोलते ते माला नाय आवरले. साला मेहमानाला असा बोलते काय? मला माफ करा.’

आजोबा फक्त हसले. म्हणाले, “मालक जाऊ द्या. अजून पोरवय आहे. समजेल हळूहळू.” शेटजींनी चहाचा आग्रह केला. पण आजोबांनी नम्रतेने नाकारला आणि आम्ही तिथून घरी आलो.

मग आजोबा दोन-तीन दिवस गावी जाऊन आले. येताना कसली कसली मुळं, पाला वगैरे घेऊन आले. आल्या आल्या दोन दिवस खपून त्यांनी दोन काचेच्या मध्यम आकाराच्या बरण्या भरून काळ्या आणि लाल रंगाच्या दोन भुकट्या बनवल्या. मला घेऊन ते मालकांकडे आले. त्या बरण्या दिल्या आणि एक तेलाची बाटलीही दिली. म्हणाले,

“मालक, हे औषध सकाळी एक चमचा लाल भुकटी आणि रात्री एक चमचा काळी भुकटी, कपभर दुधात टाकून घ्यायची. भुकटीला हात लावू नका. लागला तरी घाबरू नका. हाताची थोडा वेळ खाज सुटेल, बाकी काही त्रास नाही. आणि या बाटलीतले चार थेंब तेल आंघोळ झाल्यावर गुडघ्यांना हळूहळू चोळायचे. औषधं घेताना कोणाही साधूचे नाव घ्यायचे. तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचे नाव घेतले तरी चालेल. अमुकच एकाचे घ्या असे नाही. हे एक वर्षाचे औषध आहे. आणखी दोन वर्षाचे मी परत येईन आणि देईन.

मालक आजोबांना आत बेडरूममध्ये घेऊन गेले. मी पण त्यांच्या मागोमाग गेलो. आत एका साधूचा फोटो होतो. “आजोबा, हे संत मेहेरबाबा, यांचे नाव घेतला तर चालनार काय?”

आजोबांनी नमस्कार केला. म्हणाले, “शेट हे फार मोठे संत आहेत. त्यांचे नाव घ्या. चालेल. येतो मी.” बाहेर आल्यावर म्हणाले, “मनोहर चल. मालकांनी चहा घ्या म्हणून आग्रह केला पण त्यांनी घेतला नाही. किती पैसे द्यायचे म्हणून विचारले तर म्हणाले, “मालक, ही मेहेरबाबांची सेवा आहे. मला माफ करा.” शेटना नमस्कार करून आम्ही घरी आलो.

त्यानंतर बरोबर एक वर्षांनी मी आजोबांबरोबर होरमस मंझीलची लिफ्ट पकडली. तिसऱ्या मजल्यावर स्वत: होरमस शेटनीच आमचे स्वागत केले. आजोबांचे हात हातात गच्च पकडून जोरजोरात हलवत म्हणाले. “ग्रेट! ग्रेट! अरे मी तर आता चांगला चालते. फेक्टरी मंदी पण जाते. तुमी तर लय कम्माल केली!”

आजोबा म्हणाले, “मालक ही सारी कृपा तुमच्या मेहेरबाबांची. मी काही केलं नाही. बरं ही घ्या पुढची औषधं.” म्हणून दोन मोठ्या बरण्या आणि एक मोठी तेलाची बाटली त्यांना देऊन आम्ही निघालो.

आणि एक आश्चर्य घडले. होरमसनी आजोबांचे चक्क पाय पकडले. “आजोबा आज मात्र मी तुम्हाला काहीतरी घेतल्या बिगर जाऊन देनार नाय.” आजोबा हसून म्हणाले, “मालक, उठा, उठा हे बरे नाही. माणसाने माणसाचे पाय धरायचे नसतात. तो अधिकार फक्त मेहेरबाबांसारख्या साधुपुरुषांचा आहे. आपण फक्त निमित्त मात्र. चला. मेहेरबाबांचा प्रसाद म्हणून थोडं दूध द्या. मी तेवढे घेईन.’

मालकांच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले. त्यांच्याकडून दूध घेऊन आम्ही बाहेर पडलो.

त्यानंतर मिस्त्री शेट स्वत:च कधीतरी येऊन आजोबांना भेटून जायचे. त्यांना आमच्या घराचा फारच लळा लागला होता.

शेट आठवणीने आम्हाला त्यांच्या सणाला पपेटीला पार्टीला बोलवायचे. सगळ्यांचा खूप आदर सत्कार करायचे. मुलांचे लाड करायचे, पण या व्यतिरिक्त आजोबांनी त्यांच्याकडून कधी एक पैसाही घेतला नाही.

पुढे आमच्या वडिलांची पुन्हा बदली झाली आणि आम्ही भायखळ्याची जागा सोडून लांब अमरावतीला गेलो. मी मात्र कॉलेजसाठी मुंबईलाच हॉस्टेलवर राहिलो. आम्हाला मिस्त्रीशेटनी एक जंगी पार्टी दिली. पण जेव्हा आम्ही घर सोडलं तेव्हा मालक परदेशात त्यांच्या नवीन कारखान्याच्या कामासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचा निरोप न घेताच घर सोडावे लागले याची तेव्हा फार चुटपुट लागली होती. असो.

त्या पारशाने, माझं नाव करसन आणि माझे वडील होरमस मिस्त्री असं सांगताच माझ्या डोळ्यासमोरून या तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणी तरळून गेल्या. होरमस शेटजींचा प्रेमळ हसरा चेहरा आठवून मला खूप वाईट वाटले.

असो. हे सर्व आठवले. हा जुना इतिहास झाला. पण आता हा होरमसशेटचा दिवटा मुलगा माझ्याकडे कशाला आला असावा ते मला कळेना. कदाचित त्यालाही गुडघेदुखी झाली असावी आणि आमच्याकडे ते औषध अजूनही मिळत असावे असे तर त्याला वाटत नसावे ना?

मी म्हणालो, “करसनशेट, माझे आजोबा वारले. आता आमच्याकडे जडीबुटी औषधे देणारे कुणी नाही. त्यासाठी आला असाल तर आता मी काही तुमची मदत करू शकणार नाही.”

“अरे नाय नाय जोगदंडसाहेब, तेच्यासाठी नाय आला आमी. अरे आमचे बापाने मरताना विल केला हाय. अन् तेचे मंदी आमची खंडाल्याची समदी प्रॉपर्टी तुमचे आजोबांचे नावाने केली हाये. अने ते नसेल तेंचे नातू मनोहर याने के तुमी यांना देणेत यावी असा लिवला हाये. ते बी नसेल तर तेचे जे कोन वारसदार असेल तेनला देणेत यावी असा लिवला हाये. आमचा बाप तर साला वेवारशून. तुमचे आजोबांनी तेनला काय साला जडीबुटीची दवा दिला आणि तेच्यासाठी साला काय येवढी मोठी प्रॉपर्टी देते काय? तद्दन मुरख! हे बघा जोगदंडसाहेब, तुमचे दवाचे काय किंमत असेल ते सांगा. मी ते देते. पन हे प्रोपर्टीचे पेपर मी आनले हाय तेचेवर सही करूनशान मला मोकला करशो. तुमचे नाव अने अड्रेस शोधायला मला लय तरास इयाला. आता तुमची बोली बोला अने मला ताडाताडी मोकला करशो.

त्याचे बोलणे ऐकून तर सुन्नच झालो. माझी बायको पण ते ऐकत होती. आम्हाला तर काय बोलावे तेच सुचेना. अगदी अकल्पित.

शेवटी मी थोडा विचार करून म्हणालो,

“करसनशेट तुमच्या वडिलांनी जरी भावनेच्या भरात जाऊन असे काही केले असेल तरी माझ्या आजोबांनी त्यांच्या एका पैशालाही हात लावला नसता हे मला माहीत आहे. असे असता तुमची एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी कधीच घेतली नसती आणि मलाही मोह नाही. तेव्हा तुमच्या कागदपत्रांवर सही करायला मला काहीच हरकत नाही. औषधांच्या किंमतीबद्दल बोलायचे तर त्यांनी ती विकत दिली नव्हती. त्यामुळे त्यांची किंमत सांगता येणार नाही. फक्त माझी एक विनंती आहे ती तुम्ही मानाल का?”

“हां हां जोगदंडसाब, बोला बोला काय विनंती हाय?”

“करसनशेट, मला एकदा ती प्रॉपर्टी पहायची इच्छा आहे. दाखवाल का?”

हे ऐकून करसन जाम खुश झाला. इतक्या सहजासहजी आपले काम होईल असे त्या लोभी माणसाच्या स्वप्नातही आले नसते. त्याने खुषीत येऊन खिशातून एक चपटी, अत्यंत नाजूक सोनेरी नक्षीकाम केलेली चांदीची अत्यंत नाजूक डबी काढली. तिच्यावर टकटक केले. बाजूने दाबले तसे तिचे झाकण उघडले. त्याने त्यातून एक चिमूटभर पावडर दोन्ही नाकपुड्यात भरली आणि दीर्घ श्वास घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आले की तो तपकीर ओढतोय ते! अलीकडे तपकीर ओढणारे फारसे कुणी दिसत नाही. मला तर तपकीर ओढणारी माणसे मुळीच आवडत नाहीत.

असो. मी त्या डबीकडे निरखून पाहत आहे हे पाहून करसन म्हणाले, “जोगदंडसाहेब, नवीन कारखानाचे कामासाठी माझा बाप पेरीसला गेला होता.

तवा तेने असा तीन डीब्या आनल्या होत्या.” असे म्हणून त्याने ती डबी माझ्या हातात पहायला दिली. खरोखरच अति नाजूक आणि सुबक, माझ्या बायकोने पण ती हातात घेऊन कौतुकाने पाहिली. म्हणाली, “कुंकू ठेवायला किती छान आहे नाही?”

डबी परत केली तेव्हा तो म्हणाला, “मंग कदी जायाचे खंडाल्याला?”

“उद्या गुरुवार, माझा उपवासाचा दिवस. तो झाला की कधीही चालेल.” मी.

करसन तर आनंदाने वेडा व्हायचेच बाकी होते. तो म्हणाला, आपून शनिवार/रविवार खंडाल्याची ट्रिप करू या.” त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. मला पण वाटले जेवढे लवकर हे प्रकरण मिटेल तेवढे बरे. माझ्या आजोबांनी करसनच्या वडिलांना औषध दिले होते ते काही चार पैसे कमवायचे म्हणून नव्हे हे मला माहीत होते. कारण ते सर्व माझ्या समक्षच झाले होते. त्याच्या वडिलांनी केवळ कृतज्ञतेच्या भावनेतून ही इस्टेट आमच्या नावावर केली म्हणजे ती घ्यायची हे काही योग्य नाही वाटले मला. आणि आजोबा असते तर त्यांनीही त्याला कधी मान्यता नसती दिली. साधा चहा घ्यायचे नाव नाही तर इस्टेट तर दूरच! बायको पण म्हणाली, “काही नको आपल्याला असली माया!’

-विनायक रा अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..