प्रभो शिवाजी राजा – पूर्वार्ध

स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा निसर्गदत्त अधिकार आहे, आणि या पवित्र अधिकाराचा अपहार करू इच्छिणाऱ्या, जुलमाचा उच्छेद करणे हे प्रत्यकाचे निसर्गदत्त कर्तव्यच आहे. व्यक्तीची राष्ट्राची नि मनुष्य जातीची प्रगती होण्याकरता, चैतन्याची आवश्यकता असते. जिथे स्वातंत्र्य नसते तिथे चैतन्य असणे शक्य नाही.

—- जोसेफ मॅझिनी. (इटालीयन क्रांतिकारी)

स्वातंत्र्य या शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास, स्व-तंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्राचे वापर करू शकणारी, समाजव्यवस्था म्हणजे स्वतंत्र समाजव्यवस्था असे म्हणता येईल. हे स्वातंत्र्य केवळ राजकीयच असावे असे काही नाही. उपरोक्त विधानानुसार मॅझिनी म्हणतो तसे पारतंत्र्यात चैतन्य नसतेच; असते ते फक्त नैराश्य, वैफल्य आणि स्वत्वाची होणारी अवहेलना.

सुमारे ३५० वर्षांपूर्वी या अश्याच वैफल्याच्या, पारतंत्र्याच्या, नैराश्येच्या अंधारलेल्या गर्तेत जाऊन हिंदुस्थान स्वत्व हरवून बसला होता. चैतन्यहीनतेच्या अंधकारात धडपडत होता ठेचकाळत होता. पण कोणत्याही रात्रीनंतर पहाट ही उगवतेच, निशेच्या गर्भातूनच तर उषेचा जन्म होत असतो.

आणि तो सुवर्ण दिन उगवला, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ही तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630 ) , महाराष्ट्र देशी अंजन कांचन करवंदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये शिवनेरीगडावर एका क्रांती सूर्याने जन्म घेतला. खरे तर त्यांचे नाव वेगळे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण नाव लक्षावधी मनुष्यमात्रांच्या हृदयसिंहासनीं अत्यंत आदराने विराजमान आहे, परंतु  ते नांव उच्चारताना आपणही त्याच पवित्रतम मराठमोळ्या भूमीत जन्माला आलो याची सार्थ कृतार्थता वाटते, आपल्या नश्वर आणि क:श्चीत आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.

म्हणूनच ते नांव सांगावेसे वाटते. ते नांव म्हणजे “ छत्रपती शिवाजी महाराज….

शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज.

सर्वप्रथम अवघ्या हिंदुस्थानचे आद्य क्रांतीदैवत असणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा

महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानमध्ये जेंव्हा जेंव्हा क्रांतीचा उद्घोष केला गेला तेंव्हा तेंव्हा त्या क्रांतिकारकांनी शिवरायांकडून नक्कीच प्रेरणा घेतली होती.

महाराजांचे रणशौर्य जसे अद्वितीय होते, तितकेच त्यांचे बुद्धीचातुर्य देखील अलौकिक होते. महाराजांचा गनिमी कावा हा इतका बिनतोड होता की त्यामुळे शत्रूचे बल कितीही अवाढव्य असले तरी, शिवरायांच्या मूठभर मावळ्यांपुढे ते अगदीच दुर्बल ठरे.

रोहिडेश्वरी शपथ वाहिल्यानंतर तब्बल ३० वर्षे झाली, महाराज आणि त्यांचे साथीदार (एका अर्थाने अनुयायीच म्हणा ना) अहोरात्र झुंझत होते, आपल्या अतुलनीय पराक्रमाने, असामान्य कर्तृत्वाने, अलोट त्यागाने, अलौकिक निष्ठेने, अचाट उद्योगाने आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षेने या मराठीचीये नगरी नंदनवन वसवलं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याना स्वर्गाचे रूप आणलं एक अभूतपूर्व क्रांती घडवली.

महाराजांपूर्वी ३५० वर्षे याच महाराष्ट्रात देवगिरीवर असेच सुखी समाधानी राज्य होते, पण सुलतानांनी त्याचा सर्वनाश केला, माणसांची मनेचं मारली, गुलामगिरी मध्ये धन्यता मानावयाच्या त्या दिवसात महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी घातलेला घाट म्हणजे स्वतःच्याच जीवावर स्वतःहुन संकट ओढावून घेणे.

पण महाराजांनी हे शिवधनुष्य उचललं, पेललं महाराज म्हणजे विश्वविधात्याचा अपूर्व चमत्कारच, अवघ्या ३० वर्षांत सृष्टीचं बदलून टाकली. धर्म, मंदिरे, भाषा, संस्कृती, स्त्रिया, मनुष्यमात्र, शेतीवाडी, गोधन यांना महाराज आश्रयो जाहले.

त्यांनी मेलेली मने जिवंत केली, हाती नांगर धरणारे पाहता पाहता स्वराज्याचे शिलेदार झाले, साधुसंतांना बिनघोर ईश्वर भक्ती करता येऊ लागली, गोर गरिबांची लग्ने निर्विघ्न पार पडू लागली.

एकीकडे महाराजांनी रयतेवर मायेचे छत्र धरले होते तर दुसरीकडे गनिमांवर समशेर धरली होती, महाराजांच्या कीर्तीचा डंका दिल्लेश्वराच्या कानी पडत होता, दिल्लीपती आलमगीर औरंगझेबाच्या अंगाची लाही लाही होत होती. आदिलशाहीची स्थिती पण काही वेगळी नव्हती. मनातल्या मनात त्यांनी महाराजांचे राज्य मान्यच केले होते, महाराजांचा दरारा या ३० वर्षात एवढा वाढला होता कि त्यांच्याशी टक्कर म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण हे सूत्रच होऊन बसले होते.

राजियांच्या यशोकीर्तीचा नगारा पार सातासमुद्रापार वाजला, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आदी समुद्रापल्याडच्या राजवटींनी देखील महाराजांची दखल घेतली होती. आजच्या भाषेत ज्याला “ग्लोबल” होणे म्हणतात, तसे महाराज त्यांच्या हयातीतच ग्लोबल झाले होते. एकंदरीतच महाराजांच्या शत्रूची अवस्था अशी झाली

सरित्पतीचे जल मोजवेना ! माध्यानीचा भास्कर पाहवेना

मुठीत वैश्वानर बांधवेना । तैसा शिवप्रभू जिंकवेना |

 

महाराजांच्या सैन्याचे, युद्ध आवेशाचे वर्णन करताना, कविराज भूषण म्हणतात,

साजि चतुरंग सैन अंग में उमंग धरि सरजा सिवाजी जंग जीतन चलत है

भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी-नद मद गैबरन के रलत है ।

ऐल-फैल खैल-भैल खलक में गैल गैल गजन की ठैल –पैल सैल उसलत है

तारा सो तरनि धूरि-धारा में लगत जिमि थारा पर पारा पारावार यों हलत है ।।

“अर्थ : शूर शिवाजी आपले चतुरंग सैन्य म्हणजे हत्ती, घोडे, रथ, पायदळ तयार करून वीरोचित उत्साहाने, घोड्यावर बसून युद्ध जिंकण्यास निघाले आहेत. नगाऱ्यांचा भयंकर ध्वनी होत आहे, उन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून वाहणारा, मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे. सैन्याच्या खळबळीतुन देशभर गल्लोगलीतून कल्होळ माजून राहिला आहे. सैन्याच्या खळबळीने आणि हत्तीच्या रेटारेटीने उडत असलेल्या धुळीने आकाश इतके भरून गेले आहे कीं, एवढा मोठा सूर्य पण एखाद्या लहानशा ताऱ्याप्रमाणे भासत आहे. समुद्रतर ताटात धावणाऱ्या पाऱ्याप्रमाणे इकडून तिकडे धावत आहे.”

थोडक्यात महाराजांच्या सैन्याचा आवेश, उत्साह हा शत्रूच्या मनात धडकी बसवणारा होता, पण असे असूनही कोणत्याही प्रसंगी रयतेच्या गवताच्या काडीलाही सैन्याने कधी स्पर्श केला नाही.

” वरं जनहितं ध्येयं ” म्हणतात ते हेच………

महाराजांनी अनेकवेळा बृहत्पराक्रम करून देखील, महाराज आपल्या राज्याला श्रींचे राज्य असेच संबोधत. इंग्रजी भाषेत ज्याला “ डाऊन टू अर्थ ऍटिट्यूड ” असे म्हटले जाते, ते हेच. असे असूनही महाराजांनी कधीही आपला स्वाभिमान सोडला नाही. औरंगजेबाच्या दरबारात जेंव्हा त्यांची मानखंडना झाली तेंव्हा परिणामाची क्षिती न बाळगता, औरंगजेबाला खडे बोल सुनावून महाराज भरल्या दरबारातून निघून आले तो आग्राभेटीचा प्रसंग सर्वांनाच ज्ञात आहे.

स्वाभिमानी करार आणि निर्लज्ज लाचारी” यातील नेमका भेद, महाराजांना ठाऊक होता म्हणूनच जेंव्हा कधी तह करण्याचे प्रसंग आले, तेंव्हा त्यांनी प्रसंगी दौलत पणाला लावली परंतु आपले सैन्य, रयत, धर्म यांबाबत कधीच तडजोड केली नाही.

महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील परंतु लेखनविस्ताराच्या भयास्तव केवळ काही मोजकेच पैलू लेखाच्या उत्तरार्धात देत आहोत.

— श्रीपाद श्रीकांत रामदासी

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 6 Articles
मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नोकरी करतो. विविध प्रकारच्या लेखनाची आवड असून, चरित्रात्मक लेखनात विशेष रस आहे. काही कविता देखील केल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…