नवीन लेखन...

पूर्णविराम (कथा)

‘आता या वेळेला, माझ्याकडे कोणी आलं तर सरळ सांगून द्या शेटजी घरी नाहीत म्हणून.” असं वाक्य म्हणून रामजी शेठ आतमध्ये चालले तोवर दारातून हाक आली, “रामराम शेठजी! बरं झालं भेटलात ते! तुम्ही भेटाल की नाही अशा शंकेतच आम्ही आलो होतो.”

“या, याऽऽ याऽऽऽ” असं तोंडदेखलं म्हणत शेठजी सोफ्यावर बसले. आलेली माणसं समोरच्या गालिच्यावर खालीच बसली. दिवाळी जवळ आली रे आली की शेटजींचा मूड खराब व्हायचा. रामजी शेठ तसे माणूस म्हणून चांगले पण पैसा हातून जाणार म्हटलं की तळमळ करायचे. गणपती, नवरात्राला वर्गणी देऊन झाली की पाठोपाठ दिवाळीचे खर्च. ज्याला त्याला अख्ख्या पगाराइतका बोनस द्यायचा. अनेक मासिकांना हाफ पेज, फुल पेज जाहिराती द्यायच्या. सौ.ची ओंजळ खुलीच असते. कोणी मोठा प्राणी घास घ्यायला उभा आहे असाच त्यांना भास होत असे.

त्यामुळे आता आलेली माणसं खरंतर नवीन चेहऱ्याची होती तरी इकडचं तिकडचं काही न बोलता शेठजींनी थेट प्रश्न विचारला, “बोला, काय मागायला आलात?”

आदिवासी क्षेत्रातून आलेली माणसं एकमेकांकडे टकामका बघायला लागली. ती एकदम गोंधळून गेली. शहरात यायचं म्हणून त्यातल्या त्यात स्वच्छ कपडे त्यांनी जरी घातले होते तरी त्यांचे बोलणं, बसणं, कपडे, रंग, बावरलेपणा यांची आदिवासी खूण दाखवत होती. पण एक निश्चित की त्याच्या प्रत्येकाच्या मुखावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता. जिद्द होती. कोणत्याही परिस्थितीला आम्ही तोंड देऊ शकतो याची खात्री होती. ही गोष्ट शेठजींच्या नजरेतून सुटली नाही.

पुन्हा तेच म्हणाले, “बोला, का आला आहात?”

त्या चार-पाच जणांपैकी एकजण दहावीपर्यंत शिकलेला होता. त्याचं नाव होतं सुखा. तो म्हणाला, “शेठजी, तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. आम्ही आज अडचणीत आहो असे म्हणत नाही. कारण आम्ही सारखेच अडचणीत असतो. ती नसली तरच चैन पडत नाही.”

“आता काय हवंय तुम्हाला?”

आढेवेढे न घेता त्यांच्यातला एकजण बोलून गेला, “आम्हाला दोन-निदान एकतरी सायकल हवी आहे.

“एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. आपापल्या झोपडीपुढे असलेल्या जागेत छोटं-मोठं उगवतं. कोणीच लक्ष देत नाहीत. जगावं कसं? हाच प्रश्न, उठल्यापासून डोळ्यासमोर येतो. घरातल्या दोन बायका मिळून एक धड लुगडं अशी परिस्थिती आहे. हवंतर एकदा येऊन बघा म्हणजे पटेल. गावात कोणाला काही पाड्यावर झालं तर डॉक्टरला बोलवायला जायला सायकली देखील नाहीत. जरा बऱ्या लोकांकडे दोन-चार आहेत. पण त्यांची ऐट, त्यांचा तोरा सांभाळावा लागतो. म्हणून म्हटलं की तुम्ही आमच्या ‘गिरिजा आदिवासी केंद्रा’ला दोन सायकली द्याव्यात.” त्याच्या बोलण्यानं वातावरण सुन्न झालं. शेटजींना वाटलं अशी गाऱ्हाणी कितीजण आणतात. १३५ कोटी जनता तितक्याच अडचणी, मी कोणाला कोणाला पुरे पडणार! आतातरी आपल्याला पैसा देणे शक्य नाही असे स्पष्ट उत्तर ऐकूनसुद्धा ‘सुखा’ शांतच होता. बहुधा ‘नाही’ या शब्दाशी त्याची फारच जवळीक होती. ‘होय’ म्हटलं असतं तरच खड्यात तांदूळ मिळाला असं वाटलं असतं. अत्यंत निर्विकारपणे ‘मोठ्या आशेनं या लोकान्ला इथपर्यंत ट्रकमधून आणलं आता बघतो नाहीतर एस.टी.नं जाण्याइतके पैसे आहेत का बघतो. नाहीतर दोन पायाची सायकल!”

असं बोलतानाही कोणाच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. आजन्म काटे टोचणाऱ्याला आणखी एक काटा. विशेष काय?

ती माणसं परत गेली. शेटजींना थोडासा का होईना अहंकारच होता की, किती माणसं आपल्याकडे येतात! पण त्यांच्या विचाराला लगेचच सुरुंग लागणार याची त्यांना कल्पनाही नव्हती. कारण दुसऱ्या क्षणाला पत्नी आतून ओरडलीच म्हणा ना,

“झाली का लोकांना मदत करणं? आपल्या सोनीला दिवसभर ताप आहे त्याच्याकडे लक्ष तरी आहे का? डॉक्टरांकडे जायला हवं. पण आता रस्त्यावर गाडी कशी काढणार? सगळीकडे बंद आहे ना? ड्रायव्हरपण नाही. आपलीच रिक्षाही आहे. पण जाणार कसे? जरा लक्ष तरी घाला.

करोनामुळं बाहेर पडणं शक्य नव्हतं. शिवाय डॉक्टरांकडे नेले तर ते लगेच म्हणणार, कस्तुरबा हॉस्पिटलला चला. रिपोर्ट यायला दोन दिवस! ‘करोना’ पॉझिटिव्ह असला तर पोरगी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये! शेटजींचं डोकं गरगरायला लागलं. म्हणाले, “अजून कडक बंदी नाहीये. योग्य कारणाला पोलीस सोडत आहेत. तशी ये-जा चालू आहे. आताच चार माणसं एकत्र आली नाहीत का? अजून लोकलपण चालू आहेत.”

रीक्षानं न्यायचं ठरलं पण सोनीनं भोकाडच पसरलं की “बाबा, मी रिक्षेनं येणार नाही. थंडी वाजते. मी आले तर आपल्या कारनेच येणार.” क्षणाक्षणाला प्रकृतीमुळे सोनीचा ताप आणि रडं वाढतच होतं. शेवटी शेठजीनं ठरवलं की शेजारच्या बंगल्यातल्या इन्स्पेक्टरना फोन करू आणि मग स्वत:च गाडी घेऊन जाऊ. इन्स्पेक्टरने हिरवा कंदिल दाखविला.

आणि सोनीला घेऊन ते हॉस्पिटलला निघून गेले. नवरा-बायको दोघेही मनातून घाबरले होते. नशिबाने डॉक्टरने तपासून सांगितले, “घाबरू नका. करोनाची लक्षणे नाहीत. सर्दी-खोकला नाही. श्वसनाला काहीच त्रास नाही. मी औषध देतोय. चोवीस तासात ताप उतरेल. नाहीच उतरला तर बघू. पण ती वेळ येणार नाही. एक बरे केलेत की तिला कारने घेऊन आलात.”

परीक्षेचा निकाल ‘फर्स्ट क्लास’ने पास झाल्याचा आनंद पत्नीच्या चेहऱ्यावर होता. पण शेठजी मात्र आतून हलले होते. तो ‘माणुसकीचा गहीवर’ होता. ते पत्नीला कळणे शक्य नव्हते. ते तिघे घरी आले.

“जरा विश्रांती घेतो,” म्हणून शेठजी झोपायला गेले. डोळ्यावर झोप होती पण डोळे मिटत नव्हते. आपण कुठेतरी चुकतोय किंवा चुकलोय, याचे शल्य टोचत होते. आपली मुलगी रिक्षानेही यायला तयार नाही म्हणून आपण तिला कारने घेऊन गेलो. ‘सुखा’च्या पाड्यात डॉक्टरच नाही. मौजे जंगलपाड्यात कोण येणार? तिथे तर कोणी यायलाच तयार होणार नाही; होतही नाही असे सुखा सांगत होता. कशावरून अतिशयोक्ती नसेल? काय करावं? एकदा प्रत्यक्षच बघून यावं का? खात्री तरी पटते का ते पहावं. चार दिवसांनी लॉकडाऊन’ उठेल असं वाटतंय कारण आपल्या जिल्ह्यात एकही करोनाची केस नाहीये. आठ दिवस गेले. लॉकडाऊन उठला. मुलीलाही बरं वाटलं. आणि शेठजीनं ठरवलं की आपण ड्रायव्हरला घेऊन जव्हारपासून काही मैलांवर असलेल्या ‘मौजे’च्या पाड्यावर जायचंच. खरं-खोट्याचा निकाल तरी लागेल.

शेठजी ‘रंगा’ ड्रायव्हरला घेऊन एक दिवस ठरल्याप्रमाणं निघाले.  जव्हारला पोहोचायचंच. ३-३।। तास लागले. पुढचा रस्ता कसा होता हे सांगायला शब्दच नाहीत. डांबरी तर सोडाच पण साधा सरळ नाही. संपूर्ण खडकाळ, वेडावाकडा. या लोकांच्या जिंदगीसारखा! ५-७ मैल गेल्यावर थोड्या थोड्या अंतरावर तरुण मुलं उभी असलेली दिसली. तर समजलं की पाड्यावरचा मुलगा ताप, खोकल्यानं हैराण आहे. जगेल असं वाटत नाही. डॉक्टरकडे न्यायचंय, ते वर्षाचं मूल हातात घेऊन एकजण पळत पळत येऊन दुसऱ्याच्या हातात देतोय, तो तिसऱ्याच्या हातात. कारण एकट्याला १०-१५ मैल पळत जाणं शक्य नाही. जणू रीलेच चालला होता. “मी मुलाला नेतो गाडीतून,” असे म्हणायचेही त्यांना सुचले नाही. शेठजी मनानं आणि तनानं बधीर झाले होते. गाडी पुढं नेली तर वर्दळ जाणवली. विवाहाचं चित्र दिसलं. रेकॉर्डस् नाहीत, सळसळणारे पदर नाहीत, दागिन्यांचा बडेजाव नाही पण चेहरे फुललेले आणि मने मात्र उमललेली दिसली. वधूला ना हेअरड्रेसर ना मेकअप. गळ्यातले चार काळे मणी आणि मुखावरची लज्जा हेच दोन अलंकार होते. तो सामुदायिक विवाह होता आणि सुखाचीच लगबग दिसत होती. शेठजी दूर उभे राहून पाहत होते. सुखा त्यांना समुपदेशन करीत होता. सर्वच अल्पशिक्षित, लिहायला वाचायला न येणारेच जास्त. भात, नागलीची शेती करणारे, बाहेरच्या जगाशी संबंध नाहीच. अशा अवस्थेत त्यांना व्यसनापासून कसे दूर राहावे? व्यसनाने कुटुंबाची, शरीराची कशी नासाडी होते याची माहिती देऊन सुखाच ‘सुखाची गुरुकिल्ली’ सांगत होता. शेठजी भान हरपून बघत होते. तेवढ्यात त्यांच्याकडे सुखाचे लक्ष गेले. तो खूपच आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होता. तो खूपच आनंदला. आपण नकळत शेठजींचा अपमान केलाय हे त्याच्या गावीच नव्हतं. ‘या शेठजी,’ म्हणून त्याने शेठजींना उतरविले. चहा तरी घ्या म्हणून जवळच्या झोपड्यात नेले. एका पोत्यावर ते बसले. एका तरुण स्त्रिने गुळाचा चहा आणून दिला. तो घेतला. घरात कोण कोण असते असे विचारल्यावर सासू आणि दोन मुले असे म्हणाली. सासूला बाहेर बोलवा ना त्यांना नमस्कार सांगतो म्हटल्यावर सूनबाई आत गेली आणि पाच मिनिटानी सासू बाहेर आली. शेठजी तिच्याकडे बघून आश्चर्यचकित झाले म्हणण्यापेक्षा त्यांचे डोळे विस्फारले. नकळत श्वास कोंडला जातोय असं वाटलं… कारण… सुनेच्या अंगावर जे लुगडं तेच लुगडं सासूच्या अंगावर! बाप रे! माझ्या घरात कपाट उघडलं की बदाबद साड्या अंगावर पडतायत आणि इथे?…

माझ्या घरी रिक्षा नको, गाडी पाहिजे म्हणून मुलगी रडते आणि इथे?…

माझ्या घरी किती कप चहा गार झाला, सकाळीच केलाय, आता प्यायचा नाही म्हणून फेकला जातो आणि इथे?… कशा कशाची तुलना करू? माझी अवस्था राजपुत्र सिद्धार्थासारखी झाली असेच मनोमन शेठजींना वाटलं. ते उठले आणि सुखाला म्हणाले, “माफ कर. मी चार सायकली पाठवून तर देतोच पण ही गाडीही तुमच्या ‘गिरिजा आदिवासी केंद्रा’ला भेट देतोय. पेट्रोल आणि ड्रायव्हरचा पगार मी देतो.”

“शेठजी, शेठजीऽऽ” म्हणून सुखा हाक मारू लागला पण रामलाल पुढे कधीच निघून गेला. एस.टी.ने शेठ मुंबईला आले. चालतच घरी निघाले. अजून त्यांचे मन पाड्यावरच गुंतलं होतं. वाटेत बाबूभाई भेटले, “शेठजी, चालून चालून दमलात वाटतं? आणि चेहरा उतरलेला का?

काय वायदे बाजार का? चालत निघालात?”

“बाबूभाई, आज वायदे बाजारात फायदाच फायदा झालाय पण तो दाखवता येणार नाही. सायकल द्यायला गेलो आणि ड्रायव्हरसकट गाडी ठेवून आलो. मस्त!”

बाबूभाईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि रामलाल शेठच्या चेहऱ्यावर मात्र पूर्णविरामाचा आनंद!

-–माधवी घारपुरे

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या लेखिका माधवी घारपुरे यांच्या लॉटरी ह्या पुस्तकातून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..