नवीन लेखन...

कवी विल्यम वर्डस्वर्थ

कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म ७ एप्रिल १७७० रोजी कॉकरमथ, कंबर्लंड येथे झाला.

विल्यम शेक्सपियर यांच्यानंतर इंग्रजी साहित्यात वर्ड्‌स्वर्थ यांचे नाव आदराने घेतले जाते.

विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांचे आरंभीचे शिक्षण हॉकशीड येथील ‘ग्रामर स्कूल’ मध्ये घेतल्यानंतर केंब्रिजच्या ‘सेंट जॉन्स कॉलेज’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला (१७८७). १७९१ साली ते बी. ए. झाला. तत्पूर्वी, १७९० मध्ये, त्यांनी फ्रान्स, आल्प्स आणि इटलीचा दौरा पायी केला होता. १७९१ साली तो पुन्हा फ्रान्सला गेला. फ्रेंच राज्यक्रांतीचा तो प्रकर्षकाल होता. फ्रान्समधील वर्षभराच्या वास्तव्यात ह्या क्रांतीचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव पडला. फ्रान्समध्ये असतानाच आनेत व्हॅलाँ ह्या युवतीच्या प्रेमात तो पडला. तिच्यापासून त्याला एक कन्याही (कॅरोलिन) झाली. ते आनेतशी विवाह करू शकले नाही; मात्र तिच्यासाठी आणि कॅरोलिनसाठी त्यांना जेवढे करता आले ते सर्व त्यांनी केले. १७९२ च्या अखेरीस तो इंग्लंडला परतला. १७९३ मध्ये ‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या त्याच्या काव्यकृती प्रसिद्ध झाल्या. तथापि १७९३-९५ हा तीन वर्षांचा काळ त्यांनी अत्यंत व्यथित मनःस्थितीत घालविला. इंग्लंडचे फ्रान्सबरोबर सुरू झालेले युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये उसळलेला दहशतवाद ह्यांमुळे त्याला नैराश्य आले. एका मित्राकडून अर्थप्राप्ती झाल्यामुळे १७९५ च्या ऑक्टोबरात डॉर्सेट येथे त्यांनी एक घर घेतले व आपली बहीण डॉरोथी हिच्यासह तो तेथे राहू लागला. डॉरोथी वर्ड्स्वर्थ (१७७१-१८५५) ही स्वतः एक लेखिका होती. ॲल्फॉक्स्डन जर्नल १७९८ व ग्रासमिअर जर्नल्स १८००-०३ हे तिने लिहिलेले रोजनामे तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. वर्ड्स्वर्थच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने हे रोजनामे महत्त्वाचे आहेत. तिची लेखनशैली उत्स्फूर्त आणि पारदर्शक असून सहजता हा तिचा गुणधर्म आहे. तिच्या ह्या रोजनाम्यांतून आलेल्या जिवंत, वेधक निसर्गवर्णनांनी वर्ड्स्वर्थलाही प्रभावित केले होते. आपल्या भावाचे हरवलेले मनःस्वास्थ्य डॉर्सेट येथील घरात त्याला पुन्हा मिळवून द्यावे, ह्यासाठी तिने सर्वतोपरी काळजी घेतली. द बॉर्डरर्स हे आपले शोकात्म पद्यनाटक वर्ड्स्वर्थने येथेच लिहून पूर्ण केले (१७९५-९६). १७९३-९५ ह्या काळातील त्याची निराश मनःस्थिती या पद्यनाटकातून लक्षणीयपणे व्यक्त झालेली आहे. डॉर्सेट येथे राहत असतानाच श्रेष्ठ इंग्रज कवी आणि टीकाकार सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२-१८३४) ह्याच्याशी वर्ड्स्वर्थचा आणि डॉरोथीचा परिचय झाला. पुढे ह्या परिचयाचे घनिष्ट मैत्रीत रूपांतर झाले. वर्ड्स्वर्थ आणि कोलरिज ह्या दोघांच्याही काव्यनिर्मितीला ह्या स्नेहातून चेतना मिळाली. हे दोघे आणि डॉरोथी ह्यांचे एक स्नेहविश्वच तयार झाले. ‘व्यक्ती तीन, पण आत्मा एक’ असे त्यांचे वर्णन केले जाते. कोलरिजच्या जवळपास राहता यावे, म्हणून वर्ड्स्वर्थ आणि डॉरोथी समरसेटमधील ॲल्फॉक्स्डन पार्क येथे राहावयास आली. कोलरिज व वर्ड्स्वर्थ ह्या मित्रांनी आपल्या कविता लिरिकल बॅलड्स ह्या नावाने १७९८मध्ये प्रसिद्ध केल्या. ह्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत कोलरिजच्या एकूण तीन कविता होत्या. दुसऱ्याक आवृत्तीत त्याच्या आणखी दोन कविता अंतर्भूत करण्यात आल्या. ह्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबरोबर इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादाचा उदय झाला, असे मानले जाते. लिरिकल बॅलड्स च्या दुसऱ्या. आवृत्तीला वर्ड्स्वर्थने लिहिलेली विवेचक प्रस्तावना जोडण्यात आली होती. १७९९ च्या डिसेंबरात वर्ड्स्वर्थ आणि डॉरोथी वेस्टमोरलंडमधील ग्रासमिअर येथे राहावयास आली. १८०२ मध्ये वर्ड्स्वर्थने मेरी हचिन्सन ह्या आपल्या शालेय जीवनापासूनच्या मैत्रिणीशी विवाह केला. १७९६ ते १८०६ हा वर्ड्स्वर्थच्या जीवनातील महान कालखंड मानला जातो. त्याची बरीचशी उत्कृष्ट काव्यनिर्मिती ह्याच दशकात झाली. द प्रीलूड (लेखनकाळ १७९९ -१८०५) हे त्याचे काव्य ह्याच दशकातले; वाढत्या कुटुंबाला ग्रासमिअर येथील घर अपुरे पडू लागले, म्हणून १८०८ साली वर्ड्स्वर्थ ॲलनबँक येथे राहावयास आला आणि पुढे १८११ पासून तो रायड्ल माउंट येथेच स्थायिक झाला. १८१३ मध्ये त्याला ‘डिस्ट्रिब्यूटर ऑफ स्टँप्स फॉर द काउंटी ऑफ वेस्टमोरलंड’ हे विनाश्रम पद देण्यात आले. १८४३ मध्ये इंग्लंडचा राजकवी होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला.

‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कवितांवर अठराव्या शतकातील इंग्रज कवींचा प्रभाव दिसून येतो. ‘हिरोइक कप्लेट’ आणि ‘स्पेन्सरिअन स्टँझा’ हे अठराव्या शतकातील लोकप्रिय वृत्तप्रकार होते. वरील दोन्ही कविता ‘हिरोइक कप्लेट’ मध्ये रचिलेल्या आहेत, तर ‘गिल्ट अँड सॉरो ऑर इन्सिडंट्स अपॉन सॉल्झबरी प्लेन’ ह्या आपल्या कवितेसाठी त्यांनी ‘स्पेन्सरिअन स्टँझा’चा वापर केला आहे. शीर्षके, शब्दकळा, वर्णने अशा संदर्भातही वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कविता अठराव्या शतकातील इंग्रजी काव्याच्या संकेतांना अनुसरताना दिसतात; पण अशा कवितांतही आत्मनिष्ठेचा एक समर्थ सूर दिसून येतो. वर्ड्स्वर्थ हा निसर्गकवी असला, तरी मानवाला आणि मानवी जीवनाला त्यांनी निसर्गाइतकेच महत्त्व दिले. निसर्ग आणि मानव ह्यांच्यातील अन्योन्यक्रिया हा वर्ड्स्वर्थच्या उत्कट आस्थेचा विषय होता आणि ह्या आस्थेची चाहूल त्याच्या सुरुवातीच्या कवितांतूनही स्पष्टपणे लागते. निसर्गाचे सौंदर्य आणि त्याची उदात्तता व्यक्तविणाऱ्या अनेक प्रतिमा वरील दोन्ही काव्यांत विपुल आहेत; पण निसर्ग सुंदर असला आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वादही माणसाला घेता येत असला, तरी ह्या जगात माणसाला खडतरपणाचाही अनुभव येतो आणि दुःखही सोसावे लागते, ह्याचे भानही वर्ड्स्वर्थने दाखविले आहे. ‘ॲन ईव्हनिंग वॉक’ मध्ये विपन्नावस्थेतील माता आणि तिची उपाशी मुले ह्यांचे चित्रण आहे. वर्ड्स्वर्थने केलेला आल्प्सचा दौरा हा ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ चा विषय आहे. ही कविता त्यांनी फ्रान्समध्ये असताना, फ्रेंच राज्यक्रांतीच्या वातावरणात लिहिली. परिणामतः तीत राजकीय विचारांचे स्पष्ट सूचन बऱ्याच प्रमाणात दिसून येते, ‘… …सॉल्झबरी प्लेन’ मध्ये हे अधिक दिसते (ह्या कवितेच्या मूळ संहितेत वर्ड्स्वर्थने वेळोवेळी बदल केले. ह्या कवितेचा काही भाग ‘द फीमेल व्हॅग्रंट’ ह्या शीर्षकाने लिरिकल बॅलड्समध्ये प्रसिद्ध झाला. वर्ड्स्वर्थच्या संपूर्ण काव्यसंकलनात ही कविता ‘गिल्ट अँड सॉरो’ ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे).

विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांचे २३ एप्रिल १८५० रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांना आदरांजली.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..