नवीन लेखन...

पिल्लू (कथा)

रविवार सुट्टीचा योग पाहून महाबळेश्वरला जायला सकाळी लवकर कार बाहेर काढली. मी, माझी पत्नी नीता व आमची सात वर्षाची मनाली अर्थात ‘मनी’ असे तिघेच असल्याने सकाळी सहालाच आवरून पुण्यातून निघालो. दोन तासात महाबळेश्वर फाटा गाठायचं ठरवल होतं. हायवेवर सकाळचं ट्रॅफीक देखील कमी होते त्यामुळे वेग ऐंशीच्या पुढेच होता.

कोणत्यातरी गावाचं क्रॉसींग होतं तिथे थोडा वेग कमी झाला पण परत गाडी फोर्थ गिअर मधे घेतली व वेग आणखीन वाढवला. अचानक माझ्या शेजारी को-ड्रायव्हर सीट वर बसलेली मनी स्टिअरींग ला गच्च धरत आणि डोळे मिटत अचानक ओरडली

‘बाब्या..थांब..बघ पिल्लू…आइ गं…’

मी चटकन ब्रेक मारला…आणी पाहिलं तर कुत्र्याचं एक एकदम छोटं पिल्लू आमच्या गाडीसमोर अनाहूतपणे आलं होत..आणि गोंधळून तिथेच थांबलं होतं. माझ्या ब्रेकने मागून वेगात आलेल्या एका स्कॉर्पिओने करकचून ब्रेक दाबत माझ्या जरासच मागे गाडी थांबवली. कुत्र्याचा जीव वाचला पण मी त्यासाठी दोन गाड्यांमधील लोकांचा जीव धोक्यात घातला होता हे मला लक्षात आल आणि ओशाळायला झालं.

मागच्या गाडीतून पांढ-या शुभ्र कपड्यात, समोर ड्रायवर शेजारी बसलेला, इसम उतरला. थोड्या घुश्श्यातच माझ्या खिडकीशी येउन म्हणाला.
‘काय साहेब….सकाळीच आमचा राम नाम सत्य करताय का राव?’

‘नाही… सॉरी म्हणजे.. अचानक ते कुत्र्याचं पिल्लू आलं.. पिल्लू गाडीखाली येउ नये म्हणून… अचानक… ब्रेक मारला… सॉरी रिअली सॉरी..’ मी जरा घाबरतच म्हंटलं.

एक तर स्कॉर्पिओ, त्यात पांढरे कपडे आणि त्याच्या गाडीत चार पाच हट्टे कट्टे लोक..भिती वाटणं स्वाभाविक होतं.

पण मग तो हसला…एखादा मित्र बोलावा तसं बोलला.. ‘साहेब… इतकं जास्त सेन्शिटीव्ह राहू नका या जगात… अहो कुत्र्याच्या पिल्लासाठी तुमचा माजा जीव धोक्यात घालणं बरोबर नाही..

अहो नेहमी प्रवास करतो मी हायवेवरुन.. रोज सात आठ कुत्री मरुन पडलेली दिसतातच गाडीखाली येउन.. आपण आपल्या जीवाची आधी काळजी घ्यायची… काय…? बरोबर का?’

‘होय बरोबर साहेब’.. मी थोडंसं अवसान आणत म्हंटलं.
‘काळजी घ्या… गोड पोरगी आहे तुमची…’ मनीकडे पहात तो म्हणाला, आणि मग ‘चला रे…’ असे आपल्या चेल्यांना म्हणत तो त्याच्या गाडीकडे परत गेला.

मी गाडी साइडला घेतली.

या सगळ्या घटनेला कारणीभूत ते पिल्लू आपण काहीच केलं नाही आशा थाटात हायवेच्या दुस-या बाजूला आता बागडत होतं.
स्कॉर्पिओ गाडी जाईपर्यंत मी थांबलो. मग मात्र इतका वेळ शांत असलेल्या नीताची तोफ धडाडली,

‘बरोबर म्हणाला तो’.. त्या गाडीकडे मान करत ती म्हणाली ‘समीर अरे काय हे.. कुत्र्याचं पिल्लू समोर आलं म्हणून एवढ्या स्पीडमधे असलेली गाडी कोणी हायवेवर थांबवत का? जीव असं धोक्यात घालतं का?’

‘अग पण नीता, मनी ओरडली म्हणून….’ मी बोलायचा प्रयत्न केला पण मला मधेच तोडत ती म्हणाली,
‘अरे त्या स्कॉर्पिओशी टक्कर झाली असती आपली.. कळतय का तुला समीर? अरे मनी लहान आहे.. तिला कळत नाहीत इम्प्लिकेशन्स.. पण तुला कळत ना रे.. असं जीव धोक्यात घालणं चुकीचच आहे ना? तो माणूस मघा म्हणाला तसं, रोज हजारो कुत्री मारतात हायवेंवर, रस्त्यांवर… कुणी विचार करतात का? काय झालं असतं? पिल्लू मेलच असतं ना…? आज ना उद्या ते होणारच आहे.. आपल्या गाडीखाली नाही.. दुस-या एखाद्या गाडीखाली येइल इतकच..’

मी गाडी स्टार्ट केली…आणि नीताला इतकच म्हंटलं

‘पिल्लू मेलं असत तरी मनीला जो धक्का बसला असता त्याचं काय? ती काय एंजॉय करेल महाबळेश्वरला?’

नीतानेही विचार केला की फार ताणलं जातय आणि उगाच हॉलिडे मूड बिघडायला नको म्हणून माझ्या पाठीवर प्रेमाने एक धपाटा मारत ती म्हणाली..
‘चला..मिस्टर सेन्सिटीव्ह..महाबळेश्वरला ब्रेकफास्टच्या वेळेत पोहोचायचय ना’.

एवढा वेळ मोबाइलवर सबवे सर्फर गेम मधे डोकं घातलेल्या मनीने शेवटी तोंड उघडलं
‘बाब्या.. थँक्यू रे.. किती क्यूट होतं ते पिल्लू..’ माझ्याकडे प्रेमाने पहात मनी म्हणाली.

मोबाईल ठेउन देत मग तिने तिचाही तोफगोळा डागला ‘पण त्याचे आइ बाबा पिल्लाला सोडतातच का असे रोडवर? त्यांना काळजी नाही वाटत त्या पिल्लाची?? ते गाडीखाली आलं असतं तर त्याला हॉस्पिटलला कोण घेउन जाइल?’

आता तिला काय उत्तर देणार! मी रिअर मिरर मधे निताकडे पाहिले. ती माझ्याकडे पहात गालातल्या गालात हसत होती.

मनीने मग समारोप केला
‘जाउदे बाब्या.. त्यांना नसेल काळजी तर आपण त्या पिल्लाला आपल्या घरी घेउन जाउ, ओके?’ असे म्हणत तिने फोन उचलला आणि पुन्हा गेम मधे गुंग झाली.

मुलांसारख असं विचारांना ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ करता आलं असत तर किती बरं झालं असतं असा विचार नकळत माझ्या मनात आला.
मी व नीताने मनीच्या शेवटच्या वाक्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत आम्ही सारेच पिल्लू प्रकरण विसरलो होतो. मनीनेही दिवसभर तो विषय काढला नाही. दिवसभरात बरेचसे पॉइंट्स, वेण्णा लेकला एंजॉय करुन व दुपारी मॅप्रोला फ्रेश स्ट्रॉबेरी आइस्क्रीम चा आस्वाद घेतल्यावर संध्याकाळी पाचगणीला सनसेट पाहून आम्ही माघारी फिरलो.

गाडी अजून पाचगणी सोडते तोच मनीने म्हंटलं..
‘बाब्या.. मम्मा.. आपल्याला जाताना ते पिल्लू घ्यायचय.. लक्षात आहे ना दोघांना?’.

यावेळी मी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण नीताने मात्र लगेच मनीला ठामपणे नकार दिला.
‘मनू.. आपण काही कुत्रा वगैरे पाळणार नाही आहोत. रस्त्यावरचं असं पिल्लू घरी उचलून नसत आणायच बाळा… त्यांना काही इन्फेक्शन असेल, डिजीज… म्हणजे काही रोग असेल, तर तो आपल्याला देखील होइल ना?’

मनी देखील आता लढायच्या पवित्रा घेउन होती..
‘मम्मा.. अग पिल्लाला काही झालं तर आपण कुत्र्यांचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे त्याला घेउन जाउ शकतो ना? मला ठाउक आहे.. माझ्या क्लासमधल्या गार्गी कडे पण आहे कुत्रा. मला पण हवय हे पिल्लू…’ हट्ट न सोडता मनी म्हणाली.

नीताने परत तिला समजावायचा प्रयत्न केला
‘हे बघ मनू, गार्गी बंगल्यामधे राहते ना.. मग त्यांच्याकडे खूप जागा असते कुत्रा पाळायला. आपल्याकडे तशी जागा तरी आहे का फ्लॅटमधे? कुठे ठेवणार त्याला? कोण पहाणार त्याचं खाणं पिणं..त्याचं शू शी..तू करणार आहेस का ते? समीर, तूच समजाव ना रे हिला…’

मनीने लगेच मला आपल्या गोटात वळवत नीताला म्हंटलं.. ‘बाब्या आणी मी करु सगळं… तू करो नकोस काही.. ओके??’

नीता आता वैतागली.
‘तू आणि तुझा बाब्या काय करायचं ते करा.. मला विचारु नका.

माझ्यासाठी नेहमीप्रमाणे हा ‘इकडे आड तिकडे विहीर’ वाला प्रसंग होता.

मी दुस-याच ट्रॅकवर संभाषणाची गाडी टाकली.
‘मने.. अग आता शोधायच म्हंटलं तरी कुठे सापडणार आहे ते सकाळचं ठिकाण आणि ते पिल्लू? आता अंधार पण होइल ना बाळा..मग त्या हायवेवर कुठे शोधणार त्याला? आपण असं करु.. पुण्यात कुणाकडे पाळलेल्या कुत्र्याला पिल्ले झाली की आपण एक आणू त्यातलं. ओके?’

पण दुस-याचं ऐकेल ती मनी कसली. डोळ्यात लगेचच पाणी आणत तिने ओरडूनच आम्हाला सांगितलं
‘नाही मला तेच पिल्लू पाहिजे… त्याचे आई बाबा पिल्लाची काळजी घेत नाहीत.. त्याला रस्त्यावर सोडून देतात.. मग ते गाडीखाली येउन मरु दे का?’
मनीच्या या बोलण्याने मी व नीता दोघेही हबकलो. सात वर्षाच्या या मुलीला मरणा बद्दल बोलताना पाहून आम

च्या काळजात चर्र झालं. मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली..
‘आणि मला ते ठिकाण माहित आहे… वेळे नावाचं गाव आहे त्यानंतर लगेच हॉटेल विसावा आहे…त्या हॉटेल जवळच ते पिल्लू खेळत होतं सकाळी.’
मघाच्या मनीच्या बोलण्यानंतर तिला नाही म्हणायचं धाडस माझ्या व नीताकडेही नव्हतं. मी फोन उघडाला व गुगल मॅप वर वेळे गाव सर्च केलं आणी डायरेक्शन्स मोड चालू केलं.

ते पिल्लू दिवसभरात जीवंत राहिलं असेल का, असा विचार नको असतानाही सारखा माझ्या मनात येत होता. नीताहि मनात कदाचीत तोच विचार करत असावी असा मी अंदाज बांधला.

एका तासात आम्ही वेळे गावात पोहोचलो. आम्ही आता रस्त्याच्या दुस-या बाजूला जिकडे सकाळी पिल्लू रस्ता ओलांडून गेलं होत तिकडे हॉटेल विसावा समोर उभे होतो.

नीताला व मनुला गाडीतच बसवून मी हॉटेलमधे गेलो व मालकाला भेटलो व थोडक्यात सारा प्रसंग सांगीतला.
मालक हसला.. म्हणाला..

‘साहेब.. अजूनबी या जगात कळवळा जीवंत आहे म्हणायचं.. चांगल आहे.. त्या कुत्रीने बघा चार पिलं जन्माला घातली त्या पलिकडच्या बाजूला.. पाइपात….. ती हॉटेलात यायची रोज.. आम्ही तिला काहिबाही उरलं सुरलं खाउ घालायचो..खाउन ती परत पलिकडे पाइपात पिलांकडे जायची. चार दिवसांपूर्वी ट्रकखाली आली अन गेली बिचारी… ती पिलं उघडी पडली.. खाय प्यायला नाही दोन दिवस त्यामुळे पाईपातच दोन पिलं भुकेने मेली.. तिसरं बाहेर पडलं आणी रस्त्यावर गाडी खाली आलं’

‘म्हणजे सकाळी आमच्या गाडीखाली येता येता वाचलं तेच हे पिल्लू…?’
‘नाही मेलं ते तिसरं पिल्लू, ते काल गेलं…..आज सकाळी होतं ते चौथ पिल्लू..’

माझ्या मनात शंकेची पाल चूकचूकली.
‘म्हणजे चौथे पिल्लू सुद्धा…..’ मी विचारलं..

मालक हसत म्हणाला..
‘नाही ते हाय जीतं… देव तारी त्याला कोण मारी… काय? मीच सांभाळनार होतो त्याला.. पण तुमच्या पोरीला पाहिजेल असल तर घेउन जावा.’

‘हो म्हणजे तुमची हरकत नसेल तर… प्लीज…’ एक मोठा सुस्कारा सोडत मी म्हंटलं.

‘नाही नाही.. घेउन जावा..’ असं म्हणत त्यांनी हाक दिली..’ ए सु-या.. ते सकाळचं पिल्लू घेउन ये.. कापडात गुंडाळून दे.. उगच साहेबांच्या गाडीत मुतुन शीट खराब करायला नको..’

पिल्लाला हातात घेताच एक वेगळीच भावना झाली. आज हे पिल्लू आपल्या गाडीखाली.. ! मी तो विचार झटकला..

मालकाने म्हंटलं.. ’बसा.. चहा पिउन जावा.. अहो पैसे घेणार नाही चहाचे… मंडळींना पण बोलवा तुमच्या..’

मालकाचा मोठेपणाला मनात सलाम करत मी मालकाला म्हंटलं.. ’खूप आभार मालक… पुण्याला जायचय.. पुन्हा जेंव्हा इकडून जाइन तेंव्हा नक्की थांबेन.. येतो..’

मालक हसत म्हणाला..
‘या कधी बी या.. पिल्लाला व्यवस्थित सांभाळा’..

पिल्लाला मी घेउन कारपाशी आलो.
मला पिल्लासोबत पाहिलं तसे मनीने धावत येउन पिल्लाला आपल्याकडे घेतलं आणि त्याला छातीशी धरलं. मी नीताकडे पाहिलं. आता ती देखील हसत होती.

पुण्यात येइपर्यंत मनी आणी पिल्लू दोघेही झोपी गेले होते.

माझ्या शेजारी बसलेल्या नीताने मागे पाहिलं. प्रेमाने माझा डावा हात हातात घेतला व आपल्या नाजूक हातांनी दाबला.

नव-याने केलेल्या कुठल्याही चांगल्या कामाची पावती, यापेक्षा जास्त तशीही द्यायची तिला सवय नाहीच मुळी.

— © सुनिल गोबुरे

1 Comment on पिल्लू (कथा)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..