नवीन लेखन...

फुल खिले है

 

१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला. त्याला कारणही तसंच होतं. ते म्हणजे, हा कार्यक्रम सादर करणारी, सर्वांची आवडती, चुलबुली अभिनेत्री होती… तबस्सुम!!

१९४४ साली मुंबईत तबस्सुमचा जन्म झाला. वडील हिंदू व आई मुस्लिम. आईने वडिलांच्या धार्मिक भावनेचा मान राखून तिचे नाव ठेवले, किरण बाळा सचदेव. वडिलांनी तिच्या आईच्या धार्मिक भावनेचा मान राखून नाव ठेवले तबस्सुम!! तबस्सुमचा मराठी अर्थ होतो.. ‘स्मित’! त्याच हसऱ्या चेहऱ्याने व जादुई बोलण्यानं, सहा दशकांहून अधिक काळ तिने सर्वांना आपलसं केलं..

वयाच्या तिसऱ्या वर्षी ही छोटी बाहुली, कॅमेऱ्यासमोर धिटाईने उभी राहिली. चित्रपट होता, ‘नर्गिस’! त्यानंतर ‘बेबी तबस्सुम’ नावाने तिने अनेक चित्रपट केले. मीना कुमारीच्या लहानपणीची भूमिका तिने ‘बैजू बावरा’ मध्ये साकारली. ‘बचपन के दिन भुला न देना’ या गाण्यात, ती छोट्या परिक्षित साहनी बरोबर घोड्यावरुन गाताना दिसली. ‘मुघल ए आझम’ या भव्य चित्रपटात ती छोट्या भूमिकेत वावरली.

सत्तरच्या दशकात बऱ्याच हिंदी चित्रपटांचं शूटिंग हे काश्मीरमध्येच असायचं. अशा चित्रपटांतून प्रत्येक हिरोईनला जवळची एक खास मैत्रीण असायची. ‘फिर वही दिल लाया हूं’ या चित्रपटात तबस्सुमने आशा पारेखच्या, अवखळ मैत्रीणीची धमाल भूमिका केली होती. ‘प्यार का मौसम’ चित्रपटात ती पुन्हा आशा पारेखची मैत्रीण झाली. अशा अनेक चित्रपटांतून, पिकनिक व नायक-नायिकेच्या छेडछाडीचे प्रसंग सारखेच असले तरी चुरचुरीत संवादामुळे प्रेक्षकांची धमाल करमणूक होत असे. काही चित्रपटांतून तबस्सुमने हिरोच्या चुलबुली बहीणीची भूमिका साकारली.

तलाश, हिर रांझा, गॅम्बलर, जाॅनी मेरा नाम, तेरे मेरे सपने, सूरसंगम, अग्निपथ, नाचे मयुरी अशा अनेक चित्रपटांतून तिने काम केले.

रामायण मालिकेमधील अरुण गोविलचा मोठा भाऊ विजय गोविलशी तिचे लग्न झाले आहे. तिचा मुलगा होशांग गोविलला घेऊन तिने १९८५ साली ‘तुम पर हम कुर्बान’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाद्वारे कॉमेडीस्टार जॉनी लिव्हरने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

‘गृहलक्ष्मी’ या हिंदी महिला मासिकाची ती काही वर्षे संपादक होती. तिने काही विनोदी साहित्यावर पुस्तकेही लिहिली. तिच्या एकूण कारकिर्दीत ती अभिनेत्रीपेक्षा निवेदिका, सूत्रसंचालिका व मुलाखतकार म्हणून अधिक यशस्वी झाली.

१९७२ सालापासून तिला दूरदर्शनवर पाहणारी आमची पिढी तिची आजही जबरदस्त फॅन आहे. याला कारण तिचं मिठ्ठास बोलणं. समोरच्या सेलेब्रिटीला बोलतं करणं ही फार अवघड कला आहे. त्याला नेमके आणि मुद्याचे प्रश्र्न विचारुन, एका शब्दानेही न दुखावता बोलतं करणं ही तारेवरची कसरत असते. एकवीस वर्षांच्या कालावधीत तिने हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व कलाकार व तंत्रज्ञांना बोलतं केलं. त्यांच्याकडून त्यांच्या जीवनातील चढ-उतार ऐकवले. त्या काळात सिने मासिकं, साप्ताहिकं, पाक्षिकं वाचण्यापेक्षा कलाकारांच्या तोंडून माहिती ऐकण्यात प्रेक्षकांना अधिक आनंद मिळत असे. कलाकार आणि प्रेक्षक यांतील सर्वोत्तम दुव्याचं काम तबस्सुमने अनेक वर्षे साकारलं.

माझ्या लहानपणी मी पुण्यातील सुप्रसिध्द तऱ्हेवाईक वकील, नगरसेवक व माजी उपमहापौर, प्र. बा. जोग यांची भाषणं ऐकलेली आहेत. ते सदाशिव पेठेतील चौकात मोटारीच्या टपावर बसून भाषणं करीत असत. त्यांनी त्यावेळी आपल्या जाहीर भाषणात सांगितलं होतं की, ‘मी दूरदर्शनवरील ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ कार्यक्रम कधीही चुकवत नाही, कारण मला तबस्सुमचं गोड दिसणं व चुरचुरीत बोलणं फार आवडतं!’ आणि खरंच त्या काळात तिचा आठवड्यातून एकदाच असणारा कार्यक्रम, आम्ही घरातील सर्वजण एकत्र बसून पहात असू. एवढी लोकप्रियता नंतर टीव्ही वरील एकाही कार्यक्रमाला मिळालेली नाही..

कालांतराने करण जोहरचा इंग्रजीमधून असणारा ‘कुचाळक्या’ करणारा कार्यक्रम आला. सिमी गरेवालचा इंग्रजीमधूनच असलेला शांतपणे कलाकारांच्या मुलाखती घेणारा कार्यक्रम आला. नंतर कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये ‘सर्कस जास्त व मुलाखत कमी’ असा कार्यक्रम आणला. वादग्रस्त प्रश्न विचारल्याने कपिल, वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता..

तबस्सुमने ‘तबस्सुम टॉकीज’ या नावाने स्वतःचे यु ट्युब चॅनेल सुरु केलेले आहे. या चॅनेलचे पाच लाख सबस्क्राईबर आहेत. नव्या जुन्या पिढीतील अनेक हिंदी कलाकार व तंत्रज्ञांविषयीची माहिती, त्या आठ दहा मिनिटांच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळते. काही एपिसोडमध्ये तिने घेतलेल्या जुन्या मुलाखती दिसतात. हे चॅनेल पहाताना एकवेळ आपण थकून जाऊ, मात्र तबस्सुम काही बोलताना थकत नाही… ती गोड आवाजात बोलतच रहाते.. आणि आपण ती क्लीप पाहताना, भूतकाळामध्ये सफर करुन येतो..

आज तबस्सुम ७७ वर्षांची झाली आहे. पण अजूनही ती बेबी तबस्सुमच वाटते. वय वाढलं तरी आवाजातील गोडवा तसाच आहे.. हिंदी चित्रपटसृष्टीचा हा ‘चालता बोलता इतिहास’ असाच बहरत राहो, ही तिच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझी ‘छोटीशी आशा’!!

एव्हरग्रीन ‘हसमुख’ तबस्सुमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

९-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 342 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..