नवीन लेखन...

फिरकीच्या तालावर!

टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. लो आणि स्लो पिचवर इंग्लंडच्या तडाखेबंद फलंदाजांनी नांगी टाकल्याने त्यांना ६८ धावांनी पराभव स्विकारावा लागला. फलंदाजी, गोलंदाजी आणि तुल्यबळ क्षेत्ररक्षणाला रोहीतच्या कल्पक नेत्रुत्वाची जोड मिळताच या स्पर्धेत एक अजेय संघ म्हणून टीम इंडिया नावारूपास आला आहे.

आपला संघ जरी जिंकला असला, अंतिम फेरीत धडकला असला तरी काही बाबींकडे अजिबात दुर्लक्ष करता येत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे विनिंग कॅाम्बीनेशन बदलायचे नाही या अंधश्रद्धेतून बाहेर पडावे लागेल. विराटचे सलामीला विरजन टाकून बरेच दिवस झाले आहे. त्याची दाळ शिजत नाही वरण उकळत नाही अशी अवस्था झाली आहे. त्याशिवाय तो इतक्या वाईट पद्धतीने बाद होतो की एखाद्या टेल ऐंडरला सुद्धा त्यावर हसू फुटेल. बहुदा बीसीसीआयने क्रिकेट सोबतच बायो फर्टीलाइझर्स आणि कुटीर उद्योग चालू केले की काय अशी शंका येते. कारण ज्या प्रकारे विराटला सलामीला कुजवून त्याचे कंपोस्ट खत तर यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंगचे लोणचे घातले जात आहे ते पाहता वरील शंका खर्या असाव्यात असे वाटते.

या सामन्याबाबत बोलायचे झाले तर रोहीत, विराट फलंदाजीला आल्यावर त्यांच्यावर सेंट ल्युसिया, कांगारू विरूद्धच्या लढतीचा हॅंगोव्हर स्पष्टपणे जाणवत होता. तिथे पिचवर चांगला बाऊंस होता तर इथे पिच लो अॅंड स्लो असल्याने गोलंदाजांविरूद्ध उठता लाथ बसता बुक्की देता येत नव्हते. विराट भुमीपूजन आटोपताच चालता झाला तरी रोहीतच्या मनातील इंग्लंडच्या बदले की आग काही कमी झाली नव्हती. रोहीतची स्ट्रॅटजी स्पष्ट होती. कोई साथ दे न दे चलना मुझे आता है, हर आग से वाकीफ हूं, जलना मुझे आता है. एकला चलोरे प्रमाणे त्याचे बॅट परजणे चालू होते. यासुद्धा सामन्यात रिषभ पंतने संदेसे आते है, संदेसे जाते है सारखी औपचारीकता पुर्ण केली, आला आणि मुकाट्याने परत गेला. गेल्या काही सामन्यात विराट, पंत ज्या सहजतेने बाद होत आहेत ते पाहता टीम इंडियाचे हे दोन्ही दिग्गज आपल्या नऊ फलंदाजांवर दोन फलंदाज फ्री बॅटींग करत आहे असे वाटते.

भलेही या संपुर्ण स्पर्धेत सूर्यदेव प्रत्येक संघाशी लपंडाव खेळत असला तरी कर्णधार रोहीतला यादवचा सूर्या प्रामाणिकपणे साथ देत आहे. रोहीतची तडाखेबंद तर सूर्याच्या ग्लॅमरस फलंदाजीची युगलबंदी पाहणे जबरदस्त अनुभव असते. या दोघांनी इंग्लिश गोलंदाजी सहज खेळून काढली. त्यातही त्यांचे सिनीअर सिटीझन फिरकीपटू मोईन अली, आदील रशीदचे त्यांनी फाजील लाड केले नाही. सूर्याने टॅाप अॅार्डर, मिडल अॅार्डर आणि लोअर अॅार्डर मध्ये जी मिसिंग लिंक होती, त्याची पुर्तता केली. सूर्याने खेळपट्टीवर रमत आपल्या संघाला बळकटी दिली तर हार्दीक पांड्याने आपल्या छोटेखानी पण वेगवान खेळाने टीम इंडियाला वळकटी दिली.

इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट १७१ धावांत मिळणार होते आणि त्याची जबाबदारी होती त्यांच्या टॅाप अॅार्डरवर. त्यातही जॅास बटलर, सॅाल्ट, जॅानी बेअरस्टो हे धडाकेबाज फलंदाज कधीही सामन्याची दशा, दिशा फिरवण्यात तरबेज होते. सोबतच एक दोन मोठ्या भागिदार्या सामना सहज पलटवू शकल्या असत्या. त्यातही लढाई मैदानातील असो की राजकीय, योद्धे दोनच असतात. ते म्हणजे वेळ आणि संयम. अर्शदीप बुमराहला यशस्वी तोंड दिल्यावर इंग्लिश कर्णधार बटलरने समोर फिरकीपटू अक्षरला पाहताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले, त्याचा संयम सुटला. खरेतर पॅावर प्ले मध्ये बटलर साठी ते विणलेले जाळे होते. तू आया नहीं, तुझे बुलाया गया है, हे अक्षरला चांगले माहिती होते. शिवाय या पिचवर विकेट टू विकेट, गुडलेंथ गोलंदाजी म्हणजे एक तो करेला, उपरसे नीम चढा होते.

जी चुकी १९८७ रिलायन्स विश्वचषक अंतिम सामन्यात अॅास्ट्रेलिया विरूद्ध माईक गॅटींगने अॅलन बॅार्डरला रिव्हर्स स्विप मारून केली, तिच चुकी बटलरने केली. बटलर बाद होताच इंग्लंड संघाचा पोळा फुटला. अक्षर आला रे आला म्हणताच इंग्लिश फलंदाज फिरकीच्या तालावर घुमर डान्स करू लागले. त्यातही बुमराहने एक ही मारा सॅालीड मारा सारखे पीटर सॅाल्टची फलंदाजी अळणी, बेचव करून टाकली. बटलर सॅाल्ट परतताच सेमीफायनल, स्पिनच्या दडपणात इंग्लंड फलंदाजीचे मनोरे कोसळू लागले. त्यात मोईन अलीची विकेट पाहण्या सारखी होती. खरेतर ही विकेट पंतच्या खात्यात जमा व्हायला हवी. ज्याप्रकारे पंतने समयसुचकता दाखवत मोईन अली ला मामा बनवले, यष्टीचीत केले, ते पाहता पंतचे फलंदाजीतील अपयश माफ करायला हवे.

दहा षटकाच्या आत अर्धा इंग्लिश संघ तंबूत परतला होता. मागच्या सामन्यात जी निराशा, जी उद्विग्नता, जी भिती पॅट कमिन्सच्या चेहर्यावर झळकत होती, तिच या सामन्यात लिविंगसिटेन अॅन्ड कंपनीच्या चेहर्यावर झळकत होती. कोणताही फलंदाज खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. अक्षरची बारी संपताच कुलदीपने इंग्लिश गोटात हाहाकार माजवला. बॅझबॅालचे बाळकटू प्यालेले उंच धिप्पाड इंग्लिश फलंदाज कुलदीप पुढे लोटांगण घालू लागले होते. याच रणधुमाळीत अखेरचा स्पेशलीस्ट फलंदाज लिविंगस्टोन धावबाद होताच इंग्लंडची धडपड थांबली. भलेही जोफ्रा आर्चरने इंग्लंड संघात प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले परंतु डेड बॅाडीला सिपीआर देऊन तसाही काही फायदा नसतो.

या सामन्यात सर्वात जर कोणती गोष्ट उठून दिसली तर ते रोहीतचे नेत्रुत्व! दुबे च्या पहिले पांड्याला फलंदाजीला पाठवणे असो की चौथे षटक अक्षरला देणे असो, ह्या दोन्ही चाली उपयुक्त ठरल्या. तर कुलदीप, जडेजाला मधात आणून हार्दीकला गोलंदाजीत थांबवून ठेवणे योग्य ठरले. आता अंतिम सामन्यात आपली गाठ द.आफ्रिकेशी आहे. विराटला पुन्हा एकदा सलामीला पाठवायचे की रोहीतने यशस्वी जैस्वालसोबत डावाचा प्रारंभ करायचा याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. सोबतच शिवम दुबे आपला प्रभाव पाडण्यात फारसा यशस्वी ठरला नाही याचाही विचार करावा लागेल. आयसीसी ट्रॅाफीचा दुष्काळ संपवायचा असेल तर संघ व्यवस्थापनाला काही कटू निर्णय घ्यावे लागले तर ते त्यांनी जरूर घ्यावे. मात्र इतक्या वर्षांनी आलेल्या संधीचे सोने करावे हीच तमाम क्रिकेट रसिकांची कामना आहे.

डॅा अनिल पावशेकर
दिनांक २८ जून २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आम्ही साहित्यिक चे लेखक

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..