नवीन लेखन...

‘परिचय’ – नात्यांची नव्याने ओळख !

एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो.

अशावेळी एक रवी (जितेंद्र ) नावाचा तरुण काहीसा मनाविरुद्ध (बेकार असल्यामुळे त्यालाही पर्याय नसतो.)

रायसाहेबांकडे (प्राण ) ” शिक्षक” नावाची तात्पुरती नोकरी स्वीकारतो. समाज घडविण्याचे ,दुरुस्त करण्याचे , नात्यांचा पुनर्विकास करण्याचे काम फक्त शिक्षकच करू शकतो. रवी हळुवार हातांनी या निरगाठींची उकल करतो -कधी प्रेमाने , कधी चुका निदर्शनाला आणून तो घराची घडी बसवतो आणि प्रत्येकाला नात्यांचा गहिरा परिचय करून देतो. चारजणांच्या छोट्या सैतानांच्या टोळीला त्यांचे हरवलेलं निष्पाप बाल्य मिळवून देतो. बालकांमधील वैशिष्ठ्यपूर्ण असलेलं नैसर्गिक बालपण परत आणतो. आई -वडिलांच्या मृत्यूनंतर निष्प्रेम जीवन जगणे वाट्याला आलेल्या मुलांना धमाल मस्ती ,गाणी शिकवतो आणि त्यांच्या आत दडलेलं मूल बाहेर आणतो.Transactional Analysis च्या भाषेत लिटिल प्रोफेसर किंवा शिस्तबद्ध जगणाऱ्या मुलांना जिवंत उर्मींशी ओळख करून देतो आणि रायसाहेबांना नातवंडांच्या खट्याळ /हव्या हव्याशा वाटणाऱ्या सहवासाची तोंडओळख होते. आता उभयपक्षी आपण इतके दिवस काय गमावले होते याची जाणीव होते.

आपलं हातचं काम संपवून रवी नोकरी मिळाल्यावर परततो. शिक्षकही जन्मभर विद्यार्थांच्याबरोबर कधीच राहात नाही ,तसे त्या नात्यात अभिप्रेतही नसते. विद्यार्थ्यांना स्वओळख /स्वपरिचय करून द्यायचा ,त्यांना आपल्या पायावर उभे करून द्यायचे की शिक्षक दुसऱ्या पिढीच्या घडवणुकीकडे वळतो.

जितेंद्र आणि जया भादुरी प्रमुख भूमिकेत असले तरी गुलजारच्या आवडत्या संजीवकुमारच्या रूपाने या कथेला एक हट्टी ,करुण, हरलेला कंगोरा आहे आणि तो फारच विलोभनीय आहे.

संजीवकुमार एक गायक -वादक ,वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करतो आणि रायसाहेब त्याला घराबाहेर जायचा आदेश देतात. वडील -मुलाचे न पटणे आणि अशा कारणाने विभक्त होणे भारतीय संस्कृतीचे सनातन भागधेय आहे. हट्टी मुलगा गरिबीशी /दारिद्रयाशी झुंजत हे प्राक्तन स्वीकारतो. पण पत्नीच्या निधनानंतर ,स्वतःला झालेल्या असाध्य आजाराच्या जाणिवेने पांच मुलांसाठी परत हक्काच्या (?) जन्मदात्याकडे हात पसरतो -सारं काही विसरून बापाला पत्र पाठवितो. नेमकं ते पत्र उशीरा मिळाल्याने रायसाहेब संजीवकुमारच्या निधनानंतर उशिरा नातवंडांकडे पोहोचतात. पण तोपर्यंत पीळ बसलेला असतो आणि सर्वात मोठी रमा त्यात भर घालते.

पर्याय नसलेली नातवंडं स्वतःच्या (?) घरी निरुपायाने परततात पण घरात रणांगण सुरु झालेलं असतं. आजोबांच्या प्रत्येक सद्हेतूला हरताळ फासत नातवंडं एक अनामिक सूड उगवीत असतात आजोबांवर. त्यात शिक्षकांना पळवून लावण्याचा आवडता डाव असतो -आतील रागाला ,शिस्तीला विरोधाने वाट करून देण्याचा ! ही विषम लढाई (बरीचशी एकतर्फी ) संपविण्यासाठी रवी चित्रात प्रवेश करतो. त्यालाही हातखंड्या प्रयोगांना सामोरं जावं लागतं. गुलजार इतकं बाल मानस शास्त्र क्वचितच एखाद्याला अवगत असेल. रवी हळूहळू मुलांच्या कलाने घेत घराची घडी बसवितो. घर पुन्हा हसायला लागतं. हा असरानींसारख्या नोकरासाठी आणि सती देवींसाठी आश्चर्याचा धक्का असतो. परगावाहून परतलेल्या रायसाहेबांना हा लक्षणीय बदल जाणवतो. आता तेही मुखवटा उतरवून ठेवतात आणि मुलाच्या वेळी केलेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून नातवंडांच्या बाललीलांत रमतात. सगळं घर रवीचे आभार मानते. रमाही कृतज्ञता व्यक्त करते.

रवीचे जाणे अपरिहार्य असले तरी कोणाच्याही सहजी पचनी पडत नाही. रवी आणि रमामधील भावबंध रायसाहेबांच्या लक्षात येतात आणि यावेळी ते पुन्हा तीच चूक करत नाहीत. सरतेशेवटी विनोद खन्नाच्या मैत्रीपूर्ण कानउघाडणीमुळे रवी परततो आणि त्या कोवळ्या भावबंधांशी नव्याने परिचय झाल्याने रमाशी लग्न करण्याचा निश्चय करतो.
राहुलदेव बर्मनने गुलजारच्या काव्याला सुरेख कोंदण बहाल केलेलं आहे.

“प्यासा है आजभी तरसे,
प्यासा है आजभी तरसे
ओ बरसो सावन
बरसे छलके तेरे नैन “

या ” मितवा बोले मिठे बैन ” गाण्यातल्या नितांतसुंदर ओळी ! भूपेंद्रच्या आवाजात काळजाचा ठाव घेतात. पण गाजलं दुसरं शास्त्रीय गीत – ” बिती ना बिताई रैना , बिरहा की जाई रैना ” ! लता आणि भूपेंद्र यांनी या गाण्याचे सोने केले आहे. कितीही वेळा ऐकलं तरीही अतृप्ती उरतेच. गुलजारने जीवनविषयक तत्वज्ञान इथे फार बहारदारपणे मांडलंय –

” युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादोंके पलं नहीं जाए ! “

याच बरोबर “जागीं हुई आँखियोंमे रात ना आइ रैना ” असंही सहज लिहून जातो.

किशोरची उरलेली दोन्ही गाणीही खूप गाजली. एकुणात काय “परिचय ” ने सांगीतिक मेजवानीतही तृप्त केले. प्राणचा रुबाबदार, हतबल आणि वत्सल अभिनय विसरणे शक्य नाही. संजीवही छोट्याश्या भूमिकेत छाप सोडून जातो. जया नेहेमीसारखीच सहजसुंदर -भूमिका जगणारी. थोडा जितेंद्रचं सुरुवातीला अवघडलेला- भूमिकेचा पैस सापडेपर्यंत पण नंतर खुललेला ! त्याच्या छबीविरुद्ध जाणारी ही भूमिका पण त्याला छेद देण्यात तो यशस्वी होतो.

सगळ्यांचा परस्परांशी आंतरिक परिचय करून देत असताना नकळत आपल्यालाही या पात्रांचा परिचय होतो आणि त्यांच्या प्रेमात पडायला होतं .

तोवर रवीसारखाच गुलजार नावाचा शिक्षकही निर्लेपपणे या गोतावळ्यातून बाहेर पडत दुसऱ्या निरगाठींकडे वळतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 160 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..