नवीन लेखन...

“पाणवठा” जिथे माणुसकी सोबत प्राणुसकी नांदते.

१ मे, महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी डोळे – हृदय आणि मन तुडुंब भरून जाण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. एकतर आमच्या आयुष्यात असे योग अभावानेच उभे रहातात म्हणा, आणि जेव्हा येतात तेव्हा पराकोटीचा आनंद देऊन निस्तब्ध करून जातात. त्या आनंदाला भारावलेपणाचं, नि:शब्दतेचं आणि स्वतःच्या निष्क्रियतेचं कोंदण असतं. असो,
तर, हा योग जुळून आला बदलापूरमधील “पाणवठा” परिवाराच्या “सावली गौरव २०२२” च्या निमित्ताने.
बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकापासून बदलापूर कर्जत मार्गे मुख्य रेल्वेलाईन ओलांडल्यावर समोरच असणाऱ्या “पाणवठा” या भारतातील पहिल्या प्राण्यांच्या, आणि ते ही अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमात आपण पोहोचतो. गणराज जैन आणि डॉक्टर अर्चना जैन या तरुण दांपत्याने, आपल्यासारख्याच मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि हृदयात प्राणुसकी जपणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांसह हा पाणवठा नांदता, हसता, खेळता ठेवलाय. पाणवठा बद्दल YouTube वरून अनेक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. पण मी मात्र त्या जागी गेल्यावर माझ्या मनात दाटलेले अनुभव इथे मांडणार आहे.

सावली सामाजिक संस्था आणि पाणवठा फाऊंडेशनच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रात समाजासाठी तन मनाने कार्यमग्न असणाऱ्या आणि आपल्या कृतीतून समाजाला ढवळून, हलवून आणि ओलावून जागं करणाऱ्या एका व्यक्तीला “सावली गौरव पुरस्काराने” सन्मानित केलं जातं. हा पुरस्कार सोहळा २०१३ सालापासून दर वर्षी ( महामारीमुळे २०२० ,२०२१ सोडून) केला जातो. या वर्षाचा म्हणजे २०२२ सालच्या पुरस्काराच्या मानकरी होत्या, आपल्या अप्रतिम आणि ओघवत्या शब्दकळेतून अध्यात्म, साहित्य, काव्य, संगीत अशा अनेकविध विषयांवर लेखन, निरूपण, विवेचन, सुसंवादन आणि निवेदनाच्या माध्यमातून ज्ञानामृताचा बहुमोल ठेवा श्रोत्यांसमोर ठेवणाऱ्या, गेली अनेक वर्षे आपल्या सोप्या, रसाळ वाणीमधून समाजाला जाग आणणाऱ्या, जागं करणाऱ्या आणि विचार करायला लावून जनजागृती, समाजप्रबोधन करणाऱ्या विदुषी धनश्री लेले. हा पुरस्कार त्यांना प्रदान केला, ज्येष्ठ लेखक, निवेदक, सुसंवादक, सूत्रसंचालक, चार हजारी मुलाखतकार, ज्येष्ठ पत्रकार आणि मनात माणूसपण कायम जपणारे सुधीरजी गाडगीळ यांनी. सुप्रसिद्ध अष्टपैलू आणि माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, मनात तरल भावना जपणारी, पाणवठा सारख्या अनेक सामाजिक उपक्रमांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर आणणारी आणि चांगल्या, दर्जेदार आणि सजग करणाऱ्या गोष्टींना मनापासून दाद देणारी स्पृहा जोशी.

या सोहळ्याच्या सत्कारमूर्तीना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं लेखन करण्याची जबाबदारी आयोजकांनी माझ्यावर सोपवली होती. आणि मी सोहळ्याला उपस्थित राहणार होतो म्हणून त्या मानपत्राच्या वाचनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी माझ्याकडेच सोपवली. हे मानपत्र सुंदर लाकडी चौकटीच्या स्मृतिचिन्हामध्ये बसवून धनश्रीजीना देण्यात आलं. मला पाणवठा अनाथाश्रमाला भेट देऊन तो शक्य होईल तेव्हढा नजरेखालून घालण्याची आस मनापासून लागली होती. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहाची होती. सध्या मुंबईतल्या उन्हाळ्याने सगळ्या मर्यादा पार केल्या असल्याने मी बदलापूर स्थानकावर साधारण सव्वाचार वाजता उतरलो, बाहेर येऊन गणराजजीना फोन लावला. फोनवर ते म्हणाले,
“आम्ही स्टेशनजवळच आहोत. तुम्ही तिथेच थांबा. दोन मिनिटात तुम्हाला पिकप करतो.”

दुसऱ्या मिनिटाला त्यांची गाडी माझ्या पुढ्यात हजर झाली. स्वतः गणराजजी गाडीतून उतरले आणि माझ्या लक्षात येण्यापूर्वी त्यांनी माझ्या पायाना स्पर्श केला. म्हणजे ज्यांच्या कार्यापुढे आणि त्यांच्यापुढेही आम्ही सर्वसामान्यांनी नतमस्तक व्हायचं, ते मातीच्या पायांचे गणराजजी माझ्या पायांना हात लावून मला सर म्हणून संबोधत होते. एक वय सोडलं तर ज्येष्ठतेचा कोणता मापदंड आम्हाला त्यांच्यापेक्षा मोठं करतो ? खरंच कुठून येते ही नम्रता, निकोप मन आणि निस्वार्थी वृत्ती ??? चेहऱ्यावर कसलाही अहंकार, रुबाब किंवा आपण काही महान कार्य करत असल्याचा पुसटसा भावही दिसत नव्हता. म्हणाले, “सर, आपल्याकडे तसा वेळ आहे. आपण घरी जाऊया, चहा घेऊ, आमचा पाणवठा तुम्हाला दाखवतो आणि लगेच आपण हॉलवर येऊ. सुधीरजी घरी आलेलेच आहेत.

“त्यांच्या या शब्दांनी माझा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. पाणवठा अनाथाश्रम पाहायला मिळणार आणि ज्यांना मी गेली चाळीस वर्ष एकलव्याप्रमाणे गुरू मानलं आणि फोनवरून संभाषण करण्यात समाधान मानलं त्या सुधीरजीना भेटण्याची संधी मिळणार या दुहेरी आनंदाने, मी क्षणात उन्हाने आलेली मरगळ झटकून तरतरीत झालो, आणि त्यांच्या गाडीत टुणकन जाऊन बसलो.

पुढच्या दहा पंधरा मिनिटात आम्ही पाणवठ्याकडे पोहोचलो. रेल्वे लाईन ओलांडली आणि समोरचा पाणवठा परिसर दृष्टिक्षेपात येण्याआधीच आपल्या पांगळेपणावर मात करत तिथे नांदणाऱ्या समस्त प्राणीमात्रांनी आपापल्या आवाजात सलामी दिली. आम्ही गणराजींच्या घरात चार पायऱ्या चढून प्रवेश केला. घर, त्याच्या बाजूला बसण्यासाठी मोठी पडविसदृश वरून छत असलेली मोकळी जागा, आणि आजूबाजूने पसरलेला पाणवठा हा मुक्या प्राण्यांचा अनाथाश्रम. एका भिंतीला वेळोवेळी या दाम्पत्याला त्यांच्या कार्यासाठी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मिळालेली प्रशस्तीपत्रक फ्रेम करून लावलेली होती. छान वारा वहात होता, पाणवठ्याच्या संपूर्ण परिसरात एक प्रसन्न मोकळेपण सामावलेलं होतं. समोरच सुधीरजी गाडगीळांची सत्तरी पार केलेली तरणीबांड मूर्ती खुर्चीत बसली होती. इतक्या वर्षांची त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा सरसरून बाहेर आली, आणि माझी बोटं त्यांच्या पायांना कधी लागली मलाही कळलं नाही. चहापाणी करून आम्ही पाणवठा परिसर पाहायला निघालो.

लहान मोठे कुत्रे, मांजरी, माकड, पोपट अशा प्राणी पक्ष्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार कुणाला स्वतंत्र तर कुणाला एक दुसऱ्यासोबत एकत्र राहण्यासाठी पिंजरे बांधून दिले आहेत. कुणी एका डोळ्याने अंध तर कुणी दोनही डोळ्यांनी, कुणाचा एक पाय गेलेला अशा अपंगावस्थेत असलेल्या या मुक्या प्राण्यांना प्रेम – निगा आणि निवारा एकाच “सावली”खाली मिळत असतो. प्राण्यांच्या अपंगत्वाचा विचार करून हे पिंजरे बनवण्यात आले आहेत, म्हणजे त्यांची उंची, आतमध्ये एक छोटा बल्ब जेणेकरून त्यांना काळोख आणि एकटेपण जाणवणार नाही. विशिष्ट प्रकारचे बेडही त्यांच्यासाठी करून घेतलेले आहेत. आश्रमात आलेल्या प्राण्यांवर आधी उपचार केले जातात आणि आपल्या अपंगत्वावर मात करून तो इथे रुळायला लागतो. बरा झालेला पण कायमचं अपंगत्व आलेल्या मुक्या प्राण्याला बाहेरचं जग जगू देत नाही. आणि त्यातूनच प्राण्यांच्या कायम स्वरुपी अनाथाश्रमाची संकल्पना उदयाला आली. पाणवठा या नावावरून विषय निघाला, की पाणवठा हेच नाव का ठेवलं ? त्यावर गणराजजी उत्तरले, जंगलात पाणवठा हे असं क्षेत्र असतं, जिथे वाघ, सिंह असे हिंस्र प्राणी आणि शेळी, हरीण असे प्राणी एकाचवेळी पाणी पितात, आणि जंगलाच्या अलिखित कायद्यानुसार त्यावेळी कुणी कुणावर हल्ला करत नाही म्हणे. अर्थात या गोष्टी अनेक वर्षांच्या निरीक्षणाने सांगितल्या जातात. जिथे हे घडतं तो भाग म्हणजे पाणवठा. गणराजजींच्या पणवठ्यावरही सगळ्या प्राण्यांचं स्वागत होतं. यामध्ये आजवर कुत्रा, मांजर ,घोडा, गाय, गाढव पासून मोर, पोपट, माकड, भेकर ते अगदी मगरीपर्यंत कुणालाही इथे मज्जाव नाही. मला वाटतं कुणी त्यांना येऊन सांगितलं की, एक सिंह, वाघ किंवा हत्ती जखमी अवस्थेत आहे तेव्हाही गणराज तेव्हढ्याच लगबगीने आणि प्रेमाने त्याला आपल्या पणवठ्यावर आणायला सिद्ध होतील. असो, तर जंगलाचा हा नियम या मुक्या प्राण्यांना कळू शकतो आणि वळतोही. मग आपल्यासारख्या so called शहाण्यां मनुष्यप्राण्यांना मात्र हे कसं कळत नाही ? कोणत्याही क्षणी एकमेकांच्या उरावर बसायला आम्ही कधीही सज्ज असतो.

एका कुत्र्याच्या पिल्लाचा मागचा पाय नव्हता. त्याला त्या ठिकाणी छान दोन चाकांची गाडी जोडून त्याचा फिरण्याचा प्रश्न सुकर केलेला होता. सगळ्या प्रशस्त पिंजऱ्याना रंगीत पडदे लावलेले होते, जेणेकरून प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये. बोलता बोलता जैन पती पत्नीनी एक खंत बोलून दाखवली. म्हणाले, माणसांच्या अनाथाश्रमाला जेव्हढी मदत मिळते, त्याच्या निम्म्याहूनही मदत आम्हाला आवाहन करून मिळत नाही. आम्ही जुन्या चादरी, पडदे घ्यायलाही तयार असतो, पण प्राण्यांचा अनाथाश्रम ही संकल्पनाच अजून लोकांच्या मनात रुजलेली नाही. गणराजजीनी आपल्या मुक्या प्राण्यांसाठी गादिसहित बेड बनवले होते, आता बोला ?
हा पाणवठा आपल्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक प्राण्याची काळजी अगदी अखेरपर्यंत मायेने घेतो. जसे घरच्याच लोकांनी दूर केलेले ज्येष्ठ माणसांच्या वृद्धाश्रमात आश्रयाला येतात तसेच समाजाने हाड हाड केलेले मुके जीव पाणवठयाच्या अनाथाश्रमात विसावतात.

म्हटलं, तुम्हाला कसं कळत अशा प्राण्यांबद्दल ? त्यावर ते चटकन म्हणाले, आता लोकच आमच्याशी संपर्क करून कळवतात. पणावठ्याच्या सावली गोशाळा उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी, सोडून दिलेल्या अनाथ गोमाताना आश्रमात आणून आणि त्यांना धष्टपुष्ट करून गरजू शेतकऱ्यांना मोफत दिल्या आहेत. गोशाळेत आजही तुकतुकीत कांती झालेल्या गायी उभ्या होत्या.

अनेकदा कुत्र्यांनी चावे घेतले, कोब्रासारख्या सापाने दंश केला. मरणासन्न अवस्थेतून जिद्दीने बाहेर आल्यावर पुन्हा एकदा पत्नीसह गणराजजी आपल्या कार्यात रुजू झाले. काय म्हणायचं याला ?
स्पृहाने त्यांना विचारलंही, की असे जीवावर बेतणारे प्रसंग आयुष्यात येऊन सुद्धा तुमची मानसिकता जराही डळमळली नाही याचं कारण काय ? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्यातलं खरेपण दाखवून देणारं होतं. गणराजजी म्हणाले,
“तराजूच्या एका पारड्यात भीती आणि दुसऱ्यात समाधान, आनंद ठेवून तोलताना माझ्या समाधानाचं आनंदाचं पारडं नेहमीच जड राहिलं. आणि त्यामुळेच कदाचित मी माझ्या ध्येयापासून विचलित झालो नाही.”

कुठून येते ही दुर्दम्य इच्छाशक्ती ? ही सकारात्मक मानसिकता आणि समर्पित वृत्ती ? ही कोणी वेगळी माणसं असतात का ? तर तसंही नाही. अगदी आपल्यासारखीच सर्वसामान्य घरातली, भावभावनाही आपल्यासारख्याच असलेली. का होतात ही एखाद्या ध्येयाने वेडी ? घरात पंख्याखाली आपल्यासारख्या तंगड्या पसरून खादाडी करत कोणत्याही विषयावर आपली so called अमूल्य मतं देत बसायला यांना का आवडत नाही ? कारण ध्येयपूर्तीसाठी ही माणसं धडपडणारी असतात. मनात निस्वार्थ भाव असतो आणि हृदयात परोपकार . आपल्या ध्येयाचा घेतलेला वसा कोणत्याही परिस्थितीत टाकून न देता पुढे जात रहातात. एखाद्या गोष्टीसाठी माणूस वेडा होतो तेव्हाच आपल्यासारख्या शहाण्यांचा ?भविष्यकाळ सुकर होतो. आज माणूस माणसापासून तुटत चाललाय. कोरोना काळात तर हा अनुभव अनेकांनी अगदी जवळून घेतला. अशा या कलियुगात ही मंडळी मात्र मुक्या, अपंग प्राण्यांना हृदयाशी कवटाळतायत. गणराजजी म्हणतात, कोणताही प्राणी आपल्यावर हल्ला करतो ते भीतीने. आपण अनेकदा त्यांच्या क्षेत्रात जाऊन लुडबुड करतो, आणि मनुष्यस्वभाव पुरेपूर ओळखू शकत नसलेले हे मुके जीव भयभीत होऊन प्रतिकराला सिद्ध होतात. हा द्वैत भाव खरंच सरला तर सारीकडे अद्वैताची अनुभूती जाणवू लागेल, आणि पुराणात ऋषी मुनींच्या आश्रम परिसरात, त्यांच्यासोबत प्राणी पक्षी आनंदात निर्वैरपणे रहात होते, हे नुसतं वाचनात आलेलं, विश्वास न बसणारं सत्य आजही प्रत्यक्षात येऊ शकेल. मनुष्य आणि प्राणी दोघांचीही खात्री झाली की आपल्याला एक दुसऱ्यापासून काहीही धोका नाही, मग का कुणी हल्ला करेल ? आणि मुक्या प्राण्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रश्नच उरणार नाही.

गणराजजींच्या मनात अभयगाव योजना नांदतेय. ते म्हणतात अभयगावं अस्तित्वात आली की अभयारण्यांची गरजच उरणार नाही. अगदी गावागावातून मनुष्य प्राण्यांमध्ये मायेची अनुभूती जाणवू लागेल. आज समाजाच्या पचनी न पडणारी कल्पना ही असेलही. मी – माझं – मला हेच सतत करत रहात यापुढच्या जगाचा वासवाराही लावून न घेणाऱ्या आजच्या समाजात ही संकल्पना समजून घेणं हीच बरीचशी कठीण गोष्ट आहे. त्याचबरोबर हे ही सत्य आहे की दृष्ट्या व्यक्तींना काळाच्या पुढचं दिसत असतं.

जैन पती पत्नी काहीही बोलताना, आधी केले मग सांगितले या तत्त्वाने चालत असतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे, काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरात एक मगर बिनघोरपणे वस्तीला होती. ती ही दोन चार दिवस नाही तर महिन्याभराच्या वर. त्याचं झालं असं, की महाडला सावित्री नदीमध्ये एक मगर दुखापतग्रस्त अवस्थेत आहे असं गणराजजीना कळलं. त्यांनी त्या आठ फुटी मगरीला महाडमधल्या आपल्या केंद्रावर आणून एका मोठ्या टाकीत पाणी भरून त्यात सोडलं. पण ती टाकिही तिला अपुरी पडू लागली. बरं ती जखमी असल्यामुळे तिला सतत पाण्यात ठेवणंही योग्य नव्हतं……
यापुढचा भाग ऐकताना मात्र माझी जीभ टाळूला चिकटली. ते म्हणाले, आम्ही आमची बेडरूम रिकामी केली आणि तिला, तिथे ठेवली. तिलाही जरा फिरता येऊ लागलं. यापुढे जाऊन गणराजजीनी तिला आपला हॉलही मोकळा करून दिला. मगरीची चैन झाली. एक दिवस जैन कुटुंबीय डायनिंग टेबलवर जेवत असताना, ही तिकडे हजर झाली. सगळ्यांनी तिच्याकडे विशेष लक्ष न देता आपलं जेवण सुरू ठेवलं. मगरबाई त्यांच्या बाजूने कुणाला काहीही इजा न करता पुढे गेली. यामधून आपण काय बोध घ्यायचा ??? अगदी मनापासून विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.

“सावली गौरव सोहळ्याची” वेळ जवळ येत होती, पण पणवठ्याच्या परिसरातून पाय निघत नव्हता. सहज बोलताना गणराजजी म्हणाले, ज्या क्षेत्रातल्या व्यक्तीची आम्ही पुरस्कारासाठी निवड करतो, त्यांना हा पुरस्कार कुणाच्या हस्ते स्वीकारायला आवडेल हे सुचवण्याचा पर्याय देतो. धनश्रीजीनी सुचवलेला पर्याय अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, बोलणं या क्षेत्राचं कुलदैवत असा उल्लेख ज्यांचा केलाय ते सुधीरजी गाडगीळ हा होता. आणि योगायोग म्हणजे गणराजजीनी निवडलेला पर्यायही अगदी हाच होता.

सावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो.

या अनाथाश्रमाला अजूनही नियमित विद्युत पुरवठा नाही. मोठा पाऊस झाला की पाणी साचल्याने प्राण्यांची होणारी प्रचंड गैरसोय, आर्थिक विवंचना आणि या सगळ्याबद्दल असणारी सरकारी उदासीनता अशा अनेकविध अडचणींमधून हे जैन दांपत्य आपली वाटचाल अक्षरशः नेटाने करतायत.

२०१९ साली झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण आश्रमाची वाताहत झाली. पण त्यातूनही या द्वयीने आपल्या सहकाऱ्यांसह हा अनाथाश्रम आणि हा पाणवठा पुन्हा एकदा उभा केला . सलाम त्यांच्या कार्याला.अखेर अगदी मनापासून एकच सांगावसं वाटतं, एकदा तरी या प्रकल्पाला नक्की भेट द्या. इथे नांदणारी प्राणुसकी अनुभवल्यावर मन भरून नाही आलं तर मी काहीही हरायला तयार आहे.

गणराजजी खूप ओघवतं बोलतात. त्यांच्या प्रत्येक शब्दातून पणवठ्याबद्दलची कळकळ जाणवत रहाते. तरुण पिढीला हे काम कळावं म्हणूनही अनेक ठिकाणी जाऊन बोलतात, खूप पोटतिडकीने सांगतात. आठवड्याचे पाच दिवस लॅपटॉपवर घालवून, शनिवार रविवार मॉल अथवा तत्सम ठिकाणी खादाडी करून आणि भरमसाठ खर्च करून घरी परतणाऱ्या आम्हा शहरवासीयांना , ही कळकळ, काही वेगळं करण्याची आस आणि मुक्या परक्या प्राण्यांना अगदी मायेने जवळ घेण्याची मानसिकता खरंच कधी समजणार ???
दृष्ट लागण्यासारखा सावली गौरव सोहळा , रंगमंचावर आयोजकांसह सुधीरजी गाडगीळ, स्पृहा आणि सत्कारमूर्ती धनश्रीजी लेले, म्हणजे निरामय निस्वार्थ कर्म, नैसर्गिक कला आणि पंचेंद्रियाना आनंद देणारी शब्दकळा. सोबत या सगळ्यांवर मनोमन प्रेम करणारे रसिक प्रेक्षक. मानपत्राचं वाचन करताना आनंदाने, संकोचाने आणि आपणही या सोहळ्याचे एक भाग आहोत या सुखद विचाराने हृदय भरून येत होतं.

निघताना दाटल्या डोळ्यांनी गणराजजीनी पुन्हा एकदा पायांना स्पर्श केला. या दांपत्याच्या पाया पडावं, असं अगदी मनापासून वाटत होतं. पण डोक्यावरचे पांढरे केस, पाठीत घातलेली आणि अशावेळीही वाकायला नकार देणारी खोट्या सामाजिक प्रतिष्ठेची अदृष्य कांब आणि आपल्यापेक्षा फक्त वयाने लहान असलेल्या कुणाच्या पाया पडलेलं कसं दिसेल ही मनात चाललेली खळबळ या तिघांनी ते होऊ दिलं नाही. मग भरल्या डोळ्यांनी त्या उभयतांना मनोमन नमस्कार केला आणि परोपकाराच्या, माणुसकी आणि प्राणुसकीच्या संनिध्यातून स्वार्थी जगात परतलो.

प्रासादिक म्हणे,

–प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..