नवीन लेखन...

हेचि दान देगा देवाsss

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला हा लेख


संत पुरुष म्हणजे ईशतत्त्वाचे वाटाडे. जन्मभर स्वतः वारेमाप कष्ट करून सतत त्यांनी जगाचेच हित चिंतिले आहे. ‘चिंता करीतो विश्वाचि ऽऽ’ या वचनातून समर्थ रामदास स्वामींनी ‘कल्याण करी रामराया ऽऽ’ या शब्दांतून समाजाबद्दल ईश्वरीशक्तीकडे अशीच करुणा भाकली आहे. जीवनाच्या अवघ्या जेमतेम दोन दशकाच्या उण्यापुऱ्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ‘वैश्विक शांतीसाठी’ पसायदानातून हीच प्रार्थना केली आहे. ‘आता विश्वात्मके देवे…..

तेणे वाङ्मज्ञ तोषावे, तोषानि मज द्यावे पसायदान हे य….’ अगदी याच धर्तीवर संत तुकारामांनी पांडुरंगापुढे फार सुरेख मागणे मागितले आहे की ज्यामुळे साऱ्या समाजाचेच भले होईल.

‘हेचि दान देगा देवा, तुझाविसर न व्हावाऽऽऽ’ या शब्दपंक्तीत त्या शक्तीचे सतत अविस्मरणच चिंतून सामान्यांचा भक्तीचा मार्ग खुला कला आहे. या संतांनी स्वतःसाठी, स्वतःच्या ऐहिक सुखासाठी काहीच, कधीच मागितले नाही ‘अवघे विश्वचि माझे घरss’ या विचारसरणीतून सतत विश्वाच्या भल्याचा विचार केला आहे. म्हणून ही संतमंडळी आपल्यातून जाऊन (अवतार समाप्ती) अनेक शतके जरी झाली तरी आजही आम्हाला वंदनीयच आहेत.

‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’ या संकल्पनेतून त्यांचे चरित्र, साहित्य, आजही आम्हाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या साहित्याचा प्रत्येकाला त्याच्या बुद्धीनुसार, कुवतीनुसार वेगवेगळा अर्थ लागल्याने त्याच्यावरच सखोल तपशीलवार विचार होत असल्याने प्रबंध लिहिणारे अभ्यासकदेखील भरपूर आहेत, यातच संतांच्या साहित्याची ‘गहराई’ (खोली) समजते. वास्तविक ते कोणत्या शाळेत वा कॉलेजात गेले होते? वा विशेष ज्ञान प्राप्त केले होते? तरी आंतरिक प्रेमापोटी व ईश्वरीकृपेने त्याचे बहुमूल्य मार्गदर्शन आमचे जीवन आजही घडवीत आहेत, संपन्न करीत आहेत हे नक्की. त्याबद्दल वादच नाही.

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतिऽऽ’ या न्यायाने ही संत मंडळी म्हणजे ईश्वराने गउद्धारासाठी पाठविलेले प्रेषितच होते. जात, पात, धर्म, वंश इ. भिंतींच्या पलीकडे त्यांचे जगदोद्धाराचे कार्य म्हणजे ईश्वरी प्रसाद म्हणायला हवा.

महाराष्ट्रात १७ व्या शतकात जगनियंत्याने
तीन महान रत्ने दिली. १) संत तुकाराम, २) समर्थ रामदास स्वामी, ३) छत्रपती शिवाजी महाराज.

‘परित्राणाय साधूनाम् ऽऽ’ या भगवद्गीतेतील तत्त्वाची ही प्रत्यक्ष प्रचितीच म्हणावी लागेल. कारण १३ ते १६ व्या शतकाच्या काळातील यावनी आक्रमणांनी पीचलेल्या, त्रासलेल्या जनतेला सावरून, त्यांना एकत्र आणून त्यांच्यात स्वत्व, आत्मविश्वास अंगी बाणणे हे महत्त्वाचे होते. या तीन संतांचा अवतार जणू त्यासाठीच होता. प्रेषितांनी ज्या घरात जन्म घेतला ती घरे खचितच साधी व सामान्य नव्हती. ह्यांच्या जन्माच्या अगोदर अनेक पिढ्याकडून ईश्वरी कार्य घडलेले आहे. थोडक्यात सर्वोत्तम समाजकार्य होण्यासाठी त्या घराण्याची सुपीक पार्श्वभूमी देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हटलेच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी । जसे पेराल तसे उगवते. ‘

१६ व्या शतकाच्या अगदी अखेरीस पिढ्यानपिढ्या पांडुरंग भक्तीने संपन्न असलेल्या मोरे कुटुंबात पुणे जिल्ह्यातील देहू (इंद्रायणी काठी) या गावी पेशाने व्यापारी (वाणी) असलेल्या घरात तुकोबांचा अवतार झाला. भगवंताच्या इच्छेनुसार व योजनेनुसार समाजातील अठरापगड जाती जमातींना शक्तीच्या माळेत एकत्र गुंफण्याचे कार्य व्हायचे असल्याने अनेकविध घराण्यात ही संत रत्ने अवतारीत झाली. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चातुवर्ण्यातील घराण्यांतून आलेली ही संतरत्ने भक्तीद्वारे समाजास ईश्वरी शक्तीप्रत नेण्यासाठी सदैव कार्यरत राहिली.

वाण्याच्या घरात जन्मलेल्या तुकोबाने नेहमीच्या व्यापारी वृत्तीला न मानवणाऱ्या व पेलणाऱ्या वृत्तीचा अंगिकार केल्याने व्यावहारिक व्यापारी जगात संत तुकोबा कधीच यशस्वी झाले नसले तरी सचोटी, प्रामाणिकपणा स्विकारून भगवद्भक्तीने भक्तीक्षेत्रांत अत्युच्चपदी पोहोचले. म्हणूनच म्हटले जाते ना ‘ज्ञाने रचयिला पाया तुका झालासे कळस ।’ यावरून संत तुकोबांचे जगतकार्य ध्यानी येते. भक्तीचे बीज समाजात ज्ञानदेवाने पेरले तर तुकोबाने भक्तीचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या छायेखाली आजही कितीतरी पांथस्थरूपी भक्त, साधक आसरा घेत आहेत.

‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ या संत तुकोबांच्या कार्यामुळे घरात संपन्नतेचा कायमच अभाव. त्यामुळे संसाराचे गणित जुळविताना तुकोबांच्या धर्मपत्नीची (आवली) फारच कुचंबणा होत असे. विठ्ठलाच्या सतत नामस्मरणाने संसाराचा गाडा व्यवस्थित चालत नसल्याने तिची चाललेली चिडचीड. पांडुरंगाप्रतीचा राग हे सारे वास्तविकतेला धरूनच होते. पण नाम स्मरणातच असलेल्या तुकोबांना त्याचे काहीच नव्हते कारण त्यांचा पूर्ण भरवसा विठ्ठलावरच होता. त्याच्या उत्युच्च भगवत् विश्वासाची किंमत अर्थात सामान्यांना समजणारी नव्हती.

‘मना सज्जना भक्तीपंथेचि जावे’ या समर्थांच्या मनाच्या श्लोकाद्वारे समाजाला भक्तीचाच महिमा सांगितला गेला आहे. ईश्वराप्रत जाण्यासाठी अगदी सामान्यातील सामान्य संसारी माणूस फक्त भक्तीच करू शकतो. हे तत्त्व संतमंडळींनी सतत समाजमनापुढे खुले केले. समर्थ दासबोधात नवविधाभक्तीचीच कास धरताना दिसतात. त्यांच्या मते भक्ती ही ईश्वराप्रत घेऊन जाणारी साधना, तपस्या (भक्ती) असून ती करणारा ‘साधक’ म्हणजे भक्त असतो तर साधनेमागील ईप्सित स्थळ म्हणजे मुक्ती म्हणजे ‘साध्य’ होय. नावे वेगळाली असली तरी त्यामागील तत्त्व हे एक असल्याचे संतांनी सतत सांगितले आहे.

प्रत्येकाला पूजातंत्र, अर्चन, अर्पण, मंत्र, पद्धती वगैरे माहिती असेलच असे सांगता येणार नाही कारण प्रत्येकाच्या कुवतीनुसार हे असू शकते. पण प्रत्येकाला एक गोष्ट सहजी जमू शकते ते म्हणजे ईशशक्तीचे ‘नामस्मरण.’ थोडक्यात त्या उपकारकर्त्या ईशशक्तीला सतत आठवीत राहणे. विशेष म्हणजे ते नामस्मरण फक्त बुद्धीची देणगी लाभलेला माणूसच करू शकतो. हाच माणूस व अन्य प्राण्यात फरक आहे. भारतीय अध्यात्मानुसार आपापल्या प्रारब्धकर्मानुसार ८४ लक्ष योनी पार केल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. सोबत तो बुद्धीची देणगी घेऊन आलेला असतो. त्या बुद्धीच्या साहाय्याने त्याने स्वतः सोबत इतरांचा देखील उद्धार करण्याची त्या जगत्न्नियंत्याची अपेक्षा असते. आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्म घेणारा जीव कधीतरी संपतोच. जन्म व मृत्यू दरम्यान त्या जीवाचे अन्नवस्त्रादी योगक्षेम ईश्वरीशक्ती (जगन्नियंता) चालवीत असते. ती देखील कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्या शक्तीप्रती कृतज्ञता पाळण्याची बुद्धीजीवाची जबाबदारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर जीवनात आपल्याला कित्येक जणांची आपल्या दैनंदिन कामात छोटी मोठी मदत होत असते. आपण काम झाल्यावर त्या व्यक्तीचे आभार मानतो. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मग जी शक्ती आपला सारा योगक्षेम चालविते तिच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवीच अन्यथा आम्ही कृतघ्न ठरू. ती कृतज्ञता साध्यासुध्या ‘भक्तीने’ आपण साधू शकतो. ती म्हणजे स्मरण भक्ती-नामस्मरण. ती इतकी सहज व सोपी आहे की त्याला कोणत्याही वेळाकाळाचे बंधन नसते. आपापली दैनंदिन सारी कार्ये करीत असताना नामस्मरण करू शकतो.

नामसंकीर्तन साधन पै सोपे,
जळतील पापे जन्मांतरीची.

संतांच्याचरित्रांतून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की त्यांनी आपापली नित्य कर्मे कधीच सोडलेली नाहीत. उलट ती कर्मे करतानाच नामस्मरणाने सारी कर्मेच ईश्वर बनविली.

‘घेता नाम विठ्ठलाचे, जळती पर्वत पापांचे.’ नामस्मरणात इतके सामर्थ्य आहे. कुणीही पापी त्या पाप कर्मातून धुवून गेल्याची उदाहरणे सर्वश्रुत आहेत.

अत्यंत हिंसक लुटारू व क्रूर असलेला ‘वाल्या कोळी. ‘ रामनामाने अती शुद्ध पवित्र होऊन रामचरित्राचा कवी बनला. अजामिळसारखा अत्यंत पापी, क्रूर देखील केवळ ‘नारायण’ नावाच्या त्याच्या शेवटच्या मुलाच्या संबोधण्यामुळे उद्धरून गेला.

वास्तविक आपण दिवसातून सुमारे १०,००० वेळा श्वास घेत असतो. त्या प्रत्येक श्वासागणिक ईश्वराचे नाम घेतले तर वेगळ्या आणखी जपजाप्याची गरजच नसते. पण आपल्याला ते शक्य होत नाही कारण तेवढी आपली तयारी व निग्रहदेखील नसतो. श्रद्धा, विश्वास नसतो. नाम घेत असताना अनेक अनंत भले बुरे विचार सतत मनात येत असतात त्यामुळे आपण मुखाने नाव घेत असलो तरी मनापासून ते खरेखुरे नामस्मरण होत नसते. आपल्या मनावर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ या षड्रिपूंची जाड जाड पुटे असतात. त्यामुळे सदैव मन अशुद्धच असते. ते शुद्ध बनण्यासाठी मनातील विकार जाणे गरजेचे असते. त्यासाठी सत्संग, सत्पुरुषांचे मार्गदर्शन हवे असते. त्यांचा सहवास हवा असतो. विवेकवृत्ती जागृत व्हावी लागते. तेव्हाच खऱ्या अर्थाने नामस्मरण होते. मग त्या शक्तीचा प्रसिद्ध अभंग आहे –

भक्तीवाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला, मीच खरा अपराधी.

नामस्मरण करीत असताना प्रत्येक नामा सोबत आपले मन कणाकणाने शुद्ध, पवित्र होत जाते. सहाजिकच कणाकणाने भक्त त्या ईश्वरशक्तीप्रत जाऊ लागतो. कारण त्या ईश्वरशक्तीप्रत पोहोचल्याशिवाय शक्तीची ओळख कशी होणार? व आपण त्याच्याशी तादात्म्य कसे पावणार? प्रत्येक नामासोबत ईश्वरशक्ती सतत आपल्या सोबत असते त्यातूनच कित्येकदा अतर्क्य अशा चमत्कृती घडून येतात.

प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी संत तुकारामांच्या किर्तनास आले असताना व यवनाच्या सैन्यानी घेरले त्यावेळी एक चमत्कृती घडली व कीर्तनात बसलेले सारेच जण शिवाजी दिसू लागले. सैनिकांना प्रत्यक्ष शिवाजी ओळखणेच अशक्य झाले व खरा शिवाजी सहजपणे तिथून सटकला. या कथेतून एवढेच घेता येईल की ईश्वरीशक्ती भक्ताचे सतत संकटातून रक्षण करीत असते. अशीच एक गोष्ट संत तुकारामांच्या बाबतीत घडली. ब्राह्मणांच्या अतिरेकी वागण्यावरून तुकारामांना त्यांनी लिहिलेल्या गाथा इंद्राणीत बुडवायला सांगितल्या गेल्या. त्यानुसार अत्यंत खिन्नपणे तुकारामांनी त्यांचे जीव की प्राण असलेल्या गाथा पाण्यात सोडून दिल्या व अन्न पाणी वर्ज्य करून तेथेच नामस्मरण करू लागले. तेरा दिवसांनी त्या गाथा कोरड्या स्थितीत परत तुकारामांना प्राप्त झाल्या. ईश्वरीकृपेने तुकारामांचे अवतार ईप्सित पूर्ण करण्यासाठी गाथा-म्हणजेच ज्ञान समाजात पसरविले गेले. वेगळ्या शब्दात बोलायचे झाले तर गाथांच्या स्वरूपात संत तुकारामबुवा आजतागायत अमर राहिले. त्यांचे साहित्य अजरामर झाले.

देहे त्यागिता किर्ती मागे उरावी….’ (मनाचे श्लोक)

‘अवली’ ची कृती व्यवहाराला धरून होती त्यात भाबडेपणा नव्हता. ती जरी पांडुरंगाला काळ्या, विठ्या म्हणून दुषणे देत असली तरी संत तुकोबांची खऱ्या अर्थाने ती पतिव्रता सहधर्मचारिणी होती. ते जेवल्याशिवाय ती जेवत नसे. एकदा तर कित्येक दिवस काट्याकुट्यातून भंडाऱ्या डोंगरातून आपल्या पतीसाठी डोक्यावर जेवण घेऊन वाट तुडवीत जात असे. विठ्ठलावरची तिची भक्ती विरोधातून होती. (जशी रावण, कंसाची) म्हणून अवतारसमाप्तीच्या वेळी तुकारामांना न्यायला पुष्पक विमान आले असताना आवलीला तुकारामांनी बरोबर चलण्यास सांगितले. तिची तेवढी पात्रता होती हे विसरून चालणार नाही. अर्थात संसारातच ती अधिक रमल्याने ती त्यांचे सोबत गेली नाही ही गोष्ट निराळी. पण पतीसोबत सहगमन करायची तिची पात्रता व क्षमता नक्कीच होती.

अशा या वैश्यवृत्तीच्या पांडुरंग भक्ताने देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता केवळ समाजाचाच विचार करून साऱ्या जगतासाठीच महत्त्वाची प्रार्थना केली की आजही ती तितकीच जिवंत ठरते.

जीवनभर आत्मानंदात बुडून रममाण होणारे तुकोबा म्हणतात-

‘आनंदाचे डोही आनंद तरंग sss’ कारणत्यांना सर्वत्र आनंदच दिसतो. दुःख कुठेच दिसत नाही. कारण ते भौतिक सुखदुःखाच्या कल्पनेच्या कधीच पलीकडे गेलेले असतात. सर्वत्र त्यांना पांडुरंगच म्हणजे चैतन्य दिसते. या साऱ्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी स्विकारलेला ‘भक्तीचा’ म्हणजेच ‘नामस्मरणा’चा मार्ग. नामस्मरणाची अविट गोडी ते कधीच विसरू शकले नाहीत. त्यासाठीच पांडुरंगाला ते सतत प्रार्थना करतात व एकच मागणे मागतात. जे आजही नारदीय कीर्तन परंपरेत कीर्तनाच्या अखेरीस बुवा न चुकता म्हणतात. कारण भक्ती प्रचार व प्रसार हेच नारदीय कार्य आहे.

‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.’

-रामकृष्ण अभ्यंकर

(दिवाळी अंक २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..