नवीन लेखन...

ओवाळूं आरती : भाग – २/५

भाग

अर्चनेचे प्रकार आपल्याला वैदिक काळापासून दिसून येतात. वैदिक ऋचांमध्ये वेगवेगळ्या देवतांना वंदन व त्यांची स्तुती केकेली आहे. उदाहरणार्थ,अनेकांना परिचित असलेला गायत्री मंत्र.          ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यम्’ हा गायत्री मंत्र, सूर्याची वंदना करणारा मंत्र आहे. इंद्र, मित्र-वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) यांची अर्चना होत असे, हें आपण आधी पाहिलेंच आहे.  तसेंच, उषा, सरस्वती नदी यांची स्तुती करणार्‍या वैदिक ऋचाही आहेत. नंतरच्या काळातही, पुराणिकांनी हें दैवी-कथांच्या कथन-गायनाचें कार्य शतकानुशतकें केलें आहे.

‘आरती’ हा शब्द संस्कृत असला तरी, आज  आपल्यासमोर ज्या पद्यरूप आरत्या असतात, त्या ‘आरत्या’ हा काव्यप्रकार मध्ययुगीन आहे. वैदिक आर्ष-संस्कृत व नंतरच्या काळातील संस्कृतमध्ये अर्चनेचे अनेक प्रकार दिसले तरी, आरत्या दिसून येत नाहीत. (‘संस्कृत भाषेत आरत्या पुरातन काळीं अस्तित्वात होत्या, पण सगळ्याच्या सगळ्या  नंतरच्या काळात लुप्त झाल्या’ , हें मानणें फार कठीण आहे. फारतर असें असेल की, ‘तत्कालीन संस्कृत आरत्या असल्याच तर, फारफार कमी असतील , व म्हणून सहसा सापडत नाहींत’. पण , त्याहीपेक्षा जास्त शक्यता अशी वाटते ही, ‘त्या काळी मंत्र-श्लोक-स्तोत्रें-प्रार्थान हेंच प्रकार वापरात असावेत’ ).  आरतीच्या संदर्भात, पुरातनकालीन ‘प्राकृत‘ भाषांचेंही तसेंच आहे. मध्ययुगात, अगदी यादवकालीन मराठीतही आपल्याला आरत्या हा प्रकार दिसत नाहीं. मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांचा काळ  हा यादवकालीन काळ. ज्ञानेश्वरांनी भगवद्.गीतेवर ‘टीका’ लिहिली, पसायदान (प्रसाद-दान) लिहिलें, विराण्या लिहिल्या, भक्तिपंथाचा प्रचार-प्रसार केला ; पण त्यांनी लिहिलेली आरती दिसून येत नाहीं. ज्ञानेश्वकालीन इतर संतांनीही भरपूर रचना केल्या आहेत, ज्या भक्तिरसानें भरलेल्या आहेत, पण त्यांनी रचलेली अशी एखादी आरती दिसत नाहीं. (ज्या नामदेवांच्या नांवाच्या आरत्या आहेत, ते नामदेव ज्ञानेश्वरकालीन नव्हेत, तर पंधराव्या-सोळाव्या शतकातील आहेत. त्याबद्दल पुढे पाहूं या).

भक्ती ही गोष्ट जरी पुरातन काळापासून अस्तित्वात आहे, पण ज्याला ‘भक्तिपंथ’ म्हणतात, तो पंथ इ.स. च्या दुसर्‍या-सहस्त्रकाची-सुरुवातीची-दोनएक-शतकें-गेल्यानंतर अस्तित्वात आलेला आहे. तो दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला, व त्याचा भारतभर प्रसार झाला. उत्तरेत वल्लभाचार्यांनी भक्तिपंथाचा प्रचार केला. हिंदीत, तुलसीदास, सूरदास, मीराबाई अशा संतांच्या भक्तिपर रचना खूप आहेत (उदा. तुलसींचें रामचरितमानस —  ज्यातील ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाहिं पर वचन न जाहिं ।’, ही चौपाई प्रसिद्ध आहे  ; सूरदासांचें ‘निरगुन कौन देस को बासी ? ’ वगैरे ; मीरेचें ’मेरो तो गिरधर गोपाल, दूसरो न कोय ।’ इत्यादी). पण, या संतांनी आरत्या मात्र लिहिलेल्या आढळून येत नाहींत. कबीर तर एक प्रकारें सूफीच होते. भारतात इराणमधून ‘सूफीझम’ मध्य युगात आला. ‘सूफीझम’मध्येही एक प्रकारची भक्ती व तीनुसार गायन-संगीत हें होतें. (त्या काळीं, व आजही अशा संतांच्या मज़ारपुढे भक्तिप्रद कव्वाल्या गायल्या जातात). मात्र कबीरांनी व अन्य सूफी संतांनी आरत्या लिहिल्याची माहिती नाहीं. कबीरांचें लेखन तर ‘रहस्यवाद’ म्हणून ओळखलें जातें, म्हणजे तें भक्तीपंथीय नाहीं.  गुजरातीत, नरसी मेहता ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीर पराई जाणे रे ’ अशी भजनें लिहितात, पण तत्कालीन आरती उपलब्ध आहे काय ? पूर्वेतही चैतन्य महाप्रभू मधुराभक्ति आळवत होते, पण तत्कालीन आरत्या आहेत काय ? तसें पाहिलें तर, तुलसी, सूर, मीरा, नरसी, चैतन्य हे ज्ञानेश्वरादींच्या बर्‍याच नंतरच्या काळातले आहेत, पण मध्य युगात एकनाथांनी मराठीत सुरूं केलेला ‘आरती’ हा प्रकार हिंदीत त्या काळीं दिसत नाहीं, तो नंतर आला असणार.

भक्तिपंथाप्रमाणेंच,  ‘दत्तपंथ’ ,जो खासकरून महाराष्ट्रात लोकप्रिय आहे , हा पंथही मध्ययुगीनच. दत्ताला ‘अवधूत’ असेंही म्हणतात, आणि अवधूत हा शब्द नाथपंथीयांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘नाथपंथा’चा मुख्य काळ, इ.स. च्या पहिल्या-सहस्त्रकाच्या-अखेरीची-दोनएक-शतकें  व दुसर्‍या-सहस्त्रकाची-सुरुवातीची-दोनचार-शतकें, असा आहे, म्हणजेच, नाथपंथही मुख्यत: मध्ययुगीनच. त्यामुळे, भक्तिपंथाबरोबरच, या पंथांशी संबंधित आरत्याही पश्चातकालीन ठरतात.

मराठीत आपल्याला  पद्यरूपानें दिसणार्‍या आरत्या , मुख्यत्वें संत एकनाथ यांच्या काळापासूनच्या आहे, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे.  एकनाथांआधी आपल्याला भक्तिरचना, ओवी, अभंग, पदें, वगैरे रूपांतच  दिसतात.  एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलें, अध्यात्मिक भारुडें लिहिली, तशा आरत्याही लिहिल्या. आरत्यांमध्ये, ‘एका जनार्दन‘ असा त्यांनी स्वत:च्या नांवाचा उल्लेख केलेला आहे. (जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरू ). त्या काळानंतर  आपल्याला तुकाराम, रामदास वगैरे संतांनी, त्यांच्या शिष्यवर्गानें, त्या-त्या पंथीयांनी, तसेंच मुक्तेश्वरादि अन्य भक्तांनी, साहित्यिकांनी व भक्ति-रचना करणार्‍या इतरांनीं आरत्या लिहिलेल्या आहेत. आपण आधी उल्लेख केलेलाच आहे की, ‘नामदेव’ या नांवाच्या ज्या आरती-रचना आहेत, त्या ज्ञानेश्वरकालीन नामदेवांच्या नव्हेत. त्या आरत्यांची ची भाषा पाहिल्यास, ती ज्ञानेश्वकालीन नाहीं, हें सहज लक्षात येतें. ज्ञानेश्वरकालीन व एकनाथकालीन मराठीत फरक नसता, तर एकनाथांना ज्ञानेश्वरांची ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) हिची भाषा, स्वत:च्या काळात वापरात असलेल्या मराठीत  बदलायची जरूर भासलीच नसती. इतिहासाचार्य राजवाडे यांना, ज्ञानेश्वरांच्या काळानंतरच्या दो-चार-दशकांतच उतरवलेली (कॉपी केलेली) प्रत मिळालेली आहे. तशीच अन्य एक प्रत अन्य एका सद्- गृहस्थांनाही मिळालेली आहे. त्यांतून, ज्ञानेश्वर व एकनाथ या दोन संतांच्या काळातील भाषेचा फरक कळून येतो.

ही चर्चा करण्यांचे कारण म्हणजे, आरत्यांशी संबंधित ‘नामा/ नामदेव’, ‘बाप रखुमादेवीवर’ वगैरे उल्लेख  हे, पश्चात्-कालीन आहेत. नामा म्हणजे ‘विष्णुदास नामा’. ‘नरहरि’ या नांवानें ज्यानें आरती लिहिली, ती व्यक्ती नरहरी सोनार खचितच नव्हे. ‘गीतेची आरती’  म्हणून एक आरती आहे, जिच्यात शेवटी ‘बाप रखुमादेवीवर’ असे शब्द आहेत ; पण ही ज्ञानेश्वरांनी रचलेली नक्कीच वाटत नाहीं, तिची भाषा ज्ञानेश्वरकालीन वाटत नाहीं. तसेच, ज्ञानेश्वर, तत्कालीन प्रथेप्रमाणें ‘बापरखुमादेवीवरु’ असा उकारान्ती शब्द वापरतात. (त्यांचे अन्य असे शब्द आहेत : घनु, काऊ, पाऊ, पंढरीराऊ, वगैरे ) . पण हा, ‘गीतेच्या आरतीचा’ कर्ता ‘बापरखुमादेवीवर’ असा स्वत:चा अकारान्ती उल्लेख करतो. त्यावरूनही स्पष्ट दिसतें की, हा रचयिता म्हणजे ज्ञानेश्वर नव्हेतच. कदाचित असें असावें की, ज्ञानेश्वरांनी गीतेवर ‘टीका’ लिहिलेली असल्यामुळे, हा जो कोणी ‘गीतेची आरती’ रचणारा अनामिक भक्त होता, त्यानें भक्तिभावानें ज्ञानेश्वरांचें नांव तिच्यात गोवलें  असावें. याव्यतिरिक्त,  या अनामिक रचयित्याच्या मातेचें नांवही ‘रुख्मिणी’ असूं शकेल, व त्यामुळे त्यानें ज्ञानेश्वरांपासून स्फूर्ती घेऊन, स्वत:चें नांवही (टोपण नांव), ‘बापरखुमादेवीवर’ असें घेतलेलें असूं शकेल.

साधारणत: आरत्यांमध्ये रचयित्यांनी त्यांची नांवें गोवलेली असतात, हें वरच्या उदाहरणांवरून स्पष्ट आहे. (तशी मध्ययुगीन पद्धतच होती. उदा. सूरदास, मीरा यांच्या रचना पहा. गझल हें  भक्तिकाव्य नव्हेच.पण गझलेतही, मक्त्यात — म्हणजे अंतिम शेरमध्ये —- आपल्याला गझलगोंनी स्वत:चें नांव गोवलेलें दिसतें ). आरत्यांच्या थोर रचयित्यांची कांहीं नांवें आपण आधी पाहिलीच आहेत, जसें एकनाथ, मुक्तेश्वर, तुकाराम, रामदास वगैरे. कांहीं अन्य नांवांची वर चर्चा  केलेली आहे , जसें विष्णुदास नामा, नरहरि इत्यादी. कांहीं अन्य नांवें अशी : श्रीपति, मोरेश्वसुत-वासुदेव, माधवदास, चिंतामणि, रामी-रामदास (एक रामदासपंथीय साधुपुरुष), दामोदर, अनंत- गोपाळदास, कृष्ण (कृष्णाजी), मंगेशात्मज, गोसावीनंदन,  इत्यादी. अनेकदा रचयित्यानें स्वत:चा उल्लेख,  ‘दास’ , ‘माधव-दास’, ‘रमावल्लभ-दास’ (इत्यादी), एवढाच केलेला आहे. कांहीं आरत्यांमध्ये रचयित्यानें स्वत:चें नांव गोवलेलेंच नाहीं. कारण तो भक्त आहे, त्याला स्वत:चें नांव गोवायची आवश्यकता वाटली नाहीं. आधुनिककालीन संतांवरील आरत्यांच्या रचयित्यांनी साधारणपणें त्यांचें नांव गोवलेलें नसतेंच. याव्यतिरिक्त, अजूनही अनेक रचयिते असतील, असणारच.

वर उल्लेखलेले ‘गोसावीनंदन’ यांनी जशा मराठी आरत्या लिहिलेल्या आहेत, तशी त्यांनी लिहिलेली ‘सिंदुर लाल चढायो’ ही श्रीगणेशाची हिंदी आरतीही  मिळते. त्याचप्रमाणें रामदास, एकनाथ यांच्या हिंदीतील (किंवा जिला ‘दखनी हिंदी’ म्हणत, त्या भाषेतील) रचना आहेत, नामदेवांच्या हिंदी रचना तर शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहिब’ या ग्रंथात समाविष्ट आहेत. पण या भक्तिप्रद रचना असल्या तरी, त्या आरत्या नव्हेत. (ग्रंथसाहिब भक्तिपरच आहे, त्यातील ‘शबद’ या भागाचें बरेंच ‘पठण’ होतें, पण त्या आरत्या नाहींत. गुरुबानी-पठणात ‘आरती’ हा शब्द येतो, पण तरी त्या पठणाला ‘आरती’ असें अभिधान देतां येईल का ?).

आरत्यांचे वर्ण्यविषय (आराध्यें-उपास्य) पण भिन्नभिन्न असतात. जसें, गणेश, शंकर, विठ्ठल, दत्त, विष्णू, व्यंकटेश, श्रीराम, मारुती, परशुराम, श्रीकृष्ण, खंडोबा,  असे अनेक देव व देवावतार; दुर्गा,  गौरी / मंगळागौरी , हरितालिका, महालक्ष्मी, एकवीरा, शांतादुर्गा, अशा अनेक देवी ; ज्ञानेश्वर, नामदेव, नृसिंह- सरस्वती, एकनाथ, तुकाराम, बहिरोबा, रामदास, असे पुरातन संत ;  अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगांवचे गजानन महाराज, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, शिरडीचे साईबाबा, पावसचे स्वरूपानंद, असे अनेक आधुनिककालीन संत, या सर्वांवर आरत्या आहेत. त्याव्यतिरिक्त, नवनाथ, काळभैरव, दशावतार, वैनतेय (गरुड), चंद्र, शनिदेव, सूर्य, तुलसी, गंगा, सत्यनारायण, देवपंचायतन, पुरातन-संतांची-मांदियाळी, सद्.गुरू, अशा अनेकांच्या आरत्या मिळतात. विविध देवस्थानांतील विशिष्ट दैवतांच्या आरत्याही मिळतात, जसें शिखर शिंगणापुरचा शंभूमहादेव, मंगेशीचा मंगेश. त्यातच असेंही आहे की मूळ दैवत एकच, पण त्याला भिन्नभिन्न नांवें असतात, व त्या त्या नांवांनी तें दैवत भजलें जातें, आणि यामुळे त्या त्या भिन्नभिन्न नांवांनी त्याच्या आरत्याही होतात, जसें की दुर्गा, विष्णू इत्यादी. परत, असेंही आहे की, एकच दैवत, पण वेगवेगळ्या स्थानमहात्म्यामुळे तें वेगवेगळ्या नांवानें भजलें जातें, व त्यामुळे त्या त्या भिन्न स्थानांशी निगडित देव-नावांच्याही आरत्या केल्या जातात. ( जसें की, शंकर हें दैवत भजलें जातेंच , पण, वर उल्लेखल्याप्रमाणें,  मंगेश हा आहेच, शिखर शिगणापुरचा शंभुमहादेवही आहेच, जेजुरीचा खंडोबाही आहेच). परत, अवतारांचा समावेशही विचारात घ्यावा लागतो. या सगळ्या गोष्टीमुळे आरत्यांचें वैविध्य वाढलेलें आहे. त्यामुळे, आरत्यांची यादी प्रचंड आहे; त्यांची संपूर्ण जंत्री बनवणें फार कठीण आहे. पण थोडक्यात काय, तर, ज्या आराध्याची/उपास्याची  आराधना/उपासना करायची, पूजा करायची, त्या आराध्याची आरती कोणीतरी संतानें, भक्तानें वा कुणां अन्य कवीनें रचलेली असते.

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

लेखकाचे नाव :
सुभाष स. नाईक
लेखकाचा ई-मेल :
vistainfin@yahoo.co.in
सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..