नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ७- पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष

                                   पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष

खैर या वृक्षाचे (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); संस्कृत – खदिर) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी जंगलातील काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो.

काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामापर्यंत आणि म्यानमारमधील रुक्ष मैदानांत हा वृक्ष आढळून येतो. भारतातील पश्चिम घाट, आंध्र प्रदेश, पंजाब इ. प्रदेश आणि हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात हा चिपळूण, सावर्डे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आढळतो. याच्यापासून काथ (कात) हा विड्याचा घटकपदार्थ बनवला जातो.

खैर हा मध्यम आकाराचा वृक्ष ९-१२ मी. उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या, तर जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसांसारखी असून दलांच्या १०-१२ जोड्या असतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात.

फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणसावर येतात. खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. शेंगा पातळ, पिंगट, सरळ, ५-८ सेंमी. लांब व टोकास चोचीसारख्या असतात. त्यात ३-१० बिया असतात.

खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास कात (कॅटेच्यू) म्हणतात. खैर वृक्षाचे लाल खैर व सोन खैर असे दोन प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया चुंद्रा आहे. महाराष्ट्रात विशेषकरून हेच आढळत असल्यामुळे सामान्यपणे हेच खैर किंवा काताचे झाड असे मानतात.

खैराच्या झाडाच्या अतिजून, लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळवून काढलेल्या पदार्थास कात (किंवा काथ) म्हणतात.
खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया चुंद्रा आहे. सोन खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया पॉलिकँथा (अ‍ॅकेशिया सुमा) आहे. कातासाठी हेही झाड प्रसिद्ध असून ते उ. कर्नाटक व द. महाराष्ट्र येथे आढळते. याखेरीज प. बंगाल, बिहार, व श्रीलंका येथेही आढळते.

मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात.

कात:
मुख्यतः खैर वृक्षाच्या (ॲकेशिया कॅटेच्यू) लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळविल्यावर जो घन पदार्थ मिळतो त्यास `कात’ असे म्हणतात. खैराशिवाय थोडया प्रमाणात ताज्या सुपाऱ्या, आवळी फळ, गॅंबिअर झाडाची (युन्कॅरिया गँबीर) पाने कात तयार करण्यासाठी वापरतात. खैर झाडापासून `कात’ व `कच्छ’ असे दोन पदार्थ मिळतात. ज्यामध्ये कॅटेचीन जास्त प्रमाणात असते त्यास `कात’ व ज्यामध्ये कॅटेच्यू टूनिक अम्ल जास्त असते त्यास `कच्छ’ असे म्हणतात. भारतामध्ये कात विड्यातून खातात तसेच त्याचा औषधातही उपयोग करतात. कच्छचा उपयोग कपडे रंगविण्यासाठी व कापड छपाईमध्ये तसेच गॅंबिअर काताऐवजी कधीकधी करतात. सामान्यतः `कात’ आणि `कच्छ’ या दोहोंनाही कात म्हणूनच ओळखले जाते. खैर वृक्ष भारत व ब्रह्मदेश या देशांतील जंगलात आढळतात. अ‍ॅकारिया गॅबिएर या झाडांच्या फांद्या व पानांपासून काथ करतात. खेराचं लाकूड पाण्यात उकळून तयार केलेला अर्क वाळवल्यावर त्यापासून काथ तयार होतो. काथाचा रंग तपकिरी करडा किंवा तांबडत करडा असतो.

काथाचा खडा छिद्रमय आणि ठिसूळ असतो. काथ तोंडात टाकताच पहिल्यांदा कडू आणि झणझणीत चव लागते. त्याला

एक विशिष्ट वास असतो. काथामध्ये टॅनिक अ‍ॅसिड असते. याच टॅनिक अ‍ॅसिडमुळे काथाचा उपयोग गुळण्या करण्यासाठी व हिरड्यांना लावण्यासाठी केला जातो.

केसांमध्ये दिसणारा सफेद केस कोणालाच नको असतो. काही जण केस पांढरे व्हायला लागल्यानंतर डाय करायला लागतात. पांढरा रंग लपविण्यासाठी बरेचदा अमोनिया असणारा रंग वापरला जातो. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. केसांना रंग देण्यासाठी मेंदीचाही वापर सर्रास केला जातो. यामुळे केसांचे नुकसान होत नाही. पण बऱ्याचदा असे वाटते की, मेंदीचा रंग उतरायला लागल्यावर केस लाल दिसू लागतात आणि मेंदीने केसांना एकच रंग मिळतो. पण असे नाही. मेंदीमुळेही तुम्हाला हवा तसा रंग केसांना देता येतो. तुम्ही मेंदी तयार करताना काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला हवा तसा रंग तुम्हाला केसांना देता येतो आणि तेही कोणत्याही केमिकलयुक्त रंगाशिवाय. मेंदीने तुम्ही केसांना लाल, ब्राऊन आणि बरगंडी असे कलर नक्कीच देऊ शकता. यामुळे मुळात केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि तुमचे केसही व्यवस्थित राहतात. काथामुळे हिरड्या मजबूत होतात. तोंडातल्या आतील जखमा बऱ्या होतात. तसेच यामुळे गळ्याची सूज उतरते. चिघळलेल्या जखमांवर काथाचे मलम लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात. खाण्याचं पान बनवतानाही काथाचा वापर केला जातो.

सरळ झाडापेक्षा वेड्यावाकड्या झाडांपासून कात जास्त मिळतो. नुकत्याच तोडलेल्या झाडापासून मिळणाऱ्या काताचे प्रमाण वाळलेल्या झाडापेक्षा जास्त असते. मेलेल्या झाडापासून कात निघत नाही. शरद ऋतूत व हिवाळ्यात तोडलेल्या झाडांपासून कात जासत मिळतो. झाडाचा बुंधा ६०-१२० सेंमी. व्यासाचा झाल्यावर व झाडावर पांढऱ्या रेषा किंवा ठिपके दिसल्यास ती तोडतात. एका झाडापासून त्याच्या लाकडाच्या ७% कात मिळतो. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात.

खैर झाडामध्ये एल एपिकॅटेचीन, रॅसेमिक ॲककॅटेचीन व कॅटेच्यू टूनिक अम्ल ही संयुगे असतात. जून झाडात `खीरसळ’ हे करडे पांढरे स्फटिकीय चूर्ण सापडते. त्यात प्रामुख्याने एल एपिकॅटेचीन हे संयुग आढळते. कात तयार होत असताना एपिकॅटेचिनाचे रॅसेमिक ॲककॅटेचिनामध्ये रुपांतर होते. ते थंड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे), तर उष्ण पाण्यात विद्राव्य असून पाण्याच्या सानिध्यात त्याचे ऑक्सिडीकरण (ऑक्सिडीभवन) होऊन कॅटेच्यूटूनिक आम्ल बनते.

उत्पादन:

खैरकात-

कुटिर उद्योगात हा कात एकाच प्रकाराने करतात. यामध्ये कच्छ मिळविण्याचा प्रयत्न केला जात नाही. साधारणपणे नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये कात तयार करण्यात येतो. खैराची झाडे तोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करतात. त्यावरील आवरण काढून टाकतात व आतील लाल लाकडाचे आणखी बारीक आकाराचे तुकडे करतात. हे तुकडे मातीच्या भांड्यात पाण्याबरोबर शिजवून त्यातील अर्क काढतात. ही मातीची भांडी भट्टीवर किंवा चुलवणवर एका ओळीत ठेवतात. साधारणः एकाच वेळी सु.२५ भांडयांचा उपयोग करतात. प्रत्येक भांडयात सु.७ किग्रॅ.तुकडे भरतात.

लाकडापासून पहिला अर्क काढण्यास तीन तास लागतात. तीन तासांनंतर भांड्यातील पाणी ओतून काढतात व दुसरे पाणी घालून परत शिजवितात. असे ३-५ वेळा पाणी बदलतात. शेवटच्या खेपेचे पाणी नवीन लाकडाबरोबर शिजवितात.

अर्कयुक्त पाणी मसलिन कापडातून गाळतात व या विद्रावाची संहती (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण) मातीच्या भांडयात वाढवितात. नंतर हा विद्राव बरेच दिवस तसाच ठेवतात. नंतर तो वाळू व मातीयुक्त स्तर असलेल्या भांडयात ठेवून किलतानाने बंदिस्त करतात व १५ दिवस तो तसाच ठेवतात. विद्रावातील विद्राव्य टॅनीन बाहेर पडते व कात आत राहतो. त्याचे ठोकळ्यांत रुपांतर करुन त्याच्या आवश्यक त्या आकाराच्या वडया करतात. ह्या वडया सावलीत वाळवितात. उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये काताला चव येण्यसाठी विद्रावात सेमुळ झाडाची लाकडे एक आठवडाभर ठेवतात व नंतर कात घट्ट करतात.

कात तयार करण्याची वरील पध्दत वेळखाऊ व खर्चिक असून तयार होणाऱ्या कातात टॅनिनचे प्रमाण वेगवेगळे असते, तसेच कातात मलिनता जास्त असते. शिवाय त्यात कच्छ हा उपपदार्थही मिळत नाही. डेहराडून येथील `फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट’ मध्ये झालेल्या संशोधनानुसार कात बनविण्याच्या पध्दतीत सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारलेल्या पध्दतीत कच्छही मिळतो. या पध्दतीमध्ये लाकडाचे तुकडे (२५ किग्रॅं. पर्यंत) तांब्याच्या जाळीवर ठेवतात. ही जाळी तांब्याच्या भांडयात ठेवलेली असते. त्यात पाण्याच्या साहाय्याने (३० लि. पाणी) अर्क काढतात. पहिला अर्क निघण्यास दिड ते दोन तास लागतात. नंतर दोन वेळा अर्क काढतात. यावेळी तीस मिनिटे लाकडे शिजवितात. तिसऱ्या वेळेचा अर्क सौम्य असतो. तो नवीन लाकडाबरोबर वापरतात. सर्व अर्क एकत्रित करुन उघडया काहिलीत त्याची संहमी (घनता १.०७-१.१३ ग्रॅ./घ.सेंमी. होईपर्यंत) वाढवितात व नंतर अर्क २-३ दिवस तसाच ठेवतात. यावेळी काताचे स्फटीक बनतात. ते काढून घेतात व दुसऱ्यांदा स्फटिक मिळवितात. सर्व स्फटिक पाण्याने धुवून ते कॅन्‌व्हासमधून गाळून हातदाब यंत्राने दाबून वडया तयार करतात. प्रथम वडया सावलीत व नंतर ४००से. वर वायूच्या साहाय्याने जाळीवर वाळवितात. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास एक आठवडा लागतो व मिळणाऱ्या मालाचा दर्जा उत्तम असतो. मूळ विद्रावाची संहती तांब्याच्या काहिलीत वाढवून, तो विद्राव लाकडी चौकटीत ओततात. यामुळे कच्छ उत्तम प्रतीचा मिळतो. एकाच झाडाच्या लाकडापासून एकाच वेळी ३-३.५% कात व ८-१०% कच्छ मिळतो.

मोठया प्रमाणावर कात बनविण्याचे काम यांत्रिक पध्दतीने करतात. मोठया प्रमाणात अर्क काढण्यासाठी तांब्याचे ऑटोक्लेव्ह (दाबाखाली शिजविण्याचे पात्र) वापरतात. यामध्ये एका ऑटोक्लेव्हमधून पाणी दुसऱ्यात जाण्याची योजना केलेली असते व अशा रीतीने १२ तासांत अर्क निघतो. अर्काची संहती निर्वातावस्थेत वाढवितात व प्रशीतकामध्ये तो थंड करुन काताचे स्फटीक मिळवितात व ते स्फटिक विद्रावापासून दाब-गा ळणीने अगर केंद्रोत्सारणाने (केंद्रापासून दूर जाणाऱ्या प्रेरणेने) बाजूला काढतात. त्याच्या वडया करुन उष्ण हवेने वाळवितात. पटल बाष्पीभवन पात्रात विद्रावाची संहती वाढवून कच्छ मिळवितात.

काताचे प्रकार:

फूल कात, जनकपुरी कात, गल्ला कात, मधई कात, पापडी कात, गोरा कात इ. काताचे प्रकार बाजारात आढळतात. फूल कात वजनाला हलका व फिक्कट रंगाचा असतो. गोरा कात हा कच्छ, गॅंबिअर व तांबडी माती यांचे मिश्रण असतो. पापडी कातामध्ये खडू व अरेबिक डिंक असतो. सुवासिक कातात बडीशेप, अजमोदा, वेलची, दालचिनी, लवंग, धने, चंदन, केशन, केवडा इ. पदार्थ मिसळतात. बाजारात येणारा कात हा फिक्कट तांबड्या रंगाचा, विविध आकारांमध्ये किंवा चौकोनी वड्यांच्या स्वरुपाचा असतो. तो तुरट असतो. अतिशुध्द काताचे स्फटिक असतात. पण बाजारी कातात सामान्यतः अर्जुनाची साल (चूर्ण), गॅंबिअर कात, कच्छ, हिरडा, गॉल नट, चिनी माती, खडू, स्टार्च, अरेबिक डिंक, तांबडी माती, लोहाचा तांबडा ऑक्साइड इ. मिसळतात. बाजरी काताचे विश्लेषण केल्यास आर्द्रता ११.२ %, कॅटेचीन २१.४ %, कॅटेच्यू टूनिक अम्ल ३४.७ %, इतर कार्बनी पदार्थ २७.१५ % व राख ५.५ % आढळते तर चांगल्या प्रतिच्या कातात कॅटेचीन ६० %, थंड पाण्यात विद्राव्य असणारा भाग ३० %, आर्द्रता ९.२५ %, अविद्राव्य भाग ०.७५ % व राख ०.५ % आढळते.

कच्छ हा करड्या किंवा नारिंगी काळसर रंगाच्या लहान धनाच्या वा ठोकळ्यांच्या स्वरुपात मिळतो. हा कठीण व गंधहीन असून तुरट चवीचा असतो. त्याचे विश्लेषण केल्यास आर्द्रता १०-१२.५ % टूनीन ४५-५० %, टॅनीनविरहित भाग २४-३२ %, राख २-३ % मिळते.

उपयोग:

भारतात काताचा उपयोग विडयातून खाण्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. तसेच त्याचा आयुर्वेदीय औषध म्हणूनही उपयोग करतात. त्याच्यात शीतक, पाचक, जंतुनाशक गुणधर्म आहेत. व्रण, रक्तस्त्राव, त्वचारोग, उपदंश, मूळव्याध व कातडीच्या भेगा यांवर त्याचा पोटातून घेण्यासाठी व बाहेरुनही उपयोग करतात. काताचा इतर औषधांबरोबर चूर्ण, गोळया, आसव, अरिष्ट, मलम इ. स्वरुपांतही उपयोग करतात.

खैराचे लाकूड अतिशय कठिण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, घाण्याच्या लाटा, होड्या, खांब, तलवारीच्या मुठी इ. कामांस ते उपयुक्त असते. जळणासाठी तसेच कोळशाकरिता ते वापरतात.

कच्छचा उपयोग रंजक क्रियेत व कातडे कमावण्यासाठी करतात. तसेच पाण्याशी वारंवार संबंध येणाऱ्या बोटींना व कोळयांच्या जाळ्यांना संरक्षक पदार्थ म्हणून लावतात. कॅलिको कापड छपाईत, लगदा व कागद रंगीत करण्यासाठी, पाणी मृदू करण्यासाठी, स्टेन्सिल व छपाई यांच्यासाठी लागणाऱ्या शाईच्या निर्मितीत, बाष्पित्राच्या (बॉयलरच्या) आतील भागांवर बसणारे पाण्यातील लवणांचे थर नाहीसे करण्यासाठी व खोल असणाऱ्या तेलाच्या विहिरी खोदताना चिखलाची श्यानता (दाटपणा) कमी करण्यासाठीही कच्छचा उपयोग करतात. कातडी कमावण्यासाठी कच्छ वापरल्यास त्यांचा रंग जाऊन ती कठीण होतात.

भारतातील कात उत्पादन, कारखान्यांची संख्या इ. आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. तयार होणारा कात भारताततच वापरला जातो. मात्र काताची आयात व निर्यातही होते. भारतातून ब्रिटनला कच्छ व गॅंबिअर कात निर्यात करण्यात येतो, तर ब्रह्मदेश व सिंगापूर येथून त्याची काही प्रमाणात आयात करण्यात येते. पान खाण्याची सवय असणाऱ्यांना कात शिवाय पान खाणं शक्य नाही. काता शिवाय पान कधीही चांगली चव देऊ शकत नाही.
पण पानात घालणाऱ्या कातच्या औषधी उपयोगा विषयी आपण चर्चा करू.

पानात वापरला जाणारा कात तपकिरी रंगाचा असतो. जो औषधी गुणधर्माचा आहे. ह्याच्या नियमितपणे सेवन केल्याने अनेक रोग नाहीसे होतात.

दातांचे आजार दूर करतो –

कातचे नियमित सेवन केल्याने दाताचे आजार दूर करू शकता. या साठी कात मंजनेत मिसळून दात आणि हिरड्यांना नियमितपणे स्वच्छ केल्याने दाताचे सर्व आजार नाहीसे होतात. ह्याचा वापर करताना लक्षात ठेवा की हे मंजन मध्ये जास्त मिसळायचे नसून फक्त अर्ध्या चिमूटभर घ्यावयाचे आहे.

तोंडाचे छाले दूर करते-

बऱ्याच वेळा काही लोक तोंडाच्या छाल्यापासून त्रासलेले असतात, तर काही लोक पान खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्याचे अर्थ असे असतात की जेव्हा देखील आपण पानाचे सेवन कराल त्या मध्ये कात आवर्जून टाकावा आणि मगच त्या पानाचे सेवन करावं. असं एक किंवा दोन वेळा केल्यानं तोंडातील छाले नाहीसे होतात.

करपट ढेकर दूर होते-

आता कळलेच असणार की कात किती फायदेशीर आहे. जर आपण करपट ढेकर येण्यापासून त्रासलेले असाल तर ते दूर करण्यासाठी आपण कात चा वापर करू शकता. या साठी आपण सकाळ संध्याकाळ एक ते दोन चमचे गरम पाण्यात कातची भुकटी मिसळून सेवन करा. या मुळे करपट ढेकर ची समस्या दूर होईल.

घशात खवखव होणे –

जर आपण बदलत्या हवामानामुळे घशात होणाऱ्या खव-खव मुळे त्रासलेले असाल, तर त्याला दूर करण्यासाठी कात वापरू शकता. यासाठी आपण काताची भुकटी गरम पाण्यात मिसळून किंवा काताची भुकटी चघळून घशातील खवखव दूर करू शकता. बरेच लोक हे सर्दी-पडसं साठी एक प्रभावी औषध मानतात.

कात खैर नावाच्या झाडापासून निघालेल्या लाकडाने मिळतो. हे एक औषधी झाड आहे. असे म्हणतात की आयुर्वेदात विविध प्रकारचे औषध बनविण्यासाठी काताचा वापर करतात. हे पानात लावण्याच्या शिवाय हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडाचे छाले सारख्या त्रासाला दूर करण्यासाठी ह्याचा वापर करतात.

साधारण पणे कातास ५०-६० रुपये किलो भाव मिळतो. परंतु आजकाल ५-१० वर्षात काताची मागणी बरीच वाढली आहे कारण कात सध्या पान मसाला, गुटखा यामद्धे वापरला जातो. वरील उपचार हे वैद्याच्या देखरेखी खाली करावेत.

खाऊचे पान व कात यांचे अतूट नाते आहे. काताशिवाय पान रंगत नाही. गीतकार राजा बढे यांनी लिहलेली व लावणी सम्राज्ञी सौ. सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावणीत काताचे सुंदर वर्णन आहे.
कळीदार कपूरी पान कोवळं छान केसरी चुना
रंगला कात केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
असा हा काताचा रंगतदार महिमा

— डॉ. दिलीप कुलकर्णी.

संदर्भ:

विकेपेडिआ

C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products Vol.V. New Delhi,1960

इ संध्यानंद 07-Apr-2020

Dina Nath Tiwari (1995) A monograph of Khair tree. International Book Depo, Dehradun.

गूगल वरील अनेक लेख.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 58 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

3 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ७- पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष

  1. आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी जसे की कात हा झाडापासून बनवतात त्यांची पद्धत वाचून किती कष्टाचे आहे याची जाणीव होते. निसर्गाची किमया त्याचे शास्त्रीय सौंदर्य लिहून ते सहज सोप्या भाषेत पटेल असे लीहणे ही अवघड गोष्ट आहे.या लेखात कात हा छान रंगला आहे.छान लेख

  2. डॉ. कुलकर्णी ह्यांनी लिहिलेल्या ह्या सदरात खैर वृक्षा बद्द्ल अतिशय तपशीलवार तशीच थोडी रंजक अशी माहिती दिली आहे.काथ, हा बहुउपयोगी पदार्थ ही ह्या वृक्षांनी आपल्या ला दिलेली देणगी आहे. तोंडाच्या आजारांवर ह्यांचा उत्तम इलाज करता येतो, हि माहिती तसेच केसांना रंगवण्यासाठी एक नेचरल डाय म्हणून उपयोग करता येतो, हे मला ह्या लेखातूनच कळलं.

  3. काता विषयी बरीच आणि छान अशी माहिती मिळाली.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..