नवीन लेखन...

नूतनीकरण

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये प्रा. प्रतिभा सराफ यांनी लिहिलेली ही कथा.


‘बेटा, किती दिवसापासून मी तुला सांगतेय… आपल्याला घराचे नूतनीकरण करायचे आहे.कोणाला काम द्यावयाचे ते ठरव.’

‘नूतनीकरण म्हणजे काय?’

‘इतकंही मराठी येत नाही का तुला?’ मी तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकीत बोलले.

‘आत्ता मला त्रास देऊ नको. मी मिड ऑफ द वर्क आहे.’ कविता चिडून म्हणाली.

‘अग, काय हे, घरात तरी थोडं मराठी बोलत जा.’

‘असू दे ना ग आई… नंतर बोलू. ‘हे बघ आता मला सुट्या चालू होणार आहेत. मी असं करते, त्या सिन्हांना बोलावते.’ ‘प्लीज नको… मागच्या वेळेस त्यांनी बाथरूममध्ये असे काही टाईल्स लावले की तीन वेळा उखडावे लागले.’

‘बाकी आपल्या संवादाच्या निमित्ताने इतके बरे झाले की तुला उखडावे वगैरे असे शब्द माहीत आहेत.’ मी हसत हसत म्हटले.

‘आई त्रास देऊ…. नकोस. मुद्याचे बोल.’ ‘बरं…सिन्हांना नाही बोलवत. माधवकाकांना बोलावते…

‘आई… ते किती ओल्ड फॅशन्ड आहेत.

माझ्या आजी-आजोबांच्या वयाचे आणि त्यांच्यासारख्याच थॉटचे.’

तिचे हे वाक्य पूर्ण होण्याआधीच सासूबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि कमरेवर हात ठेवून म्हणाल्या, ‘ओल्ड फॅशन्ड कोणाला म्हणालीस तू…

‘अगं… आजी तुला कसे ग ओल्ड फॅशन्ड म्हणेन गं मी. त्या माधवकाकांना म्हटले.’

कविता खुर्चीवरून उठून आजीला बिलगत म्हणाली. सासूबाई कालच पार्लरमध्ये जाऊन केस कापून आलेल्या होत्या. त्या मोकळ्या केसांना का क्लिप लावत मनापासून हसल्या. त्यांनी कविताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या तेथून निघून गेल्या.

‘हे बघ, माझ्या ओळखीपाळखीचा कोणी कॉन्टॅक्टर नाही. तू काय तो निर्णय घेऊ शकतेस…कविता… तूच डोके खाल्लेस म्हणून मी हे नूतनीकरणाचे मनावर घेतले. तुला जर इंटरेस्ट नसेल तर मी माझ्याकडे असलेल्या पैशाचा वेगळा विनियोग करते.’

‘विनियोग म्हणजे काय?

‘म्हणजे वापर.

‘कशासाठी वापर करणार आहेस तू ते पैसे?’ ‘सोनं घेणार.’

‘लॉकर सजवण्यासाठीच ना?’

मी मान हलवून ‘नाही’ म्हटले.

‘नाही… काही बोलू नकोस… सगळेच्या सगळे दागिने त लॉकरमध्ये नेऊन टाकलेस.’

‘मग काय करणार? अंगावर घातले तर भीती… घरात ठेवले तर भीती… त्यापेक्षा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित तरी राहतात.

”मग मी काय वेगळे बोलले? दागिने लॉकरला सुख देणार ना? स्वत:ला ना त्याचा आनंद दुसऱ्यांना नेत्रसुखही नाही.’

का’तुला हेही नको आणि तेही नको.’

‘आगं आई… घर सजवलं तर कसं आपल्यालाही नेत्रसुख मिळतं आणि घरात आलेल्यांनाही. माझ्या ओळखीची माणसं तुला नकोत. तुला कोणाला बोलवायचे नाही, मग काय करायचे?’

‘नाही थांब… आज आत्ता फोन करते. माझा एक क्लासमेट आहे इंटिरिअर डेकोरेटर झाला आहे तो.

‘बापरे! म्हणजे आपणच गिनीपिग की काय?’ ‘म्हणजे?’

‘म्हणजे असं की आत्ता डिग्री घेतली आणि आपलंच घर त्याच्या हातात द्यायचे पहिल्यांदाच.’

‘अगं आई… तो ना मॅकनोर युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेऊन परतलाय… तेही यू.के.वरून!’ ‘बापरे! म्हणजे आपले फॉरिन टाईप घर बनवणार की काय तो आपले?’

‘फॉरेन टाईप म्हणू नकोस…. मॉडर्न म्हण हवे तर…

‘हे बघ बाई, तो खूप महागडा असेल. तो त्याची चार वर्षाची इंटेरियर डेकोरेटर कोर्सची सगळी फी तो आपल्याकडूनच वसूल करणार.’ मी म्हटले.

‘खरंच की काय कविता…?’ आजी स्वयंपाकघरातून चहाचा कप पेलवत हॉलमध्ये येऊन बसता बसता खोचकपणे म्हणाली. कविता यावर काहीच बोलली नाही.

मग मीच विचारले, ‘बरं बाई… नाव काय त्याचं?’ व साडीला हात पुसत सासूबाईंनी विचारले. ‘काय पोरगी द्यायचीय की त्याला? त्याचं नाव विचारताय?’

मी सासूबाईंना वैतागून म्हणाले. नाराय ‘ए चूप तू. नावावरून माणूस कळतो.’ सासूबाई त्या दिवशी भारीच उत्साहात होत्या. ‘ज्योतिषविद्या येते की काय तुम्हाला?’ ‘तू मध्ये मध्ये बोलू नकोस… मी कविताशी बोलते आहे ना… कळलं?’

सासूबाई मोठे डोळे करीत मला म्हणाल्या. ‘त्याचे नाव राघव.’ कविता म्हणाली.

‘वाह… मराठी दिसतोय.’

‘नाही.’

राघव तिवारी… भय्या आहे.’ मी म्हटले.

‘भैय्या नाही… माझा मित्र आहे.’ कविता काहीतरी मोबाईलवर स्क्रोल करीत बोलली.

मी आणि सासूबाई मात्र खळखळून हसू लागलो. तसे चमकून कविताने आमच्याकडे

पाहिले आणि म्हणाली, ‘हसायला काय झालं?’

‘काही नाही…’ म्हणत आम्ही परत हसू लागलो. कविता आमच्या दोघींकडे रागारागाने बघत स्वत:चा आय फोन उचलून बेडरूमकडे निघून गेली. दार खाडकन लावल्याचा आवाज आम्हाला ऐकू आला आणि आम्ही दोघी परत हसू लागलो..

आठ-दहा दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. मी दासबोधाचा क्लास संपवून घरी आले. दार उघडले तर समोरच एक मुलगा बसलेला होता. निळे जीन्स पँट आणि पिवळ्या-निळ्या चौकडीचा शर्ट त्याने घातलेला होता. पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने हलके हलके उडणारे त्याचे सिल्की केस मस्त दिसत होते. मी घरात शिरताच त्याचे मोठे डोळे अजून मोठे करत तो उभा राहिला. हसून माझ्याकडे पाहिले आणि माझ्याजवळ येत त्याने पटकन वाकून मला नमस्कार केला. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवत कविताकडे पाहून एक भुवई उंचावत ‘कोण?’ असे दर्शविले तर ती म्हणाली, ‘अगं हा राघव तिवारी!’

‘हो तो इंटेरियर डेकोरेटर?’ मी आठवत लगेच म्हणाले. स्वत:च्या स्मरणशक्तीचे मला कौतुक वाटले. इतक्यात सासूबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. सोफ्याकडे वाकून बघत म्हणाल्या,

‘यू. के. रिटर्न ना?

कविताने रागारागाने तिकडे पाहिले. आजीला काहीतरी चुकल्यासारखे जाणवले.

‘सॉरी… सॉरी…’ असं काहीसं म्हणत त्या परत त्यांच्या बेडरूमकडे निघून गेल्या.

‘हॅलो आंटी…’ मागून आवाज आला.

मी चमकून मागे पाहिले. तसा एका मुलाने

हात पुढे केला. मी थोडीशी दचकलेच पण ताळ्यावर येत हात पुढे केला तसा त्याने शेकहँड केला आणि म्हणाला,

‘मी राहुल जोशी.’

काळी जीन्स पँट, दहा ठिकाणी फाटलेली… जागोजागी ठिगळं लावलेली… (हो… कसली भिकारडी फॅशन… फाटकी आणि ठिगळं लावलेल्या पँटी का घालतात?)

मी त्याच्याकडे निरखून पाहू लागले. केसाची लांब वेणी घालून त्याचा मस्त डोक्यावर अंबाडा बांधलेला… एका हातात मुलींसारखे ब्रेसलेट, एका कानात डूल!

‘अगं हा कोण? ओळख तरी करून दे.’ त्याच्याकडे अंगुलीनिर्देश करीत मी विचारले.
‘सॉरी… सॉरी… ओळख करून द्यायचीच राहिली. हा राहुल जोशी, राघवचा मित्र!’ कविता म्हणाली.

‘जोशी…?’ या अवताराकडे पाहून अकस्मात माझ्या तोंडातून हा उच्चार निघाला. कोणाला काहीच कळले नाही बहुतेक. मात्र तो मुलगा म्हणाला,

‘बरोबर आंटी. राहुल जोशी…’

मी आले तेव्हा तो बहुधा वॉशरूममध्ये गेला असावा. आमचे बोलणे चालू असतानाच सासूबाई पाण्याची तीन ग्लास घेऊन बाहेर आल्या. त्यांनी मुलांकडे पाहून विचारले,

‘तुम्ही चहा घेणार का?’

तसे सोफ्यावरून उठत मी म्हणाले, ‘मी बनवते चहा.

राघव म्हणाला, ‘आंटी, अभी घरसे आये है… कुछ बनानेकी जरुरत नही. ।’

‘अरे बेटा, चाय तो…’

‘नहीं प्लीज… नहीं आप बैठो ना.’

तरीही मी उठून स्वयंपाकघरात गेले. कविताही मागोमाग आली.

‘अगं आई, त्याने आल्या आल्या सांगितले मला तो काहीही खाणार नाही म्हणून. ‘हो असू दे.’ असं म्हणत मी एका प्लेटमध्ये बाकरवडी काढली आणि फ्रीजमध्ये धुवून ठेवलेले दोन द्राक्षाचे घड उचलून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवले. त्या दोन्ही प्लेट्स बैठकीतल्या टीपॉयवर ठेवल्या आणि आम्ही बोलायला सुरुवात केली.

राहुलने शांतपणे समोर ठेवलेले खायला सुरुवात केली आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करीत बसला.

राघव, मी आणि कविता घरात नेमके काय बदल करायचे त्याबद्दल बोलत होतो. बोलता बोलता आम्ही बेडरूममध्ये गेलो तर राघव म्हणाला,

‘वाव… क्या बेडशीट है, टेक्स्चर और प्रिंट फॅन्टॅस्टिक है… मुझे बहोत अच्छा लगा ।’

मी तिरकसपणे कविताकडे कटाक्ष टाकला आणि स्मितहास्य केले. तिला काय ते कळले. तिने मला कित्येकदा सांगितले होते की ही बेडशीट टाकत जाऊ नकोस. चला तिच्याच वयाच्या कोणाला तरी आवडली याचा मला आनंद झाला. मग या खोलीमध्ये काय काय बदल करायचे हे आम्ही ठरविले. नंतर आम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये गेलो. तिथे आमचा आरसेवाला ड्रेसिंग टेबल आहे. तो पाहून राघव चित्कारला ‘बढिया…मैने तो कभी सोचाही नही था की इस कॉर्नरका ऐसा यूज कर सकते है ।’

मी परत कविताकडे पाहिले. या जागेचा असा उपयोग करावा, हे मी सुचविले होते. पण ती जागा मोकळी सोडावी असे कविताने सांगितले होते. मग आम्ही परत बैठकीच्या खोलीत आलो. बैठकीत बंद लाकडी कपाट होते. ते पाहून राघवने विचारले,

‘आप लोक क्या रखते है इसमें?’ मी आनंदाने आणि कविताने चिडून उत्तर दिले, ‘बुक्स!’

‘तो बस्स इस कबर्ड को कांचका डोअर बनाना चाहिये था अच्छा इम्प्रेशन पडता था ।’ मी त्याला म्हटले, ‘हमने इस कबर्ड को जब बनाया था, तो काचकाही डोअर लगाया था…

पर कविता को पसंद नही था । बुक्स बाहरसे दिखते है और बुरा इम्प्रेशन पडता है।’

(मनात म्हटलं, तिच्या म्हणण्यानुसार केवळ पसारा.)

‘नहीं नहीं… बुक्स तो बहोत अच्छे दिखते है।’ इतकेच बोलून तो थांबला नाही व त्याने लगेच मोबाईलवर स्क्रोल केले आणि त्याच्या घरातील हॉलमधला कपाटाचा फोटो दाखविला. काचेचे लाकडी कपाट पुस्तकांनी भरलेले होते. छोट्या-मोठ्या आकाराची पुस्तके वेडीवाकडी आत ठेवलेली होती. म्हणजे या पुस्तकांचा नक्की वापर होता हे पाहताक्षणी लक्षात आले.

मी म्हटले, ‘ग्रेट बेटा… दिल खुश हो गया।’ मला दाखवून झाल्यावर त्याने तो मोबाईल कविताच्या पुढे धरला. कविताने पाहिले पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी सहज त्याचा मित्र राहुल जोशीकडे पाहिले. एव्हाना त्याने समोरच्या दोन्ही डिश अर्ध्यापेक्षा जास्त संपवल्या होत्या.

मी सहजच म्हणाले, ‘चलो, अब मैं सब के लिए कॉफी बनाती हूँ।

‘नही आंटी बिलकूल नहीं… आप बैठो ना ।’ राघव म्हणाला. तर मोबाईलमधून डोकं वर काढून राहुल म्हणाला, ‘मला आवडेल कॉफी प्यायला.

‘चला, मी आता दोन कप आम्हा दोघांसाठी आणि दोन कटींग तुम्हा दोघांसाठी कॉफी बनवते.’असे म्हणत मी स्वयंपाकघरात शिरले. मी दोन-तीन वेळा कविताशी बोलत हॉलमध्ये येऊन गेले तर राघव स्वत:च स्वयंपाकघरात आला आणि गप्पा मारत तिथेच उभा राहिला. त्याचा कामातला उत्साह वाखाणण्याजोगा होता. तो आल्यापासून एकही मिनीट शांत बसला नव्हता. सारखा उभाच होता. हलत डुलत होता. उत्साहाने काही सुचवत होता. आमच्या तिघांची कॉफी पिऊन संपली तरी त्याने कॉफीच्या मगाला हातही लावला नव्हता. बऱ्याच मुद्यांवर आमची चर्चा झाली. तो जे काही सांगत होता ते मला पटत होते पण कविताला काहीच पटत नव्हते. तो सतत काही बोलला की, अपेक्षेने माझ्याकडे पाहत होता. त्याची इच्छा होती की मी समजून घेऊन कवितालाही समजवावे. मी त्याला म्हटले,

‘बेटा, मैं सिर्फ फायनान्सर हूँ. बाकी पसंद कविता की है ऐसाही घर बनेगा.

हे मी बोलत असताना, मला कोणाचा तरी फोन आला म्हणून मोबाईल उचलून मी

बेडरूममध्ये गेले. तर सासऱ्यांनी विचारले, ‘झाले का कविताच्या मनासारखे?’

खरं तर त्यांची आणि माझी आणि सासूची इच्छा नव्हती या घरात काही नूतनीकरण करण्याची. पण करणार काय? मी म्हटले,

चालली आहे चर्चा….. पाहू काय होतयं ते. साधारण अर्ध्या तासाने कविताने आवाज दिला म्हणून मी बाहेर आले. तेव्हा राघव म्हणाला ‘चलो आंटी चलते है… फिर मिलेंगे। राहुलच्या समोरच्या रिकाम्या प्लेट्स उचलत म्हटले, ‘जरूर बेटा… माय प्लेझर…

ते दोघे बाहेर पडले आणि पाच मिनिटात कविताही स्पोर्ट्स शूज घालून वॉकसाठी निघून गेली. मी आणि सासरे बराच वेळ चर्चा करत बैठकीच्या खोलीत बसून होतो. इतक्यात कविता घरी आली. मी तिला विचारले,

‘काय ठरलं बेटा?’

ती इतकंच म्हणाली, ‘काय ठरणार? मला नाही वाटत मी त्याच्याकडून काही काम करून घेईन.’

मी विचारले, ‘का?”

तर म्हणाली, ‘तो तुझ्या टाईपचा मुलगा आहे.’

हे बोलता बोलताच तिने पायातले शूज आणि सॉक्स काढून फेकले होते. ती उठली आणि मग बाथरूमचा दरवाजा जोरात लावल्याचा आवाज आला. मी आणि सासू-सासरे उठून आपापल्या बेडरूममध्ये गेलो. मला मात्र राघव खूप आवडून गेला. घराच्या नूतनीकरणासाठी आणि कविताच्या आयुष्याच्या नूतनीकरणासाठीही!

– प्रा. प्रतिभा सराफ


इ-१५०३, रुणावल सेंटर, गोवंडी स्टेशन रस्ता,
देवनार, मुंबई -४०००८८
मो. ९८९२५३२७९५
ईमेल :pratibha.saraph@gmail.com

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..